– एजाजहुसेन मुजावर

अठरापगड जाती-धर्मांच्या, गरीब श्रमिकांच्या, झोपडपट्ट्या, चाळींनी वेढलेल्या सोलापुरात करोना विषाणूचा कहर दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे सर्वत्र भय असुरक्षिततेचे वातावरण असतानाच आता टाळेबंदीही ब-याच अंशी शिथील करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत करोना भयसंकटाची परिस्थिती आटोक्यात येण्याची शक्यता दिसून येत नाही. टाळेबंदीचे ओझे हलके होण्याने एकीकडे दिलासा मिळत असताना दुसरीकडे करोनाचा फैलाव आणखी वाढण्याच्या भीतीपोटी सोलापूरकरांची अस्वस्थताही तेवढीच वाढली आहे. ५० दिवसांत सोलापुरात करोनाबाधित रूग्णांची संख्या एक हजाराचा टप्पा पूर्ण करीत असताना मृतांचा आकडाही शंभरी गाठण्याच्या बेतात आहे. मागील आठवडाभरात रूग्णांची व मृतांची संख्या अधिकच झपाट्याने वाढत असून हा वेग कमी न होता आणखी किती वाढेल, याची सर्वाना चिंता लागली आहे. या परिस्थितीत निदान सोलापूरपुरता विचार करायचा झाल्यास येथील भयप्रद करोना आटोक्यात आणण्यासाठी कठोर उपाययोजना करायच्या की टाळेबंदी शिथील करायची, हा वादाचा विषय होऊ शकतो. कारण करोनाचा विषाणू आता शहरातील पूर्व आणि दक्षिण भागानंतर उत्तर आणि पश्चिमेसह संपूर्ण गावठाण भागात तसेच ग्रामीण भागात फैलावत आहे.

देशात टाळेबंदी सुरू झाल्यानंतर पहिल्या २० दिवसांपर्यंत करोनाचा शिरकाव न झाल्याने सोलापूरकर निश्चिंत होते. एव्हाना, शेजारच्या पुण्यासह सांगली, सातारा व आसपासच्या सर्व सात जिल्ह्यांमध्ये करोनाबाधित रूग्ण सापडत होते. सोलापूरच्या दाराशी करोनाचे संकट उभे होते. तोपर्यंत घ्यावयाची दक्षता, प्रतिबंधात्मक उपाययोजना, जाणीवजागृती करता आली असती. परंतु प्रशासनासह सारेच घटक फारशा हालचाली करताना दिसले नव्हते. परिणामी, शेवटी १२ एप्रिल रोजी पाच्छा पेठेत चोर पावलांनी करोना विषाणूने शिरकाव केला आणि पहिला रूग्ण सापडला. सारेच खडबडून जागे झाले. प्रशासनाने पाच्छा पेठ परिसरात घरोघरी सर्वेक्षण सुरू केले. पुढे हळूहळू रूग्ण वाढू लागले. पूर्व भागापासून सुरूवात झालेला करोनाचा कहर थोड्याच दिवसांत दक्षिण भागातही पोहोचला. हा साराच भाग दाटीवाटीच्या झोपडपट्ट्यांनी वेढलेला. विडी, यंत्रमाग आणि गारमेंट उद्योगातील गरीब कामगारांच्या वसाहती असलेल्या या भागात मुळात गरिबी, अज्ञान, दारू-शिंदीची व्यसनाधीनता, आरोग्याविषयीची अनास्था, गुन्हेगारी या गोष्टी परंपरेने चालत आलेल्या. करोनाचा सर्वाधिक फटका प्रामुख्याने याच भागाला बसत आहे. आतापर्यंत एकट्या पूर्व भागातच एकूण रूग्णांच्या निम्मे म्हणजे सुमारे ४५० रूग्ण सापडले आहेत. मृतांची संख्या तेवढीच जास्त आहे.

