scorecardresearch

Premium

Mumbai Double Decker Bus : डबलडेकर बस, मुंबईच्या राजेशाही रसरशीत सफरीचा शेवट

Double Decker Bus Mumbai : मुंबईतील आकर्षणाचं केंद्र असलेली नॉन एसी डबलडेकर बसेसचा आजचा शेवटचा दिवस. ८६ वर्ष मुंबईकरांना साथ देणाऱ्या या सफरीच्या निमित्ताने शब्दसफर.

Double Decker Bus Mumbai Last Day
डबल डेकर बसेसचा शेवटचा दिवस (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Double Decker Bus Mumbai Last Day : लाल रंग, ट्रकसारखा मोठा आकार, खालचा मजला-वरचा मजला अशी रचना, वरच्या मजल्यावर फ्रंट सीटच्या पायाशी गाडीचा फलक आणि नंबर बदलण्यासाठी मूव्हर, मागे वर जायला छोटेखानी जिना, दोन मजल्यांसाठी दोन कंडक्टर, वरच्या मजल्यावरच्या फ्रंटसीटवरून भणाण वाऱ्याचा झोत अंगावर घेण्याची संधी आणि ड्रोन कॅमेरा जसं वरुन गोष्टी टिपतो तसं बसमध्ये बसून नाममात्र तिकिटात बर्ड्स आय व्ह्यू दाखवणारी खुली डबल डेकर आता मुंबईकरांचा निरोप घेते आहे. मुंबईचा उल्लेख आला की गेटवे ऑफ इंडिया डोळ्यासमोर तरळतं. सीएसटी स्टेशन, बीएमसीची वास्तू डोळ्यासमोर येते. समुद्राची नानाविध रुपं येतात तसंच या राजेशाही डबलडेकरची सैरही आठवते.

लोकल असो की बस- मुंबईकर जीव लावतात. त्यामुळेच ८६ वर्ष शहराला चालतंधावतं ठेवणाऱ्या या बसेस आता नसणार हे कळल्यावर सच्च्या मुंबईकरांचं मन खट्टू झालं. घरीदारी जग एसीमय झालेलं नसताना या डबलडेकर बसने मुंबईकरांना वारा प्यायला शिकवलं. डुप्लेक्स फ्लॅट संकल्पना रिअल इस्टेट मार्केटला कळण्यापूर्वी या डबलडेकर बसने चालता चालता वरच्या मजला गाठून शहर पाहण्याची संधी दिली. भारत सासणे लिहितात तसा रट्टल रट्टल पाऊस मुंबईत पडतो. त्या पावसाचा प्रकोप वरच्या मजल्यावरच्या बाल्कनीत बसून पाहण्याची पर्वणी दिली. राज्याच्या नव्हे देशाच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या माणसाला मुंबईचं आकर्षण असतं. त्या आकर्षणांपैकी एक असते डबलडेकर बस. डबलडेकरची सफर ही नुसती वाहतूक नव्हती, तो एक सुखवट्याचा अनुभव होता.
आजनंतरही मुंबईत डबलडेकर बस असतील पण ‘त्या’ बसची सर नाही असं म्हणणारा मुंबईकर तुम्हाला दिसेलच.

panvel municipal corporation, title of environmental ambassador, families who donate ganesh idols, title of environmental ambassador for donating ganesh idols
पनवेल : गणेश मूर्तीदान करणाऱ्या कुटूंबियांना ‘पर्यावरण दूत’ पदवी महापालिका देणार
buldhana mns, marathi name boards on shops and establishments, name boards other than marathi, name boards removed in mns style
…अन्यथा ‘मनसे स्टाईल’ने दुकानाच्या पाट्या उतरवू, बुलढाणा तालुकाध्यक्ष अमोल रिंढेंचा इशारा
Bareilly SDM Viral Video
तक्रार करण्यासाठी कार्यालयात आलेल्या व्यक्तीलाच SDM ने बनवला ‘कोंबडा’, VIDEO समोर येताच संतापले नेटकरी
mumbai murder, 36 year old man stabbed to death at saki naka, bear bottle hit on the head in mumbai
मुंबई : साकिनाका येथे ३६ वर्षीय व्यक्तीची हत्या

