scorecardresearch

BLOG: मनसेचा नेमका प्रॉब्लेम काय? नितीन नांदगावकर त्यांना का नको?

नितीन नांदगावकरांच्या पक्षांतरामुळे राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यपद्धतीवर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

BLOG: मनसेचा नेमका प्रॉब्लेम काय? नितीन नांदगावकर त्यांना का नको?

-दीनानाथ परब

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? चांगले कार्यकर्ते त्यांना का नको? हे प्रश्न आज ब्लॉग लिहित असताना माझ्या मनामध्ये आहेत. काल रात्री उशिरा नितीन नांदगावकर यांनी मातोश्रीवर जाऊन शिवबंधन हाती बांधले. निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत नांदगावकरांच्या पक्षबदलामुळे मनसेला धक्का इथपर्यंतच हा विषय मर्यादीत राहत नाही, तर नांदगावकरांच्या पक्षांतरामुळे राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यपद्धतीवर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

कारण मनसेचे प्रमुख नेते विविध मुद्यांवर वृत्तवाहिन्यांच्या स्टुडिओमध्ये बसून इशारे देत असताना नितीन नांदगावकर स्वत: रस्त्यावर उतरुन जनसामान्यांच्या प्रश्नांवर दोन हात करत होते. नितीन नांदगावकर हे काही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख नेते नव्हते ते मनसेच्या वाहतूक सेनेचे साधे सरचिटणीस होते. आपल्याला पक्षाने जे पद दिले आहे त्याला त्यांनी पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न केला. टॅक्सीचे वेगाने पळणारे मीटर, रिक्षावाल्यांचा मुजोरी हे जनसामान्यांच्या रोजच्या जगण्याशी निगडीत असलेले मुद्दे त्यांनी तडीस लावण्याचा प्रयत्न केला. त्यांनी अत्यंत कुशलतेने सोशल मीडिया हाताळत आपले काम जनेतपर्यंत पोहोचवले. त्यामुळे सोशल मीडियावर ते लोकप्रिय होते.

गेल्या चार-पाच वर्षात पक्षात मोठी पडझड झाली. २०१४ नंतर मनेसच्या बडया नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम करुन भाजपा-शिवसेनेची वाट धरली. मनसे रस्त्यावरची लढाई विसरलेला असताना नितीन नांदगावकरांच्या अनोख्या आंदोलनांनी लक्ष वेधून घेतले. पक्ष प्रतिकुल परिस्थितीतून जात असताना नांदगावकरांच्या या आंदोलनामुळे मनसेबद्दल एक सकारात्मकता निर्माण झाली होती. नितीन नांदगावकरांच्या आंदोलनाचा धडाका लक्षात घेता त्यांना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. पण पहिल्या दोन उमेदवार यांद्यामध्ये त्यांचे नाव दिसले नाही. त्यामुळे अखेरीस त्यांनी हाती शिवबंधन बांधण्याचा निर्णय घेतला.

काही महिन्यांपूर्वी ते लोकसत्ता डॉट कॉमच्या डिजिटल अड्डा कार्यक्रमामध्ये आले होते. त्यावेळी पक्षात होत असलेली घुसमट त्यांनी बोलून दाखवली होती. ठाण्याचे दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता. विविध सामाजिक विषयांवर आंदोलने करत असताना ते जनता दरबाबरही भरवायचे. मनसेच्या अन्य नेत्यांच्या विभागातील नागरीकही त्यांचे प्रश्न, फिर्याद घेऊन जनता दरबारात यायचे. त्यावेळी मनसेच्या अन्य नेत्यांची निष्क्रियता समोर यायची. त्यामुळे पक्षांतर्गत दबावामुळे त्यांना हा जनता दरबार बंद करावा लागला होता.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याची घोषणा केली. त्यावेळी त्यांनी माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले आहे असा आरोप केला होता. म्हणजे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याभोवती कान भरणारे बडवे जमले आहेत असा त्यांना म्हणायचे होते. लोकसत्ता डॉट कॉमच्या डिजिटल अड्डा कार्यक्रमात नितीन नांदगावकर जे म्हणाले त्यांचा रोखही तसाच होता. नितीन नांदगावकर यांच्यावर आज पक्ष सोडण्याची वेळ आली यात त्यांच्यापेक्षा मनसेचे जास्त दुर्देव आहे. कारण सध्याच्या परिस्थितीत नितीन नांदगावकरांसारखे कार्यकर्ते मनसेसाठी दुर्मिळ आहेत. नांदगावकरांवर पक्ष सोडण्याची वेळ येत असेल तर आम्ही आंदोलने का करु? असा विचार प्रामाणिक कार्यकर्ते नक्कीच करतील.

 

मराठीतील सर्व ब्लॉग्स ( Blogs ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mns leader nitin nandgaonkar resign joins shivsen dmp