scorecardresearch

Premium

वसतिगृहात राहिलेल्या मुलांमध्ये नैतिकता नसते का ? वसतिगृहातील मुले असतात तरी कोण ?

माजी कुलगुरूंनी हे वक्तव्य करणे म्हणजे शिक्षणव्यवस्थेवरील प्रश्नचिन्ह आहेच, पण विद्यापीठांनी विद्यार्थ्यांकरिता निर्माण केलेली वसतिगृह, त्यांची शिस्त यावरही प्रश्न उपस्थित करणारे आहे. मुळात नैतिकता म्हणजे काय? वसतिगृहात राहणारी मुले बिघडतात का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतात. वसतिगृहातून बाहेर पडणारे मूल हे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गुण घेऊन येते. त्यातील सकारात्मकतेचा विचार करणार कोण ?

hostel_LIfe_Loksatta
वसतिगृहात राहिलेल्या मुलांमध्ये नैतिकता नसते का ? (फोटो क्रेडिट pixabay)

माजी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी एका चर्चासत्रादरम्यान अजब तर्क मांडला. त्यांनी वसतिगृहातून परत आलेल्या मुलांमध्ये नैतिकता नसते, असे म्हटले आहे. माजी कुलगुरूंनी हे वक्तव्य करणे म्हणजे शिक्षणव्यवस्थेवरील प्रश्नचिन्ह आहेच, पण विद्यापीठांनी विद्यार्थ्यांकरिता निर्माण केलेली वसतिगृह, त्यांची शिस्त यावरही प्रश्न उपस्थित करणारे आहे. मुळात नैतिकता म्हणजे काय? वसतिगृहात राहणारी मुले बिघडतात का? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने निर्माण होतात. वसतिगृहातून बाहेर पडणारे मूल हे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गुण घेऊन येते. त्यातील सकारात्मकतेचा विचार करणार कोण ?

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि विद्यापीठ शिक्षण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुनानक भवन येथे ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’वर गुरुवारी कार्यशाळा पार पडली. यावेळी ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण : जाणीव व जागृती’ या विषयावर माजी कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर बोलत होते. ते म्हणाले, आधीच्या काळात गुरुकुलात मुलगा शिकून परत आल्यानंतर आई-वडिलांना त्याचा खूप अभिमान वाटायचा. कारण, गुरुकुलात विषय, व्यक्तिमत्त्व तसेच सर्वांगीण विकासाचे शिक्षण मिळत होते. आता गुरुकुल राहिले नाहीत म्हणून मुलांना वसतिगृहात पाठवले जाते. परंतु, वसतिगृहामधून परतणाऱ्या मुलांमध्ये नैतिकता उरत नाही.” आज अनेक मुले वसतिगृहांमध्ये राहून शिक्षण घेत आहेत, अनेक जण वसतिगृहात राहून शिकलेले आहेत या पार्श्वभूमीवर हे विधान विचार करण्यासारखे आहे.

dombivli brahmin sabha, importance of yoga, yoga for healthy life, doctors told the importance of yoga
निरोगी राहण्यासाठी योगसाधना प्रभावी उपचार पध्दती, डोंबिवलीतील परिसंवादात तज्ज्ञ डाॅक्टरांची मते
carrier, Carrier article Initiatives for Social Commitment of Identity Education Policy
ओळख शिक्षण धोरणाची: सामाजिक बांधिलकीसाठी उपक्रम
loksatta readers reaction on editorial
लोकमानस : मध्यमवर्ग हा मतदार, मग शेतकरी कोण?
ncp leader jitendra awhad reaction on ripti devrukhkar issue
मराठी माणूस सहन करतोय म्हणून अशा प्रवृत्तींची हिमंत वाढते ; जितेंद्र आव्हाड यांची तृप्ती देवरुखकर प्रकरणावर प्रतिक्रिया

नैतिकता ही सापेक्ष संकल्पना आहे. समाजाने म्हणजे माणसाने माणसांसाठी काही चौकटी-नियम आखले आहेत. त्या नियमांमध्ये जे बसते, नीतीनियमाला धरून असे समजले जाते. एखाद्याला जी गोष्ट नैतिक वाटेल ती दुसऱ्याला वाटणार नाही. त्यामुळे नैतिक असे एकमेव शाश्वत सत्य नसते. ते परिस्थितीनुसार बदलते. एखादे मूल वसतिगृहात जाते, तेव्हा ते कमीत कमी १० वर्षांचे असते. महाविद्यालयीन वसतिगृहात येणारे मूल १६ वर्षांचे असते. हा काळ त्याच्या जडणघडणीचा असतो. आपल्या गावात-शहरात शिक्षणाची सोय नाही, म्हणून शहरातील चांगल्या महाविद्यालयात प्रवेश घेतात. पर्यायाने वसतिगृहात राहतात. खरंतर वसतिगृह हे मुलांना आयुष्यभराच्या आठवणी देणारे, आयुष्य जगायला शिकवणारे असते.

