Bolg: #होम: नातेसंबंधाचं प्रेक्षणीय घर

सर्व पात्रांची कामगिरीही दमदार असली तरी ऑलिव्हरची भूमिका करणाऱ्या इंद्रनने संपूर्ण सिनेमा आपल्या खांद्यावर वाहून नेला आहे.

home
(File Photo)

-सॅबी परेरा

आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या, आपली काळजी घेणाऱ्या लोकांपेक्षा सोशल मीडियावर मिळणारा एखादा लाईक किंवा एखादी कमेंट, मोबाईलवर वाजणारी एखादी नोटिफिकेशन आपल्याला अधिक महत्वाची वाटू लागली आहे. कोरोना महामारीच्या काळात लोकांना सक्तीने आपल्या कुटुंबासोबत राहावे लागल्याने काही ठिकाणी परस्परांतील नातेसंबंध सुधारले आहेत तर कित्येक ठिकाणी नात्यातल्या भेगा रुंदावून कुटुंब विस्कळीत झाल्याचीही उदाहरणे आहेत. एकमेकांपासून कोसो मैल दूर असणाऱ्या, एकमेकांना कधीही न पाहिलेल्या, न भेटलेल्या दोन व्यक्ती भावनिकदृष्ट्या एकमेकांच्या अगदी जवळ असू शकतात. याउलट एकाच कुटुंबात, एकाच घरात राहणाऱ्या व्यक्ती भावनिक आणि मानसिकदृष्ट्या एकमेकांच्या जवळ असतीलच असे नव्हे. हे पूर्वापार चालत आलेलं सत्य असलं तरी केवळ भौगोलिकदृष्टया आपल्या “जवळ” असलेली व्यक्ती दूरच्या एखाद्या व्यक्तीच्या “सोबत” असण्याची शक्यता आजकालच्या तंत्रज्ञानातील सुधारणेमुळे कित्येक पटीने वाढली आहे.

प्रगत तंत्रज्ञानाने माणसांवर, कुटुंबावर, त्यांच्या नातेसंबंधावर कसे आणि कायकाय परिणाम केलेत यावर या आधीही काही फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स येऊन गेलेल्या असल्या तरी एकंदरीत चित्रपटीय अनुभव आणि परिणामाच्या बाबतीत ऍमेझॉन प्राईम वर रिलीज झालेला “#होम” हा मल्याळम सिनेमा आजवरच्या सिनेमापेक्षा वेगळा आणि बऱ्यापैकी उजवा आहे.

अप्पचन (कैनकारी थंगराज) हे वयस्क गृहस्थ डिमेन्शिया या आजाराने ग्रस्त आहेत. आपल्या तरुणपणी ते इंग्रजी पुस्तकांचे मल्याळम अनुवाद टाइप करण्याचं काम करायचे. अप्पचन त्या पुस्तकांत आणि त्यातील आभासी दुनियेत इतके रममाण झाले कि त्या कादंबरीतील पात्रांची नावे त्यांनी आपल्या मुलांना (मुलं: ऑलिव्हर ट्विस्ट, पीटर पॅन आणि मुलगी: मेरी पॉपीन्स) दिली. घरात आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे याच्याशी पूर्ण अनभिज्ञ असलेल्या या माणसाच्या आयुष्यातील वास्तवाची रिबन संपली असली तरी आठवणींच्या बटनांचा खडखडाट सुरूच आहे.

ऑलिव्हर टिवस्ट (इंद्रन) हा आपल्या मुलाबाळांकडून प्रेम मिळविण्यासाठी तडफडणारा टिपिकल मध्यमवर्गीय बाप आहे. आपल्या भावी सासऱ्याची स्तुती करण्याची एकही संधी न सोडणाऱ्या, त्यांच्याशी मित्रत्वाने वागणाऱ्या आपल्या मुलाने, आपल्याशीही तसेच वागावे म्हणून ऑलिव्हर धडपडत आहे. आपण आपल्या मुलांशी बोलत असताना त्यांना आपल्यापेक्षा त्यांच्या हातातील मोबाईलची, त्यातील, व्हिडियो कॉल, फेसबुक, व्हॉट्सएप, इंस्टाग्राम या आभासी दुनियेची ओढ का वाटते ह्याचे त्याला कुतूहल आहे. आपली मुलं जर आभासी दुनियेतून वास्तवात येऊ बघत नसतील तर त्यांच्याशी कनेक्ट होण्यासाठी आपणच स्मार्टफोन नामक उंबऱ्यावरून या आभासी दुनियेत जाऊ का नये असे ऑलिव्हरला वाटते. पण तो जितका आपल्या मुलांसोबत जाण्याचा प्रयत्न करतो तितकी ती मुलं त्याला झिडकारून लावतात. विसंगती अशी कि, चार्ल्स डिकन्सच्या कादंबरीतील ऑलिव्हर ट्विस्टला कितीही मिळालं तरी आणखी मिळविण्याची हाव आहे या उलट #होम मधील ऑलिव्हर ट्विस्टला, आपल्या मुलाबाळांनी आपल्याला हिडीसफिडीस करू नये, बाप म्हणून किमान आदर मिळावा इतकीच मामुली त्याची इच्छा आहे.

