Rabindranath Tagore’s 83rd Death Anniversary: ही गोष्ट १८८२ ची आहे. २२ वर्षांच्या रवींद्र टागोर यांनी सी एफ अँड्रीव यांना लिहिलेल्या पत्रात आपल्या मनातील दुःख बोलून दाखवले होते. त्यांनी पत्रात लिहिले होते, ‘ती माझी राणी होती, ती गेली आणि माझ्या मनातील सौंदर्य आणि स्वातंत्र्याचे दरवाजे बंद झाले आहेत.’ हे शब्द केवळ रवींद्रनाथ टागोर यांच्या वेदनांची अभिव्यक्ती नव्हते; तर त्यांचे झालेले भावनिक नुकसान होते. त्यांच्यातील कवीला आपल्या आवडत्या सखीचे जाणे असह्य होत होते. ती त्यांची प्रेरणा होती, ती त्यांची वहिनी कादंबरी होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कादंबरी ही टागोर कुटुंबातील प्रभावशाली स्त्री होती. तिचा विवाह वयाच्या १० व्या वर्षी रवींद्रनाथ टागोर यांच्या भावाबरोबर झाला होता. कादंबरीच्या स्वभाव वैशिष्ट्यांचे वर्णन टागोर यांनी त्यांच्या My Boyhood Days (Chhelebelai) आत्मचरित्रात केले आहे. ते लिहितात, ‘नववधू घरी आली, तिच्या सावळ्या हातात सोन्याच्या बांगड्या होत्या… मी सुरक्षित अंतरावर तिच्याभोवती प्रदक्षिणा घातली, पण जवळ जायची हिंमत होत नव्हती. सर्वांचेच लक्ष तिच्यावर होते… त्यावेळी मी फक्त एक दुर्लक्षित बालक होतो.

अधिक वाचा: भारतीय संस्कृती: प्रणय देवतांच्या प्रेमकथेचा अन्वयार्थ काय?

टागोर यांच्या आईच्या निधनानंतर कादंबरीकडे रवींद्रनाथ यांची काळजी घेण्याची जबाबदारी आली. बालपणातून तारुण्यात प्रवेश करत असताना, बालपणीचे सवंगडी साहित्यप्रेमी झाले. आणि लवकरच कादंबरी ही टागोर यांच्यासाठी प्रेरणा स्थान ठरली. टागोर १७ वर्षांचे झाल्यावर ते काही काळासाठी इंग्लंडमध्ये होते. त्यावेळीही ते इंग्लडमधून कादंबरीला पत्र लिहीत होते. त्यांच्यातील पत्रव्यवहार प्रकाशित झाला आहे. या पत्रांमुळे टागोर कुटुंबियांना जबर धक्का बसला. त्यांनी रवींद्रनाथ आणि कादंबरी यांच्यातील नाते लैंगिक आणि उत्कट असे मानले. म्हणूनच त्यांनी रवींद्रनाथ यांचा लवकरात लवकर विवाह करण्याचा निर्णय घेतला. ९ डिसेंबर १८८३ रोजी रवींद्रनाथ टागोर यांचा विवाह ११ वर्षांच्या भवतारिणी देवीशी झाला. रवींद्रनाथ भवतारिणी देवींनाच मृणालिनी असे म्हणत. रवींद्रनाथांच्या विवाहानंतर एकाकी पडलेल्या कादंबरीची अवस्था निपुत्रिक, दुर्लक्षित पत्नी अशी झाली. त्यामुळे जबर मानसिक धक्का बसलेल्या कादंबरीने चार महिन्यांनी अतिरिक्त अफूचे सेवन करून जीवन संपविले. त्यानंतर कादंबरी सापडते ती केवळ रवींद्रनाथांच्या पत्रात. रवींद्रनाथ कादंबरीचा उल्लेख बालपणीची सखी असा करतात.

टागोरांची नलिनी

मुंबईतील प्रसिद्ध डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खड यांची कन्या अन्नपूर्णा हीच नलिनी होय. ती अण्णाबाई किंवा अण्णा म्हणूनही ओळखली जाते. वास्तविक नलिनी ही रवींद्रनाथ टागोर यांचं पहिलं प्रेम म्हणून ओळखली जाते. सुरेंद्रनाथ रवींद्रनाथांचे वडील बंधू पहिले भारतीय आयसीएस होते. त्यांची नोकरी मुंबई प्रांतात होती. त्यांनाही मराठीचे आकर्षण होते. त्यांनी तुकाराम महाराजांचे काही अभंग बंगालीत भाषांतर केले. रवींद्रनाथ टागोर हे १८७८ साली प्रथम इंग्लंडला गेले. तत्पूर्वी तिथले शिष्टाचार अंगवळणी पडावे म्हणून सत्येंद्रनाथ यांनी त्यांची सोय तीन महिन्यांसाठी उच्च शिक्षित डॉ. तर्खड यांच्या कुटुंबात केली होती. अन्नपूर्णाचे त्यावेळी वय १९ वर्ष होते तर रवींद्रनाथांचे १७. त्यामुळे लवकरच त्यांच्यात मैत्रीपूर्ण नातं तयार झालं. याविषयीचे वर्णन भानू काळे यांच्या पोर्टफोलिओ या पुस्तकात केले आहे.

