काही दिवसांपूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली जे-म्युंग यांची बैठक झाली. म्युंग हे भारत दौर्‍यासाठी आले होते. या दरम्यान मोदींनी महत्त्वाचे विधान केले, “आज के-पॉप आणि के-ड्रामा भारताच्या कानाकोपऱ्यात लोकप्रिय होत आहेत. त्याचप्रमाणे भारतीय चित्रपट आणि संस्कृतीचे कोरियामध्येही मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे.” भारतातील तरुणांमध्ये के-पॉप कल्चर आणि के-ड्रामा खूप लोकप्रिय होत आहे असेही मोदी म्हणाले; पण हे के-पॉप, के-ड्रामा भारतात कधीपासून चलनात आहे? के-ड्रामाची इतकी भुरळ भारतीय तरुण-तरुणींना कशी पडली? के-ड्रामाचा हेतू केवळ मनोरंजनच आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधू या, या लेखातून.

के-पॉप, के-ड्रामा आहेत तरी काय?

१९६०-७० च्या दशकात ‘बिटल्स’चं नाव माहीत नाही असा एकही तरुण सापडणं जसं कठीण होतं; त्याचप्रमाणे ‘बीटीएस’ हे नाव माहीत नाही असे ‘जेन-झी’ तरुण-तरुणी सापडणे कठीण आहे. ‘बीटीएस’ म्हणजेच ‘बँगटॅन सोन्योडॅन’. हे एका म्युझिकल बँडचं नाव आहे, जो के-पॉप कल्चरचाच एक भाग आहे. ‘के-पॉप’ म्हणजेच ‘कोरियन-पॉप्युलर कल्चर’ आणि ‘के-ड्रामा’ — म्हणजेच ‘कोरियन-ड्रामा’ यात कोरियन चित्रपट, वेब मालिका यांचा समावेश होतो.

भारतात के-ड्रामाची सुरुवात कधीपासून?

जागतिकीकरणासोबतच सगळ्या प्रकारचे आंतरराष्ट्रीय चित्रपट आणि सीरियल भारतीय टीव्ही वाहिन्यांवर दिसू लागले. त्यात अगदी सुरुवातीला जे कोरियन चित्रपट चांगलेच गाजले, त्यात २०१६ च्या ‘ट्रेन टू बुसान’ या थ्रिलर चित्रपटाचे नाव अग्रक्रमाने घ्यावं लागेल. एका विषाणूचा संसर्ग अनेक लोकांना होतो, आणि हळू हळू ते लोक झोंबीमध्ये परिवर्तीत होतात असे या चित्रपटाचे कथानक आहे. परंतु, चित्रपटातील बाप-लेकीची कथा आणि बुसानपर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणतो.

हेही वाचा : नेटफ्लिक्सवरील ‘ही’ ट्रेंडिंग सीरिज पाहिलीत का? IMDb वर ९.३ रेटिंग मिळवून मोडला ‘स्क्विड गेम’चा रेकॉर्ड

अगदी सुरुवातीला ‘डाए जांग ग्युम’ किंवा ‘ज्वेल इन दी पॅलेस’ सारख्या ऐतिहासिक मालिका भारतात सुरू झाल्या. ‘डिसेंडेंट्स ऑफ सन’, ‘हिलर’ असे सीरिज् ड्रामा आहेत जे टीव्हीवर पाहिले जात असत. पण, वेब-मालिकांचे खरे चलन-वलन वाढले ते कोविड काळानंतर. तोपर्यंत भारतीय प्रेक्षक बर्‍यापैकी ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळू लागला होता. अशातच ‘बीटीएस’सारख्या बँड ग्रुप्सचा प्रभाव अगदी शिगेला पोहोचला होता.

विशेष गाजलेल्या वेब-मालिकांच्या यादीत ‘क्वीन ऑफ टिअर्स’, ‘बिझनेस प्रोपोझल’, ‘मॅरी माय हजबंड’ ही काही प्रेम आणि नातेसंबंध यांच्याशी निगडीत ड्रामांची नावे. अलीकडच्या काळात प्रचंड गाजलेला, सर्वाधिक पाहिला गेलेला, ज्याचे एकूण तीन सीझन निघाले असा के-ड्रामा म्हणजे ‘स्क्वीड गेम’ ! ‘स्क्वीड गेम’ ही सायको-थ्रिलर वेब-मालिका आहे. ही मालिका पाहण्यासाठी लोकांनी खास नेटफ्लिक्सचे सदस्यत्व घेतले, इतकी या ‘स्क्वीड गेम’ची लोकप्रियता आहे. या मालिकेतील ‘स्पर्धक ४५६’ ज्याची भूमिका सिओंग् गी-हून या कलाकाराने केली आहे, त्याला प्रेक्षक कधीच विसरू शकणार नाहीत. एखादा सर्वसामान्य दुर्बळ माणूसही नायकाच्या रूपात दाखवला जाऊ शकतो हे तर सिद्ध होतेच, पण पैशासाठी माणूस कोणते टोक गाठू शकेल हेही दिसून येते. माणसाच्या तीव्र हव्यासाचे आणि तीव्र चांगुलपणाचे दर्शन या वेब-मालिकेत घडते. यात प्रसिद्ध झालेली गाणी आजही लोकप्रिय आहेत.

