Letter from Corona: …कळावे लोभ असावा; आपला कृपाभिलाषी ‘करोना’

“तुम्ही मला एवढ्यात तरी जाऊ द्याल असं वाटत नाही. म्हणूनच, माझ्या ‘प्रिय’ माणसांनो….”

Letter from Corona: …कळावे लोभ असावा; आपला कृपाभिलाषी ‘करोना’
  • वैष्णवी कारंजकर

माझ्या ‘प्रिय’ माणसांनो…
तुम्ही म्हणाल हा काय चावटपणा आहे? करोनासाठी माणूस प्रिय कसा काय असू शकतो? पण ते खरंच आहे. अहो, बांडगुळासाठी सर्वात काय प्रिय असेल तर ते ज्यावर फोफावतं ते झाड. झाड नसेल तर बांडगुळाचं अस्तित्व शून्य आहे, आणि तुम्ही नसाल तर माझं भवितव्यच ते काय?
त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी प्रिय तर आहातच, पण मी तुम्हाला आणखी एक आश्वासन देतो की मी तुम्हाला लवकर सोडून जाणार नाही. खरंतर असं म्हणणं चुकीचं आहे, तुमचं वागणं बघता तुम्हालाही मी आवडतोय आणि तुम्ही मला एवढ्यात तरी जाऊ द्याल असं वाटत नाही. म्हणूनच, माझ्या ‘प्रिय’ माणसांनो…

आपल्या या प्रेमप्रकरणाला आता वर्ष होऊन गेलं की! नवं लग्न झालेल्या जोडप्याचे सुरूवातीचे दिवस कसे भुर्रकन उडून जातात तसंच हे वर्ष गेलंय, नाही? काय मग कसं वाटतंय मला नांदवताना? वर्षभरात तुमच्या या जोडीदाराला काय हवं नको ते कळलं असेलच की! मला विचाराल तर तुम्हाला ते नुसतं कळलेलंच नाही तर तुम्ही ते अंगी बाणवलं देखील! म्हणूनच तर तुम्ही मास्क नीट घालत नाही, स्वच्छता पाळत नाही, सोशल डिस्टन्सिंगचा तुम्हाला गंध नाही. ते तर जाऊ द्या, मला हद्दपार करण्यासाठी तुम्ही आपसातले मतभेद विसरून एकसुद्धा येत नाही. उलट माझ्या नथीतून एकमेकांवर जेव्हा तीर मारता ना, तेव्हा तर मला इतका आनंद होतो, तेवढा आनंद तर चीनच्या लॅबोरेटरीत मी जेव्हा पहिला श्वास घेतला ना तेव्हासुद्धा झाला नव्हता. खरं सांगू, नवजात होतो तेव्हा मी, धडधड होती.. कसं होईल आपलं या जगात? वेगळे देश, वेगळ्या संस्कृती, वेगळ्या भाषा नी धर्म पण शत्रू एकच तो म्हणजे मी… माझा फडशा पाडाल असंच वाटलं होतं. पण मला हळूहळू कळायला लागलं, की माझं बस्तान चांगलंच बसणारे कारण माणसाचा शत्रू साध्या साबणानं दोन मिनिटांत मरणारा व्हायरस नाही, तर माणसाचा शत्रू तो स्वत:च आहे. देशांना, राज्यांना, सरकारांना, धर्माच्या ठेकेदारांना नी नेतेमंडळींना माझ्यारुपानं एक हत्यार मिळालं, जुने हिशेब फेडण्यासाठी, आपली खुर्ची बळकट करण्यासाठी, आधीच भीतीनं अर्धमेल्या असलेल्या अब्जावधी गोरगरीबांना आपल्या तालावर नाचवण्यासाठी. मग काय झाला खेळ आरोप-प्रत्यारोपांचा सुरू?

