शुक्रवारी, १५ मे २०२६ रोजी सकाळी ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांचे ठाण्यातील रुग्णालयात निधन झाले.
कोण होते डॉ. आनंद नाडकर्णी?
डॉ. आनंद नाडकर्णी हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशभरातले प्रख्यात ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ होते. त्यांनी मनोविकारांसंबंधी समाजात असलेल्या गैरसमजुतींविरुद्ध एक वैचारिक चळवळ सुरु केली आणि मानसोपचार क्षेत्रातील कठीण संकल्पना सर्वसामान्यांना समजतील अशा सोप्या भाषेत मांडल्या.
डॉ. आनंद नाडकर्णी: सुरुवातीचा प्रवास आणि जडणघडण
डॉ. आनंद नाडकर्णी यांचा जन्म एका सुशिक्षित मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. त्यांच्या घरातील वैचारिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक वातावरणामुळे त्यांच्यात वाचन, कला आणि साहित्याची आवड अगदी लहानपणापासून रुजली होती.
वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी डॉ. आनंद नाडकर्णी यांना पोलिओची लागण झाली. परिणामी त्यांच्या एका पायाला कायमचे अपंगत्व आले. त्यांना आयुष्यात अनेक टप्प्यावर शारीरिक मर्यादांचा सामना करावा लागला; मात्र या संकटमयी काळाने त्यांना जिद्द शिकवली. कोरोना काळात ‘लोकसत्ता’शी संवाद साधताना त्यांनी आपल्या मुलाखतीत म्हटले होते की,
“संकट काळात भावनांवर नियंत्रण ठेवून माणसाने ‘पीडित मानसिकतेतून’ (victim mindset) बाहेर पडले पाहिजे. जेव्हा आपण परिस्थिती स्वीकारतो, तेव्हाच आपण त्यावर मात करू शकतो.”
शारीरिक अपंगत्वामुळे ते इतर मुलांसारखे मैदानावर उतरून प्रत्यक्ष क्रिकेट खेळू शकत नव्हते. मात्र, खेळाची प्रचंड आवड असल्यामुळे त्यांनी प्रेक्षक म्हणून बारीक निरीक्षण करायला सुरुवात केली आणि तिथूनच ते क्रिकेट समालोचन (कॉमेंट्री) करायला शिकले. त्यांच्या तीक्ष्ण निरीक्षणातूनच त्यांची प्रभावी वाणी आणि वक्तृत्वाची खरी जडणघडण झाली. अचूक शब्द फेक आणि आवाजातील प्रवाहीपणा पुढे जाऊन त्यांच्या अष्टपैलू वक्तृत्वाचा मुख्य आधारस्तंभ ठरला.
वैद्यकीय शिक्षण आणि मानसोपचार क्षेत्राची निवड:
डॉ. नाडकर्णी यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मुंबईतील ‘जी. एस. मेडिकल कॉलेज’मधून एम.बी.बी.एस. (MBBS) पूर्ण केले. त्यानंतर के. ई. एम. रुग्णालयातून ‘डिप्लोमा इन सायकोलॉजिकल मेडिसिन’ आणि ‘एम. डी’ ही पदवी मिळवली. ज्या काळात मनोविकारांकडे अंधश्रद्धेच्या नजरेतून पाहिले जायचे, त्या काळात त्यांनी मानवी मनाचा अभ्यास करण्याचे आव्हान स्वीकारले.
डॉ. नाडकर्णी यांचा अथांग साहित्यिक प्रवास:
महाविद्यालयीन जीवनात डॉ. नाडकर्णी केवळ वैद्यकीय अभ्यासापुरते मर्यादित नव्हते. के. ई. एम. रुग्णालयात असताना ते आंतर-महाविद्यालयीन एकांकिका, नाटके, लेखन आणि सांस्कृतिक चळवळींमध्ये अत्यंत सक्रिय होते. ते केवळ डॉक्टरच नव्हते, तर ललित लेखक, कवी, नाटककार, अभिनेता, संगीतकार, तबलावादक, चित्रकार, मर्मज्ञ संगीतप्रेमी आणि उत्तम सूत्रसंचालक होते.
