Nag Panchami traditions श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी म्हणतात. या दिवशी हळदीने किंवा रक्तचंदनाने पाटावर नऊ नागांच्या आकृत्या काढून त्यांची पूजा केली जाते. काही ठिकाणी घराच्या दरवाजाच्या भिंतीवरही फणायुक्त नाग काढून त्याची पूजा करतात. दूध आणि लाह्या यांचा नैवेद्य त्यांना दाखवतात. नागपंचमीच्या दिवशी काही ठिकाणी या दिवसाचे महत्त्व सांगणाऱ्या कथेचे वाचन करण्यात येते. ही कथा शेतकऱ्याशी संबंधित आहे. एक शेतकरी होता. एका सकाळी त्याने नित्याप्रमाणे जमीन नांगरण्यास प्रारंभ केला; परंतु नांगर जमिनीत घुसताच त्या खाली असलेल्या नागाच्या वारुळातील पिलांना त्याचा फाळ लागला आणि ती पिल्ले गतप्राण झाली. हे पाहून नागिणीला राग आला; तिने त्या शेतकऱ्याला व त्याच्या बायका-मुलांना दंश करून ठार मारले. मग तिला कळले की, त्या शेतकऱ्याची एक मुलगी परगावी आहे. नागीण तिला मारण्यासाठी परगावी गेली. पाहते तर त्या शेतकऱ्याच्या मुलीने पाटावर चंदनाचे नाग काढून त्यांची पूजा केली होती. दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवून ती त्यांची प्रार्थना करत होती. ते दृश्य पाहून नागीण प्रसन्न झाली. नैवेद्याचे दूध पिऊन ती तृप्त झाली आणि तिने त्या शेतकऱ्याच्या मुलीला डोळे उघडण्यास सांगितले. मुलीने डोळे उघडले आणि समोर सळसळती नागीण पाहून ती मुलगी घाबरली. नागिणीने तिला अभय दिले आणि झाला तो वृत्तांत कथन केला. शेतकऱ्याच्या मुलीने वडिलांकडून झालेल्या चुकीची माफी मागितली. त्या मुलीच्या भक्तिभावाचे फळ म्हणून नागिणीने तिच्या आई-वडिलांना आणि भावंडाना पुनश्च जीवनदान दिले. ही कथा पौराणिक असली तरी त्यातून स्पष्ट होणारा मथितार्थ हा शेतकऱ्यांसाठी सापाचे महत्त्व विशद करणारा आहे. अधिक वाचा: Nag Panchami 2024: चांदीच चांदी! नागपंचमीला निर्माण होणार राजयोग; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींवर असणार नागदेवतेची कृपा नागपंचमी हा स्त्रियांचा सण नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये, उकडलेले पदार्थ करावेत, कोणत्याही प्रकारची हिंसा करू नये असा दंडक आहे.पूर्वी नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया आणि मुली संध्याकाळी गावाबाहेर नागाच्या वारुळावर अथवा देवळात जात असत. दूध लाह्या वाहून नागांची पूजा केल्यानंतर झिम्मा फुगड्या इत्यादी खेळ आणि झाडांना झोपाळे बांधून त्यांवर झोके घेणं, फेर धरून गाणी म्हणणं हे आकर्षणाचे केंद्रबिंदू होते. ही गाणी गद्यप्राय होती त्यांत बाळाई, भारजा, जैता, बहुला गाय इत्यादींच्या कथा गुंफलेल्या असत. क्वचित त्यात सासर- माहेरचा जाच किंवा कौतुकही शब्दबद्ध झालेले असायचे. नागपंचमीच्या सणाला संपूर्ण भारतात आगळे महत्त्व आहे. नाग ही कुलसंरक्षक देवता आज काश्मीरमधली परिस्थिती बिकट असली तरी या भागात पारंपरिकरित्या सर्पपूजा अस्तित्त्वात असल्याचे पुरावे मिळतात. काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी सर्पाकृती कोरलेल्या