डॉ. नीरज देव
Swatantryaveer Savarkar Mental Power Secrets: Explore the deep psychological roots of Savarkar’s resilience against British torture: इतिहास म्हणजे केवळ घटनांचे संकलन नसून प्रतिकूल परिस्थितीवर मानवी चेतनेने मिळवलेला विजय असतो. विनायक दामोदर सावरकरांची जीवनगाथा अशाच एका अदम्य आत्मबलाचा जिवंत पुरावा आहे. जेव्हा त्यांचे सर्वस्व असलेली भारतमाता पराधीनतेच्या बेड्यांत जखडली गेली होती, तेव्हा भारतमातेच्या त्या विराट दुःखाला हसत हसत स्वीकारून ते विक्राळ काळाशी दोन हात करण्यासाठी उभे ठाकले. सातही समुद्रांवर सत्ता गाजवणाऱ्या ब्रिटिश साम्राज्यालाच त्यांनी थेट आव्हान दिले.
अशुभाकांक्षेपासून दिव्य संकल्पापर्यंत
नाशिक असो वा लंडन, मार्सेल्स असो वा अंदमान — जीवनातील प्रत्येक कठीण वळणावर सावरकरांच्या अंतर्मनातील ‘अशुभाकांक्षा’ (विनाश व अंधःकाराची पूर्वकल्पना-पूर्वसिध्दता) एका दिव्य संकल्पात परिवर्तित होत गेली. सावरकरांचे आत्मबल ही केवळ सामान्य मानसिक कणखरता नव्हती; तर ते एक अभूतपूर्व मानसशास्त्रीय रूपांतरण होते, ज्याने अखेरीस पराधीन भारतमातेला मुक्त करण्याची भक्कम पायाभरणी केली. परिणामी त्यांची जीवनयात्रा ‘कालजयी’ आणि ‘मृत्युंजय’ ठरली. हा केवळ राजकीय संघर्ष नव्हता, तर संपूर्ण भारताच्या अंधःकार आणि वेदनेवर मात करून अमरत्व प्राप्त करणाऱ्या एका अद्वितीय मानसिकतेची अखंड यात्रा होती. जरी ते स्वतः अज्ञेयवादी (Agnostic) होते, तरी त्यांची ही यात्रा तिच्या तात्त्विक प्रखरतेमुळे चेतनेच्या सर्वोच्च आध्यात्मिक अवस्थेशी स्पर्धा करणारी ठरली.
विलक्षण धैर्य
पन्नास वर्षांच्या काळ्या पाण्याच्या भीषण शिक्षेनंतरही सावरकर डगमगले नाहीत. उलट त्यांनी तत्कालीन व्यवस्थेलाच प्रतिप्रश्न केला — “पन्नास वर्षे? इंग्रजांचे राज्य तरी येथे टिकेल काय?” अंदमानची ती भयाण काळकोठडी, तो भयंकर एकांत, ते अमानुष छळ आणि ते पशुवत अत्याचार — हे सर्व त्यांनी कोणत्या अंतःशक्तीच्या जोरावर सहन केले असतील? इतके विलक्षण धैर्य आणि संयम त्यांच्यात कुठून आला असेल? आणि हे कसे घडले असेल? असे प्रश्न कोणत्याही संवेदनशील आणि चिंतनशील व्यक्तीच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक आहे.
आत्मबलाची व्याख्या
या अलौकिक मानसिक शक्तीलाच आपण सामान्यतः ‘आत्मबल’ असे म्हणतो. मार्सेल्स येथील त्या ऐतिहासिक आणि जगप्रसिद्ध उडी नंतर वीर सावरकरांनी जी कालजयी कविता लिहिली, तिचे शीर्षकही ‘आत्मबल’ असेच होते. या आत्मबलाची सैद्धांतिक व्याख्या करायची झाल्यास असे म्हणता येईल — “अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या ध्येयाशी अढळ राहून, लक्ष्याकडे नेणारा मार्ग शोधून काढणे म्हणजेच आत्मबल होय.”