त्यांच्या नावावर एकूण २७ प्रकाशित साहित्यकृती आहेत ज्यामध्ये ‘वैद्यकसत्ता’, ‘शहाण्यांचा सायकिॲट्री’, ‘आरोग्याचा अर्थ’, ‘मनोगती’, ‘स्वभाव विभाव’, यांसारखे वैचारिक साहित्य आणि ‘गेट वेल सून’ सारख्या प्रसिद्ध नाटकांचा समावेश आहे. त्यांच्या या वाङ्मयीन प्रवासासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचे चार राज्य साहित्याचे पुरस्कार आणि इतर संस्थांचे एकूण १९ प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले.

कम्युनिटी सायकिॲट्री आणि ‘आय. पी. एच’ची स्थापना:
शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ प्रॅक्टिस (वैद्यकीय सराव) केल्यावर त्यांच्या लक्षात आले की, मानसिक आरोग्य केवळ रुग्णालयात किंवा दवाखान्याच्या चार भिंतींच्या आत मर्यादित राहता कामा नये. मानसिक आजार गंभीर होण्यापूर्वीच समाजात जाऊन काम करणे गरजेचे आहे. त्यांचे असे मत होते की,
“मानसिक आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञाने फक्त दवाखान्यात न बसता समाजात उतरून काम केले पाहिजे.”
याच भूमिकेतून त्यांनी ‘कम्युनिटी सायकिॲट्री’कडे पाऊल टाकले आणि १९९० च्या दशकात ठाण्यात ‘इंस्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ (IPH) या संस्थेची स्थापना केली. ही संस्था पुढे कोविड काळात लाखो लोकांसाठी मानसिक आधार ठरली.
डॉ. आनंद नाडकर्णी: कोविड काळातील कार्य आणि त्यांचे विचार
कोविड महामारी हे केवळ शारीरिक आरोग्याचं दुखणं नसून, ते एक मोठे ‘मनो-सामाजिक’ (PSYCHO-SOCIAL) संकट होते. भीती आणि माणसांच्या एकलकोंडीपणामुळे समाजात नकारात्मकता पसरत असताना त्यांनी ‘आय. पी. एच’च्या माध्यमातून डिजिटल आणि टेली-काउंसिलिंग (TELE-COUNSELING) यंत्रणा उभी केली. याविषयी सांगताना ते म्हणाले होते की,
“या परिस्थितीचा फक्त आपल्या आरोग्यावरच नाही, तर आपल्या मनावर आणि सामाजिक जीवनावरही मोठा परिणाम झाला आहे. आपण या परिस्थितीचा सामना करताना तीव्रता (INTENSITY), त्याची पुनरावृत्ती (FREQUENCY) आणि त्याचा कालावधी (DURATION) या तीन गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. जर या गोष्टी आपल्या कार्यक्षमतेवर आणि उत्पादकतेवर परिणाम करत असतील, तर आपल्याला मानसोपचाराची मदत घेणे आवश्यक आहे.”
लोकांच्या मनात कोरोनाची प्रचंड भीती बसली होती. त्या भीतीवर त्यांनी मानसोपचाराच्या दृष्टिकोनातून (CBT: COGNITIVE BEHAVIORAL THERAPY / REBT: RATIONAL EMOTIONAL BEHAVIOR THERAPY) अत्यंत व्यावहारिक मार्ग्दर्शन केले. शारीरिक रोगप्रतिकारशक्ती आणि मानसिक अवस्था यांचा थेट संबंध त्यांनी सोप्या भाषेत उलगडला होता-
“ताप येणे हा शरीराचा केवळ एक सिग्नल आहे, कोरोना असणे ही एक ‘अडचण’ आहे. ताप आल्यावर थकवा, निरुत्साह किंवा डिप्रेस्ड मूड असणे (नैराश्य येणे) हे साहजिक लक्षण आहे. पण आपण डोक्यात अतिरंजित विचार (REACTIVE THOUGHTS) करून त्या अडचणीचे रूपांतर ‘महा-आपत्तीत’ (CALAMITY) करतो, ते थांबवले पाहिजे. आपल्या भावनांचा थेट परिणाम आपल्या रोगप्रतिकारशक्तीवर होत असतो. त्यामुळे विनाकारण भीती वाढवून अंतर्गत रोगप्रतिकारशक्ती कमी करू नका.”
