– योगेश मेहेंदळे

एका घरात चार जनरेशन किंवा पिढ्या असतील तर ते कुटुंब भाग्याचं मानलं जातं. म्हणजे आजी किंवा आजोबांचं सहस्त्रचंद्रदर्शन होतं, ते पणतू वा पणतीचं तोंड बघतात आणि कुटुंबात चार पिढ्या नांदतात. पण, हल्ली म्हणजे अंबानींच्या जिओच्या क्रांतीनंतर या चार जनरेशनची व्याख्याच बदललीय. प्रत्येकाच्या हातात फोरजी व दिवसाला दीड जीबी इतका किमान डेटाचा प्लॅन आला आणि आजी-आजोबापण फेसबुक व व्हॉट्स अॅपवर आले. कुटुंबाच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर आजी नी आजोबांनी नातवांचं कौतुक करणाऱ्या पोस्ट्स टाकणं हे तर नित्याचंच झालंय. लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या-कोताऱ्यांपर्यंत सगळ्यांना या सोशल मीडियानं इतकं पछाडलंय की मधे तर एकानं Attending Uncle’s Funeral अशी कॅप्शन देत स्मशानातला सेल्फी पोस्ट केला होता. हे सेल्फीचं वेड तर इतकं वाढलंय की अनेक डोंगरांवर व समुद्रकिनारी शेवटच्या सेल्फीचे मानकरी असा फलक लावता येईल.

हे व्हॉट्स अॅप नी फेसबुकच्या वेडाचा अमल इतक्या वेगानं पसरतोय की मानसोपचारतज्ज्ञांनी सोशल मीडिया ट्रीटमेंट सेंटर्स सुरू केली तर आश्चर्य वाटायला नको. फेसबुकच्या व्यसनावर खात्रीशीर इलाज करून मिळेल किंवा व्हॉट्स अॅपपासून सुटकारा हवाय? या क्रमांकावर व्हॉट्स अॅप करा अशा जाहिराती लवकरच बघायला मिळतील यातही काही शंका नाही. या सगळ्या वेडाला प्रोत्साहन देताना, लिलाव करावा त्या आवेशानं स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्यामध्येही अहमहमिका लागलेली आहे. पाच मेगापिक्सेलच्या कॅमेऱ्यापासून सुरू झालेला हा लिलाव सध्या एकाच स्मार्टफोनमध्ये चार कॅमेरे व 40 मेगापिक्सेल इथपर्यंत येऊन पोचला आहे. कधी कधी शंका येते की, काही वर्षांनी स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्या कॅमेरेच विकतील नी सोबत फोनपण आहे अशी जाहिरात करतील. पूर्वी लोक पिकनिकला गेले किंवा गावाला वगैरे गेले की फोटो काढायचे आता, फोटो काढण्यासाठी पिकनिक काढली जाते. कपडे वगैरे बॅगेत भरायच्या आधी चार्जर व पॉवर बँक बॅगेत भरला जातो. माझ्या माहितीच्या एका गृहस्थानं पिकनिकला जाताना, दोन स्मार्टफोन, दोन चार्जर, एक टॅब व एक भलीमोठी पॉवर बँक घेतली. परंतु रेल्वेचं तिकिटच घ्यायला विसरल्यामुळं त्याला पिकनिक कॅन्सल करावी लागली. त्याही अवस्थेत त्यानं भरलेल्या बॅगांसह काढलेला सेल्फी पोस्ट केला नी अर्जंट कामामुळे पिकनिक रद्द करावी लागली वगैरे सोशल मीडियावर थाप मारली.

या सेल्फीमधला सगळ्यात मोठा उच्छाद असतो तो म्हणजे ग्रुप सेल्फी! सेल्फी म्हणजे जणू काही एम. एफ हुसेनचं चित्र असावं इतकी रंगसंगती मॅच करावी लागते. सेल्फीमधले माहीर तर फोटो ऑड दिसू नये म्हणून काही जणांना कपडे बदलायला लावतात. एक भुवई उडवताना, दोन्ही भुवया उडवताना, तोंडाचा चंबू केलेल्या अवस्थेत (खरंतर मूळ पाऊट हे वैतागल्याचं चिन्ह आहे, पण सेल्फीमध्ये याचा अर्थच बदलून गेलाय) पोज द्या, एकमेकांचे पाय पकडून साखळी करा, गॉगल खाली करा, कॉलर उडवा अशा अनेक चित्रविचित्र कसरती करायला लावतात. कल्पनाशक्ती जितकी अगाध तितक्या अनंत पोजेस हे सेल्फी मास्टर बनवतात आणि सिनेमाच्या डायरेक्टरप्रमाणे करवून घेतात. पाचवी पर्यंतचं सामान्य शिक्षण मग दहावीपर्यंत विविध विषयांचा सखोल अभ्यास मग त्यानंतर करीअर ठरवणारं शिक्षण अशी बांधणी असते, त्याप्रमाणेच स्मार्टफोन, व्हॉट्स अॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, हाय मेगापिक्सेल कॅमेराफोन, सेल्फी, मग ग्रुप सेल्फी आणि या सगळ्या सेल्फींचं सोशल मीडियावर संदर्भासह स्पष्टीकरण अशी चढती भाजणी असते. यातल्या कुठल्यातरी स्टेपवर तुम्ही असायलाच हवं अन्यथा नेक्स्ट जेनच्या चाचणी परीक्षेत तुम्ही नापास हे नक्की! असो…

