समीर जावळे
Ajit Pawar Complete Journey : “हे जग कायम असणार आहे, तुम्ही आम्ही आज असू, उद्या नसू, काळाचं, नियतीचं बोलवणं आलं की जायचं आहे” हे शब्द आहेत अजित पवारांचेच. होय तीन ते चार दिवसांपूर्वी त्यांनी जे भाषण केलं त्यातले हे शब्द खरे ठरतील आणि नियती अशी काही वेळ साधेल असं मुळीच वाटलं नव्हतं. पण २८ जानेवारीची सकाळ महाराष्ट्रासाठी अत्यंत वाईट ठरली. कारण याच दिवशी अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झालं. अजित पवार हे नाव घेतल्यानंतर समोर येतो तो एक धडाडीने काम करणारा आणि हाती घेतलेल्या कामांचा प्रचंड उरक असणारा नेता. अजित पवार लोकनेते होते यात काही शंकाच नाही. त्यांच्या जाण्याने अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. बारामतीत त्यांना अखेरचा निरोप देताना त्यांच्या कुटुंबासह महाराष्ट्राचे डोळे पाणावले कारण अजित पवारांसारखी माणसं सारखी सारखी जन्माला येत नाहीत, अशा प्रकारे स्वतःला घडवत नाहीत.
अजित पवाराचं पॉवरफुल करिअर
यशवंतराव चव्हाण आणि काका शरद पवार यांच्या संस्कारांच्या मुशीत अजित पवार राजकारणात तयार झाले होते. खरंतर शरद पवारांचे पट्टशिष्य अशी त्यांची ओळख म्हटली तर मुळीच वावगं ठरणार नाही. पण शरद पवारांच्या सावलीतच न राहता त्यांनी स्वतःची अशी एक खास ओळख निर्माण केली. आपल्या प्रेम आणि आपुलकीची खऱ्या अर्थाने ‘दादा’गिरी केली. १९९१ मध्ये अजित पवार बारामती लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून गेले. पण दिल्लीपेक्षा महाराष्ट्रातल्या मातीत काम करणं त्यांना अधिक भावलं. त्यामुळे १९९२ ते पुढचा सगळा काळ ते राज्यात आले. बारामती या मतदार संघातून ते १९९५ ते २०२४ या कालावधीत ते आठवेळा आमदार म्हणून निवडून आले.
बारामतीतून रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून येणं ही त्यांची खासियत होती
रेकॉर्डब्रेक मतांनी निवडून येणं ही अजित पवारांची खासियत होती. त्यामुळेच त्यांच्या विरोधात कुणीही उभं असलं तरीही तो व्यक्ती पडणार याची खात्री बारामतीकरांनाच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राला असायची. रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येण्याचं कारण अजित पवारांचा शब्द पाळण्याचा स्वभाव होता. कुणाचंही काम होणार असेल आणि अजित पवार हो म्हणाले तर ते काम होणारच. जर अजित पवार नाही म्हणाले तर काम होणार नाही. अजित पवार शब्दाला पक्के होते. जितके रोखठोक तितकेच प्रेमळ, हजरजबाबी आणि मिश्कीलही होते. त्यांच्या भाषणाची शैली गावातल्या लोकांना तर आवडायचीच पण शहरी भागातल्या तरुणांनाही ते बोलण्यातून आपलंसं करुन घ्यायचे. समजा ते चिडले तरीही पुढच्या क्षणाला असं एखादं वाक्य बोलायचे की उपस्थितांमध्ये हशा पिकत असे.

अधिकाऱ्यांमध्ये अजित पवारांचा दरारा होता
अजित पवारांनी आत्तापर्यंत सहकार, कृषी, क्रीडा, अर्थ, उत्पादन शुल्क विभाग अशी अनेक खाती पाहिली. प्रशासनातल्या लोकांकडून काम कसं करुन घ्यायचं ही त्यांची खासियत होती. धक्कातंत्र हे त्यांचं स्वभाव विशेष होतं. सकाळी ६ वाजल्यापासून अजित पवार काम करायला सुरुवात करायचे. अनेकदा अधिकाऱ्यांच्या आधी साईटवर किंवा कार्यालयात पोहचून त्यांना चुकारपणा केल्याबद्दल झापायचे. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी वर्गात अजित पवारांचा जबरदस्त दरारा होता. अजित पवार म्हणजे रोखठोक माणूस अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक असं कधीही घडलं नाही. शरद पवारांशी जेव्हा त्यांचे मतभेद झाले तेव्हा मनातली खदखद त्यांनी जाहीर सभेत बोलून दाखवली. बंद दाराआडच्या चर्चा, मनात ठेवण्याचा राजकीय सूज्ञपणा असं काही त्यांच्या स्वभावात नव्हतंच. त्यामुळेच अजित पवार हे नितळ व्यक्तिमत्वाचे होते यात काही शंकाच नाही.

….आणि अजितदादांचे शरद पवारांशी मतभेद झाले
राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष शरद पवारांनी १९९९ मध्ये स्थापन केला. पण जुलै २०२३ मध्ये अजित पवार या पक्षातल्या ४२ आमदारांना घेऊन सत्तेत सहभागी झाले आणि त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची दोन शकलं झाली. शरद पवारांची सावलीच त्यांच्यापासून वेगळी झाली असं म्हणता येईल. विकासकामं करायची असेल तर सत्तेत असणं आवश्यक आहे त्यामुळेच आम्ही सत्तेत सहभागी होत आहोत असा विचार अजित पवारांनी मांडला. हा विचार शरद पवारांना मुळीच पटला नाही. त्यानंतर अजित पवारांनी ५ जुलै २०२३ ला शरद पवारांनी राजकारणातून रिटायर्ड झालं पाहिजे असंही म्हणून दाखवलं. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदार संघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे असा सामना झाला. हा सामना खऱ्या अर्थाने शरद पवार विरुद्ध अजित पवार असाच होता. या निवडणुकीत सुप्रिया सुळे विजयी झाल्या. ज्यानंतर अजित पवारांना त्यांची चूक लक्षात आली. शरद पवारांच्या विरोधात बोलणं त्यांनी थांबवलं. लोकसभा निवडणुकीत महायुतीला जे अपयश मिळालं ते विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत महायुतीने धुवून काढलं. अजित पवारांनी महायुतीत सहभाग घेतला तरीही पक्षाचा मूळ शाहू, फुले, आंबेडकरांचा विचार सोडला नाही हे विशेष. बटेंगे तो कटेंगे या घोषणेला त्यांनी विरोध दर्शवला होता. जे पटलं नाही ते नाही हे रोखठोकपणे सांगायची हिंमत असणारे नेते म्हणजे अजित पवार होते हे महाराष्ट्रानेही पाहिलं आहे.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा आणि महापालिकेतली समीकरणं
महाराष्ट्र विधानसभा २०२४ निवडणुकीत महायुतीला २३२ जागा मिळाल्या. या अभूतपूर्व यशानंतर चर्चा सुरु झाली ती दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याची. पण काही गणित जुळलं नाही कारण शरद पवारांना भाजपासह जाणं मान्य नव्हतं. अर्थात राजकीय मतभेद झाले तरीही शरद पवार हे पवार कुटुंबाचे कुटुंब प्रमुख. त्यांची कौटुंबिक साथ अजित पवारांनी कधीही सोडली नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या पाहिजेत ही अजित पवारांची भूमिका होती. महापालिका निवडणूक नुकतीच पार पडली त्यात दोन्ही राष्ट्रवादी पुणे आणि पिंपरी महापालिकांसाठी एकत्र आल्याही पण दोन्ही पक्षांचं विलीनीकरण राहिलं ते राहिलंच. राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडे यांनीही शरद पवार आणि अजित पवार एकत्र येणार होते दोन्ही पक्ष एकत्र येणं आवश्यक आहे हे अजित पवार म्हणाले होते ती त्यांची तीव्र इच्छा होती हे सांगितलंच. पण त्यांची ती इच्छा अधुरीच राहिली. आता अजित पवारांच्या निधनानंतर दोन पक्षांचं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

राजकारणातलं टायमिंग आणि नियतीने साधलेली ती वेळ…
राजकारणातलं अफलातून टायमिंग अजित पवारांकडे होतं. त्यांची भाषणं, किस्से, उत्तरं गाजली आहेत ती यामुळेच. लोकांना आपल्या खास शैलीने आणि हजरजबाबीपणाने आपलंसं करुन घेण्याची हातोटी अजित पवारांच्या ठायी होती. ‘मला टक्कल पडलंय तरी शिकवत आहेत’, ‘एकनाथ शिंदेंचं माहीत नाही मी तर उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहे बाबा’, ‘गौतमी पाटील बैलापुढे नाचली तर तुझं काय गेलं?’, ‘पायताण घे आणि हाण डोक्यात’ ही आणि अशी तमाम वाक्यं ऐकून उपस्थितांमध्ये हशा पिकलेला महाराष्ट्राने पाहिला आहे. शरद पवारांनी निवृत्त व्हायला पाहिजे हे बोललो म्हणून कान पकडून दिलगिरी व्यक्त करणारे दादाही आपण अलिकडेच पाहिले आहेत. निर्मळ मनाचा आणि काम हेच आपलं ध्येय मानणारा माणूस आपल्याला सोडून निघून गेला आहे. राजकारणात त्यांनी सदैव वेळेला प्रचंड महत्त्व दिलं. त्याचप्रमाणे त्यांचं मिश्किलपणाचं टायमिंगही खास होतं. पण २८ जानेवारीच्या सकाळी नियतीने वेळ साधली आणि पुढची अनेक वर्षे महाराष्ट्राला हवा असलेला जिंदादिल नेता हिरावून नेला. त्यांच्या अंत्यदर्शनाला पक्षभेद विसरुन झालेली गर्दी त्यांच्या कारकिर्दीची साक्ष देत होती. कार्यकर्ते, लोक, असंख्य पदाधिकारी हे सगळेजण पाणावलेल्या डोळ्यांनी विद्या प्रतिष्ठान मैदानावर झालेले अजित पवारांच्या पार्थिवावरचे अंत्यसंस्कार पाहात होते. त्यांच्या कारकिर्दीला सलाम करत होते. त्यांचं असं अपघाती जाणं प्रत्येकालाच चटका लावून गेलं, आपल्या घरातला माणूस गेलाय ही भावना निर्माण करुन गेलं.अजित पवार दिलेला शब्द पाळणारे होते यात काही शंकाच नाही. त्यांच्या असंख्य आठवणी मनात तशाच राहतील कैक पिढ्यांना प्रेरणा देत राहतील.

