बॉलिवूड ‘माँ’ विरुद्ध मॉलिवूड ‘अम्मा’ !

बॉलिवूडने बनवलेली महान आईची प्रतिमा वर्षानुवर्षे तशीच आहे. तिला छेद देण्याचं धाडस मल्ल्याळी चित्रपट साराज ने दाखवलं आहे.

mimi-saras-motherhood-films

-श्रुति गणपत्ये

भारतामध्ये दैवतीकरण करून एखाद्या वक्तीला पुजण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. मग त्यामागे सारसार विचारबुद्धी नसते. अगदी त्या व्यक्तिचं वैयक्तिक असं काहीच उरत नाही. बॉलिवूडमध्ये आई ही संकल्पना अशाचपद्धतीने विकसित झाली आहे. आई देवासमान असते, ती कधीच वाईट वागू शकत नाही किंवा तसं वागण्याची तिला मुभा नाही, ती कायम आपल्या मुलांवर निःसंकोच आणि कोणत्याही अटींशिवाय प्रेम करते, मुलं कशीही असली, कशीही वागली तरी त्यांना स्वीकारते. तिला माणूस म्हणून कोणी गृहीतच धरत नाही. अशी ही बॉलिवूडने बनवलेली महान आईची प्रतिमा वर्षानुवर्षे तशीच आहे. तिला छेद देण्याचं धाडस मॉलिवूडने म्हणजे मल्ल्याळी चित्रपट साराज ने दाखवलं आहे. अ‍ॅमेझॉन प्राइमवर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.

साधीशी गोष्ट आहे. साराला चित्रपट दिग्दर्शक व्हायचं आहे आणि त्यासाठी ती तिच्या स्क्रिप्टवर खूप मेहनत घेते. खूप जणांकडून नकार आल्यावर एक निर्माता तिचा चित्रपट बनवायला तयार होतो आणि तिला दिग्दर्शनाची संधी देतो. त्याचवेळी ती गरोदर असल्याचं तिच्या लक्षात येतं. मग करियर की कुटुंब या पेचात ती अडकते. आतापर्यंत तिला साथ देणारा नवराही मग मूल हवं म्हणून तिच्या विरोधात जातो. ती जो निर्णय घेते तो नक्कीच क्रांतीकारी असतो. त्यासाठी चित्रपट बघावाच लागेल. पण मूल हवं की करियर या प्रश्नाचं उत्तर शोधतानाचा तिचा प्रवास या चित्रपटात इतका विचारपूर्वक मांडला आहे की पुढची २० वर्ष तरी हिंदी चित्रपट हे करू शकणार नाही. मूलासाठी घरच्यांचा वाढणारा दबाव, एकीकडे शूटिंग सुरु होणार म्हणून सुरू झालेली धावपळ, कुटुंबातल्या व्यक्तिंनी मुलाच्या येण्याभोवती सुरू केलेलं स्वप्नरंजन, चित्रपटाच्या निमित्ताने भेटणाऱ्या व्यक्तिंचंही मुलं आणि संसार हे किती महत्त्वाचे आहेत हे सांगणं यातून साराला सातत्याने अपराधीपणाची भावना येत राहते. पण तिला दिलासा मिळतो तो तिच्या डॉक्टरकडून. या डॉक्टरचे जे संवाद लिहिले आहेत आणि त्याची मूल होण्या-न होण्याबद्दलची भूमिका आहे ती खूपच अप्रतिम आहे. त्याने आपल्या क्लिनिकमध्ये बोर्डच लावलेला असतो, “वाईट पालक होण्यापेक्षा पालक न झालेलं बरं”. मूल होणं ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी मूल नको असणं या विचाराचाही सन्मान करायला हवा. हा डॉक्टर सारा आणि तिच्या नवऱ्याशी खूप मोकळेपणाने मूल या विषयावर संवाद साधतो. आपल्या शरिरावर बाईचा पहिला हक्क आहे. त्यामुळे मूल होऊ देणं किंवा न होऊ देणं याचा अधिकार तिचा आहे. जग काय म्हणेल, घरच्यांना काय वाटेल या गोष्टीची तिने परवा करायची गरज नाही. माझ्या मते, कोणताही डॉक्टर इतका समंजस आणि प्रगतीशील विचार मांडण्याचं प्रत्यक्षात धैर्य करणार नाही. कुठेही आपण काही वेगळं करत असल्याचा आव न आणता, सर्वसामान्य घरामध्ये घटना घडते आहे हे दाखवण्यासाठी दिग्दर्शक ज्यूड अ‍ॅन्थनी जॉसेफ आणि साराची भूमिका करणाऱ्या अ‍ॅना बेनचं खूपच कौतुक वाटतं. भावनिक होणं, समाजाची चौकट, कुटुंबाच्या अपेक्षा या सगळ्या गोष्टी चित्रपटामध्ये येतात. पण आईचं दैवतीकरण निक्षून टाळलं आहे. तिला माणूस म्हणून दाखवलं आहे आणि हीच चित्रपटाची खरी ताकद आहे.

