– प्रविण शिंदे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महात्मा जोतिबा फुले यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य समाजातील गोरगरीब आणि वंचित घटकांची परिस्थिती सुधारावी यासाठी प्रयत्न केले. त्यांनी हे काम इतकं झोकून देऊन केलं की यात त्यांच्याकडून प्रकृतीकडेही दुर्लक्ष झालं आणि त्यांना पक्षघातामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागला.

या पक्षघातामुळेच त्यांचा लिहिता उजवा हातही निकामी झाला. मात्र, या आजारातून काहिसं बरं वाटल्यावर त्यांनी लगेचच अशिक्षितपणामुळे अडवणूक झालेल्या, शोषण झालेल्या समाजाला दिशा मिळावी म्हणून डाव्या हाताने ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या पुस्तकाचं लेखन केलं. मात्र, हे पुस्तक अर्धे छापून झाले होते तेव्हाच बिघडलेल्या प्रकृतीमुळे जोतिबा फुले यांचा मृत्यू झाला. यानंतर फुले दाम्पत्याने दत्तक घेतलेल्या आणि पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेल्या यशवंतराव या त्यांच्या मुलाने हे पुस्तक १८९१ मध्ये प्रकाशित केलं. या पुस्तकाच्या छपाईचा खर्च जोतिबा फुले यांचे मित्र मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी उचलला होता.

जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या कर्मकांडाची चिकित्सा

जोतिबा फुले यांनी आपल्या ‘सार्वजनिक सत्यधर्म’ या पुस्तकात माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत होणाऱ्या कर्मकांडाची चिकित्सा केली. यात एकूण २८ विषयांवर तपशीलाने मांडणी केली. यातील एक विषय म्हणजे लग्न. याच लग्न प्रकरणात त्यांनी सत्यशोधक विवाहाबाबतची त्यांची भूमिका मांडली. गणपतराव आणि जोतीराव या दोघांमधील संवादाच्या स्वरुपातील या मांडणीत लग्न म्हणजे काय इथंपासून तर लग्न ठरवताना कोणते गूण पाहावेत इथपर्यंत फुलेंनी मांडणी केली.

मुला-मुलीच्या संमतीशिवाय होणाऱ्या लग्नांवर आसूड

महात्मा फुले म्हणतात, “अनेक मुलींचे आई-वडील आपली मुलगी खाऊन-पिऊन सुखी राहील, मजा करेल या आशेने तिची संमती घेतल्याशिवाय तिला श्रीमंताची सून करून देतात. अनेक मुलांचे आई-वडील आपला मुलगा खाऊन-पिऊन सुखी राहील, मजा करेल या आशेने मुलाची संमती घेतल्याशिवाय त्याला राजेरजवाडे यांचा जावई करून देतात. अनेक मुली मुलांच्या वर्तनाचा विचार न करता त्याच्या फक्त शौर्यावर भाळून त्याला आपला पती करतात, तर अनेक मुलं मुलींच्या स्वभावाचा विचार न करता फक्त मुलीच्या देखणेपणावर भाळून तिला पत्नी करतात.”

लग्न कसं करावं? फुले म्हणतात…

प्रचलित लग्नाची पद्धत आणि त्यातील त्रुटी दाखवत महात्मा फुले पुढे म्हणतात, “मुला-मुलींनी लग्न करताना आपल्या आई-वडिलांसह लहान-मोठे नातेवाईक आणि मित्रांचा सल्ला घेऊन स्वतः सारासार विचार करावा आणि मग वधू किंवा वराच्या किंवा सत्यशोधक समाजगृहात मानव पंचासमक्ष प्रतिज्ञा घेऊन लग्न करावं. यामुळे आपल्या निर्मिकास परमानंद होईल.”

लग्नासाठी महात्मा फुले यांनी ५ मंगलाष्टकं उदाहरणादाखल दिली आहेत. त्यातील २ वराची आणि ३ वधुची आहेत. त्यानंतर त्यांनी वर आणि वधुने घ्यायच्या प्रतिज्ञेचाही एक नमुना दिला आहे. तसेच लग्नात वधू-वराने नातेवाईक-मित्रांच्या भेटी घेतल्यानंतर शेवटी आनंदाने कोणत्याही धर्माची किंवा देशाची आवडनिवड न करता सर्व मानवबंधुंमधील पोरक्या मुला-मुलींना आणि अंध-अपंगांना आपल्या शक्तीनुसार दानधर्म करीत आपल्या घरी/गावी जावे असं सांगितलं.

