जालन्यातील दारुल मजानिन ते प्रादेशिक मनोरुग्णालय…एक व्यथा, जी होतेय कथा!

६७ वर्षांआधी शासकीय मनोरुग्णालय अन्यत्र हलवून आता पुन्हा त्याच गावात शासकीय मनोरुग्णालय स्थापन होतेय. असा आगळावेगळा इतिहास जालन्याला लाभणार आहे.

darul majanin mental hospital
दारूल मजनिन, जालना ची पुरुष विभागाची इमारत…येथे १८९५ ते १९५३ शासकीय मनो रुग्णालय होते…आता जनता विद्यालय भरते…

डॉ. नीरज देव
मनोरुग्णालय म्हणजे सामान्यांच्या भाषेतील पागलखाना; गावापासून दूर असणारा, समाजाच्या सर्व अंगांपासून तुटलेला, त्याच्या आत काय चालते? याची खबरबात बाहेरच्या दुनियेला नसलेला अन् बरे ती असावी असेही फारसे कुणाला वाटत नसलेला. तरीही मनोरुग्णालय ही मनोरुग्णांची, त्यांच्या नातेवाईकांची; तशीच समाजाची सुद्धा एक अत्यंत महत्वाची आवश्यकता असते.

ज्याप्रमाणे आपले शरीर आजारी पडते तसेच आपले मनही आजारी पडत असते. शारीरिक आजारांचे जसे सर्दी-खोकल्यापासून कॅन्सर, एड्सपर्यंत विविध प्रकार असतात. त्याचप्रकारे मनोविकारांचेही एखाद्या विचित्र लकबीपासून तो थेट स्किझोफ्रेनियापर्यंत अनेक प्रकार पडतात. या विविध मानसिक आजाराचा विचार केला तर भारतात १००० जणांत कोणता न कोणता मनोविकार असलेले १२२ जण सापडतात तर तीव्रतर मानसिक विकाराचे १००० जणांत ३ ते ६ जण सापडतात, असा एका शोधयंत्रणेचा दावा आहे. याचाच अर्थ तीव्रतर मनोविकार असलेल्यांची संख्या काही लाखांत जाते.

भारतातील मनोरुग्णांचे वाढते प्रमाण, मानसिक आजारावर चालणारे प्रदीर्घ उपचार व त्यावर होणारा न परवडणारा खर्च बघता शासकीय मनोरुग्णालये सोयीची व्हायला हवीत. तशी ती होत नसली तरीही जुनाट व तीव्र मनोरुग्णांसाठी ती आजही उपयुक्त ठरतात. अशा शासकीय मनोरुग्णालयांची संख्या भारतात ४३ असून खाटांची संख्या १९,००० च्या आसपास आहे. यात सामान्य रुग्णालयातील खाटांची संख्या विचारात घेतलेली नाही, ती घेतली तरी उपलब्ध सुविधा किती तोकडी आहे त्याचा अंदाज येतो.

महाराष्ट्राचा विचार करता शासकीय मनोरुग्णालयांची संख्या अवघी ४ आहे. त्यातील पुणे, ठाणे व रत्नागिरी ही तीन मनोरुग्णालये तर परस्परांपासून अवघ्या १००-१५० किमी अंतरावर म्हणजे काही विशिष्ट भागातच एकवटलेली आहेत, तर चौथे नागपूर महाराष्ट्राच्या एकदम टोकाला आहे. मधल्या शेकडो किमीच्या पट्ट्यात मानसिक रुग्णांसाठी पाहिजे तशी ठोस सुविधाच उपलब्ध नाही. जणू या शेकडो मैलात कोणी मनोरुग्णच रहात नाहीत असे कोणाला वाटावे. सन २०१५-१६मध्ये जालना येथे मनोरुग्णालय कागदोपत्री मंजूर झाले. जानेवारी २०२० मध्ये त्याची पायाभरणी झाली, पण निर्मितीची प्रक्रिया कोरोनाच्या आघातात लांबली किंवा धूसर होत गेली. पण राज्याचे आरोग्यमंत्री मूलतः जालनेकर असलयाने धूसर होत चाललेली ती प्रकिया पुन्हा संभव झाली. असो.

जालना येथे याआधीसुद्धा, पुणे, ठाणे व नागपूरच्या मनोरुग्णालयासारखेच एक मोठे शासकीय मनोरुग्णालय होते. त्या विस्मरणात गेलेल्या व आता होऊ घातलेल्या नव्या अशा जालना नगरातील दोन मनोरुग्णालयांची ही कथा!

शेकडो रुग्णांसह रुग्णालय झाले गायब!

भारतातील पहिले मनोरुग्णालय १७ व्या शतकात सन १७९४ साली मद्रास येथे स्थापण्यात आले. त्यानंतर १८ व्या शतकात सुमारे १६ मनोरुग्णालयांची उभारणी करण्यात आली. महाराष्ट्रातील पहिले मनोरुग्णालय १८८६ साली रत्नागिरी येथे स्थापन करण्यात आले. तर १९ व्या शतकाच्या आरंभी १९०१ साली ठाणे, १९०४ साली नागपूर तर १९०७ साली येरवडा (हे मुंबईहून येरवड्याला स्थलांतरीत करण्यात आले होते.) मनोरुग्णालयांची स्थापना करण्यात आली होती. याचाच अर्थ महाराष्ट्रातील ही चारही मनोरुग्णालये स्वातंत्र्यपूर्व काळातील होत.
अठराव्या शतकात उभारल्या गेलेल्या मनोरुग्णालयाच्या याच मालिकेत जालना येथे एक मनोरुग्णालय होते. ज्याची शासन दरबारी कोणतीच नोंद नाही. इतकेच कशाला ‘असे कुठले मनोरुग्णालय जालना येथे होते’ याची नोंद जालना नगर परिषद, आरोग्य संचालनालय, मुंबई, उपआरोग्य संचालक, औरंगाबाद, जिल्हा शल्यचिकित्सक जालना इ कोणत्याच शासकीय विभागात नाही. तर आंध्र प्रदेश आरोग्य संचलनालय, हैद्राबाद अशी कोणतीही माहिती द्यायला तयार नाही असे लेखकाला माहितीच्या अधिकारात कळाले.

माहितीच्या अधिकारात लेखकाला हे ही कळले की, जालना येथून इरागड्डा हैद्राबाद येथे स्थलांतरीत झालेल्या इन्स्टिट्यूट फॉर मेंटल हेल्थ या मनोरुग्णालयाला ‘स्वतःचे पहिले नाव’, ‘पहिले सुपरीटेंडंट’, ‘आपले स्थापना वर्ष’ इत्यादी काहीच ठाऊक नाही. या मनोरुग्णालयाच्या अधिकृत छापील माहिती पुस्तिकेत तत्कालीन अधीक्षक डॉ. गौरी देवी म्हणतात की ‘१९५३ साली या मनोरुग्णालयाची स्थापना कोंडवाडा पध्दतीत झाली, १९६० च्या आसपास त्याचे रुपांतर मनोरुग्णालयात झाले व आज ती एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे.’ वस्तुस्थिती एकदम उलटी होती. जालना येथून सुस्थापित मनोरुग्णालय हैद्राबाद येथे बराकीत हलविले होते. त्यामुळे दुर्दैवाने म्हणावे लागते की शेकडो रुग्णांसह रुग्णालय झाले गायब!

मनोरुग्णालयाचे पहिले नाव शोधायला द्राविडी प्राणायाम

जसे हे मनोरुग्णालय जालन्याच्या इतिहासातून नामशेष झाले तसेच त्याचे नावही गायब झाले. ‘दारुल मजानिन’ हे पहिले नाव शोधायला लेखकाला भरपूर परिश्रम घ्यावे लागले. त्या मनोरुग्णालयात सेवा देणारे लक्ष्मणराव संगमुळे यांना स्थलांतरावेळचे ‘गव्हर्नमेंट हॉस्पिटल फॉर मेंटल डिसीजेस’ हे नाव स्मरत होते. पण रुग्णालयाचे पहिले नाव माहित नव्हते. सर्वप्रथम लेखकाला जालना नगरातील एक वृद्ध गृहस्थ शेंद्रेकर यांच्याकडून कळाले की रुग्णालयावर एक उर्दू पाटी होती व तिच्यावर ‘दारु’ पासून सुरु असलेले काहीतरी नाव होते. जालन्यातील जूने नामवंत डॉ बद्रूद्दीन यांना त्या नावातील ‘मजानिन’ एवढेच शब्द स्मरत होते. नंतर उर्दू विशेषज्ञांकडून ते ‘दारुल मजानिन’ असायला हवे असे लेखकाला कळाले. शेवटी ते लिखित स्वरुपात हैद्राबादच्या १९८३ साली प्रकाशित एका गॅझेट मध्ये सापडले.