तर या फेसबुक, व्हॉट्सअॅप, सेल्फी नी सोशल मीडियाच्या तुम्ही किंवा तुमच्या जवळची व्यक्ती आहारी गेली असेल तर वेळीच काळजी घेणं आवश्यक आहे. कारण, नेक्स्ट जेनच्या परीक्षेत जितक्या चांगल्या गुणांनी तुम्ही उत्तीर्ण वाढ, तितक्याच वेगानं तुमचा प्रवास मानसेपचारतज्ज्ञांच्या सोशल मीडिया ट्रीटमेंट सेंटरच्या दिशेने होणार आहे हे लक्षात ठेवा. स्वत:सह शेकडोजणांच्या काळजीपूर्वक अभ्यासातून व प्रयोगातून एक जीवनशैली किंवा सोशल मीडिया डाएट प्लॅनच म्हणा ना… बनवण्यात आला आहे. याचं नीट आचरण केल्यास तुमच्या मेंदूचं रक्षण होईल व तुम्हाला सोशल मीडिया ट्रीटमेंट सेंटरमध्ये जायला लागणार नाही हे नक्की!

तर काय आहे हा साधा सोपा सोशल मीडिया डाएट प्लॅन?

– चुकूनही टॉयलेटमध्ये मोबाइल नेऊ नका. अभ्यासातून असं आढळून आलंय की आधी पाच मिनिटांमध्ये कार्यभाग आवरून येणाऱ्यांना मोबाइल आत नेला तर 20-25 मिनिटं लागतात. यामुळं फ्लॅट असूनही चालीप्रमाणे बाहेर रांग लागते नी कौटुंबिक सौहार्दावर विपरीत परिणाम होतो.

– रात्री झोपताना मोबाईल सहा फूट लांब ठेवावा. कारण या अंतरावरून गजर लावलेला असेल तर तो ऐकायला येतो आणि कुणाचाही हात इतका लांब नसतो की तो मोबाईलपर्यंत पोचेल. आता हे का तर आमच्या अभ्यासातून असं आढळलंय की अनेकजण रात्री दोन तीन वाजता व्हॉट्स अॅपवर दिसतात, परंतु सकाळी विचारलं तर ते चक्क नाही सांगतात. त्यांना माहितीच नसतं की रात्री त्यांनी व्हॉट्स अॅपवर काही मेसेजेस फॉरवर्ड केलेत म्हणून…

– दिवसातून दोन वेळाच सोशल मीडियावर रहा. प्रत्येकी 55 मिनिटं त्यासाठी द्या. व्हॉट्स अॅप, फेसबुक, इन्स्टा जे काही करायचंय ते या 55 मिनिटांमध्ये दिवसातून दोन वेळा.

– दिवसातून दोनवेळा या 55 मिनिटांमध्ये जितक्या ग्रुपवर जितकं काही बोलायचंय, जितके फोटो, सेल्फी टाकायचेत ते बिनधास्त टाका व बघा. त्यासाठी काहीही बंधन नाही. हवंतर तुमच्या आवडीच्या ग्रुपमधल्या सगळ्या सदस्यांनी वेळा ठरवून घेतल्या नी रोजच्या रोज व्हॉटस अॅप संमेलन भरवलं तरी हरकत नाही, पण दिवसातून दोनवेळाच नी फक्त 55 मिनिटंच.

– आता 55 मिनिटंच का, तर आमचा अभ्यास सांगतो की एक तासापेक्षा 55 मिनिटांचा वेळ मनाला जास्त वाटतो. मनाचंही समाधान होतं नी वेळही वाचतो.

– दोन सेशनच्या मध्ये सहा तासांची गॅप हवी. म्हणजे तुम्ही सकाळी आठ-नऊ वाजता एक सेशन व पाच सहा वाजता दुसरं सेशन करू शकता. किंवा सकाळी अकरा बारा वाजता एक सेशन व संध्याकाळी सात आठ वाजता दुसरं सेशन करू शकता.

– आमचा अभ्यास सांगतो की या सहा सात तास तासांच्या गॅपमुळे मेंदूतील अत्यंत महत्त्वाच्या पेशींना आराम मिळतो, ऑफिसचं घरचं किंवा जे काही काम तुम्ही करत असाल त्यात सकारात्मक बदल दिसून येतो, कार्यक्षमता वाढते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावरच्या या दोन सेशनमध्ये तुमची जास्त दखल घेतली जायला लागते. बघावं तेव्हा व्हॉट्स अॅपवर पडलेल्यांच्या तुलनेत कमी परंतु मार्मिक वावर असलेल्यांना जास्त लाइक्स मिळतात असं आमचा अभ्यास सांगतो.

– आता दोन सेशनच्या मध्ये स्मार्टफोन बघायचाच नाही का? तर नाही ऑफिसचे कामाचे ग्रुप असतील, बातम्या अथवा ज्ञान वा अध्यात्माशी संबंधित ट्विटर हँडल असतील वा फेसबुक पेजेस असतील ती बघायला हरकत नाही. पण ते ही बेता बेतानं, अधेमध्ये दोन-तीन मिनिटं इतकंच.

– हे डाएट एक महिना फॉलो करा नी तुम्हाला फायदा झाला तर आपल्या सगळ्या ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा… त्या 55 मिनिटांच्या दोन सेशनमध्येच!

(या सोशल मीडिया डाएटचा डॉ जगन्नाथ दीक्षित यांच्या आहारासंदर्भातील डाएटशी काहीही संबंध नसून तसं आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा)