प्रिय उद्धवदादा,

दादाच! आमच्या राज्याचे मुख्यमंत्री यापेक्षाही अधिक आमच्या कुटुंबाचे प्रमुख, मोठा भाऊ, वडील, घरचा कर्ता मुलगा…याच नात्याने तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. राज्यासह देश, जग करोनाच्या महाकठीण संकटात सापडलं होतं. प्रत्येक जण घाबरला होता. आपण आज मरतोय की उद्या…अशा भीतीत प्रत्येकजण जगत होता. पण या भीतीच्या वातावरणात तुमचं आमच्याशी संवाद साधणं, वेळोवेळी धीर देणं, आपल्य़ा शांत, संयमी वाणीने आमच्या मनातली भीती कमी करण्याचा प्रयत्न करणं संपूर्ण राज्याला भावलं.

jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…

करोनाकाळात तुमचे हे आधाराचे, दिलासादायक चार शब्द भीतीच्या वातावरणातून बाहेर यायला मदत करत होते. फक्त महाराष्ट्रीयांनाच नाही तर आपल्या राज्यात अडकलेले परप्रांतीय मजूर…या आगंतुक पाहुण्याच्या भीतीदायक सहवासाने घाबरले होते, सैरभैर झाले होते. आपल्या लेकराबाळांच्या काळजीने आपल्या घरी परतण्यासाठी मिळेल तो मार्ग शोधत होते. त्यांच्या मनस्थितीचा विचार करून तुम्ही त्यांनाही आपलंसं केलंत, त्यांच्याशी आपुलकीने संवाद साधत त्यांना धीर दिला. आपल्या घराकडे तुम्हाला सुरक्षित पोहोचवू असं आश्वासनही दिलंत. करोनाकाळातलं हेच तुमचं संयत बोलणं महाराष्ट्रातल्या जनतेला भावलं आणि एक मुख्यमंत्री न होता तुम्ही या घाबरलेल्या जनतेच्या घरातलाच एक सदस्य झालात. म्हणून मी, या राज्यातला एक सामान्य नागरिक तुम्हाला हक्काने दादा म्हणून शकतो.

दादा, करोनाकाळातलं तुमचं हे गृहकर्तव्यदक्ष रुप आम्हाला खरंच भावलं होतं. तुमच्याकडून या काळात काही चुकाही झाल्या असतील हे अगदी १०० टक्के मान्य. पण त्यावेळी तुमच्या चुका काढण्यापेक्षा आम्हाला आमचा जीव वाचवणं आणि त्या महासंकटाच्या भीतीतून बाहेर पडणं अधिक गरजेचं होतं आणि त्यावेळी तुम्ही आम्हाला मदत केलीत. आता या महासंकटाची भीती तर कमी झाली आहे, पण आता एक वेगळाच आजार सुरू झाला आहे. हा आजार करोनापेक्षाही अधिक भयंकर स्वरुप घेत असल्याचं आम्हाला दिसत आहे. आता या नव्या संकटाच्या भीतीत तुमच्या घरचे जगतायत. त्यावेळी जसा तुम्ही दिलासा दिलात, तसाच दिलासा तुम्ही आत्ताही द्यावात अशी आमची अपेक्षा आहे.

हा नवा आजार म्हणजे अनियंत्रित राजकारण. दादा, दोष तुमच्या एकट्याचा नाही, एकट्या विरोधी पक्षाचा नाही की एकट्या सत्ताधारी पक्षाचा नाही. कारण आता दोष देत बसण्यासाठी आम्हाला वेळच नाही. करोनाने आमचे जीवलग आमच्यापासून हिरावून घेतलेत, अनेकांचा पोटापाण्याचा स्रोत हिरावून घेतला आहे, अनेकांचं आरोग्य हिरावून घेतलं आहे. अशात आम्हाला आत्ताच्या या राजकारणाच्या चिखलात काहीही रस उरलेला नाही. रोज सकाळी उठून खायचं काय? हा प्रश्न आमच्यासमोर आ वासून उभा ठाकला आहे. अशात आता तुम्हीच सांगा संजय राऊत-किरीट सोमय्यांची तू तू मै मै आम्ही ऐकत बसायचं की स्वतःच्या जगण्याची काळजी करायची?

आम्हाला मान्य आहे राजकारण म्हटलं की समाजकारणासोबतच सत्ताकारणही आलंच. पण हे सत्ताकारण करत असताना समाजकारणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून कसं चालेल? आमचे एसटी कर्मचारी, ज्यांनी आम्हाला बारा महिने तेरा काळ अथक परिश्रम करत सर्वोत्तम सेवा दिली, ते आज त्यांच्या हक्कासाठी लढतायत. साडेतीन- चार महिने झाले, आम्हाला आमच्या घराशी, गावाशी जोडणारी एसटी ठप्प आहे. एसटी कर्मचारी आत्महत्या करतायत, त्यांची लेकरंबाळं उपाशी झोपतायत. अशा परिस्थितीत या आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडणं हे आमच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखं नाही का?

आमची तरणीताठी पोरं उज्ज्वल भवितव्यासाठी मान पाठ एक करून, जीवाचं रान करून स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करतायत. आरोग्य विभागाची परीक्षा, MPSC, पोलीस भरती..अशा अनेक परीक्षांचा अभ्यास करतायत. कित्येक कायदेशीर, राजकीय बाबी कदाचित तुम्हालाही सांगता येणार नाहीत, इतक्या सहजपणे ते सांगतील. आयुष्याची ७-८ वर्षे घालवून आईबापाच्या डोळ्यात सुख पाहण्यासाठी सरकारकडं आशा लावून बसले आहेत. त्यांच्या परीक्षांचे पेपर इतक्या सहजतेने फुटतात? त्यातल्या आरोपींवर कारवाई झाल्याचं दोन-तीन दिवस कळत राहतं. पण पुढे काय? हा ‘पुढे काय?’ इतका मोठा आहे की त्यापाय़ी अनेकांनी आपल्या आयुष्यापुढेच गुडघे टेकले.

नवाब मलिकांची अटक, किरीट सोमय्यांचे आरोप, त्याला संजय राऊतांचं प्रत्युत्तर, देवेंद्र फडणवीसांचे आरोप-प्रत्यारोप, प्रतिक्रिया, काँग्रेस, भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडी सगळ्या अगदी झाडून सगळ्या पक्षांची रोज काही ना काही कारणाने होणारी आंदोलनं, एकमेकांवर केले जाणारे भ्रष्टाचारांचे आरोप, निवडणुकीच्या दृष्टीने केली जाणारी विधानं, प्रचारसभा आणि बरंच काही….! तुमच्यासाठी हे सगळं महत्त्वाचं असेल. पण आम्हाला उद्याचं जेवण मिळेल की नाही? याची चिंता आहे. आमच्या लेकरांनी दिवसरात्र राबून अभ्यास केला, पण ऐनवेळी पेपर फुटल्यावर त्यांनी करायचं काय? याची चिंता आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या जाणाऱ्या जीवांची चिंता आहे.

उद्धवदादा, मनातल्या चिंता, भीती, काळजी हे फक्त घरातल्या कर्त्या पुरुषाला, घरातल्या वडिलधाऱ्यांनाच सांगू शकतो आपण. त्या नात्याने आम्ही सगळे तुमच्या घरातले तुम्हाला विनंती करतो…हे सगळं आवरा आता! कोणाचे कोणत्या दहशतवाद्याशी संबंध आहेत, कोण किती भ्रष्टाचार करतो, कोणाची किती प्रॉपर्टी आहे, हे सगळं सध्या आम्हाला ऐकायचं नाहीये. निवडणुकीपूर्वी हक्काने, आपुलकीने चौकशी करणारे आमचे प्रतिनिधी, मत मागायला येताना आमच्या आयाबहिणींना सन्मान देणारे जेव्हा त्यावरून एकमेकांसाठी अपशब्द वापरत चिखलफेक करतात, त्यावेळी फार वेदना होतात, दादा! हे सगळं कृपा करून आवरा. राजकारण, सत्ताकारण हे सगळं लोकशाहीचा एक भाग आहेत हे पूर्णतः मान्य आहे. पण लोकशाहीतला ‘लोक’ हा भागच पूर्णपणे दुर्लक्षित ठेवून कसं चालेल?

दादा, पुन्हा एकदा तुमच्या त्या दिलासादायक शब्दांची, काळजीयुक्त कृतीची या महाराष्ट्राला गरज आहे. एसटी कर्मचारी तुमच्या आधाराची वाट पाहतायत, करोनाने जीवलग गमावलेल्या व्यक्ती तुमच्यात आपला जीवलग शोधतायत, तुमच्याच आदित्य, तेजसच्या वयाची लेकरं डोळ्यात तेल घालून अभ्यास करतायत, त्यांच्या समस्या तुम्ही ऐकाव्यात, त्यावर मार्ग काढावा याची आतुरतेनं वाट बघतायत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. आपल्या घराकडे दुर्लक्ष करू नका. तुमच्याच घरातला एक व्यक्ती तुम्हाला कळकळीची विनंती करत आहे.

vaishnavi.karanjkar@loksatta.com