पण गॅझेट मधील ती नोंद अतिशय गोंधळाची होती. त्यात म्हटले होते की ‘१८९५ साली चंचलगुडा तुरुंगात दारुल मजानिनची स्थापना करण्यात आली व १९३९ साली ते ४०० रुग्णांसह जालना येथे हालविण्यात आले व नंतर पुन्हा ते हैदराबादला स्थलांतरीत करण्यात आले.’ या सगळ्याच गोष्टी कपोलकल्पित कथा वाटाव्यात अशा होत्या. बघा ना, एकतर तुरुंगात ४०० बेडचे मनोरुग्णालय, ज्याची पुसटशी खूण हैद्राबादेत कुठेही नाही, शिवाय मनोरुग्णालयाची हैद्राबाद ते जालना नि जालना ते पुन्हा हैद्राबाद अशी सुमारे ११-१२०० किमीची दाखवलेली सफर. तात्पुरते म्हणून ज्या जालन्यात मनोरुग्णालय हालविले तेथे मात्र सुनियोजितपणे बांधलेल्या मनोरुग्णालयाच्या प्रचंड मोठ्या दोन इमारती. सन १९४९ च्या एका अहवालात जालना मनोरुग्णालयात २५८ मनोरुग्ण भरती असल्याचा उल्लेख, गॅझेटप्रमाणे १९३९ साली ४०० रुग्ण होते ते १० वर्षांच्या काळात वाढतील की कमी होतील? पण अहवालात तर चक्क १४२ रुग्ण कमी दिसतात. अशा बाबी पाहता प्रस्तुत गॅझेटमधील माहिती निराधार वा अर्धवटच मानावी लागते.

यापेक्षा अगदी वेगळीच माहिती मानसिक आरोग्याचा आढावा घेणाऱ्या मानवाधिकार आयोगाच्या एका अहवालात सापडते. त्यात असे म्हटले आहे की ‘जालना येथे १९०७ साली मनोरुग्णालयाची स्थापना करण्यात आली होती व ते १९०८ साली हैद्राबाद येथे नेण्यात आले होते.’ ही माहिती छापताना संबंधित यंत्रणेने हैद्राबादस्थित प्रस्तुत संस्थेची माहिती पुस्तिकासुद्धा वाचण्याचे कष्ट घेतलेले दिसत नाही. ज्यात १९५३ साली जालन्यातून हैद्राबाद येथे रुग्ण हालविल्याचा (रुग्णालय हलविल्याचा नाही) स्पष्ट उल्लेख आहे.

मनोरुग्णांची हेळसांड : शासकीय यंत्रणेला ना खेद ना खंत

मनोरुग्णांची हेळसांड ही नित्याचीच बाब दिसून येते. २००१ साली तमिळनाडूतील इरवडी येथे एका दर्ग्यात लागलेल्या आगीत काही मनोरुग्ण जळून खाक झाले होते. वैशिष्टय म्हणजे आग लागल्यावर त्यांनी ‘वाचवा, वाचवा !’ असे ओरडायला ही सुरवात केली होती. पण संबंधितांना वाटले की त्यांचा हा नेहमीचाच गोंधळ आहे. त्यामुळे त्यांनी रुग्णांच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष केले व त्यात सहा रुग्ण जळून खाक झाले. त्यानंतर मानवाधिकार आयोगाला जाग आली व त्यांनी मनोरुग्णालयाकडे मोर्चा वळविला. पण १९५३ साली जालना येथून अदमासे ३५०-४०० रुग्ण पाच-सहाशे किमी दूर हैद्राबादला स्थलांतरीत करताना त्यातील कित्येक हरवले, कित्येक पळून गेले अशी नोंद इरागडा, हैद्राबादस्थित मनोरुग्णालयाच्या माहिती पुस्तिकेतच आहे. मात्र, प्रत्यक्षात किती जालन्याहून नेले व त्यातील किती हैद्राबादला पोहोचले याची निश्चित संख्या संबंधित संस्थेकडे उपलब्ध नाही. शिवाय जालना येथील पक्क्या इमारतीतून हैद्राबाद येथे नेल्यानंतर मनोरुग्णांना सैनिकांनी खाली केलेल्या बराकीत सुमारे नऊ वर्ष ठेवण्यात आले. थोडक्यात या सगळ्या परिस्थितीत मनोरुग्णांचे भयानक हाल व आबाळ झाली. पण त्याविषयी संबंधित संस्थेने व स्वतंत्र भारत सरकारने कुठलाही खेद वा खंत आजपावेतो तरी व्यक्त केलेली नाही.

कसे होते जालन्याचे दारुल मजानिन?

