scorecardresearch

‘ती’ची तारेवरची कसरत

नुकतीच लग्न होऊन आलेली ती असो वा लग्नाला २० वर्ष झालेली ती तडजोड ही तिलाच करावी लागते.

‘ती’ची तारेवरची कसरत

– सुजाता साळवी (लेखिका आंतरराष्ट्रीय स्तरावर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत.)

“अगं त्याला भरपूर वाढ, अजून एक पोळी दे. झोपू दे त्याला, रात्री खूप उशीर पर्यंत काम सुरु होतं त्याच..दमला असेल ना तो”, अशी आणि बरीच अशा आशयाची वाक्य रोजंच तिच्या कानी पडतात. पण तिला मात्र कोणी कधी विचारत नाही की दमलीस का गं? किती ती धावपळ, थोडं झोप आता आधी मस्त पोटभरून खाऊन घे. तिने आपलं फक्त उसन्या गोष्टीचं अवसान आणायचं.

तिनं मात्र नेहमीच खंबीर रहायचं घराचा कणा असल्यासारखं. आता ही ‘ती’ कोण? तर ही ती म्हणजे तुमच्या आमच्यासारखीच एक. किंबहुना तुमच्या आमच्यातलीच एक म्हणायला हरकत नाही. जेव्हा ती एक मुलगी आणि बहिण म्हणून स्वच्छंदीपणे जगत असते, मोकळ्या वातावरणात वावरत असते. ना कसले बंधन, ना रोक टोक..ना उद्याची चिंता. हवं तसं जगणं आणि वाटेल तसं वावरण, मौज मजा करणं, खाणं पिणं आणि आवडी निवडी. एखाद्या दिवशी नाहीच झाली सकाळी उठण्याची इच्छा तर थेट दुपारी उठणारी ती. आईच्या हातचं गरमागरम जेवणं ते ही आयतं ताटात वाढून मिळणं, भूक लागल्यावर कसलाच विचार न करता सर्वात आधी ताटावर बसणं आणि वाढलेलं सारं फस्त करून टाकणं. आपण कसे बसलोय, कुठे बसलोय, कोणासमोर काय बोलावं आणि किती बोलावं याचा कोणाला हिशोब न देणं…यासारखं दुसरं सुख नाही. मनात आलं की पटकन गाडी काढून फिरायला जाणं, मित्र-मैत्रिणींसोबत एखादी ट्रीप प्लॅन करणं.

अशी ही ती बफिकीर होऊन जगणारी लग्नानंतर मात्र जबाबदा-या सांभाळता सांभाळता स्वतःला कशी विसरुन जाते याचा थांगपत्ता लागत नाही. केवळ स्वतःसाठी जगणारी ती जेव्हा लग्न करून स्वतःचा संसार थाटून नांदायला जाते, तेव्हा मात्र तिचा जणू काय दुसराच जन्म म्हणावा. खरं तर आई होणे हा स्त्री चा दुसरा जन्म म्हणतात पण स्वतःचं घर, कुटुंब सोडून परक्या घरी रहायला जाणं, तिथल्या चालीरीती समजून घ्याव, आपल्या इच्छा, आपली स्वप्न बाजूला सारून तिथल्या माणसांच्या आवडी निवडी, सवयी जपणे,नाती सांभाळणे, एकंदरीतच नवीन घरात स्वतःला कशाप्रकारे सामावून घेता येईल याचा पुरेपुर प्रयत्न करणे हा देखील नवीन जन्मच नाही का? एवढंच काय हे सारं करायला तर दुसरा जन्म देखील अपुरा पडेल असे म्हणायला हरकत नाही.

नवीन घरात येऊन जी आव्हान तिला पेलावी लागतात तेव्हा तिची होणारी घुसमट, मनात येणारे असंख्य प्रश्न, भिती, एकटेपणा तिला भांबवून सोडतात मात्र त्याशिवाय काही पर्यायही नसतो. सासरच्या घराला आपलं समजून एखादा बदल जरी घरात करायचा ठरला तर घरातल्या व्यक्ती तिलाच विरोध करतात आणखील तिला परक्या घरून आल्याची जाणीवही करून देतात. या सा-यामध्ये रहावं तरी कसं, वागावं तरी कसं हे प्रश्न मात्र नेहमीच निरुत्तरीत राहतात. नवीन माणसांमध्ये वावरताना प्रत्येक दिवस तिच्यासाठी एक नवीन आव्हान घेऊन येतो. एका बळकट दुर्गेप्रमाणे ती सारी आव्हानं पेलत असते. तिला येणारी आव्हानं ही साधीसुदी नसून कधी ती मानसिक, शारीरीक तर कधी भावनिक देखईल असतात पण कितीही झालं तरी शेवटी मात्र ती तिला एकटीलाच पेलावी लागतात. ती मुळातच हळवी असते आणि त्यात तिला करावी लागणारी तडजोड काही वेळेस तिला आणखी कमजोरही बनवू शकते. सुरुवातीला सारं जग आपल्याभोवती फिरतंय की काय असं वाटणा-या तिला नंतर मात्र आपणच सा-या जगाभोवती फिरतोय असं वाटू लागतं. या सा-यामध्ये हळूहळू तिची मानसिकता बदलत जाते आणि तेव्हा तिला सोबत हवी असते ते आपल्या माणसाची आणि ती देखील मिळाली नाही तर मात्र ती पुरती खचून जाते. एकीकडे माहेरी वर्चस्व गाजविणारी ती सासरी या सा-याच्या अधीन होऊन जाते याचा थांगपत्ताच लागत नाही.

तिच्या आयुष्यातील काही बदल हे खूप चांगले असतात तर काही मात्र मुळीच न पटणारे असतात. आपणही या घरातील हिस्सा आहोत याकरिता मात्र सतत झटणारी ती नंतर लहानसहान गोष्टीतच समाधान मानायला शिकते. मग नुकतीच लग्न होऊन आलेली ती असो वा लग्नाला २० वर्ष झालेली ती तडजोड ही तिलाच करावी लागते. शारीरीक बदल, मानसिक बदल, प्रत्येक पावलावर येणारे आव्हान ही तिलाच पेलावी लागतात. या सा-या प्रवासात तिला मात्र केवळ संघर्षच करावा लागतो. तिच्या सर्वच नात्यांमध्ये सर्वात महत्त्वाचे नाते म्हणजे बायकोचे नाते असते. कारण जेव्हा ती बायको होते तेव्हाच तिचा हा एकटीचा प्रवास सुरु होतो आणि पोवलोपावली तिची कसोटी सुरु होते. तिचे सारं विश्वच या नात्याभोवती फिरु लागते आणि मग मात्र तिची तारेवरची कसरत सुरु होते.त्यात जोडीदार समजून घेणारा असला तर या प्रवासात काहीसा विसावा मिळतो. लग्नापुर्वी हट्टी असणारी तीच एक समजूतदार बायको म्हणून अस्तित्व निर्माण करू लागते. पिढ्यानपिढ्या हे सारं असंच सुरु असल्याने ती कितीही भक्कम, मॉडर्न असली तरी ‘ती’ ला या गोष्टी सुटत नाही. कोमलता,मृदृता आणि ममतेचा प्रतिक असलेली ती स्वतः पण भावनावश होतच असते. आपल्या मनाच्या एका कोप-यात मात्र ती स्वतःशीच हितगुज साधत असते आणि ती’च तिला आधार देते आणि पुन्हा आयुष्यरुपी रणांगणात उतरण्याची ताकद देते…असं हे तिचं रोजचं!

मराठीतील सर्व ब्लॉग्स ( Blogs ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या