महात्मा फुलेंनी रचलेली ५ मंगलाष्टकं

(वर)

देवाचे नियमाप्रमाणे धरुनी चाले तुझे कूळ गे ||
सत्याने अवध्यांत श्रेष्ठ असशी तसेचही त्वत्सगे ||
अज्ञान्या समदृष्टीने शिकविशी, तू ज्ञान त्या दाविशी ||
प्रीतीने वरितो तुला अजि तुझी ऐकून किर्ती अशी ||
शुभमंगल सावधान ||१||

(वधु)

मानीशी जरी त्वा दिले अनुदिनी, कर्त्या समाधानसे ||
आम्हा सर्व स्त्रिया असे बहु पिडा, हे नेणशी तू कसे ||
स्वातंत्र्यानुभवाची ओळख आम्हा, झाली नसे मानशी ||
यासाठी अधिकार देशील स्त्रिया, घे आण त्याची अशी ||
शुभमंगल सावधान ||२||

(वर)

स्थापाया अधिकार मी झटतसे, या बायकांची सदा ||
खर्चाया न मनी मी भी किमपिही, सर्वस्व माझे कदा ||
मानीतो सकला स्त्रियांस बहिणी, तू एकली मत्प्रिया ||
कर्त्याचे भय मी मनात तुजला, ठेवीन पोसावया ||
शुमंगल सावधान ||३||

(वधु)

बंधुवत्मजला समस्त असती, त्वदिभन्न जे की नर ||
आज्ञाभंग तुझा करिन न कदा, मी सत्य कर्त्यावर ||
ठेवोनी अवघाची भार झटू या, लोकां कराया हिता ||
हाताला धरुनी तुला वरितसे, सर्वांपुढे मी अता ||
शुभमंगल सावधान ||४||

सत्यपाळक स्त्री-पुरुषांचा आशीर्वाद ||
आभारा बहु मानिजे आपुलिया, माता-पित्याचे सदा ||
मित्रांचे तुमच्या, तसेच असती जे इष्ट त्यांचे वदा ||
वृद्धां पंगु सहाय द्या मुलीमुला, विद्या तया शिकवा ||
हर्षे वृष्टी करा फुलांची अवघे, टाळी अता वाजवा ||
शुभमंगल सावधान ||५||

महात्मा फुले यांनी उदाहरणादाखल दिलेली प्रतिज्ञा

वर शपथ

आजपासून मी तुला माझी भार्या कबूल करून, मानव पंचासमक्ष मी अशी प्रतिज्ञा करतो की, आजपासून मी मनी कोणत्याही प्रकारचा कुतर्क न धरून एक क्षणभरदेखील तुझ्याबाहेर जाणार नाही. म्हणून आपल्या सर्वांच्या उत्पन्नकर्त्यासहीत आपल्या कुळस्वामीस स्मरून प्रतिज्ञा करतो.

वधु शपथ

आजपासून मी तुला माझा भ्रतार कबूल करून, मानव पंचासमक्ष मी अशी प्रतिज्ञा करतो की, आजपासून मी मनी कोणत्याही प्रकारचा कुतर्क न धरून एक क्षणभरदेखील तुझ्याबाहेर जाणार नाही. म्हणून आपल्या सर्वांच्या उत्पन्नकर्त्यासहीत आपल्या कुळस्वामीस स्मरून प्रतिज्ञा करते.

