– चंदन हायगुंडे

मुंबईवरील २६/११चा दहशतवादी हल्ला हा हिंदू संघटनांकडून करण्यात आला हे दाखविण्यासाठी पाकिस्तानने कट रचून सर्व पाकिस्तानी अतिरेक्यांकडे हिंदू नावांची खोटी ओळखपत्रे दिली. मात्र दहशतवादी अजमल कसाब जिवंत सापडल्याने पाकिस्तानचा डाव फसला… या हल्ल्याला भगवा रंग देण्याचा प्रयत्न होता, असे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या तपासात मुख्य भूमिका बजावणारे पोलिस अधिकारी राकेश मारिया यांनी आपल्या “लेट मी से इट नाऊ” या आत्मचरित्रात नमूद केल्याने एकाच खळबळ उडाली आहे.

Miller Mathew
‘No Comments’ : भारत पाकिस्तानात घुसून दहशतवादी मारतं का? अमेरिकेचे परराष्ट्र विभागाचे प्रवक्त म्हणाले…
lokmanas
लोकमानस: दांभिक नवनैतिकवाद्यांकडून अपेक्षा निरर्थक
why arrest arvind kejriwal excise case
विश्लेषण : दिल्लीतील मद्य घोटाळ्यात अरविंद केजरीवालांचे नाव नाही, तरीही मनी लाँडरिंग अंतर्गत कारवाई का?
Lok Sabha election 2024
राजकीय नेत्यांवर पाळत ठेवण्यासाठी गुप्तहेरांची नेमणूक; नेमकं प्रकरण काय?

मात्र ही माहिती नवी नाही. कसाब व त्यांच्या साथीदारांच्या हिंदू नावांच्या बनावट ओळखपत्रांची माहिती २६/११ हल्ल्याच्या खटल्यात न्यायालयातही सादर करण्यात आली होती. तसेच २६/११ दहशतवादी हल्ल्याचे मुख्य तपास अधिकारी रमेश महाले (सध्या निवृत्त) यांनी आपल्या “२६/११ कसाब आणि मी” या पुस्तकात याबद्दल अगदी सविस्तर माहिती दिली आहे. या पुस्तकाची पहिली आवृत्ती २५ नोव्हेंबर २०१८ रोजी प्रकाशित झाली.

महालेंच्या पुस्तकातील माहितीनुसार (पान क्र: ८४ व ८५) कसाबला जिवंत पकडल्यावर त्याने पोलिसांना जबाब देताना सांगितले कि, “मुंबईत जर दुर्दैवाने कुणी पोलिसांच्या हाती सापडलंच, तर त्यांची खरी ओळख पटू नये आणि हल्ल्याचा कट नक्की कुठे शिजला, याचा थांग भारतीय यंत्रणांना लागू नये, यासाठी आम्हा दहाही जणांना नवी ओळख देणं गरजेचं होतं. त्यामुळे काही दिवस अगोदर आमची छायाचित्रं घेण्यात आली. मी आणि माझ्या इतर साथीदारांची ओळख पटू नये म्हणून हिंदू नावांचे ओळखपत्र देण्यात आले होते. अरुणोदय डिग्री अँड पी. जी. महाविद्यालय, वेंद्रे कॉम्प्लेक्स, दिलखुशनगर, हैद्राबाद, पिनकोड – ५०० ०६० असा पत्ता छापलेली ओळखपत्रे बनवून त्यावर ही छायाचित्रे चिटकवण्यात आली. आमच्या पैकी प्रत्येकाला एक भारतीय नाव देण्यात आलं. मी मोहम्मद अजमल अमीर कसाब (अबू मुजाहिद) चा झालो समीर दिनेश चौधरी, रा. २५४, टीचर्स कॉलनी, नागरभावी, बंगळुरू.. ”

कसाबच्या इतर साथीदारांनाही बनावट नावं मिळाली होती, ती अशी:

– इस्माईल खान (अबू इस्माईल) – नरेश विलास शर्मा, रा. २८/ बी ममता नगर, निगोल, हैदराबाद.
– इम्रान बाबर (अबू आकाशा) – अर्जुनकुमार वीरकुमार, रा. १३/२, एस के अपार्टमेंट, इंदिरा नगर, हैदराबाद.
– नासीर (अबू उमर) – दिनेशकुमार रविकुमार, रा. ७८१, हुडा कॉलनी, सरूर नगर, हैदराबाद.
– हाफिज अर्शद (अब्दुल रहमान बडा उर्फ हयाजी) – रघुबीरसिंग रणजितसिंघ, रा. प्लॉट क्र ६७३ – ४ व्ही, इलिस ब्रिज, अहमदाबाद.
– अब्दुल रहमान छोटा (साकीब) – अरुण विक्रम शर्मा, रा. ३६ – ए, गंगा कॉलनी, नवी दिल्ली.
– फहादुल्ला – रोहित दीपक पाटील, रा. ३१३, एस के अपार्टमेंट, इंदिरा नगर, विजयनगर कॉलनी, हैदराबाद.
– सोहेब (अबू सोहेब) – सुधाकानं नायर (ओळखपत्र जाळून गेल्याने पत्ता समजू शकला नाही)
– जावेद (अबू अली) – किशोर नायडू (ओळखपत्र न सापडल्याने पत्ता समजला नाही)
– नझीर अहमद (अबू उमेर) – प्रकाश कुमार (ओळखपत्र न सापडल्याने पत्ता समजला नाही).

या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे की, “लष्कर ए तय्यबा” ने हल्ल्याचा कट आखताना घेतलेली पुरेपूर काळजी तपासादरम्यान दिसून आली. सध्या भारतीय यंत्रणांच्या ताब्यात असलेल्या अबू जुंदालने इंटरनेटवरून सर्व तपशील मिळविला होता. त्यानंच तपासादरम्यान मुंबई पोलिसांना याची माहिती दिली होती. त्यामुळेच ज्या महाविद्यालयाच्या नावाची ही ओळखपत्र होती, ती महाविद्यालये दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्षात असल्याचं आणि त्यावर देण्यात आलेले धारकांचे पत्ते खरे असल्याचे आम्हाला आढळून आले.”
“हिंदू भाविक हातावर लाल रंगाचा धागा बांधतात. “लष्कर ए तय्यबा” ने तसे धागे मिळवून अतिरेक्यांना मुंबईकडे निघण्यापूर्वी मनगटावर बांधायला लावले होते. मुंबईत ते मारले गेल्यानंतर त्यांच्या हातावरच्या धाग्यांवरून ते हिंदू आहेत, असा भारतीय यंत्रणांचा समाज व्हावा म्हणून ! शिवाय हल्ल्यांच्या ठिकाणांची ज्याने पाहणी केली त्या डेव्हिड कोलमन डेडलीने हे धागे मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराच्या परिसरातून खरेदी करून लष्कर ए तय्यबा च्या म्होरक्यांना दिले होते, हे नंतरच्या काळात अमेरिकन यंत्रणांनी केलेल्या तपासात उघड झालं आहे.”

२६/११/२००८ रोजी मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा अभ्यास व्हावा म्हणून मुख्य तपास अधिकारी रमेश महाले यांचे “२६/११ कसाब आणि मी” हे पुस्तक नक्की वाचायला हवे, संग्रही ठेवायला हवे. पाकिस्तानने रचलेले षडयंत्र, कसाबला जिवंत पकडताना शहीद पोलिस तुकाराम ओंबळेंचे शौर्य, पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात हेमंत करकरे, अशोक कामठे, विजय साळसकर या पोलिस अधिकाऱ्यांना आलेले हौतात्म्य, डेव्हिड हेडली व परदेशातला तपास, न्यायालयातील कामकाज, हल्ल्याचे षडयंत्र उघड करण्यासाठी ९८ पोलिसांच्या टीमने दिवसरात्र घेतलेली मेहनत, पाकिस्तान विरोधात मिळविलेले भक्कम पुरावे इत्यादीबाबत या पुस्तकात सविस्तर माहिती आहे. तसेच हे पुस्तक वाचल्यास २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने भारतीय पोलिस, गुप्तहेर खात्याबाबत शंका निर्माण करणाऱ्या, “हू किल्ड करकरे?” असा सवाल करून समाजाची दिशाभूल करणाऱ्यांचीही पोल खोल होते.

“२६/११ कसाब आणि मी” पुस्तकाचे प्रकाशक – मेनका प्रकाशन, २११७, सदाशिव पेठ, विजयनगर कॉलनी, पुणे – ४११०३०. पुस्तक येथे व अन्य दुकानांत उपलब्ध आहे.