गीता मणचेकर

खरंतर आपण सर्वजण पर्यावरणाच्या बाबतीत जागरूक झालो आहोत. पण आता वेळ आली आहे ती, आपण आपल्या वैयक्तिक पातळीवर त्यासाठी काय काय करतो आहोत हे इतरांना सांगण्याची आणि निमित्त आहे गणेश चतुर्थीचं.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

कोविड १९ या संसर्गजन्य आजाराने एकच हाहाकार माजवला होता. अजूनही त्याची टांगती तलवार आहेच. ज्यांना त्याची लागण झाली होती त्यांना अजूनही त्याच्या नंतरच्या परिणामांना समोरं जावं लागतंय. म्हणूनच आपल्या आरोग्यासाठी स्वच्छ हवा, स्वच्छ पाणी आणि परिसर याची किती आवश्यकता आहे हे नव्यानं सांगण्याची आता गरज उरलेली नाही. कोरोना व्हायरसने आपलं जीवन व्यापून टाकलं होतं. आपल्या जाणीवे नेणिवेमध्ये अजूनही कोविड १९ रुतून बसलाय त्याच्या उच्चाटनासाठी निसर्ग संरक्षणाची किती गरज आहे हेही सांगण्याची गरज उरलेली नाही. पण रात गई , बात गई या उक्तीप्रमाणे आपण चालू लागलो तर भविष्यात येणाऱ्या संकटांना आपण दोन हात करुच शकणार नाही. म्हणून निसर्ग संवर्धनाला पर्याय नाही.

आणखी वाचा: गणपतीला बाप्पा का म्हणतात ? काय आहे ‘बाप्पा’ शब्दामागील कथा…

मुंबईसारख्या मोठ्या शहरांत पारंपारिक गणेश चतुर्थीचं झगझगीत गणेश उत्सवात केव्हाच रुपांतर झालंय. पूर्वी एखाद्या आळीचा किंवा ग्रामपंचायतीचा सामाजिक गणपती उत्सव असे. पण आता गल्ली बोळात अनेक सामाजिक गणपती बसवले जातात. त्याबरोबर येणारे प्रदूषणाचे प्रश्नही बिकट झाले आहेत. यावर अनेकांनी वैयक्तिक पातळीवर बदल केलेही आहेत. घरगुती गणेश पूजनामध्येही खूप बदल केलेले दिसतात. प्रामुख्याने पाणी प्रदूषण आपल्याकडून होऊ नये या साठी आता अनेक लोक कायम स्वरूपी गणेश मूर्तीची पर्यायाची निवड करताहेत. मध्यंतरी शाडू मातीच्या मूर्तींचा पर्यायही समोर होता पण आता शाडू मातीच्या मूर्तीमुळे होणारे दुष्परिणामही समोर आले आहेत. शाडू मातीच्या गाळामुळे पाण्याच्या स्रोतांचे झरेच बंद होतात. शिवाय मूर्ती रंगवण्यासाठी रसायनांचाही वापर होतो . तोही जलचरांना खूपच घातक ठरतो आहे. यामुळे विसर्जनाला पर्याय म्हणूनही अनेकांनी जाणीवपूर्वक कायम स्वरूपी गजानन मूर्तीची निवड केल्याचे दिसते. हा बदल खूपच स्वागतार्ह आहे.

पूर्वी गणेश मूर्ती ही पार्थिव म्हणजे मातीचीच असे आणि ती बोळवलीही जात असे आपल्याच अंगणात तुळशी वृंदावनात किंवा नारळाच्या झाडाच्या बुंध्याजवळ! निर्मल्याचही त्याच परिसरात विघटन होत असे. किती पर्यावणपूरक होते गणेश पूजन!

आणखी वाचा: शास्त्रीय गणेशमूर्ती कशी असावी ? गणेशमूर्तींचे स्वरूप कसे असावे ? काय सांगते अथर्वशीर्ष…

