तारुण्य तुझ्या हृदयाचे असेच बहरत राहो
वार्धक्य तुझ्या जगण्याला असेच विसरत राहो
तलवार तुझ्या गीतांची बिजलीसम तळपत राहो

या ओळी आहेत कवी सुरेश भट यांच्या पण त्या लागू पडतात प्रख्यात ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना. याचं कारण आशा भोसले यांचा चिरतरुण आवाज. आशाताई यांच्या संगीत विश्वाच्या आकाशातला ध्रुवताराच निखळून पडलाय की काय? अशी भावना आज प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे. कारण आशा भोसले यांच्या आवाजाची जादू तुम्ही आम्ही आणि मागची ऐंशी वर्षे कैक पिढ्या अनुभवत आहेत. आज या सूर सरस्वतीने अखेरचा श्वास घेतला आणि घरातली व्यक्ती निघून गेल्याची भावना निर्माण झाली.

ऐंशी वर्षांहून अधिक काळ प्रदीर्घ काळ गाणं गात होत्या आशाताई

१९४३ ते २०२४ अशी प्रदीर्घ कारकीर्द असलेल्या आशा भोसलेंनी लाइव्ह कॉन्सर्ट करणं सोडलं होतं पण गाण्याची उर्मी कायम होती. त्यांच्या अखेरच्या दिवसांमध्ये त्यांनी गायलेलं ब्रम्हा-विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले या गाण्याचा व्हिडीओ आशिष शेलार यांनी पोस्ट केला आहे. त्यात त्यांचे उच्चार, त्यांचं गाणं म्हणायची विशिष्ट लकब आणि त्यांचा आत्मविश्वास त्यांच्या चिरतरुण आयुष्याची खात्री पटवतोय यात काहीही शंका नाही.

Asha Bhosle News
आशा भोसले यांच्या आवाजाची भुरळ आजच्या पिढीलाही आहे. ही त्यांच्या गाण्यांची खासियतच म्हटली पाहिजे. (फोटो-आशा भोसले, फेसबुक पेज)

आम्ही राज्य केलं आहे..

आशा भोसले यांनी एका मुलाखतीत राज ठाकरे यांचा एक किस्सा सांगितला होता की त्यांनी आशा भोसलेंना विचारलं होतं की तुम्ही (आशा भोसले) आणि दीदींनी (लता मंगेशकर) यांनी काय केलंत? त्यावर मी न थांबता उत्तर दिलं होतं की आम्ही राज्य केलं आहे. आशाताई म्हणाल्या होत्या ते खरंच आहे. गाणं वाचलं की ते किती सजवता येईल ते सजवायचं असं आशा भोसले म्हणाल्या होत्या ते किती खरं आहे हे त्यांची गाणी ऐकल्यावरच कळतं. मराठी लावणी असो, नाट्यसंगीत असो, मराठी भावगीत असो, शास्त्रीय गायन असो, हिंदी गाणी असोत, गझल असो गाण्याच्या सगळ्या प्रांतात त्या मुक्तपणे वावरत होत्या. फुलपाखरु जसं प्रत्येक फुलावर बसत स्वैरप्रमाणे संचार करतं त्याचप्रमाणे आशा भोसले गात होत्या. Versatile म्हणजे बहुढंगी असं त्यांचा आवाज होता. आपला आवाज, संगीत कुणाचं आहे? कुणासाठी पार्श्वगायन करतो आहोत या प्रमाणे आशा भोसले गात होत्या, गात राहिल्या. ‘ऋतू हिरवा’ असो, ‘मलमली तारुण्य माझे’ असो ते अगदी रंगीलातलं ‘तनहा तनहा’ असो किंवा कारवाँमधलं ‘पिया तू अब तो आजा’ असो कुठलंही गाणं काढून ऐका ते ऐकणाऱ्याला ताजंतवानं करुन जाईलच. ही किमया त्यांनी त्यांच्या आवाजातून साधली होती. त्यांच्या गाण्याचं वेगळेपण म्हणजे त्यांच्या आवाजाचे विविध पैलू. त्यामुळेच त्या लतादीदींपेक्षा वेगळ्या ठरल्या.