समाजातील शोषक आणि विषमतावादी रुढींना अर्थपूर्ण पर्याय

महात्मा फुले यांनी लिहिलेल्या सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाला आणि सत्यशोधक विवाहाच्या संकल्पनेला समजून घेताना त्यांनी त्या काळात समाजावर असलेला देव-धर्माचा प्रभाव आणि त्यातून होणारं शोषण रोखण्यासाठी लोकमनाचा विचार करून मांडणी केली. त्यामुळे देव-धर्माच्या नावावर सर्वसामान्यांचं शोषण होत असतानाही फुलेंनी देव संकल्पनेला निर्मिक या संकल्पनेचा पर्याय देत मांडणी केली. त्यांनी समाजात बदल घडवण्यासाठी समाजाशी फटकून वागणं चालणार नाही हे ओळखलं आणि समाजातील शोषक आणि विषमतावादी रुढींना अधिक अर्थपूर्ण आणि समताधिष्टित पर्याय दिला. हा पर्याय देताना त्यांनी लोकांनी एकत्रित येण्याला, आनंद साजरा करण्याला कोठेही विरोध न करता या एकत्र येण्याला विधायक अर्थ दिला. मानपान, मध्यस्थता आणि लग्नातील लेणदेण नाकारून सहजीवनाला सुरुवात करताना आपल्या प्रेमाच्या लोकांसोबत हा आनंदसोहळा साजरा करावा हा विचार दिला. यात स्त्रियांनाही पुरुषांप्रमाणेच सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे यावर भर दिला.

पुरोहितांशिवाय/मध्यस्थांशिवाय आनंद साजरा करण्याची शिकवण

फुलेंचा सत्यशोधक विवाहामागील विचार आणखी खोलवर समजून घ्यायचा असेल तर त्यांनी लिहिलेले सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट असं लिखाण वाचणं गरजेचं आहे. त्यात त्यांनी सर्वसामान्य नागरिकांचं कर्मकांडाच्या माध्यमातून पुरोहित वर्गाने केलेल्या शोषणाला कडाडून विरोध केला. आयुष्यातील आनंद किंवा दुःखाच्या प्रसंगी पुरोहितांकडून होणारं आर्थिक शोषण सर्वसामान्यांना अधिक वंचित करत आहे असं त्यांनी ठाम सांगितलं. तसेच आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यावर पुरोहितांशिवाय/मध्यस्थांशिवाय आनंद साजरा करण्याची शिकवण दिली. म्हणूनच सत्यशोधक विवाहात ब्राह्मणा/पुरोहिताच्या मध्यस्थीला बाद करून त्यांनी आपल्या जवळच्या लोकांच्या साक्षीने आयुष्याला सुरुवात करण्यास सांगितलं.

फुले पोथीनिष्टतेच्या विरोधातील समाजसुधारक

महात्मा फुले हे स्वतः पोथीनिष्टतेच्या विरोधातील समाजसुधारक होते. त्यामुळे त्यांनी एका विशिष्ट काळाच्या अनुषंगाने केलेली मांडणी पुढे जाऊन एक नवी पोथी तयार व्हावी असं त्यांना अभिप्रेत नव्हतं. म्हणूनच त्यांनी आपल्या काळातील समाजमन ओळखून दिलेल्या पर्यायांना अधिक कालसुसंगत होण्यासाठीचा अवकाशही दिला. त्याचाच भाग म्हणून आजपावेतो सत्यशोधक विवाहाची संकल्पना अधिक विकसित होत गेली. त्यात पुढे स्त्री-पुरुष समानतेला अधिक समाविष्ट करत जातीभेदाच्या गोष्टी नाकारण्यात येत आहेत. तसेच सहजीवनाच्या आधुनिक संकल्पनांना अनुसरून नवे संकल्प, प्रतिज्ञा तयार होत आहेत.

सत्यशोधक विवाहाचा अर्थपूर्ण पर्याय तळागाळात पोहचला पाहिजे

आता देव आणि निर्मिक या संकल्पनांऐवजी ज्यांनी समाजाला अधिक माणुसकीच्या मार्गावर नेलं त्या महापुरुषांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा पर्याय स्विकारण्यात येतोय. त्यामुळेच महात्मा फुले यांना मानणाऱ्या आणि तार्किक विचार करून सत्याचा आग्रह धरणाऱ्या मानवतावादी लोकांनी हा विचार अधिक समृद्ध करत समाजातील तळागाळात पोहचवण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. म्हणूनच हा अर्थपूर्ण पर्याय अधिकाधिक लोकांनी अंगिकारून नवा आदर्श निर्माण करायला हवा.

संपर्क – pravin.shinde@loksatta.com

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pravin shinde write on mahatma phule and his thoughts on satyashodhak vivah marriage pbs
First published on: 11-04-2022 at 13:47 IST