-श्रुति गणपत्ये

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रोममध्ये १९६० झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मिल्खा सिंगकडून संपूर्ण देशाच्या आशा उंचावलेल्या असतात आणि ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत तो पुढेही असतो. पण एेनवेळी काहीतरी घडतं आणि त्याची एकाग्रता तुटते. भारताच्या फाळणीच्या वेळी पाकिस्तानमध्ये असलेल्या त्याच्या कुटुंबियांना कसं त्याच्या डोळ्यासमोर मारून टाकलं जातं ते दृश्य येतं आणि तो स्पर्धा हरतो. फाळणीच्या डागण्या मिल्खा सिंगच्या मनावर कायमस्वरुपी राहतात. भारत-पाकिस्तानचे संबंध चांगले रहावेत म्हणून मैत्रीपूर्ण खेळांचं आयोजन केलं जातं आणि मिल्खा सिंगने त्याचं नेतृत्व करावं अशी मागणी होते. त्याचा भूतकाळ त्याला आठवत राहतो आणि तो नकार देतो. मग केवळ पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंच्या शब्दाखातर तो तयार होतो आणि पाकिस्तानला जातो. त्याच्या कुटुंबियांना मारलेल्या ठिकाणीही तो जाऊन रडतो. “भाग मिल्खा भाग” (हॉटस्टार) या चित्रपटामध्ये मध्ये फाळणीने अनाथ झालेल्या, परिस्थितीशी झगडत वाढलेल्या आणि भविष्यात देशाचा सर्वोकृष्ट खेळाडू बनलेल्या मुलाची अप्रतिम कथा आहे.

हा चित्रपट आठवण्याचं कारण म्हणजे १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढच्या वर्षाीपासून १४ ऑगस्ट हा “विभाजन विभिषिका दिवस” म्हणून लक्षात ठेवला जाईल असं जाहीर केलं. भारताच्या फाळणीच्या वेळी झालेल्या हिंसाचारामध्ये मारले गेलेल्या, सापडलेल्या लोकांचे स्मरण करण्यासाठी हा दिवस असेल, असं त्यांनी सांगितलं. फाळणीचा बळी ठरलेल्या लोकांना विसरता कामा नये आणि त्यांच्या भूतकाळाचं दुःख समजून घेतलं पाहिजे याबद्दल दुमत नाही. पण पाकिस्तान निर्मितीचा १४ ऑगस्ट हा दिवस निवडून मोदींना त्यांना पाहिजे तो संदेश लोकांपर्यंत पोहोचवला. खरंतर फाळणी होताना उसळलेल्या हिंदू-मुस्लिम-शीख दंग्यामुळे लाखो लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. दंग्यातून वाचलेल्यांच्या जखमा कधीच भरून निघाल्या नाहीत. पण फाळणीला इतकी वर्ष होऊनही अनेक लोक आजही त्याची फळं भोगत आहेत. फाळणीचं स्मरण ठेवताना आज बळी ठरणाऱ्यांची परिस्थिती आपण सुधारणार का हा खरा प्रश्न आहे.

पण असे घाव केवळ फाळणीच्या वेळी नाही तर त्यानंतरही लोकांवर होत राहिले. बलराज सहानी यांचा १९७३ मध्ये आलेला “गरम हवा” (यू ट्यूब) हा चित्रपट भारतात राहणे पसंत केलेल्या मुस्लिमांसमोर कसे सामाजिक, आर्थिक प्रश्न उभे केले गेले याचं उत्तम चित्रण करतो. फाळणीच्या काही वर्षानंतरही मुस्लिमांप्रती अविश्वास, धर्माची बाजू न घेणाऱ्यांना सामाजिकदृष्ट्या वाळीत टाकणे, भारतीय मुस्लिमांना सातत्याने पाकिस्तानात जाण्याविषयी सुनावणं, त्यांची आर्थिक कोंडी करणं आणि सख्खे नातेवाईक पाकिस्तानमध्ये गेल्यामुळे इथे उरलेल्या कुटुंबियांची पाकिस्तानचे एजंट म्हणून होणारी निर्भत्सना ही खूप उत्कृष्ट पद्धतीने व्यक्त केली आहे. या परिस्थितीमध्ये आज स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही फारसा फरक पडलेला नाही.

अमृता प्रीतमच्या कादंबरीवर आधारित “पिंजर” (अ‍ॅमेझॉन) फाळणीच्या जखमा कशा कायमस्वरुपी राहतात आणि समोर आलेलं भवितव्य स्वीकारून, मन मारून, आयुष्यात अनेकांना किती तडजोडी कराव्या लागल्या हे दाखवत राहतं. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये माणूस बदलतोही. आधीच्या पिढ्यांमधील वैमन्यस्याचा बदला घ्यायला पुरोला (उर्मिला मातोंडकर) पळवून आणणारा रशिद (मनोज वाजपेयी) फाळणीमध्ये घडणाऱ्या घटनांनी, हिंसाचाराने बदलतो. पाकिस्तानमध्ये अडकलेल्या पुरोच्या वहिनीला शोधून सुखरूप तिच्या घरी पाठवण्यासाठी तो मदत करतो. पुरोही वहिनीबरोबर आपल्या कुटुंबामध्ये भारतात परत जाईल म्हणून तो माघारही घेतो. पण पुरोच आपलं भवितव्य आता रशिदबरोबर असल्याचं मान्य करून त्याच्याबरोबर राहणं पसंत करते. फाळणीने मानवी नात्यांची केलेली मुस्कटदाबी खूप सुंदर चित्रित केली आहे. या चित्रपटातला एकही क्षण कंटाळवाणा होत नाही.