आत्मबलाच्या निर्मितीत व्यक्तीची स्व-प्रतिमा, जीवनाचे ध्येय, स्वतःच्या क्षमता व मर्यादांची अचूक जाणीव, सद्सद्विवेकबुद्धी आणि विचार-सिद्धांतांचा दृढ पाया — या सर्वांचा मोठा वाटा असतो. अर्थातच त्यात जीवनातील अनुभवांचे योगदानही अत्यंत महत्वपूर्ण असते.

परा-अहम् (Super-Ego) प्रधान स्व-प्रतिमा
सिग्मंड फ्रॉईडने व्यक्तिमत्त्वाची त्रिमितीय रचना मांडली आहे. त्यानुसार व्यक्तिमत्त्वाची पहिली मिती ‘इद’ (Id) असून ती वासनामय आणि प्रवृत्तिप्रधान असते; तर तिसरी मिती ‘परा-अहम’ (Super-Ego) असून ती नैतिक मूल्ये, सामाजिक संकेत आणि आदर्शांनी व्यापलेली असते. त्यामुळे या दोन घटकांमध्ये सतत संघर्ष निर्माण होत असतो. या संघर्षाचे संतुलन राखण्याचे कार्य ‘अहम’ (Ego) करत असतो, असे फ्रॉईडचे प्रतिपादन आहे.
गांधीजीच्या आत्मकथेत ‘इद’ आणि ‘परा-अहम’ यांतील संघर्ष वारंवार स्पष्टपणे दिसून येतो. मात्र सावरकरांबाबत तसे आढळत नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची स्व-प्रतिमा ही प्रामुख्याने ‘परा-अहम’ प्रधान असल्याचे दिसते. परिणामी त्यांच्या जीवनात ‘इद’ आणि ‘परा-अहम’ यांतील अंतर्गत संघर्ष फारसा जाणवत नाही; उलट ‘अहम’ आणि ‘परा-अहम’ यांचे परस्पर साधर्म्य आणि सुसंवाद दिसून येतो. ही बाब मानसशास्त्रीयदृष्ट्या दुर्मिळ मानावी लागेल.
सावरकरांच्या आत्मबलाचे रहस्य बालपणातच दडलेले
फ्रॉईड तसेच इतर मानसशास्त्रज्ञांच्या मते, बालपणीचे अनुभव व्यक्तीच्या संपूर्ण जीवनावर खोलवर परिणाम घडवतात. त्यामुळे सावरकरांच्या आत्मबलाचे रहस्य त्यांच्या बालपणातच दडलेले असावे, असे वाटते. लहानपणापासूनच त्यांच्या मनात स्वतःविषयी एक अत्यंत प्रभावी आणि ठाम स्व-प्रतिमा निर्माण झाली होती. त्यांची धारणा अशी होती की — “माझे विचार प्रवाहाविरुद्ध असले तरी मी माझ्या वक्तृत्वाने लोकांना ते मान्य करायला भाग पाडू शकतो. मी जसे बोलतो तसेच आचरणही केले पाहिजे, म्हणजे इतरांनाही प्रेरणा मिळेल. मी बोलावे आणि लोकांनी त्याचे अनुसरण करावे. मी एखाद्या महान कार्यासाठीच जन्मलो आहे.” या विचारांतून त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि ध्येयनिष्ठा प्रकर्षाने दिसून येतात.