आईचाच विषय निघाला आहे तर आता १८० डिग्रीमध्ये वळून हिंदी चित्रपटांकडे येऊया. नेटफ्लिक्सवर या आठवड्यामध्ये लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित “मिमी” हा क्रिती सेनॉनची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट प्रदर्शित झाला. सरोगसी या महत्त्वाच्या सामाजिक विषयावर हा चित्रपट असल्याने याबद्दल खूप उत्सुकता होती. पण बॉलिवूडच्या चौकटीतच रहायचं ठरवल्याने आईचं दैवतीकरण करून चित्रपट पूर्णतः भरकटला आहे. कथा तर सरोगसी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर रचायची होती. पण आई या साचेबद्ध चौकटीतून बाहेरही पडायचं नव्हतं. त्यामुळे सरोगसीसारख्या गंभीर प्रश्नाचंही हसं करून ठेवलं. खरंतर चित्रपटाचं परिक्षण करताना मला संपूर्ण कथा सांगायला आवडत नाही. पण या चित्रपटाने शेवटपर्यंत एवढी निराशा केली आहे की कथा सांगणं मला भाग आहे.

मिमी ही राजस्थानमध्ये राहणारी नृत्यांगना असते आणि बॉलिवूडमध्ये जाऊन हिरॉईन होण्याचं तिचं स्वप्नं असतं. त्यासाठी तिला पैसे हवे असतात म्हणून एका परदेशी जोडप्यासाठी सरोगसीला ती तयार होते. ती गरोदर राहिल्यावर बऱ्याच काळाने डॉक्टरांच्या लक्षात येतं की मुलामध्ये काही दोष आहे आणि ते मतिमंद जन्माला येईल. हे ऐकून ते परदेशी जोडपं मुलाची जबाबदारी झटकून निघून जातं आणि मिमीमधली बॉलिवूड आई जागी होते. “मुलाला बाहेर मारणं हे पाप असेल तर पोटात मारणं हेही पापच आहे” असले डायलॉग मारून ती ते व्यंग असलेलं मूल जन्माला घालायचा निर्णय घेते. इथपर्यंत तरीही ठीक आहे कारण पालक आपल्या शारिरीक, मानसिक व्यंग असलेल्या मुलांनाही तितक्याच प्रेमाने स्वीकारतात. यामध्ये सरोगसी, आपल्या आई-वडिलांपासून लपवून मिमीने घेतलेला निर्णय, मग ते जोडपं निघून गेल्यावर ड्रायवर मुलाचा बाप असल्याचं सांगणं, आधी चिडलेले आईवडील लगेच त्या मुलाचा स्वीकार करून जल्लोषच सुरू करतात हे टिपिकल बॉलिवूड सीन. पण बॉलिवूड ट्विस्ट पुढे आहे. ते मूल सामान्य जन्माला येतं. मग मिमी आपली बॉलिवूडची स्वप्न सोडून मुलामध्ये गुंतून जाते. काही वर्षांनी त्या मूलाचे परदेशी आई-वडील त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर बघून त्याला घ्यायला येतात आणि अर्थात मिमीला कोर्टात जाण्याची धमकी देतात. आधी मिमी विरोध करते. पण मग तिच्यातली आई जागी होऊन खऱ्या आईला (?) तिचं मूल परत करण्याचा निर्णय घेते. पण तेवढ्यात त्या परदेशी आईचंही मन बदलतं कारण ती एका अनाथ मुलीला रडताना बघते आणि तिला दत्तक घ्यायचं ठरवते. हॅप्पी एंडिंग !

मूळात सरोगसी ही प्रतिगामी संकल्पना आहे कारण माझ्याच रक्तामांसाचं-डीएनएचं मूल हवं हा विचार त्यामागे असतो. एखाद्या बाईच्या गरिबीचा फायदा घेऊन तिचा गर्भ भाड्याने घेणं आणि शरीर व्यवसाय करणाऱ्या सेक्स वर्करचं शरीर भाड्याने घेणे याच काहीच फरक नाही. परिस्थितीमुळे त्यांना शरीर विकण्याची वेळ येते आणि ही समाजाची सगळ्यात वाईट अवस्था आहे. भारतातही अनेक देशी-परदेशी जोडपी सरोगसीसाठी येतात आणि अनेकदा त्यातून असे गुंतागुंतीचे प्रश्न उभे राहतात. त्यावर सरकारने कायदा बनवून नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. पण हा धंदा त्या नियंत्रणाबाहेरचा आहे. मध्यंतरी गुजरातमध्ये अशी काही गावंच्या गावं समोर आली होती की जिथल्या बायका सरोगसी करायच्या. मुंबईतल्या अनेक गरीब वस्त्यांमधूनही तरुण बायकांना हेरून नऊ महिने त्यांना वेगळं ठेवून सरोगसीसाठी उपयोग केला जातो. या चित्रपटाच्या शेवटी परदेशी जोडपं मूल दत्तक घेताना दाखवलं आहे. पण या संपूर्ण गुंतागुंतीमध्ये किंवा मुलासाठी अमेरिकेहून भारतात सरोगेट आई शोधत वर्षभर फिरणाऱ्या या आणि अशा अनेक जोडप्यांना दत्तक मूल हा विचार मनात का येत नाही?

shruti.sg@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Malyali film saras break the typical motherhood concept from bollywood kpw