उपलब्ध साधनांवरुन असे दिसते की जालना येथे १८९५ साली स्थापन केलेल्या दारुल मजानिन मनोरुग्णालयाच्या स्त्री व पुरुषांसाठी स्वतंत्र अशा दोन वास्तु होत्या. सध्या त्या वास्तुत अनुक्रमे राष्ट्रीय हिंदी विद्यालय व जनता हायस्कूल वसलेले आहेत. त्यापैकी जनता हायस्कूलची वास्तु जवळपास जशाच्या तशाच स्थितीत आहे. आजही ती वास्तु त्या जुन्या मनोरुग्णालयाच्या दणकटपणाची साक्ष देते. या वास्तुत रुग्णाच्या निवासाकरिताचे कक्ष, तीव्र मनोरुग्णांसाठीचे स्वतंत्र कक्ष, पाण्याची टाकी, स्वयंपाकघर, प्रशस्त मनोरंजन गृह, नातेवाईकांना भेटण्यासाठीचा व रुग्णाच्या निदानाकरिताचा स्वतंत्र कक्ष, रुग्णालयाला असलेले भक्कम व भले मोठे किल्ल्याला असावे तसे दार व त्या दारातच आणखी एक छोटे दार अशा साऱ्या बाबी आजही त्या वास्तुच्या सुनियोजितपणाची साक्ष देतात. याशिवाय त्याच वास्तुत दोन डझन शौचालये होती. त्यांना दरवाजे नव्हते मात्र भिंतींचा असा आडोसा उभारलेला होता की आतल्या व बाहेरच्याला सहज कळावे की कोणी तरी आत वा बाहेर आहे. अशी विलक्षण रचना असलेली ही शौचालये नुकतीच पाडण्यात आलीत.

या मनोरुग्णालयात स्थलांतर समयी पुरुष रुग्ण अंदाजे २०० ते २५० तर स्त्री रुग्ण अंदाजे ८० ते१०० भरती होते, असे त्यावेळी त्या रुग्णालयात कार्यरत असलेले लक्ष्मण संगमुळी सांगतात. त्याकाळी आसपासच्या परिसरात जालन्याची ओळख या मनोरुग्णालयामुळे आजच्या येरवडा वा ठाण्यासारखीच होती असे कैक वयोवृद्ध सांगतात. या मनोरुग्णालयासंबंधी अनेक किस्से लेखकाला ऐकायला मिळाले.

निजामाची बेगम मनोरुग्णालयात

या रुग्णांमध्ये निजामाची एक बेगम भरती होती. ती जेव्हा रुग्णालयात दाखल झाली. तेंव्हा तिचे किलोभर दागिने अधीक्षक कार्यालयात जमा झाले. अशी आठवण त्यावेळी मनोरुग्णालयात सेवा देणारे संगमुळी देतात. ह्या बेगमचा थाट काही औरच होता. तिचा कक्ष मनोरुग्णालयाच्या अगदी प्रवेशद्वारालगत नि स्वतंत्र होता. मनोरुग्णालयात प्रवेश करताना तिला कुर्निसात घालणे जवळपास बंधनकारकच होते. तसे न करता कोणी आत शिरला तर त्याला शिव्यांची लाखोली वाहिली जायची व कुर्निसात करुन प्रवेश केला तर त्याला अदबीने बोलाविले जाऊन विडापान मिळायचे, अशी आठवण स्त्री वार्डात भरती असलेल्या एका महिलेच्या नातेवाईक स्व. सिंधुताई देशपांडे देत.

मनोरुग्णालयातील भोजन व्यवस्था

शासकीय रुग्णालयात जाऊन तेथील रुग्णांना मिठाई वा फळे वाटप करुन मिरविणारे आपण नेहमीच पाहतो. त्यांनी पोस्ट केलेल्या फोटोंना अगदी मनापासून दाद देतो. अशीच घटना जालना मनोरुग्णालयात एकदा घडली होती. तत्कालीन अधीक्षक डॉ. नटराजन ( हे डॉ राधाकृष्णन यांचे भाचे जावई होते.) यांना भेटायला गावातील प्रतिष्ठित मंडळी मिठाईची खोके घेऊन आली. दिवाळीच्या सणासाठी आपण ही भेट आणली म्हणून ती सांगू लागली. त्यावेळी डॉ. नटराजन यांनी त्या सर्वांना बसावयास सांगितले व रुग्णालयाच्या आचाऱ्याला आजच्या जेवणाची थाळी व सोबत शिधा पुस्तिका आणायला सांगितली. थाळीत पोळी भाजी सोबत मिठाई पण होती. इतकेच नव्हे तर दिवाळीच्या काळातील शिधा पुस्तिकेत रोज काही ना काही गोड पदार्थ रुग्णांना देण्याची नोंद होती. ती पाहताच ते सर्व प्रतिष्ठित गृहस्थ काहीही न बोलता आपापले मिठाईचे खोके उचलून चालते झाले. आजच्या जमान्यातील शासकीय मनोरुग्णालयातील भोजनाचा दर्जा पाहता ही बाब अधिकच अधोरेखित व्हावी.

janata vidyalay jalna mental hospital
ही दारुल मजानिन जालना ची इमारत…तिचा पूर्ण कायापालट करण्यात आला ….आता येथे राष्ट्रीय हिंदी विद्यालय भरते