करोनाचे संकट ओढवले तसा छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयावरील वैद्यकीय सेवेचा भार वाढला आहे. सुरूवातीला एका खासगी रूग्णालयात काही रूग्ण करोनाबाधित आढळून आल्याने गोंधळ उडाला. त्यातच सर्दी, ताप, खोकल्याचे रूग्ण खासगी रूग्णालयांनी पाहायचे नाहीत, असा नियम आल्यामुळे रूग्णांना शासकीय रूग्णालयाचीच वाट धरणे भाग पडले. त्यामुळे शासकीय रूग्णसेवेवर जसा भार वाढत चालला, तशी तेथील अव्यवस्था, अपुरे मनुष्यबळ आणि सुविधांचा अभाव यामुळे तेथील यंत्रणा तोकडी पडू लागली. त्यातच रूग्ण आणि मृतांची संख्या झपाट्याने वाढू लागल्यामुळे जवळपास एकमेव आधार असलेल्या शासकीय रूग्णालयात उपचारासाठी, तपासणीसाठी जाणे म्हणजे मृत्यू अटळ आहे, असा सार्वत्रिक समज वाढीस लागला. अशा भीतीपोटी मग रूग्णांचे शासकीय रूग्णालयात दाखल होण्याचे, तपासणी आणि उपचार करून घेण्याचे प्रमाण कमी झाले. त्यामुळेच करोना प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर मृतांची संख्या वाढल्याचे दिसून येते. मृतांमध्ये ९० टक्के वयोवृध्द व्यक्ती आहेत. वृध्दत्व, अशक्तपणा, दमा, मधुमेह, रक्तदाब, अर्धांगवायू व इतर आजारांनी पछाडलेल्या वृध्द रूग्णांना वैद्यकीय सेवा मिळू शकली नाही. त्यांच्या वाटाही बंद झाल्या होत्या. यातच आजार अंगावर काढणा-या वृध्दांकडे घरातील तरूणांनी केलेले दुर्लक्ष ही बाबदेखील अधोरेखित करावी लागेल. बरेच रूग्ण खूप उशिरा रूग्णालयात दाखल झाल्यामुळे मृत्युचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते. तर अनेक व्यक्ती वैद्यकीय उपचाराअभावी घरातच दगावल्याचे चित्र दिसून आले. मृतांची वाढती संख्या ही स्मशानभूमी आणि कब्रस्तानात दहन वा दफन झालेल्या मृतांवरून स्पष्ट होते. पूर्व भागात पद्मशाली समाज स्मशानभूमीत एरव्ही, दररोज पाच ते सहा मृतांवर अंत्यसंस्कार होतात. परंतु गेल्या एप्रिल व मे महिन्यात दररोज या एकाच स्मशानभूमीत १२ ते १४ मृतांवर अंत्यसंस्कार होत असल्याची माहिती समोर आली आहे. हीच गोष्ट मोदीखान्यातील हिंदू मोरे स्मशानभूमीची. तर अक्कलकोट रोड मुस्लीम कब्रस्तान व मोदी कब्रस्तानात मिळून गेल्या दोन महिन्यात ४५० मृतांचे दफन झाले आहे. गतवर्षी याच कालावधीत ही संख्या २५० इतकी होती. म्हणून करोना संकटात मृतांचे प्रमाण दुपटीने वाढले आहे.