आढळतात. पंजाबमध्ये सफीदोन या नावाचे एक ठिकाण आहे. ते पंजाबातल्या सर्पपूजेचे केंद्र आहे. जनमेजयाने जे सर्पसत्र केले ते याच ठिकाणी अशी मान्यता आहे. बंगाल आणि छोटा नागपूर या भागात या दिवशी सर्पराज्ञी मनसादेवीची पूजा करतात. तिची पूजा केली नाही, तर कुटुंबातील व्यक्ती सर्पदंशाने मरते अशी समजूत आहे. राजस्थानात पीपा, तेजा इत्यादी पौराणिक नागराजाची पूजा प्रचलित आहे. बिहारात हिनवर्ण स्त्रिया स्वतःला नागपत्नी समजून नागाची गीते गातात. ओडिसातले लोक अनंतदेव या नावाने नागपूजा करतात. आसाम मध्ये उथेलन नावाचा एक प्रचंड सर्प असल्याचे मानले जाते. तो नरबळी दिल्याशिवाय तृप्त होत नाही अशी तिथल्या आदिवासींची धारणा आहे. महाराष्ट्रात घरोघरी मातीचे नाग करून पूजा केली जाते. गुजरातेत नागमूर्तीपुढे तुपाचा दिवा लावतात आणि मूर्तीवर जलाभिषेक करतात. महाराष्ट्र, गुजरात, काठियावाड इत्यादी भागांमध्ये नाग ही कुलसंरक्षक देवता मानली जाते. वऱ्हाडात मुंग्यांच्या वारुळाजवळ नागमूर्ती ठेवून तिची पूजा करतात. केरळमध्ये नायर आणि नंपूतिरी यांच्या घराभोवतीच्या परिसरात वायव्येच्या कोपऱ्यात सर्पकावू नावाचे एक ठिकाण असते. तिथे नागप्रतिमा ठेवून तिच्या भोवती झाडेझुडुपे वाढवतात. वर्षातून एकदा त्या नागदेवतेची मोठी पूजा करतात. त्रिवांकुर, छत्तीसगड, विलासपूर याठिकाणी नागांची देवळेच आहेत. दक्षिण भारतात अनेक समाजांमध्ये विवाहित स्त्रिया लग्नसमारंभात सर्पाची पूजा करतात. कर्नाटकात नागांच्या नैवेद्याला गूळ-पापडीचे लाडू करतात, त्यांना तंबीट म्हणतात. अधिक वाचा: Nag Panchami 2024: नागपंचमी का साजरी केली जाते? जाणून घ्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व नागांचे अवतार मानलेल्या वीर पुरुषांचीही पूजा उत्तरप्रदेशात मथुरा, वाराणसी, अहिच्छत्र या ठिकाणी नागपूजेची मोठी केंद्र आहेत. उत्तरप्रदेशात नागपंचमीच्या दिवशी घरातील पुरुष दुधाची भांडी घेऊन गावाबाहेर अथवा जंगलात जातात आणि नागांच्या वारुळात ती दुधपात्रे रितीकरून येतात. काशीत या दिवशी सकाळी नागलो भाई नागलो, छोटे गुरु का, बडे गुरु का, नागलो भाई नागलो असे ओरडत शाळकरी मुलांच्या मिरवणुकाच निघतात. संध्याकाळी नागकुंवा नामक जलाशयावर असलेल्या नागमूर्तीचे पूजन होते. जमलेले लोक नागकुव्याचे पाणी नागतीर्थ म्हणून प्राशन करतात. व्याकरणकार पतंजली हा शेषावतार होता. मरणोत्तर त्याने या विहिरीत वास्तव्य केले असे सांगितले जाते. प्राचीन काळी नागपंचमीच्या दिवशी कुस्त्या आणि नृत्य -नाट्य होत. कृष्णाने कालियामर्दन केले. तो दिवस नागपंचमीचा होता अशी एक धारणा आहे. नागपंचमीच्या दिवशी नाग कोणालाही दंश करत नाही, आणि डसलाच त्याचे विष बाधत नाही अशी समजूत आहे. भारतात काही ठिकाणी नागांचे अवतार मानलेल्या वीर पुरुषांचीही पूजा केली जाते. पंजाबमधील गुगा, होशंगाबादमधील राजवा आणि सोरळ मध्य परदेशातील करूवा आणि राजस्थानमधील तेजाजी हे ते वीरपुरुष होत. महाराष्ट्रात बत्तीस शिराळ्याला नागपूजा मोठ्या प्रमाणावर केली जाते.