जालना येथेच मनोरुग्णालय व्हावे

असे हे मनोरुग्णालय जालना येथून हालवणे निश्चितच जालना नगराला व परिसराला एकप्रकारे मारकच ठरणारे होते. दुर्दैवाने त्याची खंत शासन, लोकप्रतिनिधी, जनता वा वृत्तपत्रे या पैकी कुणालाच नव्हती. लेखकाला प्रस्तुत माहिती त्याची आजी कै. शकुंतला देव व त्यांची मैत्रिण कै. शोभना साठे (ज्यांचे पती उपरोक्त मनोरुग्णालयात डॉक्टर होते.) यांच्याकडून सर्वप्रथम मिळाली. लेखकाने जालना मनोरुग्णालयाच्या स्थलांतराच्या हिरक महोत्सवी वर्षाचा मुहूर्त साधून दि. ०४ जाने २०१३ रोजी जालना येथे पत्रकार परिषद घेऊन मनोरुग्णालयाची सर्व माहिती प्रसिद्ध केली होती. त्यानंतर दि. ०६ जाने २०१३ रोजी जालन्यातील त्या जुन्या मनोरुग्णालयाच्या वास्तुत जिथे सध्या जनता विद्यालय आहे तेथे एक कार्यक्रम घेऊन त्यात जालन्यात पुन्हा मनोरुग्णालय स्थापन करावे, व मध्य महाराष्ट्राची सोय करावी अशी मागणी केली होती. पत्रकार परिषद व प्रस्तुत कार्यक्रमाला वृत्तपत्रांनी चांगलीच प्रसिद्धी दिली होती. या कार्यक्रमास जालना आयएमएचे तत्कालीन अध्यक्ष डॉ. चारुदत्त हवालदार, जालना येथील प्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉ. जे बी भाला देखील होते. तदनंतरही लेखकाने येनकेन प्रकारे ही मागणी लावून धरली.
ही सर्व माहिती लेखकाने हैद्राबाद स्थित मनोरुग्णालयाला धाडली. तोवर ते त्याची स्थापना विकीपीडियावर १९५३ सालच दाखवित होते. लेखकाच्या प्रयत्नानंतर ती आता १८९५ दाखवताहेत.

प्रादेशिक मनोरुग्णालयाची पायाभरणी

साधारणपणे २०१५-१६ च्या आसपास या मागणीला शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळून जालना येथे प्रादेशिक मनोरुग्णालय स्थापनेची घोषणा झाली. २०२० साली जानेवारी महिन्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते जालन्यातील सामान्य रुग्णालयाच्या बाजूला प्रस्तावित प्रादेशिक मनोरुग्णालयाची पायाभरणी झाली. कोरोना संसर्गामुळे रेंगाळलेले हे काम आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यामुळे सुरळीत होते आहे. प्रस्तावित मनोरुग्णालय पाच एकर जागेत असणार आहे. येत्या काही वर्षात बांधकाम पूर्ण होऊन प्रादेशिक मनोरुग्णालय, जालनाची निर्मिती होईल व एक नवा इतिहास लिहीला जाईल. ६७ वर्षांआधी जेथे शासकीय मनोरुग्णालय होते, ते अन्यत्र हालविले गेले व पुन्हा त्याच गावात शासकीय मनोरुग्णालय स्थापन होतेय. असा आगळावेगळा इतिहास जालन्याला लाभणार आहे. शिवाय स्वातंत्र्यप्राप्तीनंतरचे महाराष्ट्रातील पहिले प्रादेशिक मनोरुग्णालय जालना येथे स्थापन होणार आहे. प्रस्तावित मनोरुग्णालयामुळे जालना नगराचे महत्व अधोरेखित होणार आहे. शासकीय मनोरुग्णालय असणाऱ्या महाराष्ट्रातील ४ तर भारतातील ४३ नगरात जालना नगराचे नाव समाविष्ट होणार आहे. मनोरुग्णालयाच्या उभारणीमुळे आपोआपच अन्य वैद्यकीय प्रतिष्ठाने, पर्यायाने संबंधित उद्योगही परिसरात विकसित पावतील.

प्रस्तावित प्रादेशिक रुग्णालयाचे परिक्षेत्र व कार्यक्षेत्र वाढवावे

जालना येथे होऊ घातलेल्या ३६५ खाटांच्या मनोरुग्णालासाठी सध्या ५ एकराची जागा निर्धारीत करण्यात आल्याचे कळते, ही पुरेशी नाही. महाराष्ट्रातील नागपूर येथील मनोरुग्णालयाचा विस्तार ९९.२२ एकरात असून ठाणे, पुणे व रत्नागिरीचा विस्तार अनुक्रमे ७५, ४२ व १४ एकर १९ गुंठ्यात आहे. तर जालन्यातील जुन्या मनोरुग्णालयाचा विस्तार अदमासे १७ ते २० एकरात होता. या सर्व बाबी विचारात घेता भविष्यात जागा वाढविली जावी याची काळजी घ्यावी.