लॉकडाऊनच्या अनिश्चित वातावरणामुळे लोक सतत चिंतेत असायचे. यावर त्यांनी मानवी मनाला एका जागी स्थिर करण्यासाठी ‘CONTROL FACTORS’चा (नियंत्रित घटक) सिद्धांत मांडला, जेणेकरून लोक घरात राहूनही सकारात्मक राहू शकतील-
“या अनिश्चिततेच्या काळात पहिल्यांदा मनाला विचारा की, यातल्या कुठल्या गोष्टी माझ्या नियंत्रणात आहेत आणि कोणत्या नियंत्रणाबाहेर आहेत? व्हायरस किंवा लॉकडाऊन आपल्या नियंत्रणात नाही, त्यामुळे त्याचा अतिविचार सोडून द्या. आपल्या नियंत्रणात काय आहे? तर स्वतःचे निरीक्षण करणे, आपल्या घरात सुसंवाद ठेवणे आणि आपल्या कामाचे नियोजन करणे. जे आपल्या नियंत्रणात आहे त्यावर काम केल्यास अनिश्चिततेचा स्वीकार करण्याचे धैर्य निर्माण होते.”
लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका ऑटिझम (स्वमग्नता) किंवा इतर विशेष आव्हाने असलेल्या मुलांना आणि त्यांच्या पालकांना बसला होता. शाळा आणि समुपदेशन केंद्र बंद झाल्यामुळे ही मुले घरात आक्रमक होत होती. डॉ. नाडकर्णी यांनी या समस्येवर ‘आय. पी. एच’च्या स्वयंसेवकांमार्फत विशेष काम केले, ते म्हणाले होते,
“लॉकडाऊनमुळे ही विशेष मुले घरात कोंडली गेल्याने पालकांसाठी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा पालकांसाठी सामान्य पालकत्वाचे नियम चालत नाहीत. अशा वेळी पालकांनी एकत्र आले पाहिजे. आपण ‘आय. पी. एच’च्या माध्यमातून अशा पालकांचे ‘नेटवर्क’ आणि ‘सपोर्ट ग्रुप्स’ तयार करत आहोत, जेणेकरून हे पालक एकमेकांशी संवाद साधू शकतील, ऑनलाईन स्किल्स शिकू शकतील आणि एकमेकांना मानसिक धीर देऊ शकतील.”
माहितीच्या अतिरेकेमुळे लोकांमध्ये नकारात्मकता वाढत होती. त्यावर त्यांनी लोकांना कला, वाचन आणि नवीन कौशल्यांकडे वळण्याचे काम ‘आय. पी. एच’च्या विविध ऑनलाईन उपक्रमांद्वारे, केले. त्यांनी मुलाखतीत याविषयी मांडताना म्हटले होते,
“प्रत्येक क्रायसिस (संकट) हा मनाला एक नवीन प्रयोग करण्याची आणि बदलण्याची संधी देत असतो. या काळात माहितीचा कचरा डोक्यात साठवण्यापेक्षा पूर्वग्रह बाजूला ठेवून विचार करायला शिका. हा काळ घरात बसून नैराश्यात घालवण्याऐवजी आपली ‘उत्पादकता’ टिकवून ठेवण्यासाठी, नवनिर्मिती आणि सृजनशीलतेसाठी वापरा.”
कोविडच्या काळात डॉ. आनंद नाडकर्णी यांची कवी म्हणून एक नवीन ओळख जगासमोर आली. या कठीण काळात त्यांनी समाजाला केवळ आपले रुग्ण न मनाता, आपला एक मोठा परिवार मानले आणि एका कुटुंबप्रमुखाच्या भूमिकेतून लोकांच्या मनाला धीर दिला. त्यांनी आपल्या या परिवाराचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आणि त्यांच्यात जगण्याची उमेद जागी ठेवण्यासाठी कविता लिहायला सुरुवात केली. त्यांनी या कवितांना स्वतः संगीतबद्ध केले आणि ‘सॉंग ऑफ लाईफ’ व ‘आकाशाची गाणी’ या ऑडिओ अल्बमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवले.
डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या सामाजिक साहित्यिक आणि मानसशास्त्र क्षेत्रात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. बालपणातील पोलिओच्या शारीरिक अडचणींवर मात करत त्यांनी आयुष्यभर लाखो लोकांना मानसिक संकटातून बाहेर पाडण्याचे बळ दिले. विशेषतः कोविडच्या अत्यंत कठीण परिस्थितीचा विवेकनिष्ठेने स्वीकार करण्याचा आणि भीतीमुळे निर्माण होणाऱ्या नैराश्यातून बाहेर पडण्याचा त्यांनी दिलेला सल्ला अनेकांसाठी मार्गदर्शक ठरला. ‘आय. पी. एच’च्या माध्यमातून त्यांनी उभे केलेले सामाजिक मानसोपचाराचे कार्य भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.
