मंगलप्रभात लोढा

मी एक कथा वाचली होती. एक लहान मूल पळवले जाते. पोलीस शोधून काढतात, परंतु त्या लहान बाळाची खरी आई कोण याचा खटला न्यायालयात जातो. न्यायालयाला निर्णय देणे अवघड होते. अखेर न्यायमूर्ती विचार करून निर्णय देतात की त्या लहान मुलाचे दोन तुकडे करून प्रत्येकीला एक तुकडा द्यावा. त्याबरोबर त्या बाळाची जी खरी आई असते ती आकाशपाताळ एक करते. हंबरडा फोडते. माझ्या बाळाचे तुकडे करू नका, भले ते बाळ त्याच्या खोट्या आईकडे वाढले तरी चालेल, असे कळवळून विनविते. सध्याची अनेक एनजीओंची समाजाबद्दलची भूमिका अगदी अशीच आहे असे मला वाटते. श्रेय मिळाले नाही तरी समाज कोरोनातून वाचला पाहिजे हे ध्येय समोर ठेऊन अनेक संस्था काम करत आहेत.

लॉकडाउनच्या सुरुवातीपासूनच अनेक संस्था, संघटना समाजाच्या मदतीला धावल्या. गरजू व्यक्तींसाठी कम्युनिटी किचन चालवण्यापासून एकटे राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना जेवणाचे डबे पोहोचवण्यापर्यंत आणि लोकांना आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीची औषधे पोहोचवण्यापर्यंत सर्व कामे त्यांनी केली. अनेक गरजू कुटुंबांना महिन्याचा शिधा पोहोचवला गेला. वैद्यकीय मदत आवश्यक असलेल्या रुग्ण आणि वयस्कर व्यक्तींना स्वतःच्या वाहनाने अनेकांनी रुग्णालयापर्यत कोरोनाचा धोका पत्करून ने-आण केली. खाजगी डॉक्टरांना पीपीई किट वाटले आहेत. लॉकडाउनमध्ये अडकलेल्या श्रमिकांना भोजन देण्यापासून ते गरजू कुटुंबाना धान्य देणे, गावी परत चाललेल्या श्रमिकांना भोजन, वैद्यकीय सुविधा देणे, त्याचबरोबर एकट्या राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणे या स्वयंसेवी एनजीओनी केले.

जिथे सरकारी यंत्रणा पोहोचायला वेळ लागत होता तिथे समाजाने या संस्थांच्या मदतीने खिंड लढवली. अनेक डॉक्टरांनी कोरोनाच्या धोक्यताही दवाखाने उघडून समाजाची सेवा केली. राजचंद्रजी संस्थान गुरुदेव राकेशभाईंच्या नेतृत्वात गेले तीन महिने एकही दिवस खंड न पडता मुंबईतील सर्व कोविड केंद्रांना दिवसातून तीन वेळा भोजन नाश्ता पुरवत आहेत. तर जियो/जीतो संस्थेने मुंबईत दोन कोविड केंद्रे चालवली आहेत. अक्षरशः लाखो लोकांपर्यंत ही सेवाकार्ये पोहोचली आहेत.

मुंबईतील धारावी झोपडपट्टी कोरोनामुक्त झाल्याचे वाचले. मुंबई भाजपाचा अध्यक्ष म्हणून आनंद वाटला. राज्य कोरोनाच्या विळख्यात सापडले असताना अशी घनदाट लोकवस्ती कोरोनामुक्त करणे सोपे नाहीच.

त्यासोबतच हे लक्षात घेतले पाहिजे की या कामात अनेक सामाजिक धार्मिक संस्थांची मदत झाली आहे. या संकटात सरकारच्या खांद्याला खांदा लावून अनेक सामाजिक संस्था लढत आहेत. नागरिक जमेल ती मदत करत आहेत. समाजावर जेव्हा संकट येते तेव्हा राजकीय मतभेद विसरून सर्वांनी एकदिलाने त्याला सामोरे जायचे असते ही भारतीय संस्कृती आहे. ही संस्कृती आपला समाज नेहमीच पाळत आलाय. मुंबईतच नव्हे तर देशभरातच या कोरोना संकटात रास्व संघ सर्व शक्तिनिशी मदत कार्य करत आहे. लायन्स रोटरीसारख्या संघटना आणि अनेक धार्मिक संस्था, मठ, मंदिरे शक्य ती सर्व मदत करताहेत. मी हे नक्की सांगू शकतो की ही मंडळी कधीही श्रेयासाठी काम करत नाहीत. किंबहुना अजिबात श्रेय नाही मिळाले तरी त्यांच्या समाजाप्रती असलेल्या बांधिलकीत काहीही फरक पडत नाही. यापूर्वी मुंबईवर आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि आतंकवादी हल्ल्यांच्या वेळी संघाने, अन्य संस्थांनी प्रशासनाला केलेली मदत ज्यांना माहीत आहे, त्यांना कोणत्याही श्रेयासाठीचे हे मदतकार्य नाही हे निश्चित ठाऊक आहे. परंतु दुसऱ्याचे श्रेय लपविण्याची महाराष्ट्राची राजकीय संस्कृती कधीच नव्हती, याचेही भान सर्वांनी राखले पाहिजे.

