मध्य रेल्वेने उत्साहात सुरू केलेला एसी लोकलचा प्रयोग प्रवाशांसाठी जीवघेणा ठरण्याची शक्यता आहे. कल्याण दादर लोकलमध्ये एसी आणि पंखे बंद पडल्यामुळे प्रवाशांनी काही काळ गॅसचेंबरचा अनुभव घेतला.

मंगळवारी कल्याणहून दादरला जाणारी एसी लोकल (१०.०२) अर्धा तास उशिराने रवाना झाली. उशीर झाल्यामुळे लोकलला प्रचंड गर्दी होती. डोंबिवली स्टेशनात येताच गाडीतील एसी, पंखे बंद झाले. डोंबिवली स्टेशनात आणखी प्रवासी चढले. गाडी सुरू झाली.

आधी एसीने निर्माण झालेला गारवा हळूहळू विरून गेला आणि प्रवाशांना घुसमटू लागलं. डोंबिवली ते ठाणे प्रवाशात ट्यूब दोनदा चालू बंद झाल्या पण एसी-पंखे बंदच राहिले. असंच सुरू राहिलं तर जीव घुसमटेल अशी प्रवाशांमध्ये चर्चा सुरू झाली. मुंब्रा इथे लोकलचा वेग मंदावल्याने प्रवाशांच्या रागात भर पडली. अनेकजण घामाघूम झाले. गाडीत गर्दी असल्यामुळे त्रास अधिकच जाणवत होता.

७ पट जास्त तिकीट आकारूनही असंच होणार असेल तर कसा प्रवास करायचा असा सवाल काही प्रवाशांनी केला. एसी लोकल वेळेवर धावत नाहीत हा नेहमीचा अनुभव आहेच. या त्रासात आता नव्याने एसी बंद-पंखे बंद याची भर पडली आहे.

ठाण्याआधी प्रवाशांनी टॉक बॅक यंत्रणेमार्फत मोटरमनशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र आवाज नीट ऐकू येत नसल्याने त्यांच्यापर्यंत प्रश्न पोहोचला नाही.

ठाणे स्टेशनात लोकल पोहोचली. तिथून सुटण्याआधी पंखे-एसी सुरू झाले आणि प्रवाशांनी हुश्श केलं. काही मिनिटात मोटरमनने टॉक बॅकच्या माध्यमातून संपर्क करत पंखे एसीचं बघतो सांगितलं. काही सेकंदात लोकल ठाण्याहून सीएसटीला रवाना झाली. ही फास्ट लोकल असल्याने कल्याण ते दादर अंतर ४० मिनिटात पार करते. पण अनेक एसी लोकल स्लो देखील आहेत. अशावेळी एसी बंद पडल्यास काय करायचं यासंदर्भात रेल्वेने काहीच स्पष्ट केलेलं नाही.

काही महिन्यांपूर्वी मुलुंड इथे एसी लोकलमध्ये एसी बंद पडल्याने काही प्रवाशांना श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला. एसी लोकलमध्ये एसी-पंखे बंद पडल्यास काय करायचं यासंदर्भात अजूनही नियमावली नाही. काही दिवसांपूर्वीच रेल्वेने आणखी एसी लोकल सेवेत आणण्याचं पक्कं केलं आहे. आहेत त्या एसी लोकल वेळेवर चालवण्यासाठी काय करणार आणि अशी परिस्थिती उद्भवली तर काय करायचं हे प्रश्न अनुत्तरितच आहेत.

नेहमीच्या लोकलच्या तुलनेत एसीचं तिकीट ७ पट जास्त आहे. फर्स्टक्लासचं तिकीट एसी लोकलला चालत नाही. तिकीट जास्त असलं तरी एसी लोकलचा वक्तशीरपणाशी काहीच संबंध नसतो. त्यामुळे जास्त पैसे देऊन त्रास विकत घ्या अशी एसी लोकलची गत आहे. बहुतांश एसी लोकल शनिवार-रविवारी नसतात. रविवारी सुट्टीच्या दिवशी कुटुंबकबिला घेऊन माणसं बाहेर पडतात.कौटुंबिक कार्य, परीक्षा तसंच अन्य कामांसाठी बाहेर पडणाऱ्यांची संख्या जास्त असते. मात्र त्यादिवशी एसी लोकल उपलब्धच नसते.