भारतीय तरुणांना के-ड्रामाचे इतके आकर्षण का?

खरं तर, काही मोजक्या वेब मालिका आणि चित्रपट सोडले तर मुलांमध्ये के-ड्रामाचा चाहता वर्ग हा तितका नाही. भारतीय तरुणींमध्येच के-ड्रामाचे आकर्षण मोठ्या प्रमाणावर आहे. इतकेच नव्हे तर ‘बीटीएस’सारख्या बँड्समध्येदेखील मुलांच्या तुलनेत मुलींचा चाहतावर्ग फार मोठा आहे. के-ड्रामाच्या या यशामागे अनेक कारणे आहेत,

१) उपलब्धता

के-ड्रामा अगदी सहज उपलब्ध होतात, त्यात निम्म्याहून अधिक प्रेक्षक वर्गाला भाषेचे बंधन असतानादेखील केवळ इंग्रजी सबटायटल्सवर के-ड्रामा पाहणार्‍यांची/पाहणारींची संख्या अधिक असली, तरी हिंदी डब के-ड्रामांची संख्यादेखील तितकीच जास्त आहे. के-ड्रामाची लोकप्रियता वाढण्यासाठी ॲमेझॉन कंपनीचे ‘मिनी टीव्ही’ ॲपसारखे अल्गोरिदमही तितकेच जबाबदार आहेत.

२) स्वैर प्रेमकथा

के-ड्रामांमध्ये सर्वात जास्त वेब-मालिका किंवा चित्रपट या निव्वळ प्रेमकथा आहेत. सर्व प्रकारच्या काल्पनिक कथांपासून वास्तवातील प्रेमकथांपर्यंत के-ड्रामात दिसणारी स्वैर संस्कृती यामागील फार महत्त्वाचा भाग ठरते. शिल्पा रावत यांच्या ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ इंडियन सायकोलॉजी’च्या ‘के-ड्रामा इनफ्ल्युएन्स ऑन इंडियन विवर्स’ या शोधनिबंधात त्या म्हणतात, विशेषतः मुली जोडीदारांविषयीच्या अपेक्षा के-ड्रामा पाहून तयार करतात. यावरून के-ड्रामाचा मुलींच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो ते लक्षात येते.

३) लिंगविषयक प्रतिमांना छेद

‘रुपकथा जर्नल’ या मासिकातील कामना सिंह यांचा ‘नीड ऑफ एम्ब्रेसिंग सायबॉर्ग फेमिनीझम’ हा शोधनिबंध लिंग चर्चेविषयी महत्त्वाचा ठरतो. के-ड्रामांमधील मुली या नेहमीच लाजर्‍या बुजर्‍या दाखवल्या जात नाहीत. त्या स्वतंत्र, कणखर, ताठ मानेने जगणार्‍यादेखील दाखवल्या जातात; तर मुलं लाजरी-बुजरी, हळहळ व्यक्त करणारी अशी, पारंपरिक स्त्री-पुरुष प्रतिमांना छेद देणारी अनेकदा पाहायला मिळतात. या अशा स्त्री-पुरुषांचे आकर्षण विशेषकरून मुलींमध्ये निर्माण होत असल्याचे कामना सिंह यांच्या शोधनिबंधात स्पष्ट झाले आहे.

४) जीवनशैली

भारतातील प्रेक्षकांवर सर्वात जास्त प्रभाव हा जीवनशैलीचा पडतो, असे शिल्पा रावत यांचे म्हणणे आहे. के-ड्रामा पाहणारा बराचसा प्रेक्षकवर्ग हा निम्न-मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलींचा आहे. के-ड्रामांमध्ये नेहमीच गडगंज संपत्ती असलेल्या युवकांच्या प्रेमकथा दाखविण्यात येतात. यातूनच व्यक्तिरेखांमधील महत्त्वाकांक्षा जशा पडद्यावर टोकदार दिसतात, तशाच त्या प्रेक्षकांची मनेही अणकुचीदार करतात.