करोना आणलाच कुठल्या देशानं?
आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक आधीच का बंद केली नाही?
दोन महिने दारू नाही प्यायली तर काय मरायला होतं का?
करोना रात्री वाढतो नी दिवसा झोपतो असं वाटतं का सरकारला?
मरकझमुळेच वाढला, मुद्दामूनच करतात… माजलेत बाकी काही नाही
परप्रांतीयच आहेत जबाबदार, जाऊ दे त्यांना आपल्या गावी
आपल्या परंपरेतच निर्मूलनाची बीजं आहेत, पण कोणाचा विश्वास नाही
विश्वगुरू म्हणे, आधी व्हॅक्सिन द्या
कुंभमेळ्यामुळेच पसरणार करोना
निवडणुका हा अपवाद आहे, तिथं कसली बंधनं

तुम्हाला सांगू ना…आता घरी किंवा हॉस्पिटलातच आहात ना, निवांतही असालच! मग आठवा कसं वागलात गेले वर्षभर. माझ्या उच्चाटनाचा विचार केलात की माझ्या आडून तुमच्या शत्रूंवर हल्ला चढवण्याची संधी साधत होतात? नीट विचार करा, तुम्हाला कळेल माझ्या उत्कर्षाला तुमचे आपसातले हेवेदावे नी हे कथित तज्ज्ञ कोण आम्हाला अक्कल शिकवणार ही गुर्मीच कारणीभूत आहे. तुम्ही माणसं आमच्या बाबतीत एक शब्द वापरता, म्युटेशन… म्हणजे ठराविक काळानं आमची जनुकीय रचना बदलते व आम्ही नवं रूप धारण करतो. हे काय आमच्यातच फक्त आहे असं नाही.. तुमच्यात देखील आहे. आज जगात जी वेगवेगळ्या प्रकारची माणसं आहेत, रंगानं, रुपानं, विचारानं, तत्वज्ञानानं ही सगळी एक प्रकारची म्युटेशन्सच आहेत की… पण आमच्या नी तुमच्या म्युटेशन्समध्ये एक फरक आहे. आमच्या प्रत्येक म्युटेशननंतर आम्ही प्रबळ होत जातो, नी तुम्ही प्रत्येक म्युटेशनगणीक कमजोर होत जाता, कारण तुमचं प्रत्येक म्युटेशन एकमेकांच्या उरावर बसतं, तुम्ही एकमेकांचेच शत्रू होऊन बसता. आपसातच लढणाऱ्या शेकडो मानवरुपी म्युटेशन्सना एक साधा… म्हटलं ना साबणानं देखील मरणारा, माझ्यासारखा विषाणू पुरून उरतो…

म्हणूनच तर माझं या माणसांच्या जगात अगदी निवांत चाललंय. तुमची पळापळ, जगण्यासाठीची धडपड बघताना भारी मजा येते. फुकट मिळणाऱ्या ऑक्सिजनची तुम्हाला किंमत नाही. संकटसमयी गरजुंना मदत करणं अपेक्षित असलेली हॉस्पिटलं हॉटेलचा धंदा करतात, नी हॉटेलं आयसीयूचा! जे औषध माझा निकाल लावू शकतं, त्याचा तुम्ही काळाबाजार करता, जी लस मला थोपवू शकते तिचं तुम्ही उत्पादनंच पुरेसं करत नाही, नी अपुरं उत्पादन कुणाच्या अंगात टोचायचं यावरून भांडत बसता. पण आता तुम्हाला या सगळ्याची किंमत मोजावी लागत आहे. आणि जेवढी तुम्ही जास्त किंमत मोजाल ना, तेवढा माझा आनंद जास्त. कारण, तुम्हाला पटो ना पटो… तुमचा राजकीय वा जातीय वा धार्मिक विरोधक तुमचा शत्रू नाहीये… तुम्हा सगळ्यांचा मी शत्रू आहे… त्यामुळे तुम्हाला असं अगतिक झालेलं बघताना होणारा आनंद अवर्णनीय आहे. तुम्हाला ते असं नाकात नळ्या घातलेलं पाहणं, रस्त्या रस्त्यांवर औषधासाठी नी लसीसाठी भिकाऱ्यासारखं रांगेत उभं असलेलं पाहणं, समाजमाध्यमांवर एकमेकांची यथेच्छ निंदानालस्ती करताना पाहणं नी जन्मदात्या बापाच्या प्रेताला मुलानं नाकारणं म्हणजे काय सुख आहे काय सांगू!

