Money Heist 5 Review: थरारक, अभूतपूर्व आणि अविस्मरणीय

पाचवा सिझन प्रदर्शित होताच सुपरहिट

Money-Heist
Photo-Loksatta File Images

अखेर इतक्या दिवसांपासून चाहत्यांना प्रतिक्षा लागलेल्या ‘मनी हाइस्ट’चा पाचवा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. नेटफ्लिक्सच्या सर्वाधिक पसंती मिळालेल्या वेब सीरिजपैकी एक असणाऱ्या ‘मनी हाइस्ट’ला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे पाचव्या सिझनकडूनही प्रचंड अपेक्षा होत्या आणि या अपेक्षा पूर्ण करण्यात यश मिळालं आहे असंच म्हणावं लागेल. थरारक, अभूतपूर्व, अविस्मरणीय अशी जितकी विशेषणं देऊ तितकी कमी आहेत. ‘मनी हाइस्ट’चा पाचवा सिझन तुमच्या अपेक्षांच्याही पुढे जाणारा आहे.

‘मनी हाइस्ट’च्या चित्रीकरणापासून ते प्रत्येक पात्राच्या अभिनयापर्यंत या सिझनचे पाच भाग तुमचं मनसोक्त मनोरंजन करतील. या नवीन सिझनसाठी एक वर्षभर वाट पहावी लागली. पण ही प्रतिक्षा वाया जात नाही. या वेळेस आम्हाला काहीतरी ग्रँड करायचं होतं असं या सीरिजचे दिग्दर्शक आणि निर्माते जेसुस कोलमेनारने एका मुलाखतीत सांगितलं होते. त्याचप्रमाणे हा सिझन ग्रँड आहे. या सिझनमध्ये स्त्री शक्तीसोबत एलजीबीटीसारख्या गंभीर विषयांवरदेखील भाष्य करण्यात आलं आहे.

अलिसिया आणि प्रोफेसरचा सामना, बर्लिन आणि टटीनाचा फ्लॅश बॅक, कर्नल टोमायोची चालाखी आणि बँक ऑफ स्पेनमधील चोरांचे युद्ध या चार कथा व्यवस्थितपणे गुंफल्या असून नेहमीप्रमाणे उत्कंठा वाढवत राहतात.

‘मनी हाइस्ट’च्या पाचव्या भागाची सुरवात प्रोफेसर आणि अलिसियाच्या सामन्याने होते. प्रोफेसर अलिसियाच्या ताब्यात असून त्याचा छळ करत असते. चोरीचा संपूर्ण प्लॅन जाणून घेण्याचा तिचा प्रयत्न असतो. दुसरीकडे मास्टरमाइंड प्रोफेसरच जागेवर नसल्याने राकेलला नेतृत्व करावं लागतं. याचदरम्यान ओलीस ठेवलेल्यांनी पुकारलेलं बंड, आतमध्ये लष्कर घुसवण्यासाठी सुरु असलेली तयारी यामुळे मनी हाइस्टमध्ये रंजक वळणं येत असतात.

दुसरीकडे कर्नल टोमायो स्वतःची कातडी वाचवायला आपण केलेल्या चुकीचा आरोप अलिसियावर टाकतो. त्यामुळे प्रोफेसर तिचं मन वळवण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्यात यश मिळतं की नाही यासाठी वाट पहावी लागते. दुसरीकडे लष्कर आणि गँगमध्ये कधीही पाहिले नाही असे युद्ध सुरू झाले आहे.

प्रोफेसर, टोकियो आणि राकेलसोबत या पहिल्या पाच एपिसोडमध्ये गांडीया आणि अतुरोने बाजी मारली आहे. या सीरिजमध्ये एक नवीन पात्र आलं आहे ते म्हणजे बर्लिनचा मुलगा. फ्लॅशबॅकमध्ये बर्लिनच्या मुलाला दाखवण्यात आले आहे तो एक आयआयटी एक्स्पर्ट आहे. आता पुढे येणाऱ्या काळात तो प्रोफेसरची मदत कशी करेल हे पाहण्यासाठी सगळेच जण उत्सुक आहेत.

‘मनी हाइस्ट’च्या शेवटच्या सिझनमध्ये पुढे काय होणार हे पाहण्या करता आपल्याला तीन महिने थांबावे लागणार आहे. या सिझनचे पुढचे पाच भाग ३ डिसेंबर  रोजी दुपारी १.३० वाजता प्रदर्शित होणार आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Money heist season 5 review professor to aliceya mind blowing season aad 97