रावत यांच्या शोधनिबंधात, मुलींवर के-ड्रामाचा फार मोठा परिणाम होतो याची नोंद घेण्यात आली आहे. के-ड्रामातील नायिकांच्या रूपावरून त्यांच्या शरीरयष्टीचा मोठा प्रभाव हा प्रेक्षक मुलींच्या मनावर मोठ्या प्रमाणात होतो. के-ड्रामा पाहून अनेक मुलींनी डाएट सुरू केल्याचेही निदर्शनास आले आहे.

५) युटोपियन संस्कृतीचा परिणाम

पहिली गोष्ट म्हणजे के-ड्रामातील बव्हंशी नायक-नायिकांचे चित्रण हे नवीन मूल्यांना प्रेरित असले तरी या पात्रांचे चित्रण Individualistic केलेले असते. याला Narcissismची छोटीशी झालर आहे. स्व-प्रेम, आत्मपूजा, आत्मगौरव, स्वकेंद्रितता ही नवीन मूल्य म्हणून तयार होऊ लागली आहेत. एकेकाळी या गुणांना स्वार्थीपणा म्हणून बघितलं जात असे. दुसरी गोष्ट म्हणजे एकांडेपण, नैराश्य यांच्यामुळे मुला-मुलींमधील स्वभावात बदल होणं संभाव्य आहे.

६) विषयवैविध्य

के-ड्रामांमध्ये विविध विषय हाताळले गेले आहे. अगदी समाजात टॅबू असलेल्या किंवा ज्याचा अंतर्भाव पौर्वात्य संस्कृतीत फारसा आढळत नसला तरी त्याची ओळख के-ड्रामाने करून दिली आहे. याचेच एक उदाहरण म्हणजे ‘लव्ह अँड लिशेस’ चित्रपट. ‘बीडीएसएम’ BDSM संकल्पनेवर आधारित हा चित्रपट फिमेल डॉमिनेशन या समाजात जास्त चर्चिल्या न जाणार्‍या ‘टॅबू’ विषयावर भाष्य करतो.

भारत, के-ड्रामाची एक मोठी बाजारपेठ

जगातील सर्वात जास्त नेटकरी आजच्या घडीला भारतात आहे. अशात ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळणार्‍यांची संख्याही फार मोठी आहे. के-ड्रामा पाहणार्‍यांची/पाहणारींची संख्यादेखील भारतात काही थोडी थोडकी नसून दीड कोटींच्या घरात आहे, त्यामुळे भारत ही कोरियन ड्रामासाठी फार मोठी बाजारपेठ आहे. किती तरी भारतीय तरुण कोरियन भाषा शिकू लागले आहेत. मुला-मुलींसाठी सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती त्या अनुषंगाने केली जाते. बॅग्ज, बॉटल्स, कीचेन इ. कितीतरी वस्तूंचा खप हा के-पॉप संस्कृतीच्या नावावर होतो. तसेच कोरियन खाद्यसंस्कृतीचा विस्तार, कपडे यांचाही प्रभाव तरुण मनावर होत असल्याचे दिसून येते.

२०११ पासूनच कोरियन सरकार के-ड्रामासाठी दरवर्षी तब्बल ४ हजार कोटींचे अनुदान देते. कोरियन सरकारने जाणीवपूर्वक ही के-पॉप संस्कृती जगवली आहे. जागतिक मनोरंजन विश्वावर स्वामित्व मिळविण्याचा जरी हा प्रयत्न नसला, तरी अनेक देशांतील युवकांच्या स्क्रीन्सवरील नियंत्रण स्वतःकडे राखण्याचा हा फार महत्त्वाचा प्रकल्प आहे. कोरियाच्या याच के-पॉप संस्कृतीच्या मोठ्या प्रमाणावरील प्रसाराला चिनी पत्रकारांनी “हाल्यू वेव्ह” म्हटले आहे, त्यामुळेच के-ड्रामा ‘सॉफ्ट-पॉवरच्या’ रूपात जगापुढे येत असल्याचे एक चित्र भूराजकीय पटलावर तयार होत आहे.

मोदींनी भारत-कोरियातील मैत्रीपूर्ण संबंधांना प्रोत्साहन देत २०२८ मध्ये ‘भारत-कोरिया मैत्री महोत्सवा’चे आयोजन करणार असल्याचे सांगितले आहे. भारतात वाढत चाललेल्या कोरियन संस्कृतीच्या प्रभावामुळे हा निर्णय घेण्यात येत असावा. या निमित्ताने आपण भारतीय ‘के-ड्रामा’ आणि ‘के-पॉप’चे अधिक चांगले ग्राहक बनू याबाबत मात्र कुठलीच शंका बाळगायचं कारण नाही !