Blog: उद्धव ठाकरे पंतप्रधान व्हावेत ही जनतेची इच्छा

पंतप्रधान होण्यासाठी अजून काय हवं?

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Photo Credit: CMO Maharashtra

हर्षल प्रधान

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशातील संवेदनशील आणि विनम्र नेत्यांपैकी एक आहेत. कदाचित ते देशातील एकमेव मुख्यमंत्री आहेत जे सातत्याने आपल्या जनतेसोबत संवाद साधतात, तसंच सर्व तथ्य आणि उणीवा त्यांच्यासमोर मांडून आपलं सरकार कशापद्धतीने करोना महामारीशी लढत आहे हे समजावून सांगतात. मुख्यमंत्री कार्यालयातून लोकांसाठी रोज मेडिकल बुलेटिन प्रसिद्ध करत सविस्तर माहिती दिली जाते.

जेव्हा मुख्यमंत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेसोबत संवाद साधतात तेव्हा ते त्यांना प्रामाणिकपणे सांगतात की, “मला काही लपवायचं नाही, मला खोटं बोलायला माझ्या आई-वडिलांनी शिकवलेलं नाही, जे आहे ते सगळं तुमच्यासमोर मांडेन”. त्यांचा हा प्रामाणिकपणा आणि नम्रता महाराष्ट्राच्या जनतेला आश्चर्यचकित करते.

पालिका रुग्णालयांना सुसज्ज करण्याचं धोरण, पारदर्शकता ठेवणे आणि अधिकाऱ्यांना काम करण्याची मोकळीक यामुळे मुंबई मॉडेलचं हायकोर्ट तसंच सुप्रीम कोर्टाकडून कौतुक करण्यात आलं.

करोना महामारीच्या सुरुवातीपासूनच गरीबाला सर्वात प्रथम प्राधान्य देण्याच्या त्यांचा हेतू राहिला आहे. करोना महामारीच्या काळात त्यांनी कामामधून आपली असामान्य प्रतिमा केवळ राज्यातील जनतेच्या मनातच नाही तर सर्वत्र निर्माण केली. लोकांना आता उद्धव ठाकरे यांना देशाचे पुढील पंतप्रधान म्हणून पहायचं आहे.

हे लक्षणीय आहे, कारण उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळून अद्याप दोन वर्षही पूर्ण केलेली नाहीत. मात्र जे उद्धव ठाकरेंना ओळखतात त्यांना थोड्याच कालावधीत त्यांनी मिळवलेलं हे यश पाहून आश्चर्य वाटत नाही. आपले वडील बाळासाहेब ठाकरे यांचे राईट हँड म्हणून काम करत असताना त्यांनी या कौशल्यांना खतपाणी घातलं. फार कमी लोकांना माहिती आहे की, बाळासाहेब ठाकरे हयात असतानाही उद्धव ठाकरेंनी अनेक निर्णय घेतले. बाळासाहेबांनी नेहमीच आपल्या मुलाच्या निर्णयांना पूर्ण पाठिंबा दिला होता.

प्रत्येक वेळी जेव्हा उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला संबोधित करतात तेव्हा लोकांना मोठ्या भावाप्रमाणे मार्गदर्शन करतात. ते अत्यंत मितभाषी आणि नम्र नेते आहेत, पण त्याचवेळी ते शिस्त पाळली पाहिजे यासाठी प्रोत्साहन देतात आणि नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांना कारवाईचा इशाराही देतात.

सुरुवातीला जेव्हा उद्धव ठाकरे यांनी अधिकृतपणे पक्षातील कामकाजात सहभाग घेण्यास सुरुवात केली तेव्हा त्यावेळच्या नेत्यांनी ते वडिलांप्रमाणे वागत नसून किंवा त्यांच्या स्टाइलचं अनुसरण करत नसल्याची टीका केली होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी नेहमीच सांगितलं की, “माझ्या वडिलांनी मला कोणाचंही अनुकरण करु नको, अगदी माझंही असं शिकवलं आहे. मी माझ्या पद्धतीने सामान्यांसाठी चांगली कामं करावीत इतकीच त्यांची अपेक्षा आहे. मी माझ्या वडिलांच्या विचारांचं अनुसरण करतो, स्टाइलचं नाही”.

जेव्हा उद्धव ठाकरे शिवसेना प्रमुख झाले तेव्हा त्यांनी वेगळ्या पद्धतीने काम केलं. त्यांनी त्यांचं लक्ष्य ठरवलं आणि ते साध्यदेखील केलं. पक्षांतर्गत वादासारख्या अनेक लढाया त्यांनी एकट्याने लढल्या. अनेक वरिष्ठ नेत्यांनी उद्धव ठाकरेंची तुलना राज ठाकरेंसोबत केली. राज ठाकरे बाळासाहेबांसारखे दिसतात आणि काम करतात असा दावाही केला. राज ठाकरे जनतेचे नेते असून उद्धव नाहीत असंही म्हणाले.

उद्धव ठाकरेंनी मात्र त्या सर्वांना चुकीचं ठरवलं आहे. उद्धव ठाकरेंनी सिद्ध केलं आहे की, कदाचित ते त्यांच्या म्हणण्यानुसार बाळासाहेबांची कॉपी किंवा जनतेचे नेते नाहीत, परंतु मनं कशी जिंकावीत हे निश्चितपणे माहित आहे.

तीन दशकांपासून तळागाळापर्यंत जाऊन काम केल्याने त्यांना हे यश मिळालं आहे. शिवसेनेने मुंबईत मोठं रक्तदान शिबीर आयोजित करत ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये आपली नोंद केली होती, ज्यामध्ये आतापर्यंतचा सर्वाधिक २५ हजार युनिट्स रक्तसाठा जमा करण्यात आला होता. हे रक्तदान शिबीर उद्धव ठाकरेंनी आयोजित केलं होतं. तेव्हापासून ते आपल्या कार्यकर्त्यांना सामाजिक कार्य करण्यास सांगत असून कार्यकर्तेदेखील डोळे झाकून विश्वास ठेवत अनुसरण करतात. भुमीपूत्रांसाठी लढले असल्याने लोक त्यांचा आदर करतात.

उद्धव ठाकरे २०१९ नोव्हेंबरच्या आधी कधीही सरकार किंवा विधीमंडळाचा भाग असल्याने त्यांच्या प्रशासकीय कौशल्यांवर टीका करणाऱ्यांचे विचारही आता बदलले आहेत. प्रामाणिकता, वचनबद्धता तसंच शांत आणि रचनात्मक आचरणामुळे त्यांचं कौतुक होतं. अनेक प्रसारमाध्यमांनी घेतलेल्या सर्वेक्षणात मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या कामगिरीचं देशभरातून कौतुक झालं आहे.

सर्वात महत्वाचं म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे कधीच जाहीरपणे रडत नाहीत, ते खोटंही बोलत नाहीत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी ते खोटी आश्वासनं देत नाहीत. कधीही आणि केव्हाही ते बोलतात ते शब्द पाळतात. यासाठी लोक त्यांच्यावर प्रेम करतात.

पंतप्रधान होण्यासाठी अजून काय हवं?

(हर्षल प्रधान शिवसेनेचे जनसंपर्क प्रमुख व माध्यम सल्लागार असून उद्धव ठाकरेंचे विश्वासू सहकारी आहेत. लेखात व्यक्त झालेली मते व्यक्तिगत आहेत)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Blog harshal pradhan shivsena maharashtra cm uddhav thackeray prime minister of india sgy

Next Story
BLOG : वॉटसनच्या शोधात किम जोंग
ताज्या बातम्या