छत्रपती शिवाजी महाराज स्थानकाच्या बाहेरुन १३८ क्रमांकाची बस सुटते. उपनगरातून मुंबईत दाखल होणाऱ्या चाकरमान्यांना कचेरीत घेऊन जाणारी ही बस. डबलडेकर असल्यामुळे पटकन वर जाऊन फ्रंटसीट पकडायला झुंबड उडायची. सीएसटीहून सुटली की सोबो अर्थात साऊथ बॉम्बेतल्या गॉथिक शैलीतल्या वास्तूंना साद घालत बस हुतात्मा चौकात पोहोचते. वरच्या मजल्यावरच्या फ्रंट सीटवरून बघताना समोरचा बाईकवाला किंवा टॅक्सी यांना बस धक्का देणार असं वाटतं. एवढी मोठ्ठी बस चौकात वळते कशी असा प्रश्न पडतो. पण विशेष प्रशिक्षण घेतलेले सारथी मुंबानगरीच्या गर्दीभरल्या रस्त्यांवरून हा लाल हत्ती सराईतपणे नेतात.

हुतात्मा चौकातून उजवीकडचं वळण घेत बस चर्चगेट स्थानकाच्या स्टॉपवर लोकांना सोडते. इथून मास्तरांनी बेल दिली की खऱ्या अर्थाने डबलडेकरची मजा सुरू होते. उजवीकडे वानखेडे स्टेडिमय आणि डावीकडे ब्रेबॉर्न स्टेडियम, जुनी खास दुकानं-हॉटेलं यांना पार करत डबलडेकर वाटचाल करते आणि समुद्राहून येणारा भन्नाट वारा मनाला तजेला देतो. आपल्या सुदैवाने ‘पिझ्झा बाय द बे’ हॉटेलच्या सिग्नलला बस थांबली तर हा वारा आणखी काही मिनिटं आपली साथ करतो. दहापेक्षा कमी रुपये भरून ऑफिसला-कामाला जाता जाता समुद्राचा व्ह्यू आपल्या नजरेत भरतो. अहोरात्र धावणाऱ्या गर्दीमय मुंबईत काही मिनिटांसाठी समुद्राच्या विशालरुपाचं दर्शन मन सुखावून टाकतं. डावीकडे वळून डबलडेकर प्रसिद्ध अशा मरिन ड्राईव्हवरुन आगेकूच करते. चाकरमानी बसमध्ये बसून वेळेत अटेंडन्स लागावा या विचारात असताना दूर समुद्रात छोटी होडी लाटांशी खेळत पाणी काटताना दिसते. मुंबईच्या या टोकावरून राजभवनचा वैयक्तिक किनारा दिसतो. मंत्रालय आणि राजभवन हा सत्तेचा सेतू एका परिघात दाखवणारी अशी ही बस.

एअर इंडियाच्या इमारतीपाशी डावीकडे झोकदार वळण घेत डबलडेकर राज्याची कचेरी असलेल्या मंत्रालयाशी जाऊन पोहोचते. तिथून चौकातून उजवीकडे जात चव्हाण सेंटरला थांबून वीज भवन, मच्छिमार नगर, बधवार पार्क इथल्या मंडळींना सोडत डबलडेकर मेकर टॉवर आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर इथे काम करणाऱ्या चाकरमान्यांना गंतव्यस्थळी सोडते. कफ परेडच्या पोलीस स्टेशननंतर प्रकाश पेठे मार्गावरच्या बॅक बे डेपोत प्रवेश करते. मुंबईच्या एका टोकाला वसलेला हा डेपो. वादग्रस्त आदर्श बिल्डिंग पाठीशी ठेऊन डेपोतलं कामकाज सुरू असतं. सकाळी अगदी उजाडत ते ऑफिसेस रिकामी होईपर्यंत १३८च्या फेऱ्या सुरूच असतात. काही महिन्यांपूर्वी बिगरएसी डबलडेकरची जागा एसी बसेसनी घेतली. समुद्रावरून येणाऱ्या सुसाट वाऱ्याऐवजी मशीनने सोडलेला वारा मिळू लागला. वरच्या मजल्यावरचं स्टँडिंग बंद झालं. बसमधली मोकळी जागा कमी झाली. बिगरएसी बसमध्ये ड्रायव्हर स्वतंत्र बसत असे. डाव्या बाजूला मोठा आरसा ड्रायव्हरला हा लाल हत्ती चालवायला उपयोगी पडत असते. एसी बसमध्ये प्रवाशांनी वेढलेल्या स्थितीत बसून ड्रायव्हर सारथ्य करतो.

