स्वाती वेमूल कधी.. कुठे..कसं आणि किती बोलायचं याचं ज्ञान नसलं की व्यक्तीची किंमत राहत नाही असं मी मोठ्यांकडून नेहमीच ऐकलंय. पण या शिकवणीची आज प्रकर्षाने आठवण होण्यामागचं कारण आहे 'क्वीन'. क्वीन म्हणजे राणी.. हे तर माहितीच आहे ना सर्वांना. हे फक्त तिच्या चित्रपटाच्या नावावरून तिला दिलेलं विशेषण नव्हतं तर तिच्या अफलातून अभिनय कौशल्याला प्रेक्षकांनी मनापासून दिलेली दाद होती. एव्हाना मी कोणाबद्दल बोलतेय हे तुम्हालासुद्धा समजलंच असेल. बॉलिवूडची 'क्वीन' म्हणून अभिनेत्री कंगना रणौतला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं होतं. तिच्या अभिनयात तेवढी ताकद होती आणि आहेच. पण सध्या तिच्या बोलघेवड्या स्वभावामुळे तिने आतापर्यंत अभिनय कौशल्याच्या जोरावर कमावलेली सगळी प्रसिद्धी मातीमोल होतेय. तिच्या या स्वभावाची झलक अभिनेता हृतिक रोशनसोबत झालेल्या वादाच्या वेळीसुद्धा आली होती. पण तो विषय तिचा खासगी होता आणि आताचा विषय हा संपूर्ण चाहत्यावर्गाचा आहे. मग तो दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा चाहतावर्ग असो किंवा मग डोळ्यांत असंख्य स्वप्न घेऊन जगणाऱ्या या मुंबई शहराचा चाहतावर्ग असो. कंगना तिचं करिअर घडवण्यासाठी हिमाचल प्रदेशमधून मुंबईला आली. 'गँगस्टर' या पहिल्याच चित्रपटातून तिच्यात दडलेली प्रतिभावान अभिनेत्री मोठ्या पडद्यावर पाहायला मिळाली. 'फॅशन'मध्ये तिने ज्याप्रकारे शोनालीची भूमिका साकारली, ते पाहून तिच्याऐवजी आणखी कोणत्या अभिनेत्रीने तितक्या ताकदीने ती व्यक्तीरेखा उभी केली असती असं किंचितही वाटत नाही. एखादा कलाकार उत्तम अभिनय करत असेल तर प्रेक्षकांची दाद नक्कीच मिळते. पण जेव्हा तो साकारत असलेली व्यक्तीरेखा प्रेक्षकाला आपलीशी वाटू लागते, तेव्हा त्या कलाकाराचा खरा विजय असतो. हा विजय कंगनाने 'क्वीन' चित्रपटात साकारलेल्या राणीच्या भूमिकेमुळे मिळवला. तेव्हापासून खऱ्या अर्थाने मी तिच्या अभिनयाची चाहती झाली. 'राणी' या भूमिकेतला सच्चेपणा माझ्याप्रमाणेच अनेकांना आवडला असणार याची मला खात्री आहे. पण आज सोशल मीडियावर दिवसरात्र ट्विट करत वाट्टेल ते बोलणारी कंगना पाहिल्यावर एक कलाकार म्हणून तिच्याबद्दल वाटत असलेला आदराच्या भावनेवर प्रश्न उपस्थित करावा वाटतोय. तिचे ट्विट्स पाहून वायफळ, भाराभार अशी विशेषणं तुमच्याही डोक्यात नक्कीच आली असतील. कंगनाचा स्वभाव तसा सुरुवातीपासूनच बंडखोरीचा आहे. बॉलिवूडसारख्या इंडस्ट्रीत अनेकांचा रोष पत्करून स्वत:चं स्थान निर्माण करणं काही सोपी गोष्ट नाही. बॉलिवूडमधल्या घराणेशाहीला, गटबाजीला आव्हान देत स्वत:चं वेगळेपण टिकवून ठेवणं अजिबात सोपं नाही. कंगनाने तिच्या हिमतीवर सर्वकाही कमावलं पण सोशल मीडियावर अवाजवी बोलून हे सर्वकाही गमावण्याची वेळ तिच्यावर येऊ नये इतकंच एक चाहती म्हणून वाटतं. कारण आपला आवडता अभिनेता किंवा अभिनेत्री ही फक्त पडद्यावर कशी आहे एवढंच जाणून घेण्यात लोकांना रस नसतो, तर ती खऱ्या आयुष्यात कशी आहे, तिचं सोशल मीडिया पेज कसं हँडल केलं जातं, एखाद्या घटनेवर ती कशी व्यक्त होते, तिची मतं कशाप्रकारे मांडते याकडेही आजचा सुज्ञ चाहतावर्ग लक्ष ठेवून असतो. म्हणूनच अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणावर सातत्यानं भाष्य करत असलेल्या कंगनानं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने सोशल नेटवर्किंगवरुन संताप व्यक्त केला जात आहे. जसं मी सुरुवातीला म्हटलं तसं कधी.. कुठे.. कसं.. आणि किती बोलावं याचं ज्ञान नसलं की मग कमावलेली सगळी प्रसिद्धी मातीमोल झाल्याशिवाय राहत नाही. कारण एखाद्याने किती आणि कसं बोलावं यावर जरी दुसऱ्या व्यक्तीचा अंकुश नसला तरी त्या व्यक्तीला आपण किती महत्त्व द्यावं याचं स्वातंत्र्य प्रत्येकालाच आहे. त्यामुळे 'क्वीन' म्हणून ज्या अभिनेत्रीचं महत्त्व तिच्या चाहत्यांच्या मनात आहे, ते सारासार विचार न करता केलेल्या बडबडीमुळे गमावून तर बसणार नाही ना, याचा विचार कंगनाने नक्की करावा. अति तेथे माती. माती होण्याआधीच कंगनाने सावरलेलं बरं. swati.vemul@indianexpress.com