अँथनी (श्रीनाथ भासी) हा ऑलिव्हरचा थोरला मुलगा सिनेमा दिग्दर्शक आहे. त्याचा पहिला सिनेमा हिट झाला आहे. दुसऱ्या सिनेमासाठी प्रोड्युसर आणि सिनेमाचा नायक त्याच्या मागे लागले आहेत पण अँथनी मोबाईल आणि सोशल मीडियात पूर्ण बुडालेला आहे. त्याला आपल्या कामावर लक्ष केंद्रित करता येत नाहीये. त्याला डायरेक्टर्स ब्लॉक आलेला आहे. त्यामुळे दिलेल्या डेडलाईन तो पाळू शकत नाहीये. अँथनीला आपल्या भावी सासऱ्याच्या कर्तृत्वाचा खूप गर्व आहे. आपल्या सासऱ्याच्या कर्तृत्वापुढे आपल्या बापाचं कर्तृत्व यकिंचित आहे असं तो आपल्या बापाला तोंडावर सांगतो.

ऑलिव्हरचा धाकटा मुलगा चार्ल्स (नासलेन) हा आजच्या स्मार्ट, टेक-सॅव्ही, लाडावलेल्या, आणि काहीशा मतलबी तरुण पिढीचा प्रतिनिधी आहे. तो स्वभावाने गोड असला तरी तोंडाने उद्धट आहे. आपली छोटी मोठी कामं करण्यासाठीही त्याला आईवडिलांची मदत लागते. तो युट्युबर आहे. सारखा मोबाईलवर किंचाळत कसले ना कसले व्हिडीओ बनवत असतो, थापा मारत असतो, नसलेलं ज्ञान पाजळत असतो.

आपल्या मुलांकडून सातत्याने आपल्या नवऱ्याची होणारी हेटाळणी सहन न होऊन आपल्या उरात कोंडलेला राग व्यक्त करण्याची एक संधी दिग्दर्शकाने ऑलिव्हर ट्विस्टची बायको कुट्टीअम्मा (मंजू पिल्लई) हिला दिलेली असली तरी स्वतःची दुखणी अंगावर काढून स्वयंपाक, धुणीभांडी, घरादाराची साफसफाई, आजारी सासऱ्याची सेवा-शुश्रूषा, लाडावलेल्या दोन्ही तरुण मुलांना काय हवं नको ते पाहणे असे प्रेमळ आणि सुखी कुटुंबाच्या ग्लोरिफाइड प्रतिमेखाली भारतीय गृहिणीच्या वाट्याला येणारे भोग कुट्टीअम्माच्या वाट्यालाही आले आहेत.

आज आपण सर्वजण एकमेकांशी कनेक्टेड आहेत तरीही प्रत्येकजण आपापल्या लॅपटॉपच्या, मोबाईलच्या कोशात गुरफटलेला आहे. प्रत्येकजण आपापल्या जागी, आपापल्या दृष्टीने योग्यच आहे. त्यामुळे या सिनेमात कुणी व्हिलन नाहीये. व्हिलन असलाच तर तो आहे कुटुंबातील नात्यांमध्ये भिंत बनून उभा ठाकलेला आधुनिक काळ आणि तंत्रज्ञानाने आणलेलं आभासी जग.

काळाप्रमाणे बदलता न आल्याने आपला ‘व्हिडीओ कॅसेट लायब्ररी’चा धंदा बंद करावा लागलेला मध्यमवर्गीय गृहस्थ, घरातील आजारी वृद्ध, गुडघ्याचं दुखणं अंगावर काढून कुटुंबाला हवं नको बघणारी, आपल्या दोन तरुण मुलांकडून दुर्लक्षित होत असलेल्या नवऱ्याची अवस्था जाणून व्याकुळ होणारी आई, क्रिएटिव्ह ब्लॉक मधे अडकलेला सिनेमा दिग्दर्शक, युट्युब सेलेब्रिटी होण्यासाठी धडपडणारा कोवळा तरुण असं हे कुटुंब पाहताना आपल्या घरातली, आजूबाजूची पात्रे आपल्या डोळ्यासमोर आली नाही तरच नवल.

इतर सर्व पात्रांची कामगिरीही दमदार असली तरी ऑलिव्हरची भूमिका करणाऱ्या इंद्रनने संपूर्ण सिनेमा आपल्या खांद्यावर वाहून नेला आहे. केवळ इंद्रनच्या नैसर्गिक अभिनयासाठी तरी पाहावाच असा हा सिनेमा आहे.

हा सिनेमा हलक्याफुलक्या हाताळणीने प्रेक्षकाला बांधून ठेवत असला तरी कथेच्या मानाने २ तास ४० मिनिटे ही सिनेमाची लांबी जरा जास्तच वाटते. काही प्रसंग, विशेषतः सायकॉलॉजिस्टचा ट्रॅक अनाठायी घुसवला आहे असे वाटते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मुलांकडून सन्मानाने वागवले जाण्यासाठी पालकांनी काही असाधारण (Extra Ordinary) करायला हवे, ही अपेक्षाच चुकीची वाटते.

वैयक्तिक भेट, स्पर्श या ऐवजी डिजिटल माध्यमातूनच भावना व्यक्त केल्या जाण्याच्या आजच्या वस्तुस्थितीवर बोट ठेवणारा, कोणताही मोठा स्टार कलाकार न घेता, मध्यमवयीन, मध्यमवर्गीय वाटतील असे कलाकार घेऊन, मेलोड्रामाचा मोह टाळून, हसतखेळत सामाजिक संदेश देणारा सुंदर सिनेमा देता येतो हे #होम द्वारे दिग्दर्शक रोजीन थॉमस आणि त्यांच्या टीम ने सिद्ध केले आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Home malyalam movie review by saby parera kpw

ताज्या बातम्या