मुक्ततेच्या स्वातंत्र्याचं नाणं !

पण जिप्सी ही त्यांच्या मर्जीने भटके होते, हिप्पी हे व्यवस्थेच्या विरोधात टीका करणारे होते तर इथे नोमॅड हे भांडवलशाहीचे बळी आहेत.

nomadland-oscar

-श्रुति गणपत्ये

“सगळ्यात विचित्र गोष्ट अशी आहे की, डॉलर कमावण्यासाठीचा छळ, भांडवली बाजारव्यवस्थेचा जुलूम आपण स्वीकारतो. या जुलमी व्यवस्थेचं जोखड आपण अंगावर घेऊन चालत राहतो. एखाद्या ओझ्याच्या गाढवाप्रमाणे. त्याला कधीतरी मोकळं होता येईल म्हणून तो मरेपर्यंत काम करत राहतो. आपल्यातील अनेकांबरोबर असचं होतं.” भटक्यांचं आयुष्य जगणाऱ्या बॉब वेल्सची हा संवाद म्हणजे ऑस्कर विजेच्या नोमॅडलॅण्डची कथा आहे. चिनी वंशाच्या क्लोई झाओचा हा चित्रपट हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे. ऑस्कर मिळवणारी ही दुसरी महिला दिग्दर्शक असून उत्कृष्ट चित्रपट आणि दिग्दर्शन असे दोन्हीही पुरस्कार तिला मिळाले आहेत हे विशेष कौतुक. जेसिका ब्रूडरच्या “नोमॅडलॅण्डः सर्व्हांविंग अमेरिका इन द ट्वेंटी फर्स्ट सेंच्युरी” या पुस्तकावर आधारित हा चित्रपट आहे.

अमेरिकेमध्ये २००८ साली कोसळलेली भांडवलशाही अर्थव्यवस्था आणि त्याचे जगावर झालेले दूरगामी परिणाम अनेकांनी अनुभवले. साधारण आपल्या करिअरच्या मध्यावर असलेल्या मध्यमवर्गीय अमेरिकन नागरिकांना या अर्थव्यवस्थेचा सगळ्यात मोठा फटका बसला. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आणि इतक्या वर्षाची जीवनशैली, घराचे हफ्ते, मुलांचं शिक्षण, आरोग्य सुविधा त्यांना परवडेनाशा झाल्या. अनेक जण अक्षरशः रस्त्यावर आले, घरं विकली, साठवलेले पैसे संपले. या लोकांची वाताहात झाली. घरात राहणं त्यांना परवड नसल्याने काही जणांनी व्हॅनमध्ये राहणं पसंत केलं. तेच त्यांचं घर बनलं आणि कामाचा शोध घेत संपूर्ण अमेरिकेमध्ये ते फिरू लागले.

जिप्सी, हिप्पी संस्कृतीनंतर ही नोमॅड किंवा भटकी संस्कृती अमेरिकेने जन्माला घातली. पण जिप्सी ही त्यांच्या मर्जीने भटके होते, हिप्पी हे व्यवस्थेच्या विरोधात टीका करणारे होते तर इथे नोमॅड हे भांडवलशाहीचे बळी आहेत. त्यातून मग त्यांची जीवनशैली विकसित होत गेली आणि शहरांमध्ये राहून मान मोडून काम करणं, कर्ज काढून घर घेणं, ते कर्ज चुकवण्यासाठी आयुष्यभर मरत राहणं हा जीवनाचा पर्याय असू शकत नाही. त्याऐवजी कमीत कमी गरजा ठेवून, लागेल तेवढेच पैसे कमावून निसर्गाच्या सानिध्यामध्ये रहायचं, आपल्यासारखे इतर भटके हेच आपलं कुटुंब-नातेवाईक मानायचे असा एक विचार त्यातून पुढे आला. अशा भटक्या समूहाचं नेतृत्व करणारा बॉब वेल्स हा अमेरिकेमध्ये “चीप आरव्ही लिव्हिंग” नावाने हा विचार पुढे नेण्याचं काम करतो. त्याचं यूट्यूब चॅनेल आहे आणि त्याचे अनुकरण करणारेही शेकडो जण आहेत. तो आणि त्याच्यासारख्या खऱ्याखुऱ्या भटक्यांना या चित्रपटामध्ये दाखवलं आहे.