त्यांच्या या स्व-प्रतिमेला त्यांचे वडील (अण्णा), थोरले बंधू क्रांतिवीर बाबाराव सावरकर आणि मित्रपरिवाराकडून सातत्याने प्रोत्साहन मिळत गेले. बाबारावांचे तर स्पष्ट मत होते की, “आपला तात्या हा अवतारी पुरुष असून तो एखाद्या दैवी कार्यासाठीच जन्माला आला आहे.” त्यांच्या अनेक मित्रांना, तसेच वयाने मोठ्या शुभचिंतकांनाही, त्यांच्याविषयी आदरयुक्त श्रद्धा होती. सावरकरांचे पुढील विधान त्यांच्या या स्व-प्रतिमेचेच द्योतक मानावे लागेल – “माझी मैत्री म्हटली की तिचा कटाक्ष माझ्या मतांचा प्रचार हाच… माझा मित्र म्हटला की स्वदेशी वस्तू वापरणारा, स्वदेशाभिमानात रंगलेला, स्वातंत्र्याची निदान मानसिक तळमळ तरी लागलेला असावयाचा.”(माझ्या आठवणी – नाशिक, पृ. १५४)
त्यांच्या स्व-प्रतिमेचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे संकटांना धैर्याने सामोरे जाण्याची वृत्ती. अत्यंत कठीण प्रसंगांमध्येही लोकांनी आपल्या साहसाचे कौतुक करावे, अशी त्यांची धारणा होती. थोरल्या भावाला जन्मठेपेची शिक्षा झालेली, धाकटा भाऊ अटकेत असलेला, घरदार उद्ध्वस्त झालेले आणि संपूर्ण कुटुंब निर्वंशतेच्या उंबरठ्यावर उभे राहिलेले असताना, हा अवघा २६ वर्षीय तरुण आपल्या शोकमग्न वहिनींना लिहितो —
“अनेक पूर्वज ऋषिश्वर। अजात वंशजांचे संभार ।
साधु साधु गर्जतील । ऐसे वर्तणे ह्या काला ।।”
आशय असा की — “देशाच्या पारतंत्र्याच्या या कठीण काळात आपले वर्तन आणि राष्ट्रनिष्ठा अशी तेजस्वी असली पाहिजे की इतिहासातील ऋषिमुनींनाही विस्मय वाटावा; तसेच आपल्या तपस्वी पूर्वजांनी आणि भावी पिढ्यांनी अभिमानाने ‘धन्य! धन्य!’ असे उद्गार काढावेत.”
सावरकर आणि गांधीजी
प्रस्तुत विवेचनाच्या आरंभी नमूद केल्याप्रमाणे, सावरकरांची स्व-प्रतिमा ‘परा-अहम’ प्रधान असल्याने अंदमानच्या सेल्युलर तुरुंगातील अमानुष आणि कठोर कारावासातही त्यांच्या मनात शारीरिक किंवा लैंगिक वासनांमुळे उद्भवणारे मानसिक विचलन दिसून येत नाही. याउलट, गांधीजीच्या आत्मचरित्रात सामान्य परिस्थितीतही अशा प्रकारच्या अंतर्गत संघर्षांचे उल्लेख ठायीठायी आढळतात.
स्वभावातील तथाकथित ‘अपशकुनी झुकाव’
त्यांच्या प्रचंड आत्मबलामागील आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे, त्यांच्या स्वभावाचा त्यांना स्वतःलाही विक्षिप्त वाटणारा ‘अपशकुनी कल’ होय. जो पुढे चालून त्यांच्या सदैव प्रतिकूल परिस्थितीशी झगडणे नशिबी आलेल्या जीवनासाठी विलक्षण संजीवनी ठरला. ज्यात ‘आपल्याला व्यक्तिगत अपयश येणार’चे गृहीतक मांडून कामाला आरंभ असायचा. जो वरवर जरी नकारात्मक नि विक्षिप्त वाटत असला तरी प्रत्यक्षात मात्र तो ‘उचित नकारात्मकता’ (Appropriate Negative) आणि ‘उचित सकारात्मकता’ (Appropriate Positive) यांचे परस्परपूरक मिश्रण होते. ज्यात स्वतःच्या क्षमता आणि मर्यादांची अचूक जाणीव असते. या स्वभावाची मुळे त्यांच्या बालपणीच्या महामारीतील भीषण अनुभवांत होती.
सुखी कुटुंब उघड्यावर…
सन १८९९ मध्ये, ते सोळा वर्षांचे असताना, त्यांच्या भगूर (जि. नाशिक) गावात प्लेगची भीषण साथ पसरली होती. त्या काळात या रोगावर अचूक उपचार नव्हतेच; शिवाय रोगाचा नुसता उल्लेखसुद्धा संकटाला आमंत्रण देणारा ठरत असे. प्रशासनाला कुणी आजारी असल्याचे कळताच इंग्रज पोलीस घरावर धाड टाकत. घरातील लोकांना जबरदस्ती बाहेर हाकलले जाई, सामान फेकले जाई, घराची छप्परे फोडली जात. क्षणार्धात एक सुखी कुटुंब उघड्यावर येत असे. दुसरीकडे, भीतीपोटी जर कोणी आजार लपवला, तर तो मनुष्य काही दिवसांत मृत्युमुखी पडत असे. मृत्यूचे कारण तपासल्याशिवाय इंग्रज सैनिक त्याला प्लेगने मृत घोषित करत आणि कुटुंबाला घराबाहेर काढत.