लता मंगेशकर यांच्याशी थेट स्पर्धा

राजकारणातली तुमची आवडती व्यक्ती कोण असा प्रश्न एकदा आशाताईंना विचाऱण्यात आला होता, त्यावेळी त्यांनी हसत उत्तर दिलं होतं की जी बाई घरातलं राजकारण सांभाळू शकली ती देशातल्या राजकणारवर काय बोलणार? आशा भोसले आणि लता मंगेशकर या दोघींनी जेव्हा गाणं गायला सुरुवात केली, तो काळ बऱ्यापैकी सारखा होता. त्यामुळे या दोघींमध्येही स्पर्धा आहे असं बोललं जायचं. अगदी लतादीदी हयात असेपर्यंत या चर्चा रंगायच्या. याबाबत आशा भोसलेंनी २०१८ मध्ये सुधीर गाडगीळ यांना दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलं होतं. दीदी एक टोक घेऊन गात राहिली. तिची गाणी तिच्या शैलीला साजेशी संस्कारी, निर्मळ, शांत असायची. दुसरं टोक घेऊन मी गात राहिले, माझी गाणी ही माझ्यासारखी अवखळ असायची. त्यामुळे मी कुठलं गाणं गायचं आहे हे काही बंधन ठेवलं नाही. आम्ही दोघींनी एक काळ राज्य केलं आहे, मात्र काळानुरुप आपल्याला बदलावं लागतं हे देखील खरं आहे असंही आशा भोसले या मुलाखतीत म्हणाल्या होत्या.

Asha Bhosle
लता मंगेशकरांशी स्पर्धा होती का? याबाबत काय म्हटलं होतं आशा भोसलेंनी? (फोटो सौजन्य-फेसबुक पेज-आशा भोसले)

लतासारखं गाते हे म्हटलेलं मला आवडायचं नाही, असं आशा भोसले का म्हणाल्या होत्या?

९० च्या दशकात मुलाखतकार सलील चौधरी यांनी आशा भोसले यांची एक मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत लतादीदींसह जो तुमचा सांगितिक प्रवास झाला तेव्हा लता मंगेशकरांपासून तुम्ही स्वतःला वेगळी शैली कशी काय निर्माण केलीत? असा प्रश्न विचारला होता. त्यावेळी आशा भोसले म्हणाल्या होत्या, “लतादीदी माझी मोठी बहीण होती. त्यातून दीदी सुंदर गायची त्यामुळे मी सुरुवातीला तिची नक्कल करायचे. दीदी जसं गायची तसंच मी गायची. मोठ्या बहिणीची नक्कल करणं हा त्यामागचा स्थायीभाव होता. कुठलंही गाणं दीदीने म्हटली की मी तसंच गाणं त्यावेळी म्हणायची. पण मला हे लक्षात आलं होतं लता मंगेशकर हे नाव इतकं मोठं झालं होतं की तिच्यासारखं गाणं म्हणणाऱ्याला कोण चान्स देणार? लोक म्हणायचे ही (आशाताई) बहिणीसारखं म्हणजेच लतासारखं गाते. लतासारखं गाते असं जेव्हा लोक म्हणायचे ते मला आवडायचं नाही.

शांता शेळके आशा भोसले यांना काय म्हणाल्या होत्या?

प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री शांता शेळके या एकदा आशा भोसले यांना म्हणाल्या होत्या की तू अभिनेत्री का होत नाहीस आशा? त्यावर आशा भोसले म्हणाल्या होत्या की मी रोज आरशात स्वतःचा चेहरा पाहते आणि मला ठाऊक आहे की मी अभिनेत्री नाही. शिवाय हा किस्सा सांगत असताना २०१८ मध्ये दिलेल्या मुलाखतीत त्यांनी लोकांकडे पाहिलं आणि प्रश्न विचारला होता की खरं सांगा वयाच्या ८५ व्या वर्षापर्यंत हिरोईन टिकते का हो? मी जे गाते आहे, जे जगते आहे त्यामुळे लोकांना मी आवडते आहे. वयाच्या दहाव्या वर्षी हातात माईक आला तो सुटू नये अशी माझी इच्छा आहे. तो सुटणार असेल तर त्याबरोबर माझा जीव जावा असंही त्या म्हणाल्या होत्या. गाण्यावर त्यांनी अतोनात प्रेम केलं आणि ती कला आपल्या रक्तात भिनवून घेतली होती त्यामुळेच त्यांचं वेगळेपण हे सतत जाणवत होतं, यापुढेही जाणवत राहिल. खडतर आयुष्य जाऊन, आयुष्यात अनेक चढ उतार पाहून सदैव हसतमुख राहणं आशाबाईंनी आयुष्याला शिकवलं होतं. त्यामुळे त्यांची उणीव ही कैक पिढ्यांना जाणवत राहिल.

जिवलगा गाण्याचा तो किस्सा काय?

