BLOG : भाजपा-शिवसेनेची कलगीतुऱ्यात रंगलेली युती

एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडणारे दोन्ही पक्ष आज युतीच्या विचारात आहेत.

राज्यात विधानसभेच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यात. 21 ऑक्टोबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार असून 24 ऑक्टोबर रोजी निकालही लागणार लागतील. राज्यात एकीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आघाडीचा फॉर्म्युला ठरला असला तरी शिवसेना भाजपा युतीचा फॉर्म्युला मात्र अद्यापही ठरलेला नाही. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये शिवसेना भाजपाची युती झाली असली तरी विधानसभा निवडणुकीत मात्र दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले. या दोन्ही निवडणुकांदरम्यान दोन्ही पक्षांमध्ये आरोपप्रत्यारोपांच्या फैरी रंगल्या होत्या. त्या काळात अशा काही गोष्टी घडल्या ज्याने शिवसेना हा करमणुक आणि थट्टेचा विषय बनला होता.

त्यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळात समावेशासाठी अनिल देसाई यांच्या नावाची शिफारस, अमित शहा-उद्धव ठाकरे यांची चर्चा फिस्कटल्यानंतर विमानतळावरूनच माघारी फिरलेले देसाई, ऐनवेळी भाजपचे सदस्य बनून कॅबिनेट मंत्री बनलेले सुरेश प्रभू आणि केंद्रीय मंत्री अनंत गिते यांच्या राजीनाम्याबाबतची अनिश्चितता, या सर्व घडामोडी शिवसेनेला दिल्लीच्या आणि महाराष्ट्राच्याही राजकीय वर्तुळात करमणुकीचा विषय बनवणाऱ्या ठरल्या होत्या.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या पूर्वसंध्येला, शनिवारी अनंत गिते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची वेळ मागितली. मात्र, ती न मिळाल्याने उद्धव ठाकरेंच्या आदेशावरून ते मुंबईला परतले. तेव्हा सेना एनडीएतून बाहेर पडेल, असे चित्र होते. पण तसे काही पाच वर्षांनंतरही झाले नाही. त्यानंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीला मात्र युती झाली नाही. तर दुसरीकडे आघडीतही बिघाडी झाल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने वेगवेगळी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. खऱ्या अर्थाने पंतप्रधान मोदींची लाट असल्यामुळे त्याचा फायदा राज्यात भाजपाला झाला.

इतकंच काय तर राज्यातील भाजप-शिवसेना युती तुटल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लक्ष्य केले होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाची तुलना अफझलखानाच्या फौजेशी केली होती. “महाराष्ट्र काबीज करण्यासाठी अफजलखान फौज घेऊन आला, त्याप्रमाणे ही फौज राज्यात दाखल झाली आहे. महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याची भाषा करणाऱ्यांना साफ करून टाका,” अशा शब्दात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आवाहन केले होते. त्यातच कर्जमाफी आणि अन्य मागण्यांवरून शिवसेनेच्या नेत्यांनी ‘राजीनामा नाट्य’ सुरू केले होते. राज्यातील सरकार नोटीस पिरियडवर आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुंबईतील प्रचारसभेत म्हणाले होते. त्यानंतर शिवसेनेचे मंत्री आपल्या पदाचा राजीनामा देतील का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर राजीनामा खिशातच घेऊन फिरत आहोत, असे शिवसेनेच्या मंत्र्यांनी सांगित कोणत्याही क्षणी हा नोटीस पिरियड संपेल, असेही अनेक नेते म्हणताना दिसत होते. परंतु त्यांचा नोटीस पिरियड अद्यापही संपलेलाच नाही. इतकंच काय तर अलिकडेच उद्धव ठाकरे यांनी युतीच्या मुद्द्यावरूनही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना उपरोधिक टोला लगावला होता. “युतीची चर्चा अजूनही सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच शिवसेनेच्या वाट्याच्या जागांची यादी ठरवतील आणि मी ती पक्षाच्या नेत्यांसमोर मांडेन,” असेही ते म्हणाले.

आताही एकीकडे मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे हे राज्यात युती होणार असल्याचे म्हणत असले तरी दोन्ही पक्षांची पावलं विरूद्ध दिशेने जात असल्याचं पहायला मिळत आहे. भाजपामध्ये होत असलेल्या मेगाभरतीमुळे नक्कीच पन्नास पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक जागांवर भाजप दावा करणार यात काही शंका नाही. तर दुसरीकडे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नेते नारायण राणे यांनीदेखील आपला पक्ष भाजपात विलिन करणार असल्याची घोषणा केली आहे. याशिवाय नाणार आणि आरे या दोन मुद्द्यांवरून युतीत काहीसा तणाव निर्माण झाला असून यावरून दोन्ही पक्ष एकमेकांना आजमावून पाहत आहेत. हे सर्व मुद्दे शिवसेनेच्या किती पचनी पडतील यात शंका आहे. अद्यापही युतीची घोषणा झाली नसली तरी दोन्ही पक्षांना आता त्याची गरज आहे. भाजपापेक्षा शिवसेनेला युतीची अधिक गरज अधिक असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत आणि त्यात बरंचसं तथ्यदेखील आहे.

शिवसेना-भाजपामध्ये 126-162 जागांचा फॉर्म्युला ठरला असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. शिवसेना 126 जागांवर लढणार असून, भाजपा आणि मित्रपक्षांसाठी 162 जागा सोडण्याची तयारी दर्शवली आहे. गेल्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला 63 तर भाजपाला 122 जागांवर विजय मिळाला होता. भाजपाने शिवसेनेला मिळालेल्या जागांपेक्षा दुप्पट जागा मिळवल्या होत्या. त्यामुळे भाजपाचा अधिक जागांची मागणी ही गैर आहे असंही म्हणता येणार नाही. येत्या एक दोन दिवसात युतीच चित्र स्पष्ट होईल, अशी अपेक्षा तरी आता नक्कीच व्यक्त करता येऊ शकते.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत पटकावलेल्या विभागवार जागा

पश्चिम महाराष्ट्र (70) – भाजपा 24, शिवसेना 13, काँगेस 10, राष्ट्रवादी काँग्रेस 19, इतर 04
विदर्भ (62) – भाजपा 44, शिवसेना 04, काँगेस 10, राष्ट्रवादी काँग्रेस 01, इतर 03
मराठवाडा (46) – भाजपा 15, शिवसेना 11, काँगेस 09, राष्ट्रवादी काँग्रेस 08, इतर 03
कोकण (39) – भाजपा 10, शिवसेना 14, काँगेस 01, राष्ट्रवादी काँग्रेस 08, इतर 06
मुंबई (36) – भाजपा 15, शिवसेना 14, काँगेस 05, राष्ट्रवादी काँग्रेस 00, इतर 02
उत्तर महाराष्ट्र (35) – भाजपा 14, शिवसेना 07, काँगेस 07, राष्ट्रवादी काँग्रेस 05, इतर 02
एकूण (288) – भाजपा 122, शिवसेना 63, काँगेस 42, राष्ट्रवादी काँग्रेस 41, इतर 20

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Blog on shiv sena bjp alliance vidhan sabha 2019 election maharashtra uddhav thackeray devendra fadanvis jud