मृत व्यक्तीच्या शोकासाठीही वेळ मिळत नसे; घर क्षणात स्मशानात परिवर्तित होत असे. सावरकरांच्या शेजारी राहणारा एक व्यक्ती अशाच तापाने मरण पावली. त्याचा मरण-कण्ह विनायकाने रात्रभर जिन्यात बसून ऐकला होता. त्याला मित्र राणू शिंपीचे कुटुंब आठवले — पंचवीस जणांचे कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त झाले होते. त्याची आई प्लेगग्रस्त झाली होती; इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून तिला झाडाला बांधून ठेवले गेले आणि अखेरीस मुंग्या लागून तडफडत तिचा मृत्यू झाला. इतक्या लहान वयात विनायकाने मृत्यूचे असे विक्राळ तांडव पाहिले. त्याच्या शब्दांत — ‘‘कोणीं सांगावें निश्चिति अशी मरणाची काय ती. जीवनाची निश्चिति अशी क्षणाचीही वाटेना.’’ (माझ्या आठवणी भगूर १०२)
अशुभ शक्यतांचे ‘संभाव्य वास्तव’
या भीषण वातावरणात विनायकांच्या मनात विचारांचे वादळ उठले — “ही साथ आपल्या घरात आली तर? आपला मोठा भाऊ गेला तर अण्णा किती शोक करतील ! पण अण्णाच गेले तर? पोलीस आपल्याला घराबाहेर काढतील. मग मी काय करीन? आणि मीच मेलो तर…?” अशा प्रकारचे विचार आपल्याही मनात येतात; पण आपण त्यांना ‘अपशकून’ म्हणून झटकून टाकतो. सावरकरांचे वैशिष्ट्य असे की ते या अशुभ शक्यतांना ‘संभाव्य वास्तव’ मानून त्याविरुद्ध आधीच मानसिक तयारी आणि योजना करू लागतात.
दुर्दैवाने त्या रात्रीची त्यांची भीती खरी ठरली. अण्णांना प्लेग झाला. आईचे निधन आधीच झाले होते; त्यामुळे अण्णाच त्यांच्यासाठी आई-वडील दोन्ही होते. मोठा भाऊही त्या वेळी उपस्थित नव्हता. तरीही अवघ्या सोळा वर्षांच्या विनायकाने धैर्याने वडिलांची सेवा सुरू ठेवली. इतक्यात लहान भाऊ नारायणलाही तापाने ग्रासले. वरच्या खोलीत मृत्यूशी झुंजणारे वडील आणि खालच्या खोलीत तडफडणारा भाऊ — या दोघांच्या मध्ये विनायक एकटाच उभा होता. दरम्यान अण्णांचा मानसिक तोल गेला आणि ते पाण्यासाठी आर्त हाक मारू लागले. विनायकाने कुठेतरी वाचले होते की प्लेगच्या रुग्णाला पाणी देऊ नये. शेवटी मन कठोर करून त्यांनी अण्णांना खोलीत बंद केले आणि स्वतः पायऱ्यांवर बसले. आतून अण्णा ओरडत होते — “पाणी, तात्या पाणी!’’ (माझ्या आठवणी भगूर ९९)
‘पाणी मागणाऱ्याला कधीही नकार देऊ नये.’अशा संस्कारांत वाढलेल्या त्या कोवळ्या मुलाची मानसिक अवस्था काय झाली असेल? याची कल्पनाही अस्वस्थ करून टाकते. दुर्दैवाने चार दिवसांत अण्णांचे निधन झाले. नंतर सावरकरांनी लिहिले —“अण्णांच्या त्या अत्यंत आतुर किंकाळ्या ‘तात्या ! बाळ! अरे कोणी या!’ या मला अजून ऐकूं येतात आणि ओ देऊन असेंच आत्ता त्यांना तडक जाऊन भेटावें असें वाटतें!’’ (माझ्या आठवणी – भगूर ९९)