करोना भयसंकट सुरू झाल्यापाठोपाठ ‘सारी”ची साथही झपाट्याने पसरली आहे. आतापर्यंत करोनामुळे झालेल्या ८८ मृत्युपैकी जवळपास ३५ मृत्यू ‘सारी’ मुळे झाल्याची नोंद आहे. ही ‘सारी’ आली कोठून हा संशोधनाचा विषय आहे. पाच्छा पेठ, शास्त्रीनगर, बापूजीनगर, नीलमनगर, आकाशवाणी केंद्राजवळील गवळी वस्ती, भारतरत्न इंदिरानगर, कुमठा नाका, मोदीखाना, बुधवारपेठ आदी १५ पेक्षा अधिक भाग अतिधोकादायक ठरले आहेत. आजमितील सुमारे १५० प्रतिबंधित क्षेत्रांत करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न होत असलेतरी आव्हान वरचेवर वाढतच आहे. झोपडपट्ट्यांमध्ये सार्वजनिक शौचालयांचा वापर, सामाजिक अंतर पाळण्याचा प्रश्न, घरोघरी झालेल्या सर्वेक्षणाचा फोलपणा, वाढती बेशिस्त या अडचणीच्या बाबी ठरल्या आहेत. परिस्थिती हाताबाहेर जात असल्यामुळे शेवटी प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्रांसह अनेक ठिकाणी फिव्हर ओपीडी सुरू केल्या. खासगी रूग्णालये सुरू करण्यास भाग पाडले आहे. काही खासगी रूग्णालये ताब्यातही घेतली आहेत. कारवाईचा बडगाही उगारला जात आहे. तर दुसरीकडे रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. एकमेकांशी होणाऱ्या थेट संपर्कातून करोना संसर्ग प्रचंड वाढतो आहे. रूग्ण शोधण्याचे आणि वैद्यकीय चाचणी करण्याचे प्रमाण आणखी वाढवावे लागणार आहे. चाचणी आणि उपचारासाठी रूग्ण पुढे आले नाहीत तर आणखी धोका वाढू शकतो. हे त्यांना समजावून सांगणारे खूपच कमी मंडळी दिसून येतात. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाखाली येण्यास अडाणी आहेत. प्राप्त परिस्थितीत पोलिसांनी पूर्व भागात काही अतिसंवेदनशील अशा प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये कायद्याचा धाक दाखविण्यापेक्षा लोकसहभाग घेऊन ‘जनता संचारबंदी’ला प्राधान्य दिले आहे. हा प्रयोग तरी आश्वासक ठरावा.

करोनाशी दोन हात करताना प्रशासनाचे मनोबल कमी न होता ते उंचावेल, हे पाहणे गरजेचे आहे. करोना आणि टाळेबंदी यामुळे भयभीत झालेल्या आणि हातावर पोट असलेल्या बहुसंख्य गरीब वर्गाला दिलासा देण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीही तेवढीच महत्त्वाची आहे. परंतु येथे राजकीय पुढारी, आमदार, खासदारांनी या भयसंकटात निभावलेली भूमिका निराशाजनक म्हणावी लागेल. यातच अशा कठीण संकटातच सोलापूरला तीन पालकमंत्री बदलले गेले आहेत. या परिस्थितीत अपयशाचे खापर एकट्या प्रशासनावर फोडण्यात अर्थ नाही. पालिका आयुक्त दीपक तावरे यांच्या तडकाफडकी झालेल्या बदलीने काय साधले, हा संशोधनाचा विषय ठरावा. खरे तर प्रशासनाचे दुखणे काय, हेदेखील पाहिले पाहिजे. वाढती रूग्णसंख्या आणि मृतांचे वाढते चिंताजनक प्रमाण पाहता रूग्णसेवा सुरळीत होण्यासाठी स्वतंत्र आयएएस अधिकारी नियुक्त करता येईल का, याचाही विचार होणे अपेक्षित होते. याउपर टाळेबंदी शिथील होत असलीतरी त्याचा लाभ शहरातील बहुतांशी प्रतिबंधित क्षेत्रांत असलेले यंत्रमाग, विडी व गारमेंट उद्योग सुरू होण्यासाठी मिळण्यात अडचणी येतात. त्यातून मार्ग कसा काढला जातो, याचीही सार्वत्रिक उत्सुकता आहे. एरव्ही, गेल्या दहा वर्षांपासून सोलापूरला कोणी राजकीय वाली राहिला नाहीय. सध्याच्या करोना भयसंकटात सोलापूरचे हे दुखणे प्रकर्षाने जाणवतेय.