-चंदन हायगुंडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिलिटरी इंटेलिजन्सने कौशल्याने पुण्यात राहणारे काही बांगलादेशी घुसखोर शोधून काढले. त्यांची माहिती रीतसर पुणे शहर पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी सात संशयित तपासासाठी हडपसर पोलीस ठाण्यात उचलून आणले. १५ ऑगस्ट २०२१ रोजी हडपसर पोलिस स्टेशन डायरी नोंदीनुसार चौकशी दरम्यान संशयितांनी आपण बांगलादेशी आहोत व १९९५,२००२, २००७, २००८, २०११ दरम्यान (बॉर्डर ओलांडून) भारतात आलो, तसेच पुण्यात आल्यावर आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे कागदपत्रे बनविली अशी माहिती पोलिसांना दिली. पण तरीही पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली नाही. कारण अटक केल्यावर न्यायालयात ते बांगलादेशी आहेत हे सिद्ध करण्याची जबाबदारी पोलिसांची असते. आणि पोलिसांना मात्र या संशयितांकडे ते बांगलादेशचे नागरिक असल्याचे कोणतेही कागदपत्र मिळून आले नाही. म्हणून, गरज पडेल तेव्हा पुन्हा चौकशीस हजर करण्याच्या हमीवर पोलिसांनी या सर्वाना खाजगी वकील असलम सय्यद यांच्या हवाले सोडून दिले. (संदर्भ : –पुणे: “आम्ही बांगलादेशमधून आलो आहोत,” संशयित घुसखोरांची माहिती; सिद्ध करण्यासाठी पोलिसांना हवीयेत कागदपत्रं)

विशेष म्हणजे यापैकी एक संशयित फारुख याने ‘द इंडियन एक्सप्रेस’ सोबत बोलतानाही सांगितले कि तो २००८ मध्ये बांगलादेशातून भारतात आला आणि पुढे काही स्थानिकांच्या मदतीने आधार कार्ड वगैरे कागदपत्र बनवून घेतले. संशयित स्वतः आपण बांगलादेशी आहोत असे सांगत आहेत याबाबत विचारले असता पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले कि ” न्यायालयात त्यांनी आपले म्हणणे फिरविले तर ? आम्हाला सबळ पुरावे हवेत.” दरम्यान संशयितांकडून प्राप्त झालेले आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे भारतीय कागदपत्रबाबत तपास सुरु आहे, असेही त्यांनी सांगितले.

या संशयितांनी भारतीय मुलींशी लग्न केले. पुढे भारतातच मुले जन्माला घातली. लग्नाचे आणि मुलांच्या जन्माचे दाखले त्यांनी पोलिसांना दाखवले आहेत. वकील सय्यद सांगतात कि हे सर्व संशयित अनेक वर्षांपासून पुण्यात राहतात आणि त्यापैकी दोघांवर पूर्वी हाणामारीचा गुन्हा दाखल झाला तेंव्हा पोलीस आणि न्यायालयीन कागदपत्रात ते भारतीय असल्याचा उल्लेख केला आहे. आता पुणे पोलीस हा गुंता सोडवून, पुरावे जमवून संशयित बांगलादेशी घुसकोरांवर कारवाई करतात कि त्यांना ‘क्लीन चिट’ देतात हे पाहावे लागेल.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण साधे नाही. पोलीस चौकशीत समजले कि सर्व संशयित बेकायदेशीर मार्गाने बांगलादेशातून भारतात आले. बनावट माहिती सादर करून आधार कार्ड, पॅन कार्ड व अन्य कागदपत्रे मिळविले. हे सर्व त्यांना कोणी व कसे मिळवून दिले, याचा शोध घेणे आवश्यक आहे. त्यातून मोठे रॅकेट उघड होऊ शकते. विशेष म्हणजे सर्वजण कचरा वेचणे व अन्य छोटी कामे करीत असल्याचे सांगतात. तरीही या संशयितांपैकी एकाने तर भारतीय पासपोर्ट बनवला. दुसर्याने पासपोर्ट साठी अर्ज केला आहे. एकाने पुण्यात जमिनीचा तुकडाही विकत घेतला आहे. तसेच यापैकी काही संशयित भारतात स्थायिक होऊनही घुसखोरी मार्गाने बांगलादेशात येत जात असल्याची शंका आहे.

यापूर्वी भारत – बांगलादेश सीमा भागातच नव्हे तर पुण्यासह देशभरात ठिकठिकाणी बांगलादेशी घुसखोर मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. बनावट नोटा, सेक्स रॅकेटच्या गंभीर गुन्ह्यात अनेक बांगलादेशी घुसखोर अटक झालेले आहेत. बेकायदेशीर भारतात वास्तव्य करणारे बांगलादेशी घुसखोर राष्ट्र सुरक्षेस मोठा धोका ठरू शकतात. मार्च २०१८ मध्ये असेच मिलिटरी इंटेलिजन्स आणि केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने काही बांगलादेशी घुखोर पुणे, रायगड मुंबई येथून अटक केले होते. हे संशयित ‘अल कायदा’शी संबंधित “अन्सारउल्लाह बांगला टीम (ABT)” या बंदी घातलेल्या बांगलादेशी संघटनेच्या सदस्यांना विविध प्रकारे मदत करीत असल्याचे तपासात उघड झाले होते. (संदर्भ – अटक करण्यात आलेल्या बांगलादेशींकडून दहशतादी ऑपरेटिव्ह्सना मदत झाल्याचं सिद्ध – पुणे युनिट)

बांगलादेशातून लोक भारतात बेकायदेशीरपणे आणून त्यांना भारतीय कागदपत्रे, नोकऱ्या मिळवून देणे आणि त्यांचा वापर विघातक कामांसाठी करवून घेणे असे पद्धतशीर नेटवर्क असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. म्हणून पुणे शहर पोलिसांनीही या प्रकरणात संशयित बांगलादेशी घुसखोरांचा व्यापक तपास करावा अशी अपेक्षा आहे.

बांगलादेशी घुसखोर गंभीर समस्या आहे. पूर्वोत्तर भारतात त्याचे गंभीर परिणाम भारतीयांनी अनुभवले आहेत. २०१५ साली भारत बांगलादेशात ऐतिहासिक जमीन सीमा करार झाल्यानंतर घुसखोरी कमी झाली, मात्र थांबलेली नाही. भारताचे संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी दिलेल्या माहितीनुसार २०२१ च्या पहिल्या सहा महिन्यात बांगलादेशातून भारतात घुसखोरीची ४४१ प्रयत्न झाले, ज्यामध्ये ७४० घुसखोर पकडले गेले आणि एक जण मारला गेला. (संदर्भ : आंतरराष्ट्रीय सीमेवर झालेले घुसखोरीचे प्रयत्न). याशिवाय जे पकडले गेले नाहीत आणि भारतात मोकाट फिरत आहेत अशा बांगलादेशी घुसखोरांची संख्या मोठी असण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. अशा घुसखोरांना शोधून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे गरजेचे आहे.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blog pune police unable to take action against bangladeshi infiltrators even after confession sgy
First published on: 14-09-2021 at 11:43 IST