हा प्रसंग त्यांच्या संवेदनशील मनावर किती खोलवर कोरला गेला होता, याचे हे जिवंत उदाहरण आहे. मृत्यूला इतक्या जवळून पाहिल्यामुळे त्यांच्या मनातील मृत्यूची भीती कायमची नाहीशी झाली; आणि स्वातंत्र्याच्या ध्येयाबद्दलची त्यांची निष्ठा अधिक दृढ झाली. याच अनुभवांमुळे त्यांच्या स्वभावातील ती अनोखी प्रवृत्ती निर्माण झाली. ते स्वतः लिहितात — ‘‘माझ्या स्वभावाचा तेव्हांपासूनच जो एक अशुभाकांक्षी दूरदर्शीपणाचा विक्षिप्त आणि अपशकुनी कल असे, पण जो अशुभाशींच संतत झगडत रहाणे दैवी आलेल्या माझ्या आयुष्यास आजवर फारच उपयोगी पडला’’ (माझ्या आठवणी भगूर ९४)
प्रतिकूलतेची अपेक्षा
या ‘अपशकुनी कलचा’ अर्थ असा — जीवनातील सर्वांत प्रतिकूल शक्यता आधीच गृहित धरणे. वरवर पाहता हे नकारात्मक वाटू शकते. पण प्रत्यक्षात हा दृष्टिकोन वास्तववादी होता. आपल्या हाताबाहेरच्या गोष्टी प्रतिकूलच ठरू शकतात, ही जाणीव म्हणजे वास्तवाची जाणीव होय. उलट परिस्थिती कायम अनुकूल राहील असे गृहित धरल्यास आणि प्रत्यक्षात उलटे ठरल्यास मनुष्य पूर्णपणे खचून जातो. तसेच त्या बाबी विवशतेने स्वीकारल्यास दडपलेल्या भावना पुढे आक्रोश किंवा दमनकारी वृत्ती बनू शकतात. सावरकर हे सर्व मानसशास्त्रीय आणि व्यावहारिक पैलू वास्तव म्हणून स्वीकारत. परीणामी संकट आले तरी त्यांना मानसिक धक्का कमी बसे आणि परिस्थितीला सामोरे जाणे सोपे होत असे.
जर त्यांनी ‘अयोग्य सकारात्मकता’ (Inappropriate Positive) स्वीकारली असती — म्हणजे अण्णा वाचतील, हेग न्यायालय त्यांच्याच बाजूने निर्णय देईल किंवा काळ्या पाण्याची शिक्षा होणार नाही — तर प्रत्यक्ष वास्तव उलटे ठरताच ते पूर्णपणे तुटून पडले असते. परीणामी विविध संकटांना ज्या धीराने त्यांनी तोंड दिले तसे देऊ शकले नसते.
अशुभाकांक्षा आणि अथक प्रयत्न यांचा संगम
अपयशाची पूर्ण शक्यता स्वीकारूनही सावरकर कधी निष्क्रिय बसले नाहीत. उलट त्यांनी संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. हेच त्यांच्या ‘उचित सकारात्मकतेचे’ उदाहरण आहे. लंडनमध्ये अटक झाल्यावर त्यांनी आजन्म कारावासाची शक्यता गृहित धरली होती. कारावासात महाकाव्य लिहिण्याचाही संकल्प केला होता. पण संधी मिळताच त्यांनी मार्सेल्स येथे जहाजातून उडी मारून पलायनाचा ऐतिहासिक प्रयत्न केला, आणि प्रकरणाला आंतरराष्ट्रीय वळण दिले.
नैराश्यावर आत्मबलाचा विजय
नुसती कल्पना करा; मार्सेल्सवर पकडले गेल्यावर सावरकरांची मानसिक अवस्था काय झाली असेल. लंडनच्या कारावासापासून; मार्सेल्स येथून मुक्तीचे स्वप्न नि आशा त्यांनी बाळगल्या असतील, पण मुक्तीची ती ती सारी स्वप्ने नि सा-या आशा मार्सेल्सला पकडले जाताच क्षणात चकनाचूर झाल्या. उलट आता गळ्यात फास पडणार याची निश्चिती वाटू लागली ! मरणापर्यंतचा बंदीवास, घोर हताशता, तीव्र निराशा दाटून आली असेल. या जागी कोणीही सामान्य वा असामान्य मनुष्य असता तर साफ कोलमडून पडला असता. पण सावरकरांनी त्या भीषण निराशेतही स्वतःला सावरले आणि ‘आत्मबल’ ही प्रसिद्ध कविता रचली.
