scorecardresearch

Premium

डोंबोलीचा वळसा आणि माणकोली-मोठागावचा पूल!

सुशिक्षितांचं शहर असा नावलौकिक मिरवणाऱ्या डोंबिवली शहरातील नागरिकांना आता ठाणे-मुंबई गाठणं सोपं होणार आहे. एक पूल त्यांचे वळसे वाचवणार आहे.

dombivali mothagaon mankoli bridge
डोंबिवली मोठागाव-माणकोली पूल (फोटो-पराग फाटक)

हा आहे मोठागाव-माणकोली पूल. डोंबिवलीतील मोठागाव आणि भिवंडीबाजूचं माणकोली यांना जोडणारा हा सेतू. निवडणुकांचे पडघम वाजू लागले की याचं उद्घाटन होणार आहे असं म्हणतात. या पुलाचं महत्त्व समजून घेण्यासाठी ‘रिपब्लिक ऑफ डोंबिवली’ची रचना समजून घ्यावी लागेल.

मुंबईहून फास्ट लोकल डोंबिवलीला तासाभरात नेते. स्लो लोकल दीड तासात नेते. पण मुंबईतून डोंबिवलीला खुश्कीच्या मार्गाने जायचं ठरवलंत तर ३ तासही लागू शकतात. याचं कारण ठाण्यापर्यंत रेल्वेमार्गाला बहुतांश समांतर रस्ता आहे. पण ठाण्यानंतर रस्ता दूर जातो. रेल्वेमार्गावर ठाण्यानंतर कळवा-मुंब्रा-दिवा हे दिव्य त्रिकुट लागतं. नदी, नाले, दलदल या भवतालात ही शहरं आहेत.
ठाण्याहून डोंबिवलीला जायचं असेल तर एक मार्ग शिळफाटा या भूतलावरच्या सर्वाधिक धूळ आणि कचकच असलेल्या प्रदेशातून जातो. दुसरा मार्ग पिंपळनेर, कोनगाव कल्याणमार्गे जातो. दोन्ही रस्त्यांना अतोनात ट्रॅफिक असतं. भिवंडी रोड रस्त्याला कंटेनरही असतात. खड्ड्यातून उरलेला रस्ता, ट्रॅफिक आणि धूळ यातून सावरत डोंबिवली नगरीत पोहोचायला कितीही वेळ लागू शकतो. हा सव्यापसव्य असल्याने नाटकवाल्यांच्या बसेसनाही इथे येणंजाणं, प्रयोग करणं त्रासदायक होतं. नंदुरबार असो, हिंगोली असो, नागपूर असो- मराठी माणसाचा किमान एक नातेवाईक डोंबिवलीत असतो. त्यामुळे इथे यावंच लागतं. डोंबिवलीत गर्दीमुळे ट्रेन पकडता येईलच याची खात्री नाही. रस्त्याने जाणं पैसा, वेळ आणि ऊर्जा व्यतीत करणारं. वर्षानुवर्ष हेच समीकरण आहे.

three people injured in leopard attack
नायगाव शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी
development tribals near Mumbai
विश्लेषण : मुंबईलगतच्या भागातील आदिवासींसाठी विकासाची वाट बिकटच का ठरते?
palghar health news
आदिवासी पाड्यातील नव्वदीच्या आजोबांना मिळाले जीवदान!
fire in godam
चिखली: शिंदे रुग्णालय परिसरातील गोदामाला आग; रुग्ण सुरक्षित स्थळी हलविल्याने प्राणहानी टळली

आणखी वाचा: मोठागाव-माणकोली पूल खुला झाल्यानंतर डोंबिवलीत माणकोली पूल ते कोपर पूल दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करण्यास प्रतिबंध

डोंबिवली पूर्व ठाकुर्ली-कल्याण दिशेने, काटई-शिळफाटा दिशेने, दिवा दिशेने वाढतच चाललं आहे. शेअर रिक्षा २५ रुपये घेते अशी ठिकाणंही डोंबिवलीतच येतात. डोंबिवली पश्चिमेला वाढायला मर्यादा आहेत कारण उल्हास नदीच येते. डावीकडे कोपर, उजवीकडे ठाकुर्ली ५२ चाळ असा परीघ. स्टेशनहून सरळ जाणारे सगळे रस्ते नदीपाशीच जातात. अशाच एका नदीच्या मुखाशी एक पूल होतो आहे. मोठागाव-माणकोली पूल. साधारण १० वर्षांपूर्वी या पुलासाठी सूत्रं हलली. सरकारं बदलत गेली. पक्ष फुटत गेले. विरोधक सत्ताधारी झाले. सत्ताधारी विरोधक झाले. एकमेकांवर खार खाऊन असणारे एकत्र काम करु लागले. सरकारी कामाचा वेग या संकल्पनेला जागत हा पूल आता पूर्णत्वाच्या बेतात आहे.

