– कीर्तिकुमार शिंदे

बाळ केशव ठाकरे नावाच्या व्यंगचित्रकाराने १९६०मध्ये ‘मार्मिक’ हे व्यंगचित्र साप्ताहिक सुरु केलं. हे मनोरंजनाचं साप्ताहिक कधी राजकीय मुखपत्र बनलं, हे त्याच्या संपादकांना आणि वाचकांना कळलंही नाही. ‘मार्मिक’ नावाच्या या साप्ताहिकातूनच १९६६मध्ये शिवसेना नावाच्या संघटनेची- राजकीय पक्षाची स्थापना झाली. बाळ केशव ठाकरे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे झाले.

आपण आधी व्यंगचित्रकार, आणि नंतर एक राजकीय नेता आहोत, असं बाळासाहेब कायम म्हणायचे. ‘मार्मिक’ सुरू होण्याआधीपासून देशात ‘शंकर्स वीकली’ हे व्यंगचित्र साप्ताहिक दिल्लीहून प्रकाशित होत होतं. शंकर हे त्या काळचे खूप गाजलेले व्यंगचित्रकार त्याचे संपादक होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि त्यातून निर्माण झालेला मराठी असंतोष शंकर समजू शकले नाहीत.

दिल्लीधार्जिण्या राजकीय नेत्यांप्रमाणे शंकर यांनीही अनेकदा मराठी माणूस, मराठी मानसिकता यांना न रूचणारी व्यंगचित्रं काढली. सत्तरच्या दशकातल्या मराठी-दाक्षिणात्य वादात शंकर यांनी दाक्षिणात्यांची बाजू त्यांच्या व्यंगचित्रांतून मांडली. १९६६-६८-७० च्या काळात शंकर यांनी काढलेली अशी अनेक व्यंगचित्रं ‘शंकर्स वीकली’मध्ये प्रकाशित झाली होती.

मराठी माणसाच्या बाजूने शंकर यांच्या व्यंगचित्रांना उत्तर देणं गरजेचं आहे, असं एक व्यंगचित्रकार म्हणून बाळासाहेबांना वाटायचं. त्या काळात बाळासाहेबांच्या हातात एकच शस्त्र होतं, ते म्हणजे ‘मार्मिक’. आपल्या ‘मार्मिक’मधून बाळासाहेब शंकर यांच्या व्यंगचित्रांना प्रत्युत्तर द्यायचे, व्यंगचित्रातूनच.

पण असं व्यंगचित्रात्मक प्रत्युत्तर देताना बाळासाहेबांनी कधी शंकर यांच्या व्यंगचित्रांची भ्रष्ट नक्कल केली नाही. आपलं व्यंगचित्र हे स्वतंत्र, ओरिजिनल व्यंगचित्र असेल, याची बाळासाहेबांनी कायम दक्षता घेतली. असं असतानाही आपल्यावर कोणकोणत्या व्यंगचित्रकारांचा प्रभाव आहे, हेसुद्धा बाळासाहेबांनी अनेकदा आवर्जून नोंदवलेलं आहे, हे विशेष.

१९७०च्या दशकातलं व्यंगचित्रकलेचं हे पुराण इथे सांगण्यामागचं कारण आहे, महाराष्ट्र भाजपा (@BJP4Maharashtra) या भारतीय जनता पक्षाच्या ट्विटर हॅंडल तसंच फेसबुक पेजवरून आज प्रसिद्ध करण्यात आलेलं ‘बोलघेवडा पोपट’ हे व्यंगचित्र.

‘राज ठाकरे म्हणजे बोलघेवडा पोपट’

नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान बनल्यापासून त्यांनी एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही, तसंच एकही मुलाखत दिली नाही, म्हणून त्यांच्यावर गेले अनेक महिने टीका होत होती. अखेर परवा पंतप्रधान मोदी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत मोदी अडचणीत येतील, असे कोणतेही प्रश्न विचारले गेले नाहीत. ही मुलाखत फिक्स्ड होती, असा आरोप व टीका देशातील अनेक विचारवंत, पत्रकार तसंच राजकीय नेते-कार्यकर्त्यांनी केली. समाजमनाची नाडी ओळखण्यात निपुण असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या स्वतंत्र शैलीतून काढलेल्या व्यंगचित्राद्वारे या मुलाखतीवर ‘मार्मिक’ भाष्य केलं. नरेंद्र मोदी हेच नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेत आहेत, असं व्यंगचित्र काढून राज ठाकरे यांनी या मुलाखतीतली हवाच काढून टाकली. राज यांनी आपल्या फेसबुक पेजवर आणि ट्विटर हॅंडलवर हे व्यंगचित्र प्रसिद्ध करताच शेकडो लोकांनी ते शेअर केले. त्यानंतर काही मिनिटांतच विविध वृत्तवाहिन्या, न्यूजपोर्टल्स यांवर राज यांनी काढलेल्या व्यंगचित्राच्या बातम्या झाल्या. राज यांनी आपल्या व्यंगचित्राद्वारे एकप्रकारे देशातील मोदीविरोधकांची बाजू भक्कम केली.

‘बोला काय विचारू?’, ‘मोदीमय’ मुलाखतीवर राज ठाकरेंचे फटकारे

राज यांनी व्यंगचित्राद्वारे केलेल्या या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी महाराष्ट्र भाजपाने आज एक व्यंगचित्र प्रसिद्ध केलं. भाजपच्या व्यंगचित्रात राज यांच्याच कल्पनेची भ्रष्ट नक्कल करून राज ठाकरे यांनी घेतलेली शरद पवार यांची मुलाखत फिक्स्ड होती, अशी टीका त्यातून करण्यात आली आहे. कोणत्याही राजकीय नेत्यावर टीका करण्याचा हक्क प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याला, नागरिकाला, कलावंताला आहे, हे गृहीत धरूनही भाजपच्या व्यंगचित्रामुळे काही प्रश्न निर्माण झाले आहेत. हे प्रश्न नैतिकतेशी संबंधित आहेत. सध्याच्या भाजप नेतृत्वाचा आणि नैतिकतेचा लांबलांबचा संबंध नसला तरी आपण ते उपस्थित करून त्यावर चर्चा करायला काही हरकत नसावी.

भाजपने प्रसिद्ध केलेलं ‘बोलघेवडा पोपट’ हे व्यंगचित्र कुणी काढलेलं आहे? त्या व्यंगचित्रावर व्यंगचित्रकाराचं नाव का टाकलेलं नाही? ज्या व्यंगचित्रकाराने हे व्यंगचित्र काढलंय, तो त्या व्यंगचित्रातून व्यक्त होणा-या टीकेशी सहमत नाही का? ज्या व्यंगचित्रकाराने हे व्यंगचित्र काढलं, त्याचं नाव प्रसिद्ध झाल्यास व्यंगचित्राची परिणामकारकता कमी होईल का? सोशल मीडियावरील पेड ट्रोलिंगप्रमाणे भाजपला आता राज ठाकरेंमुळे ‘पेड कार्टूनिंग’पण सुरू करावे लागले का?

… आणि सर्वात महत्वाचा प्रश्न –

आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जाहीर सभांतील त्यांच्या आक्रमक वक्तृत्वाला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजप ‘पेड वक्ता’सुद्धा आणणार का?