यमदूतांनाही जीवनपाठ
पुन्हा पकडल्यावर इंग्रज पोलीस त्यांच्यावर धावून आले. तेव्हा सावरकर निर्भयपणे म्हणाले — “मी देशासाठी मरायलाच निघालो आहे. आज मेलो तरी पर्वा नाही. पण तुम्ही पोटासाठी नोकरी करता आहात. माझ्यावर हात उचललात तर मीही शांत बसणार नाही; मरता मरता तुमच्यापैकी एकाला तरी घेऊन जाईन. आपल्या कुटुंबाचा विचार करा!” या गर्जनेने पोलीस हादरले.
कर्तव्यबुद्धी आणि स्थितप्रज्ञता
काही क्षणांनी त्यांनी त्याच पोलिसांना शांत करत म्हटले — “पळून जाण्याचा प्रयत्न करणे माझे कर्तव्य होते आणि मला पकडणे तुमचे. आपण दोघांनीही आपापले कर्तव्य केले. मग दुःख कसले?”
मृत्यूच्या उंबरठ्यावर उभा असलेला मनुष्य स्वतःला पकडणाऱ्यांनाच धीर देत होता — ही मानसिक स्थिरता किती विलक्षण होती! त्यांनी मनोमन स्वीकारले होते —“आता इंग्रज मला फाशीच देतील.”
लहानपणापासूनच ते मृत्यूला सामोरे जाण्याची मानसिक तयारी करत होते. ‘मित्रमेळा’तील तरुणांना त्यांनी विचारले होते — “फार दिवस जगून पक्वकाली जें देशहित साधावयाचें तें हें लक्षावधि म्हातारेकोतारे, बायाबापड्या जगून साधतच आहेत. आतां अकालीं मरणांराचेच मारक मरण काय साधतें तें पहावयाचें उरलें आहे. फाशीवर अकालीं मरतात आणि या प्लेगांत, या दुष्काळात, या महामारींत?’’ (माझ्या आठवणी नाशिक पृ १६५)
…तर जन्मठेप अर्धविराम
फाशीसाठी मनाची सिध्दता करुन ठेवल्यानेच ‘हेगच्या आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय तुमच्या विरुध्द गेला असून आता तुम्हास पन्नास वर्षे जन्मठेपेची शिक्षा भोगावी लागणार आहे.’ हे सांगणा-या त्या अधिका-यास सावरकरांच्या धैर्याचे कौतूक वाटले. तेव्हा त्यास सावरकर म्हणाले , ‘‘ही किंवा असल्या बातम्या मलाही भयंकर वाटत नाहीत असे थोडेच आहे; परंतु प्रथमच समजून उमजून या संकटास तोंड देण्याचा आम्ही निर्धार केला असल्याने मन एका प्रकारे निर्ढावून गेल्यासारखे झाले आहे. आपणही माझ्या स्थितीत असता तर हेच धैर्य याच विवेकाच्या बळाने आपणही धरु शकता.’’ (माझी जन्मठेप पृ०१) यातील विवेक म्हणजे फाशी होईल हे अत्यंत प्रतिकूल गृहीतक त्यांनी गृहीत धरल्याने पन्नास वर्षांच्या दुहेरी जन्मठेपेची शिक्षा त्यांना इतकी भयानक वाटली नाही. कारण मृत्यू हा पूर्णविराम होता तर जन्मठेप अर्धविराम!
विशाल जीवनध्येय
विक्टर फ्रँकल यांना नाझींनी छळछावणीत डांबले होते. त्यांचे संपूर्ण कुटुंब गॅस चेंबरमध्ये मारले गेले. तरीही ते जिवंत राहिले. त्यांनी शोधले की, ज्याच्या जीवनाला स्वतःच्या अस्तित्वापेक्षाही मोठे ध्येय असते, तो कोणत्याही भीषण परिस्थितीत टिकतो. याच अनुभवांवर त्यांनी Man’s Search for Meaning हे पुस्तक लिहिले. सावरकरांचे ध्येय तर याहूनही व्यापक होते. त्यांच्या मते भारताची गुलामी हाच सर्वांत मोठा कारावास होता. ते म्हणत — “मला मिळालेली काळ्या पाण्याची शिक्षा ही भारतमातेच्या गुलामगिरीरूपी महाकाळ्या पाण्याचा फक्त एक अध्याय आहे.” त्यांना खात्री होती की जशी त्यांची शिक्षा संपली तशीच भारताची गुलामीही संपेल.