पण मला तुम्हा माणसांचं एक भारी नवल वाटतं, बरं का! तुमचे एवढे भाऊबंद माझ्यामुळे तुमच्यापासून कायमचे दुरावले, काही जण मरणाच्या दारात आहेत, काहीजण वेदनेने विव्हळत, कण्हत आहेत. पण तुमचा माज मात्र अजूनही कमी नाही झाला. तुमचं राजकारण, प्रचारसभा, धार्मिक कार्य, तीर्थयात्रा, मौजमजा, बाहेर फिरायला जाणं, पार्ट्या करणं, गर्दी करणं हे काही काही म्हणून कमी होत नाही. कसं काय जमतं बुवा तुम्हाला हे सगळं? स्वतःच्या जीवापेक्षाही प्रिय इतर अनेक गोष्टी असतात हे मला तुम्हा माणसांकडून शिकायला मिळालं.
पण मला माझ्या जिवाची फार काळजी आहे. म्हणूनच तर जेव्हा तुम्ही मास्क घालता, लस टोचून घेता, सोशल डिस्टन्सिंग पाळता, गर्दी करत नाही. तेव्हा मला माझं अस्तित्व नष्ट व्हायची भीती वाटू लागायची. पण तुम्हाला माझ्या जीवाची काळजी माझ्यापेक्षाही जास्त असल्यानं आता मात्र मी निर्धास्त आहे. आता बघा, गेल्या फेब्रुवारीपासून आपली दोस्ती आहे. म्हणजे तुम्ही मला दोस्त समजत नसला तरी मी मात्र समजतो, बरं का! तर आपली ही दोस्ती मधल्या काही काळात घट्ट होत होतीच. पण तुम्ही मात्र पक्के! मधला काही काळ एवढे निष्ठुरपणे वागलात माझ्याशी! फारच गांभीर्याने माझा विचार करत होता. चक्क सगळेजण नियम पाळायला लागला होतात, घरीच राहिला होतात, मला तर अनेक शहरांमधून हद्दपारीची वेळ आणली होतीत. आणि म्हणूनच मी तुमच्यावर रुसलो होतो आणि परत जायला निघालो होतो. पण तुम्ही आपल्या वर्षभराच्या मैत्रीला जागलात. ते पाहून मला एवढं भरून आलं की मी पुन्हा नव्या उत्साहाने, नव्या जोमाने परत आलो. तुम्ही मला दिलेला हा मैत्रीचा हात आता मात्र मी लवकर सोडणार नाही.
तुम्ही फक्त माझ्यासाठी एवढंच करा…

मास्क वगैरे फालतूगिरी आहे, अजिबात वापरू नका. एकमेकांपासून अंतर कसले राखता, जादू की झप्पी घ्या. मस्त सभा, धार्मिक जलसे, लग्न, हळदीच्या पार्ट्या.. ऐश करा, जीवन एकदाच मिळतं, उपभोगा…
हे तुम्ही करणं हीच तुमची माझ्यावरील प्रेमाची पोचपावती आहे. असंच प्रेम मला देत राहा.
आणि जर लसोत्सव वगैरे साजरा कराल… म्हणजे आत्ता झाला तसा विनालसीचा नाही… खरा खरा! नी घरात बसाल, स्वच्छता पाळाल, मास्क वापराल तर मात्र मी तुमच्यावर रुसून कायमचा निघून जाईन, बरं का!
पण मला खात्री आहे, तुम्ही यातलं काहीही मनावर घेऊन करणार नाही. एका वर्षात तुम्ही मला ओळखलं नसलं तरी मी तुम्हाला पुरतं ओळखलं आहे. तुम्ही माझा असाच पाहुणचार करत राहणार, अगदी आपल्या दोस्तीची शपथ! मी तेव्हाच जाईन जेव्हा मलाच कंटाळा येईल, तो पर्यंत आपण भेटत राहूच!

म्हणून,

तुमच्यामुळेच तुमच्यापाठी, मी कायम आहे माझ्या ‘प्रिय’ माणसांसाठी!

 

(vaishnavi.karanjkar@loksatta.com)

मराठीतील सर्व ब्लॉग्स ( Blogs ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Letter from corona virus to human beings vsk

Next Story
छोट्या शहरांशी जुळली नाळ!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी