scorecardresearch

Premium

BLOG: करोना सकाळी झोपतो, रात्री सुसाट निघतो

आपले राजकीय नेते साखळी तोडून करोनावर विजय मिळवणार होते, त्याचं काय?

BLOG: करोना सकाळी झोपतो, रात्री सुसाट निघतो

– दीनानाथ परब

आज आपल्या समाजात करोना व्हायरसने प्रत्येकाला दंश केला आहे. फक्त प्रत्येकाला दंश करण्याची या व्हायरसची पद्धत वेगळी होती. काहींच्या शरीरात या व्हायरसने थेट प्रवेश केला, तर लाखो लोकांना बेरोजगार, नोकरीचं टेन्शन, मानसिक भीती अशा मार्गाने करोनाने दंश केला. थेट करोना बाधितांपेक्षा या व्हायरसच्या साईड इफेक्टमुळे हतबल झालेल्यांचा आकडा कोटयवधीच्या घरात असेल.

करोना व्हायरसमुळे फक्त अर्थव्यवस्थाच कोसळली नाही, तर या व्हायरसने सामाजिक, मानसिक आरोग्यावरही मोठे आघात केले. फक्त दृश्य स्वरुपात हे आघात दिसले नाहीत, त्यामुळे सरकारला त्याची कल्पना नसेल. करोनामुळे कोलमडलेली मने आता कुठे सावरत असताना, सरकारकडून वारंवार लॉकडाउन, कर्फ्यूची भीती दाखवली जाते. खरंतर इतक्या महिन्याच्या लॉकडाउनमधून साध्य काय झालं? या प्रश्नाचं उत्तर फसलेल्या नोटाबंदीप्रमाणेच असेल. आधी साखळी तोडायची म्हणून२१ दिवसाचा कडकडीत लॉकडाउन, त्यानंतर साखळी तुटत नाही, म्हणून सरकार फक्त लॉकडाउनवर लॉकडाउन करत राहिलं. यातून उद्योग-व्यवसायाचं बेसुमार नुकसान झालं. लाखो लोक बरोजगार झाले. मागच्या दोन तिमाहीतील जीडीपीचे आकडेच त्याची ग्वाही देतात.

लॉकडाउनमुळे फक्त रुग्णसंख्या कमी ठेवता आली. पण आपले राजकीय नेते साखळी तोडून करोनावर विजय मिळवणार होते, त्याचं काय?. आता लसीशिवाय तरी या व्हायरसवर विजय मिळवता येणार नाही. अर्थव्यवस्थेला उभारी देण्याची गरज असताना महाराष्ट्र सरकारने पुन्हा नाईट कर्फ्यूचा अघोरी निर्णय घेतलाय. नाईट कर्फ्यूमुळे सर्वसामान्यांच फारसं नुकसान होणार नाही, त्यांचे हाल होणार नाहीत. असा महाराष्ट्र सरकारचा कयास असावा.

पण रात्रीचा कर्फ्यू लावून नेमकं साध्य काय होणार? हा प्रश्न मला पडला आहे. खरंतर रात्रीपेक्षा दिवसा मुंबईत गर्दी असते. लोकल सर्वसामान्यांसाठी अजून सुरु झालेली नाही. त्यामुळे बेस्टच्या बसेस तुडूंब गर्दीने भरलेल्या असतात. रस्त्यावर फेरीवाल्यांनी आपल्या गाड्या सुरु केल्यात. तिथे लोक मस्त उभे राहून खाद्य पदार्थांचा अस्वाद घेतात. आमच्या मैदानाजवळ चायनीजची गाडी लावणारा बहाद्दूर चायनीजवाला नेपाळहून इथे आला. पण अजून आमची हक्काची मुंबई लोकल सुरु झालेली नाही. म्हणजे लॉजिकने विचार केला, तर करोनाचं संक्रमण रात्रीपेक्षा दिवसा जास्त झालं पाहिजे. पण कदाचित करोना दिवसाची झोप घेऊन रात्री सुसाट वेगात निघत असेल. म्हणून रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत नाईट कर्फ्यूचा निर्णय घेतला असू शकतो.

ब्रिटनमध्ये करोनाचा एक नवीन स्ट्रेन सापडला म्हणून महाराष्ट्र सरकारने खबरदारी म्हणून नाईट कर्फ्यू लागू केला. पण हा नवीन स्ट्रेन ब्रिटनमध्ये सप्टेंबर महिन्यात आढळला होता. ऑक्टोंबर-नोव्हेंबर महिन्यात ब्रिटनहून अनेक विमानांनी भारतात लँडिंग केले. त्यावेळी हा स्ट्रेन भारतात आला नसेल कशावरुन? कुठल्याही व्हायरसमध्ये म्युटेशन म्हणजे परिवर्तन होतच असते. हा झाला वैद्यकीय भाग. पण नाईट कर्फ्यू लागू करण्यामागचा मूळ उद्देश आहे, नववर्ष साजरे करण्यापासून नागरिकांना रोखणे. पण त्याने काय साध्य होणार?. काही ठराविक धनाढ्यांनी रात्रीच्या पार्टया केल्या म्हणून सर्वसामान्यांनी नाईट कर्फ्यूचा त्रास का सोसायचा? मीडिया, कॉलसेंटर, आयटी, जाहीरात या क्षेत्रात काम करणारे अनेक कर्मचारी रात्री उशिरा घरी परततात. त्यांना रात्री घरी जाण्यासाठी रिक्षा, टॅक्सी मिळाली नाही, तर त्यांनी काय करायचं? म्हणजे करोनाला रोखण्यासाठी नाईट कर्फ्यू लावायचा आणि दिवसा त्याला मोकळीक द्यायची, असा त्याचा अर्थ होतो. सरकारच्या निर्णयामागे लॉजिक नावाचा काही भाग आहे की नाही?

 

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Maharashtra govt cm uddhav thackeray govt announced night curfew corona new strain dmp

First published on: 24-12-2020 at 11:53 IST

संबंधित बातम्या

क्विझ ×