दिवसरात्र कधीही गर्दी असणारा कुर्ला हा परिसर. मोकळी स्पेस ही संकल्पना कुर्ल्यात ऑप्शनला आहे. अतिशय अरुंद रस्ते, रस्त्याच्या बाजूला दुकानं-घरं-वस्ती, खड्डेमय रस्ते, प्रचंड गर्दी यातून वाट काढत कुर्ल्यात ३१०, ३१३, ३१८, ३११, ३३२ अशा गजबजलेल्या रुटवर डबलडेकर धावते. या मार्गावर खुल्या डबलडेकरमधून जाताना अक्षरक्ष: भीती वाटते. माणसांना, गाड्यांना, दुकानं या कशाला तरी बसचा धक्का लागेल असं सतत वाटत राहतं. कुर्ला स्थानक पश्चिम इथून डबलडेकरचं धूड कलिना विद्यानगरीमार्गे सांताक्रूझ स्थानक पूर्वला जातं. यापैकी एक बस मुंबई विद्यापीठाची सैर करुन जाते. मुंबई विद्यापीठाचा कलिना कॅम्पस म्हणजे शहरातलं ओअॅसिसच. विद्यापीठामधली विविधं डिपार्टमेंट्स आणि दोन्ही बाजूला राखणदारी करणारी डेरेदार झाडं यांच्याशी गुजगोष्टी करत बस मार्ग काढते. एक मार्ग विमानतळ दर्शन करत एअर इंडिया कॉलनीमार्गे सांताक्रूझ गाठतो. विमानतळ आणि विमान प्रवास ही आजही अनेकांसाठी अप्राप्य गोष्ट आहे. ३११ डबलडेकरमुळे मनसोक्त विमानं पाहता येतात. विमानतळावरची लगबग पाहता येते. ३१३ मार्गामुळे मुंबईच्या मध्यात असलेला मिलिटरी एरिया अनुभवता येतो. याच मार्गामुळे मिठी नदीचा आपण नाला कसा केला तेही पाहता येतं. या मार्गावर खुल्या डबलडेकरमधून प्रवासाची आणखी एक गंमत म्हणजे वरच्या मजल्यावर बसलेलं असताना झाडांच्या फांद्या, पानं आत घुसतात. काहीवेळेस तर अंगाला घासूनही जातात. नवखा माणूस असेल तर त्याच्या हे लक्षात येत नाही पण रोजची मंडळी झाड जवळ आलं की थोडं आत सरकतात. पावसाळ्यात तर बाहेर धोधो पाणी बरसतंय आणि आपण वरून तांडव अनुभवतोय हा बाल्कनी सिक्वेन्स पक्का.

एक मार्ग ऑफिसेसचा संच असलेल्या बीकेसीतून वांद्रेला जातो. कुर्ला-अंधेरी हा अतिशय व्यग्र असा मार्ग. या मार्गावर डबलडेकर चालवण्याची कल्पनाही मनात धडकी भरवू शकते. पण बेस्टची मंडळी हे धाडस करतात. गच्च वस्ती, दुकानं, वाहनं यातून वाट काढत ३३२ सदैव सुरू असते. बैल बाजार, साकीनाका हे परिसर ओलांडत ही बस अंधेरीतल्या आगरकर चौकात दाखल होते. जुनी माणसं सांगतात पूर्वी डबलडेकरचे असंख्य रुट होते. मुंबईकरांची लाडकी ६६ नंबर तसंच मुंबईच्या दक्षिण टोकातून वरळीला जाणारी १२४ नंबर अशा अनेक मार्गांवर डबलडेकर बस होत्या.