हेही वाचा : गटारी अमावस्येला कोकणाने पाहिलेले ‘ते’ २ अपघात; करुण अंताची कहाणी…

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, हे दूध पिणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, असे महात्मा जोतिबा फुले यांनी म्हटले. वसतिगृहात येणारी मुले ही शिक्षण घ्यायला आलेली असतात. समाजातील चौकटी, नियम यांना प्रश्न विचारण्याची ताकद त्यांच्यात येत असते. जे चुकीचे घडत असेल, अन्यायकारक असेल, तिथे ते आवाज उठवायला मागे-पुढे बघत नाहीत. पाठ्यपुस्तकातील शिक्षण त्यांना नोकरी मिळवून देऊ शकत असेल, तर वसतिगृहातील अनुभव आयुष्य जगायला शिकवतात.
नैतिकता ही संकल्पना बाजूला ठेवली तर सामाजिक अंगाने ही मुले घडतात. समाजात कसे वागावे, सर्वांना सोबत घेऊन कसे जगावे, मित्र-मैत्रिणी यांच्या अडीअडचणी-त्यातून काढले जाणारे मार्ग आयुष्यातील निर्णय घ्यायला शिकवत असतात. अनेक प्रश्न घरापर्यंत न नेता आपल्या पातळीवर सोडवतात. ‘आत्मनिर्भर’ ही संकल्पना वसतिगृहातील मुले आधी पासून उपयोजत असतात. आजारी असो किंवा वैयक्तिक अडचणी त्या स्वतःच्या पातळीवर सोडवण्याचा ते प्रयत्न करतात. विविध प्रकारच्या वर्गातील मुलांसह राहिल्यामुळे अनुभवसंपन्न होत असतात. घरच्यांनी दिलेल्या रकमेत महिन्याचे नियोजन करणे ही व्यवस्थापन कौशल्ये त्यांच्यात असतात. घरच्या अन्नाची किंमत कळल्यामुळे कोणाच्याही घरून आलेला डब्बा एकत्र बसून ‘शेअर’ करून खातात. आज पाठ्यपुस्तकात ‘शेअरिंग’ असा अभ्यास द्यावा लागतो. पण, वसतिगृहात राहणारी मुले स्वतःहून शेअर करतात.

हेही वाचा : राजकीय नेते ‘बडव्यां’चा उल्लेख करतात, हे ‘बडवे’ म्हणजे कोण ? काय आहे बडव्यांचा इतिहास

विविध समाजातील रीतिरिवाज समजतात. खाद्यपदार्थ-संस्कृती समजते. वसतिगृहातील अडचणी घरी सांगत असतीलही, पण त्यावर मात करत ही मुले शिकतात. विविध वयोगटातील, विविध समूहातील मुलांसह राहिल्यामुळे समाजात कसे राहिले पाहिजे, काय बोलले पाहिजे, याची जाण त्यांना असते. अभ्यासात किती हुशार असतील, हा मुद्दा वेगळा, पण वसतिगृहात राहून मुले ‘स्मार्ट’ होण्यास शिकतात. सामाजिक, भावनिक, सोशिकपणा त्यांच्यात येतो. घरी राहून शिक्षण घेणारे मूल आणि वसतिगृहात राहून शिक्षण घेणारे मूल यांच्यात फरक असतो. कारण, वसतिगृहात राहणारे मूल आपला ‘कम्फर्ट झोन’ म्हणजे आपले गाव, घर, समाज सोडून नवीन जागेत येऊन स्वतःला सिद्ध करू शकत असते.

वसतिगृहात अन्य सवयीही लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. अतिव्यावहारिक होण्याचीही शक्यता असते. वसतिगृहात राहण्याचे काही तोटेही असू शकतात. पण, म्हणून मुलांना नैतिकता नसते, हा तर्क माजी कुलगुरूंनी मांडणे शिक्षणव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित करणारे आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dont the kids living in the hostel have morals who are the children in the hostel vvk

First published on: 28-07-2023 at 16:53 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×