-दीनानाथ परब

देव चांगल्या माणसांना लवकर का बोलवतो? हे शब्द आजवर मी अनेकदा ऐकले आहेत. जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अनेकजण प्रेमापोटी अशी भावना व्यक्त करतात. या शब्दांचा आजपर्यंत माझ्यावर कधीही विशेष असा परिणाम झाला नव्हता. पण आज निशिकांत कामत यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर देवाने इतक्या प्रतिभावान माणसाला आपल्यातून इतक्या कमी वयात का नेलं? त्याच्याहातून अजून सरस कलाकृती का घडू दिल्या नाहीत? हेच प्रश्न माझ्या मनामध्ये आहेत. आशय, विषय, पटकथा, मांडणी यावर उत्तम पकड असलेला हा दिग्दर्शक होता. निशिकांत कामत यांचा चित्रपट मोठया पडद्यावर पाहताना त्यांनी केलेला विषयाचा अभ्यास त्यातून दिसायचा.

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
what is learning disorder marathi, learning disorder marathi article
Health Special: अध्ययन अक्षमता म्हणजे काय ? अशा मुलांसाठी काय करायचं?
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!

दिग्दर्शक होण्याआधी निशिकांत कामत एक अभिनेता होते. संजय सूरकर यांच्या ‘सातच्या आत घरात’ चित्रपटात त्यांनी कॉलेजमधल्या युवकाची साकारलेली भूमिका आजही लक्षात आहे. कॉलेजच्या दिवसात मजा-मस्ती सुरु असताना एक घटना घडते. त्यानंतर या चित्रपटात एक टर्निंग पॉईंट येतो. प्रेयसीला बलात्कारापासून वाचवता न आल्याची खंत आणि नंतर तिचा स्वीकारही करु शकत नाही, ही घुसमट निशिकांत यांनी पडद्यावर उत्तमरित्या साकारली होती.

माझ्या दृष्टीने दिग्दर्शक म्हणून तर निशिकांत कामत सर्वोत्तम होते. मराठीमध्ये फार कमी असे दिग्दर्शक आहेत, ज्यांनी बॉलिवूडमध्ये स्वत:च स्वतंत्र स्थान, वेगळी ओळख निर्माण केली. निशिकांत कामत यांनी बॉलिवूडमध्ये फक्त बस्तानच बसवलं नाही तर त्यांनी बॉलिवूडचा मराठी चित्रपट सृष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. असा हा अष्टपैलू दिग्दर्शक इतक्या लवकर आपल्यातून निघून जाणे ही मराठी, हिंदीच नाही, तर संपूर्ण भारतीय चित्रपट सृष्टीची न भरुन येणारी हानी आहे.

२००५ साली दिग्दर्शित केलेल्या ‘डोंबिवली फास्ट’ चित्रपटानंतर त्यांनी कधीही मागे वळून बघितले नाही. या चित्रपटातून त्यांच टॅलेंट, वेगळेपण अधोरेखित झालं. या माणसामध्ये इतरांपेक्षा काहीतरी वेगळं आहे हे जाणवलं, आणि नंतर निशिकांत कामत यांनी फोर्स, लय भारी, दृश्यम, मदारी, रॉकी हॅण्डसम या चित्रपटातून त्यांचे वेगळेपण सिद्धही केलं. ‘डोंबिवली फास्ट’मध्ये डोंबिवली ते मुंबई या प्रवासात सर्वसामान्य माणसाची होणारी घुसमट, मनोवस्था त्यांनी अप्रतिमरित्या टिपली आहे. संपूर्ण चित्रपट पाहताना दिग्दर्शक म्हणून त्यांनी अत्यंत बारकाईने केलेला अभ्यास जाणवतो.

तेच ‘दृश्यम’मध्ये चित्रपटाची कथा आणि मांडणीमध्ये यश होते. जे निशिकांत कामत यांनी लीलया पेलले. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट यशस्वी ठरला. ‘लय भारी’ चित्रपटाची सामान्य कथा. पण गाणी, अभिनय आणि अ‍ॅक्शन अशी भट्टी जमवून निशिकांत यांनी हा चित्रपट यशस्वी करुन दाखवला. त्यांनी फक्त व्यवस्थेवर भाष्य करणाऱ्या चित्रपटांमध्येच स्वत:ला अडकवून ठेवले नाही तर सस्पेन्स, अ‍ॅक्शन अशा सर्व प्रकारचे चित्रपट यशस्वीरित्या बनवू शकतो हे दाखवून दिले. त्यामुळे अशा दिग्दर्शकाची अकाली एक्झिट ही फक्त मराठीचीच नाही तर संपूर्ण भारतीय चित्रपट सृष्टीची न भरुन येणारी हानी आहे.