पण गोष्ट मात्र फर्न (फ्रँकेस मॅक्डोर्मंट) हीची आहे. तिच्या उमेदीच्या काळात ती शिक्षक असते. पण नेवदा प्रांतात राहणाऱ्या या फर्नच्या गावातला मोठा कारखाना बंद पडतो आणि गावाची अर्थव्यवस्थाच ठप्प होते. तिची नोकरी जाते, नवराही आजाराने गेलेला असतो. त्या गावातले सर्वच लोक हळूहळू गाव सोडून जातात. ती नोमॅडसारखं जगण्याचा पर्याय निवडते आणि एका व्हॅनमध्ये रोजचं लागणारं किमान सामान घेऊन प्रवासाला निघते. एका ठिकाणी अमेझोनच्या वेअरहाऊसमध्ये तिला मालाचं पॅकिंग करण्याची तात्पुरती नोकरी मिळते आणि काही भटके मित्रही. मग तिथला सीझन संपला की जिथे काम आहे अशा ठिकाणी जायचं, असं या लोकांचं आयुष्य असतं. आयुष्यात घडून गेलेल्या गोष्टींबद्दल दुःख, खंत असते, पण रोजचं आयुष्य नव्याने शोधण्याचा ते प्रयत्न करतात. काही दिवसांनी भेटणारे इतर भटके हे तिचे मित्र-मैत्रिणी होऊन जातात. सामान्य लोकांप्रमाणे जगण्याचा पर्याय तिच्यासमोर दोन वेळा येतो. पण ती नाकारते. अर्थाच हे जगणं इतकं सोपं नसतं. त्यात खूप कष्ट असतात, कोणत्याही प्रकारचं काम करावं लागतं अगदी शौचालय साफ करण्याचंही काम ती स्वीकारते. पण अशा आयुष्याला खरंच अर्थ आहे का आणि त्यात मानवी समाजाची काही मूल्यं जपली जातात का? नक्कीच जातात.

बॉब वेल्सचा “द रबर स्टँप रेंदेवू” म्हणून एक प्रत्यक्ष आयुष्यामध्ये वार्षिक कार्यक्रम असतो. त्यावेळी अनेक भटके एकत्र येतात, गप्पा, जेवण, भेटी-गाठी, आपले अनुभव, एकमेकांना मदत अशी देवाण घेवाण होते. माणसाचं स्वातंत्र्यं जपण हे त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट असते. तेच त्यांचं मूल्यं असतं. चित्रपटातही हा कार्यक्रम दाखवला आहे. तिथूनच फर्नला असं आयुष्य जगण्याची प्रेरणा मिळते आणि तिच्यासारखीच इतर माणसंही.

अमेरिका म्हटलं की तिथली भव्यदिव्यता अनेकांना दिपवून टाकते. तिथल्या सोयी-सुविधा प्रत्येकाला हव्या असतात, चकचकीत इमारती, गाड्या, रस्ते, रोशणाईने माणूस दिपून जातो. डॉलर ड्रीम अनेकांना खुणावतं आणि खूप पैसे मिळवून सुखी आयुष्य घालवण्यासाठी जगभरातून लोक अमेरिकेमध्ये जातात. चित्रपटांमधून, पुस्तकांतून आणि इतर विविध माध्यमांतून अमेरिकन प्रोपगेंडा अशा पद्धतीने काम करतो की अमेरिकेची काळी बाजू कधी फारशी पुढे येतच नाही किंवा येऊ दिली जात नाही. पण अमेरिकन भांडवलशाही इतकी क्रूर आहे की इतिहासामध्ये तिने आधी स्वतःच्या लोकांचं म्हणजे लॅटिन अमेरिकनांचं शोषण केलं आणि मग जगाचं. भटकं आयुष्य भांडवलशाहीविरोधात पर्याय असू शकतो का हे काळ ठरवेल. पण त्याविरोधात आवाज उठवण्याचं काम मात्र ही भटकी जीवनशैली करते आहे.

 

shruti.sg@gmail.com

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Oscar winning movie nomadland review by shruti ganpatye kpw