– कीर्तिकुमार शिंदे

विदर्भातल्या यवतमाळमधल्या दुर्गम भागात किंवा अगदी गाव-तालुका पातळीवर गोरगरीब रुग्णाना वैद्यकीय सेवा पुरविणाऱ्या काही सेवाभावी संस्था असतीलही, पण एका राजकीय पक्षाचे काही कार्यकर्ते गेली 12 वर्षं पूर्ण वेळ हेच काम करत आहेत, हे समजल्यावर तुम्हाला कदाचित धक्का बसेल.

यवतमाळ आणि चंद्रपूर यांच्या सीमेवर वणी विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात वणी, मारेगाव आणि झरीजामणी हे तीन तालुके आहेत. झरीजामणी हा आदिवासीबहुल तालुका आहे. या तीन तालुक्यांच्या ठिकाणी सरकारी म्हणजे ग्रामीण रुग्णालयं आहेत. या रुग्णालयांत कधी डॉक्टर नसतो, तर कधी औषधं उपलब्ध नसतात. सुस्तावलेल्या वैद्यकीय प्रशासकीय व्यवस्थेने पूर्ण कार्यक्षमतेने काम करावं आणि आदिवासी किंवा गरीब रुग्णावर त्वरीत उपचार व्हावेत, यासाठी इथल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका पदाधिकाऱ्याने एक आगळावेगळा प्रयोग केला. हा प्रयोग त्याने ठरवून केलेला नव्हता, तर स्थानिक पातळीवरील आरोग्य सुविधांच्या अभावातून हा उपक्रम जन्मला होता. या उपक्रमाचं नाव, ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना रुग्ण सेवा केंद्र’!

राज ठाकरे यांनी मार्च 2006 मधे आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची स्थापना केल्यानंतर राज्यभरात जिल्हा तालुका पातळीवर मनसेची असंख्य कार्यालयं स्थापन झाली. अर्थातच, ही राजकीय कार्यालयं होती. पण, वणी, मारेगाव आणि झरीजामणी या तीन तालुक्यांमधे राजू ऊंबरकर नावाच्या मनसेच्या एका अवलिया कार्यकर्त्याने तिथल्या तिथल्या स्थानिक ग्रामीण रुग्णालयाच्या अगदी समोरच ‘मनसे रुग्ण सेवा केंद्र’ सुरु केली. ही तीन रुग्ण सेवा केंद्र म्हणजेच या तीन तालुक्याची मनसेची कार्यालयं!

या तीन तालुक्यातले मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते आपापल्या मनसे रुग्ण सेवा केंद्रात बसतात. कुणाला अपघात झाला, एखाद्या आदिवासी समाजातील व्यक्तीला साप चावला, एखाद्या महिलेचं बाळंतपण असेल, तर लोक रुग्णालयात जात नाहीत, ते आधी मनसे रुग्ण सेवा केंद्रात येतात, इतका लोकांचा विश्वास राजू ऊंबरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिंकला आहे. डॉक्टर बोलावण्यापासून औषधं उपलब्ध व्हावीत यासाठी पाठपुरावा करण्यापर्यंतच्या सर्व गोष्टी मनसेचे कार्यकर्तेच करतात. गावागावातल्या रुग्णाला त्वरीत वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी प्रत्येक तालुक्यात एक अशा एकूण तीन रुग्णवाहिकाही राजू ऊंबरकर यांनी तैनात केलेल्या आहेत.

वणी मतदारसंघ यवतमाळ जिल्ह्यात असला, तरी तिथून यवतमाळ शहर 107 किमी, तर चंद्रपूर शहर 60 किमी अंतरावर आहे. त्यामुळे एखादी वैद्यकीय इमर्जन्सी असेल तर मनसे रुग्णवाहिकेतून त्या रुग्णाला चंद्रपूरच्या जिल्हा रुग्णालयात पाठवलं जातं. क्वचित नागपुरलाही पाठवलं जातं. त्यासाठी त्या गरीब रुग्णाला पैसे मोजावे लागत नाहीत. हा खर्च मनसेचे कार्यकर्तेच करतात.

दहा वर्षापूर्वी इथे बालमृत्यू तसंच मातामृत्यूची संख्या वर्षाला शंभर सव्वाशे होती. आज हा आकड़ा शून्यावर आला आहे.. पूर्वी इथे तालुका ग्रामीण रुग्णालयात सिजेरियन होत नव्हतं, पण 2016पासून ती सुविधासुद्धा सुरु झाली.. या प्रत्येक गोष्टीचा प्रशासकीय पाठपुरावा मनसेनेच केलाय. त्यासाठी प्रसंगी आंदोलनंही केली.

इथल्या मनसे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या बैठका याच तीन रुग्ण सेवा केंद्रात होतात. स्थानिक लोक त्यांच्या इतर कामांसाठीही रुग्ण सेवा केंद्रात येऊनच मनसे पदाधिकाऱ्यांना भेटतात.

काल सोमवारी वणीमधे राज ठाकरे आले होते. त्यांच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फ़ा हजारों लोक उभे होते. वणी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला प्रत्येक गावखेड़यातून आलेले किमान पाच हजार बिल्लेधारी कार्यकर्ते उपस्थित होते. इथल्या गर्दीची, जल्लोषपूर्ण स्वागताची प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. पण वणीतल्या या मूक परिवर्तनाची कुणालाही सुतराम कल्पना नाही. म्हणून हे सांगावंसं वाटलं.

मनसेचे ‘खरेखुरे आयडॉल’ राजू ऊंबरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या या कार्याला सलाम!