हल्ली सजावटीमध्येही कल्पकतेने बदल केलेले दिसतात. थर्माकोलला पर्याय म्हणून कापडाचा विविध प्रकारे उपयोग केलेला आपण पाहतो. आवर्जून झाडांचा उपयोग देखाव्यात केला जातोय. या बदलामुळे थर्माकोलमुळे होणाऱ्या प्रदूषणात खूपच घट झाली आहे. गणेशोत्सवात पूजनात वापरल्या जाणाऱ्या पत्री आणि फूलांकडे मात्र अजूनही गंभीरतेने पाहिलं जात नाही. पूर्वी आपल्याच परिसरातून फूलं पत्री आणली जात असत. त्यामुळे सर्वांना मुख्यतः लहान मुलांना आपल्या जैवविविधतेची, औषधी वनस्पतींची ओळख होत असे. पर्यायाने त्यांची जपणुकही होत असे. आता मात्र या गोष्टीचं अंधानुकरण होत आहे. निसर्गसंपन्न डोंगरांच्या कुशीतून पावसाळी वनस्पतींची कशीही ओरबाड होते. ट्रकच्या ट्रक भरून हे रानातील वैभव फुलण्याआधीच, बीजधरण्याआधीच ओरबाडून शहरात आणलं जातं. त्यामधे, कुर्डू, कावला अशा २१ पत्रींमध्ये समाविष्ट नसलेल्याही वनस्पती मुळासकट काढल्या जातात. डोंगरउतारावरची रानहळद तिच्या सुंदर रुपामुळे उखडली जाते आणि आता ती धोक्यात आली आहे. कळलावी तर धोक्यामध्ये समाविष्ट केलेली वनस्पतीही या अज्ञानातून ओरबाडण्यामुळे शहरात आणली जाते. या चुकीच्या पायंड्यामुळे देवाला पत्री वाहताना, वनस्पतींची ओळख व्हावी या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जातो हेही वेगळंच. या वनस्पती जर त्या नैसर्गिक अधिवासातून नष्ट झाल्या तर त्यांच्याबरोबर त्यांच्यावर अवलंबून असणारे कीटक व इतर प्राणीही तिथून कायमचे हद्दपार होतात. या गंभीर बाबीकडे सर्वांनी आवर्जून लक्ष द्यायला हवंय.

आणखी वाचा: श्रीगणेशाला का प्रिय आहेत दुर्वा-शमी आणि मंदार ? गणपतीचा आणि पत्रींचा संबंध काय ?

श्रावण, भाद्रपद हे इतके सुंदर महिने असतात की लहान मुलांना सहज निसर्गाशी जोडता यावं. मुलांना निसर्गाच्या हिरव्या रूपाबरोबरच हिरव्या वासाची अन् हिरव्या शांततेचीही ओळख करून देता यावी. मुलांना टाळमृदुंग, लेझीम आणि भजनाच्या यांच्या साथीने गणेश पूजन करता येतं हे जाणवून द्यायची ही खरंतर छान संधी पण फिल्मी गाणी, डीजे वरचा धांगडधिंगा यांनी या गणेश पूजनातील भाव नष्ट केलाय.

उत्सव हे आनंदासाठी, सौंदर्यासाठी, मनाच्या समृद्धीसाठी केले जातात. तसंच, येणारी पुढची पिढी अनुभवसमृद्ध व्हावी, समर्थ व्हावी यासाठी असतात. पण बदललेल्या काळानुरूप त्यात योग्य बदल करुन मगच त्यांच्याकडे हा वारसा सोपवायला हवा.

मीही २०१० पासून शाडू मातीच्या गणपती मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करत असे . मूर्ती बनवण्यातून सृजनाचा अनोखा अनुभवही सर्वांना मिळत असे. मात्र त्यात एकच अट असे, ती म्हणजे आम्ही दिलेली शाडूची माती पुढील अनेक वर्षे गणपती मूर्ती बनवण्यासाठी वापरली गेली पाहिजे. घरीच विसर्जन करुन तीच माती वाळवून पुढील वर्षासाठी ठेवता येते.

पुढे काही वर्ष मी फक्त अंगठ्याएवढीच मूर्ती करत असे आणि आता तर चक्क चित्रगणपतीच असतो पूजनात आणि फूलपत्री माझ्याच खिडकीवरच्या बागेतील. या बदलांमुळे परिसराचा थोडाही ऱ्हास माझ्याकडून होत नाही याचं समाधान मला मिळतं.

आपल्या स्वछ हवेच्या, परिसराच्या हक्कासाठी आपण सर्वांनीच प्रयत्नशील राहायला हवं. तरच सुदृढ आरोग्याचे फायदे आपल्याला मिळतील. कारण या आधुनिक काळात माणसाच्या कृतीचा निसर्गावर चांगला वाईट परिणाम होणार आहे नव्हे झालाच आहे . त्याच प्रमाणे मानवाच्याही आरोग्याच्या समस्या जटील झाल्या आहेत. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टी, निसर्गाचं भान आणि निसर्गाची जैव विविधता माणसाने जपली तरच भावी पिढ्या इथे शाश्वत राहतील.

वर्षभर तर आपण आपलं जीवन पर्यावण पूरक जगतोच पण अशा या उत्सवांच्या निमित्तानेही आपण निसर्गभान जपणं हे संपूर्ण पृथ्वीच्या चांगल्या आरोग्यासाठी पर्यायाने असंख्य जीवांच्या शाश्वततेकडे टाकलेलं महत्त्वाचे पाऊल आहे. आपली गणेश चतुर्थी आनंदात जावो.

Story img Loader