धारावीत नक्की काय घडले ?

या सर्व सेवाकार्यातील धारावी केवळ एक उदाहरण आहे. लॉकडाउनमध्ये अनेक दिवस धारावीत गोंधळाची अवस्था होती. त्यातून धारावीत कोरोनाचा उद्रेक पसरत होता. धारावीतील कोरोनाचा उद्रेक रोखण्याकरता निमुळत्या गल्लीबोळातून घरोघरी जाऊन शेवटच्या व्यक्तीपर्यंत “जनतपासणी” करणे आवश्यक होते. प्रशासनावर आधीच प्रचंड ताण होता. अशावेळी संघासह अनेक एनजीओ या धोकादायक कार्यात प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून उतरल्या.

निरामयसेवा फाऊंडेशनमार्फत अनेक डॉक्टर्स या जनतपासणी मोहिमेत उतरले. त्यांना मदतनीसांची गरज होती. म्हणून ५१ डॉक्टरांच्या जोडीला रास्व संघाचे तंदुरुस्त असलेले २० ते ४० वयोगटातील ५१२ स्वयंसेवक या कार्यात उतरले. त्यांनी मनपाच्या मार्गदर्शनानुसार जनतपासणी मोहीम राबवली. या मोहिमेत रविवार दि. ७ जून रोजी एकाच दिवशी दहा हजाराहून अधिक धारावीकरांची तपासणी पूर्ण करण्यात आली. मी स्वतः त्या दिवशी धारावीत उपस्थित होतो. धारावीत संघाच्या माध्यमातून एकूण ११८५० नागरिकांची तपासणी करण्यात आली.

मी पाहिलेले धारावीतील दृश्य भावनिक होते. इतक्या मोठ्या संख्येने डॉक्टर आणि कार्यकर्ते थेट आपल्या दाराशी आल्यामुळे धारावीकर भारावून गेले होते. धारावीत अनेक ठिकाणी या डॉक्टरांच्या गळ्यात फुलांच्या माळा घालून त्यांचे स्वागत झाले. पीपीई किटमुळे आपण दिलेला चहा ते घेऊ शकत नाहीत याची खंत अनेकांनी बोलून दाखवली.

अनेक संस्थांची मदत

मुंबईत या सेवाकार्यात जनकल्याण समिती, सेवांकुर, निरामय फाऊंडेशन, स्वामीनारायण संप्रदाय, अनिरुद्ध बापूंची संस्था, नानासाहेब धर्माधिकारींची संस्था, पांडुरंगशास्त्री आठवलेंची संस्था, नरेंद्र महाराजांचा संप्रदाय, रोटरी आणि लायन्स क्लबचे लोक, श्री राजचंद्रजी संस्थान, जियो जीतो संस्था, अनेक जैन संघटना अशा अनेक संस्था आहेत. १५ मेपासून महिनाभरात “सेवांकुर” संस्थेने के पश्चिम वॉर्डमध्ये हॉटस्पॉट असलेल्या नेहरूनगरात प्रत्येक घराचे स्क्रिनिंग पूर्ण केले. त्यापाठोपाठ भांडुप, घाटकोपर आणि गोवंडी येथेही स्क्रिनिंगचे काम या संस्थेने पूर्ण केले. मुंबईत स्वयंसेवकांनी जवळपास एक लाख बावीस हजार नागरिकांचे स्क्रिनिंग पूर्ण केले आहे.

मुंबईतील भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांनी घरात अन्न शिजवून अनेक गरिबांना जेवू घातले आहे. अनेकानी खिशातून खर्च करून गरजूंना शिधा व जरुरी सामान दिले आहे. गरजूंना दवाखान्यापर्यंत नेण्या आणण्याचे महत्वाचे काम जीव धोक्यात घालून केले. या सेवाकार्यात मुंबईत भाजपाचे ३० कार्यकर्ते कोरोनामुळे मृत्यू पावले. एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते अशा प्रकारे सेवाकार्यात मोठ्या प्रमाणावर बळी पडण्याची घटना इतिहासात क्वचितच घडली असेल. तरीही या सगळ्यांच्या सेवाकार्यात कुठेही खंड पडलेला नाही.

मदतकार्यात हातभार लागलेल्या सामाजिक संस्था, संघटना, धार्मिक संप्रदाय या सर्वांचे कौतुक करणे, दखल घेणे सरकारचे काम आहे. ज्याचे श्रेय त्याला द्यावे. त्यातून सरकारची आणि राजकारण्यांची विश्वासार्हता वाढते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून या गोष्टी आवर्जून शिकण्यासारख्या आहेत. समाजसेवा नि:स्वार्थच असली पाहिजे असे संस्कार स्वयंसेवकांना देणारा रा.स्व. संघ श्रेयाचा विचार कधीच करत नाही हे मला पक्के माहित आहे. परंतु सर्वच संस्था, संघटनांना त्यांचे योग्य ते श्रेय मिळायलाच पाहिजे. तसे झाले तर नवभारताच्या पुनर्घडणीत सरकार आणि एनजीओ यांच्यातील हा परस्पर विश्वासाचा एक महत्वाचा टप्पा ठरेल.

(लेखक विधानसभा सदस्य असून मुंबई भाजपाचे अध्यक्ष आहेत.)