हा पूल गेमचेंजर आहे. हा पूल वळसा वाचवणारा आहे. हा पूल सुरू झाल्यानंतर ठाण्याला अर्ध्या तासात जाता येणार आहे. कोणाच्याही ध्यानीमनी नसणारी गावं एकदम प्रकाशझोतात आली आहेत. मोठमोठे निवासी प्रकल्प उभे राहिले आहेत. वडापाव, चहाच्या टपऱ्या सुरू झाल्या आहेत. पुलावरून आता जाताना बाजूला नदी, हिरवीगार शेतं दिसत राहतात. पुलाचे खांब उभे राहण्याआधी अख्खा भागच तसा असेल. विकास हा शांतता हरपूनच होतो असं म्हणतात. स्टेशनपासून दूर टोकाचा शांत भाग म्हणून जो भाग ओळखला जात होतो त्या परिसरात आता अष्टौप्रहर वाहनं धावतील. पूल चांगला लांबरूंद आहे पण डोंबिवलीत प्रवेश केल्यानंतर शहरात वाहतूककोंडी होण्याची शक्यता आहे. कारण शहरातले रस्ते अरुंद आहेत. पूलाच्या निमित्ताने बाईक काढून जायला एक ठिकाण डोंबिवलीकरांना झालं आहे. डोंबिवलीत प्रत्येक बिल्डिंगमध्ये किमान एक माणूस परदेशात असतो. त्यामुळे इथून विमानतळावर सतत जा-ये असते. एअरपोर्टहून पुण्याला जायला ओला-उबर सहजी मिळते पण डोंबिवली म्हटलं की कॅन्सलच करतात. या पुलामुळे कदाचित डोंबिवली भाड्याला होकार मिळू शकतो.

आणखी वाचा: माणकोली पुलाच्या उद्घाटनानंतर डोंबिवली कोंडीच्या विळख्यात?

ब्रिटिशांनी १५० वर्ष राज्य करताना दळणवळणाचं महत्त्व दाखवून दिलं. खंडप्राय पसरलेल्या आपल्या देशात त्यांनी वाहतुकीचं जाळं विणलं. आपलं राज्य म्हणजे छोटेखानी देशच आहे. मुंबईपासून इतकं जवळ असलेल्या डोंबिवलीच्या कनेक्टिव्हिची ही दशा होती, आहे. मुंबईपुण्यापासून दूर अनेक गावं आजही जोडलं जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. अनेक पुलांनी गावांचा आयामच बदलून गेला आहे. पुलामुळे एसटी सुरू झाल्यामुळे पोरंपोरी शाळेत जाऊ लागली आहेत. गावात माणसांचं जाणंयेणं होऊ लागलं आहे. शहरात जाणं सोपं झालं आहे. मालवाहतूक सुकर झाली आहे. लक्षावधी लोकांना सामावून घेणाऱ्या डोंबिवलीकरांसाठी हा पूल त्यांचा दैनंदिन त्रास वाचवणारा ठरू शकतो. या पुलाच्या निमित्ताने रेल्वेमार्गाला समांतर रस्त्याचं महत्त्व अधोरेखित होतं. हार्बर मार्ग हा एस्सेलवर्डमधली राईडच आहे पण या मार्गालाही समांतर रस्ता आहे. रेल्वेचा खोळंबा झाला तरी रस्त्यावरून बस पकडून जाता येतं. सेंट्रलच्या लोकांना ती सुविधाच नाही.

डोंबिवलीकर कर भरतात, ओला कचरा-,सुका कचरा वेगळा करुन देतात. तिकीटं काढतात, पास काढतात. शेअर रिक्षासाठी रांगेत उभे राहतात. पण त्यांच्या नशिबात हा पूल अस्तित्वात यायला दशकभराचा कालावधी लोटला आहे. असा पूल होणार असं ऐकत बालपणापासून एक पिढी पस्तिशीत आली आहे. पुलावरून एवढी वाहनं धावू लागतील की पादचाऱ्यांना जाण्यास मनाईही असू शकते. त्याआधीच पुलावरुन सूर्यास्त टिपलेला बरा. अस्मादिकांनी तेच केलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dombivali will be connected to thane in 30 minutes by mankoli mothagaon bridge psp

First published on: 03-09-2023 at 11:28 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×