अरुणांश बी गोस्वामी, सिंधिया संशोधन केंद्र
Shinde Royal Family Maharashtra history and Scindia dynasty contribution to Maratha Empire: मराठा साम्राज्याचे आधारस्तंभ आणि उत्तर भारतावर भगवा फडकवणारे ग्वाल्हेरचे शिंदे राजघराणे (Scindia Dynasty) यांचा महाराष्ट्राच्या मातीशी असलेला संबंध अत्यंत खोलवर आहे. केवळ युद्धभूमीवरच नव्हे, तर समाजकारण आणि शिक्षण क्षेत्रातही या घराण्याने दिलेल्या योगदानाची गाथा थक्क करणारी आहे.
मराठा राज्याचा महत्त्वाचा भाग
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या मराठा राज्याचे संरक्षक म्हणून ग्वाल्हेरचे शिंदे राजघराणे उदयास आले. या राजघराण्याने अठाराव्या शतकातील भारताचा बहुतांश भाग आणि दिल्लीची राजसत्ता नियंत्रणात ठेवली होती. भारतातील संस्थानांचे यशस्वी विलीनीकरण घडवून आणणारे तत्कालीन केंद्रिय गृहमंत्री सरदार पटेल यांचे निकटवर्तीय व्ही. पी. मेनन यांनी या राजघराण्यासंदर्भात म्हटले होते की, ग्वाल्हेर हे सर्वांत प्रमुख मराठा राज्य होते.
उत्तर भारतावर वर्चस्व
राणोजीराव महाराज शिंदेनी हे राज्य स्थापन केले, परंतु महाराज महादजी शिंदे यांच्या काळात राजघराणे कीर्तीच्या शिखरावर पोहोचले. महादजी शिंदेनी मुघल बादशाह शाहआलम द्वितीय याला कैद करून उत्तर भारतावर मराठा वर्चस्व स्थापन केले. श्रीमंत दत्ताजी राव शिंदे महाराष्ट्रातील शूरवीर म्हणून ओळखले जातात. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी दत्ताजीराव शिंदेंबद्दल लिहिले आहे: ” दत्ताजी शहिद झाले. जगभरातील कोणत्याही सैनिकाने राष्ट्रध्वजाचे रक्षण यापेक्षा अधिक निष्ठेने किंवा शौर्याने केलेले नसेल.”

पहिले इंग्रज- मराठा युद्ध
नोव्हेंबर १७७८ मध्ये कर्नल एगर्टनच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सेना पुण्याकडे आली. महादजी शिंदेंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी गनिमी काव्याने लढून, त्यांच्या रसद पुरवठ्यावर हल्ले चढवले आणि इंग्रजी सैन्यामध्ये खळबळ निर्माण केली.
- ४ जानेवारी १७७९: कॅप्टन स्टुवर्ट मारला गेला
- ८ जानेवारी १७७९: ब्रिटिश सेना वडगावला पोहोचली
- १५ जानेवारी १७७९: होम्स यांनी युद्धविराम चर्चेसाठी महादजी शिंदेंशी संपर्क साधला
- १७ जानेवारी १७७९: मराठ्यांनी ब्रिटिशांच्या सोबत तह केला
तहाच्या अटींनुसार ब्रिटिशांनी साष्टी बेट, ठाणे आणि गुजरातमधील सर्व जमीन परत केली.
दुसरे इंग्रज- मराठा युद्ध
महादजी शिंदेचे उत्तराधिकारी महाराजा दौलतराव शिंदेंनीही महाराष्ट्रात ब्रिटिशांच्या विरुद्ध अनेक युद्धे लढली. २३ सप्टेंबर १८०३ चे असाई युद्ध या काळातील महत्त्वाचे होते. आर्थर वेस्ली यांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांना विजय मिळाला, परंतु वेस्ली यांचे म्हणणे होते की, नेपोलियनला वॉटरलूमध्ये पराभूत करण्यापेक्षा
असाई “Assaye” युद्ध कठिण लढाई होती.