किरण खेर यांची प्रमुख भूमिका असलेला “खामोश पानी” (यू ट्यूब) हा आणखी एक चित्रपट अमृता प्रीतम यांच्या कादंबरीवर बेतला आहे. पाकिस्तानच्या एका गावामध्ये विधवा आयेशा आणि मुलगा सलीम राहत असतात. आयेशा मुलांना कुराण शिकवते आणि आयुष्य ठीक सुरू असतं. तिच्या बाबत एक विचित्र गोष्ट असते की ती गावच्या विहिरीवर जाऊन कधीच पाणी भरत नाही. याचा संबंध तिच्या भूतकाकाळाशी जोडलेला असतो. अर्थात हे सत्य नंतर उलगडतं. सलीम हा मुस्लिम कट्टरवाद्यांच्या संपर्कात येतो जे तरुण मुलांना अफगाणिस्तानमध्ये जाऊन सोवियेत युनियनबरोबर लढण्यासाठी प्रवृत्त करत असतात. त्याचवेळी गावामध्ये काही शीख धर्मिय येतात आणि फाळणीच्यावेळी मागे राहिलेल्या एका बाईची चौकशी करतात. ती बाई आयेशा म्हणजे पूर्वाश्रमीची वीरो निघते. फाळणीच्या वेळी आपल्या बायका-मुलींवर बलात्कार, अत्याचार होऊ नयेत म्हणून कुटुंबियच त्यांना विहिरीत उडी मारून जीव द्यायला सांगतात. वीरो जीव द्यायचा नाही म्हणून पळून जाते, पण काही दंगेखोरांना सापडते. तिच्यावर बलात्कार होतो आणि शेवटी तीही पूरोप्रमाणे आपला वर्तमानकाळ स्वीकारते आणि त्याच माणसाशी लग्नं करून आयेशा बनते. पण भूतकाळात ज्या विहिरापासून पळून जाऊन तिने आपला जीव वाचवलेला असतो त्याच विहिरीत तिला शेवटी जीव द्यावा लागतो. कारण फाळणीने दुभंगलेली सामाजिक परिस्थिती तिला तसं करायला भाग पाड़ते.

खुशवंत सिंग यांच्या प्रसिद्ध कादंबरीवर बेतलेला “ट्रेन टू पाकिस्तान” (मॅक्स प्लेअर) चित्रपटही फाळणीच्या पार्श्वभूमीवर बेतलेला आहे. त्यात अंगावर काटा आणणारं एक दृश्य आहे. पाकिस्तानहून हिंदू आणि शीखांना घेऊन येणाऱ्या ट्रेनमध्ये सगळ्यांनाच कापून काढलेलं असतं. या घटनेनंतर भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या या कथेतल्या गावातलं सामाजिक वातावरण एकदम बदलून जातं. इतरवेळी सलोख्याने राहणारे हिंदू-मुस्लिम दुश्मन बनतात. शेवटी कथेचा नायक जुग्गत सिंग (निर्मल पांडे) याची मुस्लिम मैत्रिण नूर (स्मृती मिश्रा) ही पाकिस्तानला जाणं पसंत करते.

त्याशिवाय फाळणीने आयुष्य कशी उद्ध्वस्त केली हे दाखवणारे अनेक चित्रपट आहेत. सन्नी देओलचा “गदर” (झी ५), कमल हसनचा “हे राम”, नवाझुद्दीन सिद्धिकीचा “मंटो” (नेटफ्लिक्स), विद्या बालनचा “बेगम जान” (अ‍ॅमेझॉन), अलीकडे आलेला माधुरी दीक्षितचा “कलंक” (अ‍ॅमेझॉन), दीपा मेहताचा “अर्थ” असे अनेक चित्रपट आहेत. विविध स्तरातल्या लोकांना फाळणीचे बसलेले चटके आणि त्यानंतरही सुरू असलेली लोकांची प्रतारणा अशा अनेक चित्रपटांमधून पुढे येते. काळाची गरज ही खरंतर फाळणीचे घाव मागे सोडून पुढे जाण्याची आणि त्यातून धडा घेण्याची आहे. फाळणीच्या वेळी ज्या पद्धतीने धर्माच्या नावाने लोकांचा अनन्वयित छळ झाला तो पुन्हा होऊ न देणं हीच खरी फाळणीच्या बळींना श्रद्धांजली असेल.

shruti.sg@gmail.com

 

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood movies on india pakistan separation bolg by shuriti ganpatye kpw
First published on: 28-08-2021 at 12:59 IST