जगण्याच्या प्रत्येक कप्प्याला कॉर्पोरेट लूक मिळतो आहे. मुंबईतही जुन्या दगडी इमारती जाऊन काचेच्या इमारती ऑफिसची व्याख्या झाल्या आहेत. एसी नसेल तर जीव गुदरमतो अशा या कचेऱ्यांना संयुक्त राष्ट्र संघटनेने ‘सिक बिल्डिंग’ अर्थात आजारी इमारती म्हटलं आहे. सेंट्रलाईज्ड एसीमुळे बंदिस्त वातावरणात विषाणूंचा फैलाव सहजतेने होतो. सूर्यप्रकाश, कवडसे आत येतील अशा खिडक्या, तावदानं आता नसतातच. वारा खेळता राहील अशी मोकळी रचना आता लयाला गेली आहे. चाकरमानी निर्वात पोकळीत काम करतात. अनेकदा त्यांना बाहेर काय चाललंय हे समजूही शकत नाही. खुल्या डबलडेकर बसच्या माध्यमातून मुंबई रसरशीतपणे अनुभवता यायची. मुख्य म्हणजे ही चंगळ कोणालाही परवडणारी होती.

दक्षिण मुंबईत संध्याकाळी आच्छादनविरहित खुल्या डबलडेकरमधून मुंबई दर्शन करण्याची संधी दर्दी चुकवत नाहीत. ‘नीलांबरी’ नावाच्या बसमधून ही सैर घडवली जाते. महिनाभरात या बसेसही निकाली निघणार आहेत. भारतीय क्रिकेट संघाने २००७ मध्ये पहिलावहिला ट्वेन्टी२० वर्ल्डकप जिंकला. दक्षिण आफ्रिकेत विश्वविजेता झालेला भारतीय संघ मुंबईत परतला. विमानतळ ते वानखेडे स्टेडियम हा प्रवास भारतीय संघाने बेस्टच्या खुल्या डबलडेकरनेच केला होता.

मुंबईत बेस्टचा प्रवास १९२६ रोजी सुरू झाला. लंडनच्या रेड बसेसच्या धर्तीवर मुंबईत डबलडेकरची एंट्री वर्षभरानंतर झाली. प्रवाशांनाही ही सफर आवडू लागली. एकाचवेळी भरपूर प्रवासी नेण्याच्या क्षमतेमुळे बेस्ट प्रशासनाने डबल डेकरच्या संख्येत वाढ केली. एकाक्षणी बेस्टच्या ताफ्यात ९०० डबलडेकर बसेस होत्या. बसचं आयुर्मान, देखभालीचा वाढता खर्च, आकारमान आणि उंची, रस्त्यांची स्थिती, मार्गातली अतिक्रमणं यामुळे डबलडेकर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. १२०, ४५, १५ करत करत आता एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच खुल्या डबलडेकर बसेस उरल्या आहेत.

या बसेस निकाली निघणार हे कळल्यावर यतीन आंगरे नावाच्या एका बेस्टप्रेमीने एक बस विकत घेण्यासाठी स्वारस्य दाखवलं. त्यासाठी अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावाही केला. बेस्ट बसप्रेमींनी काही तासांसाठी एक खुली डबलडेकर बुक केली आणि त्यातून मुंबईची सैर केली. इन्स्टाग्रामवर बेस्टप्रेमी गेले काही दिवस या खुल्या डबलडेकरच्या प्रवासाचे फोटो आणि व्हीडिओ निगुतीने शेअर करत आहेत. बेस्ट बसेसचा प्रवास उलगडणारं संग्रहालय कुर्ल्याजवळच्या आणिक आगारात आहे. खुल्या डबलडेकरपैकी एक तिथे ठेवली जाऊ शकते. पण यासंदर्भात अधिकृत घोषणा झालेली नाही.

आज अंधेरी ते सीप्झ, मजास डेपो या मार्गावरची ४१५ क्रमांकाची सफर खुल्या डबलडेकरची शेवटची असेल. त्यानंतर बेस्ट बसचं हे मोकळंढाकळं रांगडं रुप इतिहासात लुप्त होईल.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Non ac double decker buses in mumbai last working day psp

First published on: 15-09-2023 at 07:30 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×