अधिक वाचा: Indira Gandhi : एक अधुरी प्रेम कथा… इंदिरा आणि फिरोज

या वास्तव्यादरम्यान रवींद्रनाथ टागोर यांनी नुकत्याच इंग्लंडहून परतलेल्या अन्नपूर्णेकडून इंग्रजी बोलणे शिकले. कृष्णा कृपलानी यांच्या टागोर अ लाईफ (Tagore-A Life) या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे या दोघांमध्ये परस्पर स्नेह निर्माण झाला होता आणि अन्नपूर्णेला टागोरांनी ‘नलिनी’ हे टोपणनाव दिले. दोन महिन्यांनंतर दोघे वेगळे झाले. अन्नपूर्णेने नंतर बडोदा हायस्कूल आणि कॉलेजचे स्कॉटिश उप-प्राचार्य हॅरोल्ड लिटलडेल यांच्याशी लग्न केले आणि एडिनबर्ग येथे स्थायिक झाली. तिथेच तिचे वयाच्या ३३ व्या वर्षी (१८९१) निधन झाले. असे असले तरी तोपर्यंत तिने जी साहित्य निर्मिती केली ती नलिनी याच टोपण नावाने केली होती. विशेष म्हणजे अन्नपूर्णेच्या वडिलांनी अन्नपूर्णा आणि रवींद्रनाथ यांचा विवाह करण्याचाही मानस केला होता. परंतु रवींद्रनाथांचे वडील देबेंद्रनाथ यांनी वयातील फरकामुळे हा प्रस्ताव नाकारला. द मायरिड माईंडेड मॅन या पुस्तकात कृष्ण दत्ता आणि डब्ल्यू. अँड्र्यू रॉबिन्सन लिहितात, ….पुस्तकात अन्नपूर्णा आणि तिचे वडील १८७९ साली कोलकात्यात देबेंद्रनाथांची भेट घेण्यास गेल्याचा उल्लेख आहे. परंतु तेथे नेमके काय झाले हे आजही गुपित आहे. परंतु या नात्याचा काळ अल्पावधी असला तरी रवींद्रनाथ हे अन्नपूर्णेला कधीच विसरू शकले नाही.

मृणालिनी

कादंबरीच्या निधनावर शोक व्यक्त करणाऱ्या कवीची कर्तव्यदक्ष पत्नी म्हणून मृणालिनी टागोरांच्या जीवनाचा केंद्रबिंदू बनली. त्याची खरी सोबती होण्यासाठी तिने केवळ तिची कर्तव्ये पार पाडली नाहीत तर तिचे साहित्याचे ज्ञान वाढवले ​​आणि अनेक भाषा शिकल्या.
रवींद्रनाथ टागोर यांनी प्रवास करताना तिला अनेक पत्रे लिहिली. पण त्यांची प्रेमकथाही अल्पायुषी ठरली कारण मृणालिनी २९ व्या वर्षी मरण पावली. तिच्या स्मरणार्थ टागोरांनी स्मरण नावाचा २७ कवितांचा खंड प्रकाशित केला.

व्हिक्टोरिया ओकॅम्पो

टागोर यांचे ६३ वर्षीय विधवा व्हिक्टोरिया ओकॅम्पो यांच्याशी स्नेहपूर्ण संबंध असल्याचे सांगितले जाते. कवी, त्याच्या वृद्धपकाळात, ओकॅम्पो यांच्याबरोबर ब्यूनस आयर्सच्या बाहेर असलेल्या एका वेगळ्या व्हिलामध्ये राहत होते.रवींद्रनाथ टागोर यांची तब्येत ढासळल्याने ओकॅम्पो यांनी त्यांची काळजी घेतली. टागोरांनी काही उत्तम कविता लिहिल्या होत्या ज्या ओकॅम्पो यांना त्यांनी समर्पित केल्या. टागोरांबद्दलच्या त्यांच्या भावनांचे वर्णन करताना ओकॅम्पो यांनी amour de tendresse अशी उपमा दिली होती. परंतु हे नाते गुंतागुंतीचे होते.

एकुणातच रवींद्रनाथ टागोर यांच्या जीवनात ज्या स्त्रियांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्याच स्त्रियांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप त्यांच्या साहित्य निर्मितीतही झाल्याचे दिसून येते.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rabindranath tagore death anniversary when rabindranath tagore fell in love with a marathi girl short lived love stories in tagores life svs
Show comments