महाराष्ट्रात कीर्तन या लोककलेला फार मोठी परंपरा आहे. या कीर्तनाचा पाया जरी धार्मिक असला तरी त्याचा उद्देश माणुसकीचा संदेश देण्याचाच असे. गावखेड्यात राहणाऱ्या, शिक्षणाशी संबंध न आलेल्या लोकांपर्यंत देवाधर्माची, संतांची शिकवण पोहोचवून त्यांची नैतिकता, माणुसकी, सामाजिक सौहार्द अन प्रेमभाव जपण्याचं, वाढविण्याचं मोठं काम कीर्तनकारांनी आपल्या रसाळ कीर्तनांनी केलेलं आहे.

अलीकडच्या काळात मात्र गावोगावी कीर्तनकारांचे पेव फुटले. कीर्तन करणे हा व्यवसाय झाला. या व्यवसायात मुबलक पैसा मिळू लागला. आणि मग या पैशासोबत कीर्तनकारांमध्ये स्पर्धा आली, चढाओढ आली. त्या स्पर्धेतील निकोपता लोप पावून ईर्षा आली, एकमेकांना खाली पाडण्यासाठी क्लृप्त्या लढविल्या जाऊ लागल्या. गर्दी जमविण्यासाठी कीर्तनात अश्लील विनोदाचा आणि थिल्लरपणाचा आश्रय घेतला जाऊ लागला. कीर्तनात राजकारण घुसले आणि राजकारणात कीर्तन घुसमटले. देवाधर्माच्या नावावर अमानवी प्रथा-परंपरांची भलामण होऊ लागली. बाल-कीर्तनकारांच्या वक्तृत्वाचे, वयाचे, लोकप्रियतेचे डिंडिम वाजवले जाऊ लागले. पैशाने गब्बर झालेले कीर्तनकार देखील आपण सर्वज्ञ असल्यासारखे माजोरडे वागू लागले. . . .

या सर्व परिस्थतीला एका सुंदर कथेत गुंफून, उत्तम गीत, संगीत आणि अभिनयाच्या साथीने “पाच फुटाचा बच्चन” नावाचा कौस्तुभ देशपांडे या दिग्दर्शकाचा सिनेमा आज रिलीज होत आहे. या सिनेमात किशोर कदम, शशांक शेंडे, चिन्मयी सुमित, पुष्कराज चिरपुटकर, गौरी नलावडे, समीर पाटील असे अनेक नामवंत कलाकार असले आणि त्या सगळ्यांनी आपली कामे उत्तमच केलेली असली तरी हा सिनेमा युवा कीर्तनकाराच्या भूमिकेत पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर येणाऱ्या श्रुती मधुदीप हिचा आहे. श्रुतीने युवा कीर्तनकाराचं, तिच्या आयुष्यातील विविध टप्प्यांवरील बेअरिंग इतक्या प्रभावीरीत्या पकडलं आहे की, हा पाच फुटाचा बच्चन संपूर्ण पडदा व्यापून दशांगुळे उरलेला आहे.

प्रदीप आवटे यांनी लिहिलेली आणि निरंजन पेडगावकर यांनी संगीतबद्ध केलेली या सिनेमातील सर्वच गाणी कथेतील भाव गडद करणारी, कथेला पुढे नेणारी अगदी अ-दर्जा झालेली आहेत.

कीर्तनकारांची शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात कीर्तन या विषयावर आलेला कदाचित हा पहिलाच सिनेमा असावा. अनवट विषयावरील हा सिनेमा सिनेमाच्या जाणकारांना तसेच सामान्य प्रेक्षकांनाही आवडेल असाच आहे. पाच फुटाचा हा लव्हेबल बच्चन ओटीटीवर येण्याची वाट न पाहता थियेटर मध्ये जाऊन मोठ्या पडद्यावरच हा सिनेमा अनुभवण्यात खरी मजा आहे.