हृदयनाथ मंगेशकरांच्या चाली समजून घेणं फार अवघड आहे. बाळासाहेबाचं गाणं अवघड आहे. लोकांना ऐकताना ते फार सोपं वाटत असेल पण गाणाऱ्याला त्यातला अवघडपणा जाणवतो. तो नुसता पेटी वाजवून ते गाणं गाऊन दाखवतो, पण त्याचं गाणं आलं की आम्हाला धडकी भरायची. दीदीलाही धडकी भरायची, ती म्हणायची हा काहीतरी वात्रटपणाच करतो. बाळ (हृदयनाथ मंगेशकर) तसा वात्रटच आहे. जिवलगा हे सात मिनिटांचं गाणं एका टेकमध्ये करायचं होतं, म्युझिशियन फक्त तबलेवाला आणि आणखी वाद्य होतं. जिवलगा हे असं गाणं आपल्या जिवनाशी संबंध. बाळचं इतकं चांगलं गाणं मला मिळणं अवघडच होतं असंही आशा भोसले म्हणाल्या होत्या. त्यावर एकच हशाही पिकला होता. त्यांनी याच मुलाखतीत लता मंगेशकर यांची उत्तम नक्कलही केली होती.

आर.डी. बर्मन यांच्यामुळे बदललं आशाबाईंचं आयुष्य

मंगेशकर घराण्यातल्या आशा भोसले या लता, उषा, मीना आणि हृदयनाथ मंगेशकर या सगळ्यांपेक्षा वेगळ्या ठरल्या. या सगळ्या भावंडांमध्ये आशाबाईंनी १६ व्या वर्षी जे केलं ते लतादीदींना अनपेक्षित होतं. आशा भोसले यांनी वयाच्या १६ व्या वर्षी ३१ वर्षीय गणपतराव भोसलेंशी लग्न केलं. त्यानंतर आशा भोसले हे नाव त्यांना चिकटलं ते कायमचंच. या लग्नानंतर आशा भोसले आणि लता मंगेशकर यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. १९६० च्या सुमारास आशाताई गणपतराव भोसलेंपासून विभक्त झाल्या आणि नंतर त्यांच्या आयुष्यात आले राहुल देव बर्मन अर्थात आर.डी. बर्मन. प्रतिभावान संगीतकार अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती. आशा भोसले आयुष्यात आल्या आणि आर.डी. आणि आशा यांची चांगली मैत्री झाली. १९७१ मध्ये आर.डी. बर्मन यांचा त्यांच्या पत्नीशी घटस्फोट झाला. त्यानंतर ८० च्या दशकात राहुल देव बर्मन आणि आशा भोसले यांनी लग्न केलं. पंचमदा अर्थात राहुल देव बर्मन हे आशाताईंपेक्षा सहा वर्षांनी लहान होते, त्यामुळे या लग्नाला विरोध झाला होता. पण दोघांचे सूर जुळले आणि मग आर.डी. बर्मन यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत आशाताई त्यांच्याबरोबर राहिल्या. पंचमदांमुळे आशाताईंचं आयुष्य ‘इस्टमन कलर’ सारखं होऊन गेलं असं म्हटलं तर मुळीच वावगं ठरणार नाही.

Asha Bhosle and Rahul Dev Barman
राहुल देव बर्मन यांच्यामुळे आशा भोसलेंचं आयुष्य कसं बदललं? (फोटो-आशा भोसले, फेसबुक पेज)

गायनाची अलौकिक प्रतिभा लाभलेल्या आशाताई कालवश

आपल्या गायकीने, वैविध्यपूर्ण गाण्यांनी, मराठी, हिंदीसह २० भाषांमध्ये गाणी म्हणणाऱ्या आशाताईंनी जगाचा निरोप घेतलाय. त्यांचं जाणं हे चटका लावून जाणारं तर ठरलंय. आशाताईंना अलौकिक प्रतिभा लाभली होती. लता मंगेशकर गेल्या तेव्हा जसं जग हळहळलं होतं आज तशाच काहीशा भावना आपल्या प्रत्येकाच्या मनात आहेत. आपल्या आठ दशकांच्या कारकिर्दीत वैविध्यपूर्ण गाणी आशाताईंनी गायली, ती अजरामर केली. त्यामुळे त्यांच्या अनेक गाजलेल्या गाण्यांपैकी एका गाण्याच्या ओळी आपण सगळेच मनात गुणगुणत असू अशी खात्री वाटते. “अभी ना जाओ छोडकर.. के दिल अभी भरा नहीं…!’ आशाताईंच्या स्मृतींना विनम्र अभिवादन.