सद्सद्विवेकाचा उपयोग
सद्सद्विवेक म्हणजे बुद्धीच्या साहाय्याने नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवणे. अंदमानातील अमानुष छळामुळे अनेक कैदी आत्महत्या करत. सावरकरांच्या मनातही तसे विचार कधी कधी येत; पण ते स्वतःला समजावत — “अरे वेड्या! तुला फाशी देणे हेच इंग्रजांचे ध्येय होते. ते जमले नाही म्हणून त्यांनी ही शिक्षा दिली. आता तू स्वतःच स्वतः होऊन मेलास तर इंग्रजांचीच इच्छा पूर्ण करण्यासारखे होईल.”
आज डिप्रेशनच्या उपचारात वापरल्या जाणाऱ्या CBT आणि REBT सारख्या मानसोपचार पद्धती विवेकाधारित विचारांवर भर देतात. त्यांना सद्सदविवेक असे मानसशास्त्रज्ञ संबोधतात. आश्चर्य म्हणजे या आधुनिक मानसोपचार पद्धती विकसित होण्याच्या कित्येक दशकांपूर्वी सावरकरांनी स्वतःच्या बुद्धीच्या साहाय्याने त्यांचा उपयोग केला होता, आणि त्यांनी वापरलेले नाव ही ‘सद्सदविवेक’ हेच होते.
समदृष्टी – समत्वभाव
तत्त्वज्ञानाचा अभ्यास, योगाभ्यास आणि बालपणीचे अनुभव यांमुळे त्यांच्यात विलक्षण समदृष्टी निर्माण झाली होती. जहाजातील घाणीजवळ झोपणे असो किंवा जेलरसमोर नग्न होऊन अंघोळ करण्याची सक्ती असो — प्रत्येक ठिकाणी हा समत्वभाव त्यांना आधार देत असे.
कोल्हू ओढताना किंवा नारळाच्या साली कुटताना त्यांना कधीतरी वाटे — ‘राष्ट्रनिर्मिती करणारी माझी बुद्धी या काथ्याकूटच्या क्षुल्लक कामात वाया जाते आहे.’ पण लगेच त्यांची समदृष्टी सांगत असे — ‘हे काम मी राष्ट्रासाठीच करतो आहे. आणि मोठमोठ्या वैचारिक चर्चा ह्याही एका प्रकारचा वैचारिक काथ्याकूटच आहेत.’ या समत्वदृष्टीमुळेच त्यांनी अंदमानातील अमानुष छळ सहन केला.
त्याचबरोबर ते सतत कार्यरत राहिले. त्यांनी तुरुंगाच्या भिंतींवर कविता लिहिल्या, कैद्यांचे प्रबोधन केले, साक्षरता मोहीम राबविली, मतांतरित हिंदूंचे शुद्धीकरण केले, अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य केले. ही सततची व्यग्रता त्यांच्या कारावासाला सुसह्य बनवत गेली. वरील सर्व मानसशास्त्रीय आणि तात्त्विक पैलूंनीच सावरकरांच्या अदम्य आत्मबलाची निर्मिती केली. याच अनोख्या मानसिक संतुलनामुळे त्यांनी काळ्या पाण्याच्या भीषण शिक्षेलाही पूर्णपणे तोंड दिले आणि मृत्यूवर विजय मिळवून खऱ्या अर्थाने ‘मृत्युंजय’ ठरले.
(लेखक मनोचिकित्सक, पीएच.डी. समकक्ष ‘दशग्रंथी सावरकर’ उपाधीप्राप्त व विवेक व्यासपीठ अन् महाराष्ट्र शासनाच्या ‘स्वा. सावरकर वीरता पुरस्कार’ने सन्मानित.)
