BLOG: उद्धव ठाकरेजी हे तुम्हाला पटलं का?; एका सामान्य नागरिकाचं खुलं पत्र

लोक लॉकडाउनचं पालन करत असताना जर तुमचाच पक्ष असा वागणार असेल तर उद्या त्यांना काय उत्तर देणार आहात?

Maharashtra CM Uddhav Thackeray, BJP, Narayan Rane,
लोक लॉकडाउनचं पालन करत असताना जर तुमचाच पक्ष असा वागणार असेल तर उद्या त्यांना काय उत्तर देणार आहात?

-शिवराज यादव

नमस्कार, उद्धव ठाकरे साहेब;

मी तुमच्या राज्याचा एक नागरिक…आज मुद्दामून तुम्हाला पत्र लिहून मनातल्या भावना व्यक्त कराव्याशा वाटल्या म्हणून हा सगळा प्रपंच. याचं कारण म्हणजे मंगळवारी भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झालेली अटक आणि त्यानंतर तुमच्या शिवसैनिकांनी राज्यभरात केलेली आंदोलनं.

नारायण राणे यांनी तुमच्या कानशि‍लात लगावण्याचं वक्तव्य केलं आणि हा सगळा वाद सुरु झाला…पण खरं सांगू का नारायण राणेंच्या या वक्तव्याचं माझ्यासारख्या महाराष्ट्रातील नागरिकाला अजिबात आश्चर्य वाटलं नाही. कारण त्यांच्या या अशा वक्तव्यांची आम्हाला सवय झाली आहे. फक्त नारायण राणेच नाही तर नितेश राणे आणि निलेश राणे यांनीदेखील उद्या असंच वक्तव्य केलं तरी त्यात आमच्यासाठी भुवया उंचावण्यासारखं काही नाही.

पण त्यानंतर जे काही झालं त्या गोष्टी विचार करायला लावणाऱ्या आणि अनपेक्षित होत्या. मुळात नारायण राणेंनी केलेल्या वक्तव्यानंतर तुम्ही त्यावर मीडियाशी बोलून, ट्वीट करुन एखादी प्रतिक्रिया दिली असती किंवा अगदी शरद पवारांप्रमाणे “मी त्यांना महत्त्व देत नाही” एवढं जरी म्हणाला असतात तरी जे काही राज्यभरात रस्त्यावर झालं त्यापेक्षा कैकपटीने बरं झालं असतं.

एखादी व्यक्ती आपल्याला कानाखाली लगावेन म्हणते आणि तेही मीडियासमोर तेव्हा आपला स्वाभिमान दुखावणं समजू शकतो. पण तुम्ही आता पक्षप्रमुखासोबत राज्याचे मुख्यमंत्रीदेखील आहात. अशावेळी तुमच्याच पक्षाचे कार्यकर्ते तुमच्या नावाच्या घोषणा देतात, तोडफोड करतात, आंदोलन करतात तेव्हा त्यांना थांबवण्याचं कष्ट तुम्ही का घेतलं नाही?

राज्यात करोनाचं संकट आहे म्हणून वारंवार टीव्हीवर येऊन सर्वांना संयम बाळगण्याचं आवाहन करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी त्यांच्या शिवसैनिकांना का रोखलं नाही? हा प्रश्न वारंवार सतावतो. याचा अर्थ जे काही सुरु होतं त्याला तुमचं समर्थन होतं असाच आहे आणि तुमच्या कार्यकर्त्यांसोबतच्या फोटोने ते सिद्धही केलं. तुमच्या एका शब्दाखातर राज्यातील कित्येक लोक लॉकडाउनचं पालन करत असताना जर तुमचाच पक्ष असा वागणार असेल तर उद्या त्यांना काय उत्तर देणार आहात?

तुम्हाला कदाचित भाजपाच्या लोकांना धडा शिकवायचा असेल पण यामुळे नागरिकांना मात्र चुकीच्या धड्याचं शिक्षण मिळालं आहे. म्हणजे खरं सांगायचं तर मला ‘नायक’ चित्रपटातील तो सीन आठवतो ज्यामध्ये मुख्यमंत्री पोलीस अधिकाऱ्याला हिंसा होत असेल तर होऊ दे सांगत असतो आणि हतबल पोलीस अधिकाऱ्यांकडे काहीच पर्याय नसतो.

कदाचित हे पत्र वाचून तुम्हाला मी भाजपाचा किंवा इतर कोणत्या पक्षाचा समर्थक आहे असं वाटू शकतं. पण तसं नाहीये….भर पावसात सभा घेणारे शरद पवार, पोलिसांसाठी मोर्चा काढणारे राज ठाकरे, एका गरीब बाईच्या मदतीसाठी रस्त्यावर बसणारे बच्चू कडू अशा अनेक घटना राजकारणाच्या पलीकडे जाऊन मी पाहतो. त्यामुळेच तुम्ही जेव्हा मुख्यमंत्री झालात तेव्हा एक वेगळी अपेक्षा होती. करोना संकट तुम्ही ज्याप्रकारे हाताळलं त्यावरुन विरोधक टीका करत असले तरी सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्ही पाळलेला संयम कमालीचा होता असं माझं थेट मत होतं. पण मग हा संयम आणि धैर्य शिवसैनिक (करोना संकटात) रस्त्यावर उतरुन भाजपाच्या कार्यकर्त्यांसोबत पोलिसांनाही भिडत होता तेव्हा का दिसला नाही याचं आश्चर्य वाटतं.

त्यामुळेच कदाचित नारायण राणेंच्या वक्तव्याचं नाही तर तुम्ही बाळगलेल्या मौनाचं मला जास्त आश्चर्य वाटतं.

तुमच्याच राज्याचा एक नागरिक.

(तुमच्या प्रतिक्रिया shivraj.yadav@loksatta.com या मेल आयडीवर पाठवू शकता)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Letter to maharashtra cm uddhav thackeray bjp narayan rane arrest sgy

ताज्या बातम्या