प्रादेशिक मनोरुग्णालय जालन्याला पुणे मनोरुग्णालयाच्या कार्यक्षेत्रात येणारे मराठवाड्यातील ८ जिल्हे जोडले जाणार आहेत. पण त्याशिवाय ठाणे मनोरुग्णालयाच्या कार्यक्षेत्रात येणारे जळगाव, धुळे, नंदुरबार हे तीनही जिल्हे व नागपूरच्या कार्यक्षेत्रात येणारे बुलढाणा व वाशिम जिल्हे जोडणे, अंतराचा विचार करता रुग्ण व नातेवाईकांच्या दृष्टीने सोयीचे ठरणारे आहे. त्यामुळे पुणे, ठाणे व नागपूर मनोरुग्णालयावरील ताण कमी होणार आहे.

शासकीय मनोरुग्णालये अर्थात कोंडवाडा

तीव्र स्वरुपाच्या मनोविकारात ज्यात स्किझोफ्रेनिया, सायकोसिस इ. आजारांचा समावेश असतो, अशा प्रकारच्या रुग्णांना विविध प्रकारचे भ्रम व भास होत असतात. भ्रम म्हणजे लोक आपल्या विरुद्ध आहेत, आपण कोणीतरी खूप मोठे व्यक्ती वा परमेश्वर आहोत वा आपण जगण्यास योग्य नाही इ. प्रकारापैकी कोणताही एक वा कधीकधी आलटून पालटून होणारे भ्रम होत. भास म्हणजे रुग्णांच्या ज्ञानेंद्रियांना मिळणाऱ्या चुकीच्या संवेदना असतात. ज्यात कोणी काहीही न बोलता आपोआप बोलणे ऐकू येणे, भूत दिसणे इ. चा समावेश असतो. या भ्रम व भासामुळे वास्तविकता व कल्पना यात भेद करणे रुग्णाला कठीण जाते. सोबतच बहुतेक रुग्णात अंतर्दृष्टीचा अभाव असतो. म्हणजे आपल्याला काही आजार आहे याची जाणीवच रुग्णाला नसते.

रुग्णाच्या या स्थिती व व्यवहारामुळे रुग्णाचे जवळचे लोकही त्याला कंटाळून गेलेले असतात. रुग्णावर कोणी विश्वास ठेवत नाही. याचाच गैरफायदा उचलून बहुतांश शासकीय मनोरुग्णालयात अशा रुग्णांची मोठ्या प्रमाणात आबाळ केली जाते. कैकवेळा लैंगिक दुर्व्यवहार सुद्धा केले जातात. पण त्याची दखल कोणीच घेत नाही, ‘त्याच्या बोलण्याकडे काय लक्ष द्यायचे? वेडाच आहे तो!’ या भावनेने घरचे लोक ही दुर्लक्ष करतात. परिणामी शोषण करणाऱ्यांचे फावते. अंध अपंगांना मिळणाऱ्या सहानुभूतीपूर्ण वागणूकीपासून हे रुग्ण वंचित राहतात. यांची मजा घेतली जाते, यांना चिडविल्या जाते, यांच्या खाण्यापिण्याचे हाल तर पहावले जात नाहीत. परिणामी मनोरुग्णालयात यांना पशुवत वागणूक दिली जाते. हे सारे पाहूनच न्यायालयानेसुद्धा या मनोरुग्णालयांना ‘कोंडवाडे’ म्हटले आहे. प्रस्तावित प्रादेशिक मनोरुग्णालय, जालना कोंडवाडा बनू नये अशी पहिली अपेक्षा आहे. जालन्यातील जुन्या शासकीय मनोरुग्णालयात रुग्णांना दिला जाणारा आहार अतिशय आरोग्यप्रद होता. त्यात मांसाहाराचा ही समावेश होता. अशी साक्ष त्यात किचन क्लर्क म्हणून काम करणाऱ्या संगमुळी यांची आहे. आरोग्यप्रद आहाराची ती परंपरा नवीन मनोरुग्णालयाने पुढे चालवावी.

मनोरुग्णालयाला जोडून री-ट्रीट हास्पिटल असावे

मनोरुग्णालयातून सुटणारे रुग्ण पुन्हा पुन्हा मनोरुग्णालयात भरती होताना दिसतात. यातील महत्वाचे कारण म्हणजे मनोरुग्णालयातून डिस्चार्ज झालेले मनोरुग्ण लगेच समाजजीवनात मिसळू शकण्याइतपत स्थिर झालेले नसतात. आपल्याला झालेल्या आजाराविषयी ते अनभिज्ञ असतात व यातील बहुतेकांत सामाजिक कौशल्यांचा अभाव असतो. शिवाय ‘लोक आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहतील?’ हा धाक ही त्यांच्या मनांत निर्माण झालेला असतो. त्यासोबत एक प्रकारचा अपराधभाव निर्माण झालेला असतो. तो दूर सारुन त्याच्यात आत्मविश्वास, सामाजिक कौशल्ये भरण्यासाठी काही प्रकारच्या मानसशास्त्रीय पद्धतींचा वापर करावा लागतो. यासाठी रुग्णाला री-ट्रीट हॉस्पिटल वा हाफ वे होम मध्ये मनोरुग्णालयातील डिस्चार्जनंतर ४ ते ६ महिन्यांपर्यत ठेवावे लागते. त्यामुळे विविध मानसोपचार पद्धतींचा वापर करुन रुग्णाचे परत परत रुग्णालयात भरती होणे थांबून पुनर्वसन शक्य होते. या कामासाठी प्रशिक्षित व तज्ज्ञ पुनर्वसन व चिकित्सा मानसशास्त्रज्ञांची आवश्यकता असते. हे पुनर्वसन केंद्र मनोरुग्णालयाला जोडूनच असावे. यात व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र सुद्धा असावे. केवळ जालना येथील शासकीय मनोरुग्णालयातून डिस्चार्ज्ड होणाऱ्या रुग्णांसाठीच नव्हे तर इतर खाजगी संस्थातून सुटणाऱ्या मनोरुग्णांनाही तिथे प्रवेश घेता यावा. याची भरतीची क्षमता पण मनोरुग्णालयाच्या दुप्पट ठेवावी.

स्वतंत्र व्यसनमुक्ती केंद्र

व्यसनाधीनता हा मनोविकार आहे. त्यातील उपचार पद्धती व व्यसनासक्त रुग्णांच्या गरजा इतर मनोविकृतांहून वेगळ्या असतात. हे लक्षात घेऊन जालना येथील प्रस्तावित मनोरुग्णालयात स्वतंत्र व्यसनमुक्ती केंद्र उभारावे. ज्यामध्ये मनोविकृती, मनोचिकित्सा व पुनवर्सन तज्ज्ञांच्या सेवा सहजपणे उपलब्ध व्हाव्यात. सदर विभागात विविध मानसोपचार पद्धती व समुपदेशनादि प्रकार वापरले जावेत, या विभागाचा संबंध ‘अल्कोहोलिक अॅनानिमस’ सारख्या सेवाभावी संस्थांशी जोडावा. जेणेकरुन डिस्चार्जनंतरही ती व्यक्ती व्यसनापासून दूर कशी राहील ते पाहता येईल. शिवाय ‘व्यसनाधीन व्यक्तीला कसे हाताळावे’ याबाबतचे शास्त्रीय समुपदेशन व्यसनाधीन व्यक्तीच्या घरमंडळींना देण्याची सुविधा असावी.

कम्युनिटी मेंटल हेल्थ सेंटर

प्रादेशिक मनोरुग्णालय केवळ तीव्र स्वरुपाच्या मनोरुग्णांसाठीच कामाचे असते. असा बहुतेकांचा समज असतो, तसा तो खोटाही नसतो. पण प्रस्तावित मनोरुग्णालयाने ‘समुदाय मानसिक स्वास्थ्य केंद्र’ उभारावे, ते परिसरात असले तरी स्वतंत्र असावे. याचे दोन भाग असावेत. त्यातील पहिला भाग सामान्य मानसिक समस्या जसे चिंता, उदासिनता, मंत्रचळ, हिस्टेरिया इ. च्या रुग्णांसाठी असावा. यात केवळ औषधोपचारावर भर न देता मानसोपचार पद्धतींवर भर देण्यात यावा. याच केंद्राद्वारे वार्तनिक समस्यांवर जसे पती-पत्नीतील विसंवाद, व्यक्तीत्व विकृती यावर उपचाराची सेवा पुरविण्यात यावी.

याच केंद्राचा दुसरा भाग जनजागृतीचा असावा. याद्वारे परिसरात मार्गदर्शन सभा घेण्यात याव्यात. याशिवाय अंगात येणे (ट्रान्स व पझेशन डीसऑर्डर) या मनोविकारावर उपचार करण्यासाठी परिसरात असलेली बुवाबाजी जी की रुग्णांच्या नातेवाईकाची फसवणूक करीत असतात. त्यांच्याबाबतची जनजागृती या केंद्राने करावी. त्यासाठी केवळ मनोरुग्णालयाच्या परिसरात अडकून न पडता मोबाईल व्हॅनचा उपयोग करुन समाजात जावे व मानसिक आजाराची माहिती सामान्य भाषेत लोकांना देऊन लोकांना मानसिक स्वास्थ्याबाबत जागृत करावे. जेणेकरुन मानसिक आजाराला अगदी सुरवातीलाच ओळखता येईल व प्रतिबंध घालणे ही सोपे जाईल. सोबतच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा हेतू साध्य करता येईल.