खर्डा युद्ध (१७९५)
१७९५ च्या खर्डा युद्धात बक्षी बहादूर जिवाजी बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली दौलतराव शिंदेनी हैदराबादच्या निजामाला पराभूत केले. या तहाच्या अटींनुसार:
- मराठ्यांचा सारा गोळा करण्याचा अधिकार निजामाला मान्य करावा लागला
- दौलताबाद किल्ला आणि वार्षिक ३५ लक्ष रुपये महसूलाचे जिल्हे मराठ्यांना देण्यात आले.
- ३ कोटी रुपयांची नुकसानभरपाई केली जाणार होती
- निजामचे प्रधानमंत्री अजीमुल उमरा यांना ताब्यात घेण्यात आले
वारसदारांचे सामाजिक कार्य
महाराजा माधोराव आणि जीवाजीराव शिंदेनी महाराष्ट्रातील वारसा संरक्षण, शिक्षण आणि विकासाच्या क्षेत्रात अनेक कार्ये तडीस नेली.
शिवनेरी किल्लाची दुरुस्ती: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थान शिवनेरी किल्ल्याच्या दुरुस्तीसाठी महाराजा माधोराव शिंदेनी योगदान दिले. सरकारने या प्रकल्पासाठी अनुमती दिली.
ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी: १९१७ साली महाराजा माधोराव शिंदे आणि महाराजा शाहू छत्रपती यांच्या सहकार्याने या संस्थेची स्थापना करण्यात आली. छत्रपती शिवाजी मेमोरियल निर्मितीमध्ये महाराजांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.
टिळकांच्या ‘मराठा’ वृत्तपत्राने घेतली दखल: महाराजा माधोराव शिंदेच्या मृत्यूनंतर बाळ गंगाधर टिळक यांनी ‘मराठा’ वृत्तपत्रात लिहिले होते की, “महाराष्ट्र दु:खात बुडून जाईल. महाराष्ट्राला उत्तरेकडील या मराठा राजकुमाराचा गौरव वाटतो. महाराजांनी आपल्या मातृभूमीशी विविध मार्गांनी संबंध राखला होता.”
शिक्षण आणि दान कार्य
मराठा मंदिर: महाराजा जीवाजीराव शिंदेनी ३० मार्च १९४५ रोजी मुंबईतील मराठा मंदिरची पायाभरणी केली. ही देशातील अग्रगण्य महत्त्वाची संस्था आहे आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्या वास्तूचे उद्घाटन केले. महाराजा जीवाजीराव सिंधिया १५ वर्षे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते आणि त्यांनी जातपात न मानता सर्वांना मदत केली.
रयत शिक्षण संस्था: कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांनी १९१९ मध्ये साताऱ्यात रयत शिक्षण संस्था स्थापन केली. शिंदे राजघराण्याने महाराष्ट्रातील अनेक राजवाडे आणि शेतजमीन या संस्थेला दान दिली.
समकालीन वारसदार
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी म्हटले होते, “ग्वाल्हेरच्या महाराजा जीवाजीराव शिंदेशी माझे निकटचे संबंध आहेत. ते केवळ ग्वाल्हेरमध्येच नाही, तर संपूर्ण मध्य प्रदेशात लोकप्रिय होते. गरीबांबद्दल त्यांच्या मनात कणव असे.”
वर्तमान काळात केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे हेदेखील आपल्या पूर्वजांचा वारसा सांभाळत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या विकासात योगदान दिले आहे. शिंदे राजघराणे हे केवळ सैनिक शूरवीर नव्हे, तर महाराष्ट्रातील वारसा संरक्षण, शिक्षण आणि समाजकल्याणाचे प्रतीक आहे. त्यांचे शौर्य आणि दयाळूपणा आजही महाराष्ट्रवासियांच्या हृदयात जिवंत आहे.