बाल मार्गदर्शन केंद्र

साधारणपणे शासकीय मनोरुग्णालये प्रौढ व वृद्धांवरच लक्ष केंद्रीत करताना दिसतात. मात्र प्रस्तावित मनोरुग्णालयाच्या परिसरात मुलांच्या मानसिक समस्या, बालकातील आत्महत्येच्या प्रवृत्ती, पालक बालक संबंध समस्या इत्यादी हाताळण्यासाठी स्वतंत्र बाल मार्गदर्शन केंद्र असावे. जेणेकरुन मुलांच्या मानसिक समस्यांसाठी जनतेला इतरत्र जावे लागणार नाही. याशिवाय परिसरात जी मुले गुन्हेगारीत व व्यसनात अडकलेली असतात, ज्यांची संख्या खूप मोठी आहे. त्यांच्यात सुधार करण्यासाठी मानस शास्त्रीय तंत्रांचा वापर करणारी यंत्रणा याच केंद्राद्वारे केली जावी.

शिक्षण प्रशिक्षण केंद्र

एका शोधानुसार भारताचा विचार करता मनोविकृती तज्ज्ञांची संख्या ९,००० च्या आसपास आहे, जी किमान ३६,००० हवी आहे. तर प्रशिक्षित मनोचिकित्सकांची संख्या केवळ ८५२ आहे. ती कैकपटीने अधिक हवी. हा तुटवडा भरुन काढण्यासाठी मनोरुग्णालयालाच पुढाकार घ्यावा लागतो. त्यामुळे वर उल्लेखलेले पुनवर्सन, कम्युनिटी मेंटल हेल्थ इ विविध केंद्र जर मनोरुग्णालय उभारतानाच जोडले तर अशा प्रकारचे मनोविकृती तज्ज्ञ, मनोचिकित्सक, पुनर्वसन व्यावसायिक इत्यादी घडविणारे शिक्षण प्रशिक्षण केंद्र निर्माण करणे सोपे जाईल. त्यामुळे मनोरुग्णालयासोबत देशाचाही फायदा होईल.

शिवाय नवीन मानसिक स्वास्थ्य कायद्यात अल्टरनेटीव्ह मेडिसीनचाही अंतर्भाव करण्यात आला आहे. तेव्हा आयुर्वेद, सिद्ध, होमिओपॅथी इ. सेवांचा अंतर्भाव असणारे उपचार केंद्र हे प्रायोगिक तत्वावर तर या पॅथीतील वैद्यकीय तज्ज्ञांना प्रशिक्षण देणारे केंद्र जर प्रस्तावित मनोरुग्णालयाला जोडले गेले तर अधिकच उत्तम होईल.

थोडक्यात या सर्व सुविधांमुळे जालना येथे स्थापन होणारे प्रादेशिक मनोरुग्णालय केवळ शॉक व औषधी देणारे मनोरुग्णालय न राहता ‘संपूर्ण मानसिक स्वास्थ्य केंद्र’ होईल. गेली ५८ वर्षे जालना नगराची व परिसराची जी हानी कळत नकळत शासनाकडून झाली होती. त्याची सव्याज परतफेड म्हणून अशी अपेक्षा बाळगणे चुकीचे ठरणारे नाही.

जाता जाता एवढेच सांगावे वाटते, २०१३ साली हा विषय मांडताना जालन्यातून एक मनोरुग्णालय गेले, जालना नगराचे एक वैशिष्टय गेले, म्हणून वाटणारी जी एक सल, एक व्यथा होती ती नवीन प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या रुपाने एका कथेत बदलते आहे. या कथेत लेखकाची भूमिका बीजभूत राहिली आहे, त्याची नोंद शासनाने कागदोपत्री व प्रस्तावित मनोरुग्णालयाच्या माहिती पुस्तिकेत घ्यायला हवी. तब्बल पाच दशके जालन्यात असलेल्या मनोरुग्णालयाचा इतिहास गहाळ होतो ही बाब केवळ गलथानपणाचीच नव्हे तर गंभीर बाब होती. आता तशी चूक होऊ नये यासाठी सुद्धा ही नोंद घेणे इतिहासाच्या दृष्टीने गरजेचे आहे.

(लेखक सुप्रसिद्ध मनोचिकित्सा तज्ज्ञ आहेत)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: History of jalna mental hospital moved to hyderabad now janata vidyalay pmw

ताज्या बातम्या