श्रुति गणपत्ये

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केवळ पाच महिन्यांच्या लग्नानंतर मेलेल्या नवऱ्याच्या स्वभावाचा, आवडी-निवडींचा वेध त्याच्या गर्लफ्रेंडच्या माध्यमातून घेणारी, घरची जबाबदारी न सोडता स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घ्यायला एकटीच निघालेली संध्या ही आजच्या लहान शहरातल्या मुलींच्या आशा आकांक्षांचा प्रतिनिधित्व करते. गेल्या आठवड्यात नेटफ्लिक्सवर ‘पगलियत’ चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याला अनपेक्षित प्रतिसाद मिळाला. छोट्या शहरांमध्ये राहणारं एक सर्वसाधारण कुटुंब आणि कमवता मुलगा एवढ्या तरुण वयात गेल्याने आर्थिक अडचणीत, त्याच्या विधवा बायकोचं भविष्य, नातेवाईकांचा विम्याच्या पैशावर असलेल्या डोळा, संस्कृती आणि रूढी परंपरा या चक्रानुसार गोष्टी घडतात, पण मुळात त्या नवरा बायकोची पाच महिन्यात म्हणावी तशी जवळीक किंवा प्रेमाचं नातं जुळलेलं नसतं. त्यामुळे बायकोचा शोध सुरु होतो. तो तिच्या नवऱ्याबद्दल माहिती मिळवण्याचा आणि आपलं अस्तित्व शोधण्याचा. आपल्या आयुष्याचे निर्णय आपणच घेऊ शकतो हे जेव्हा नायिकेच्या लक्षात येतं तेव्हा ती सगळ्या चक्रातून बाहेर पडते. एक सुंदर सहज चित्रपट आहे. हिंसा, आत्यंतिक भावनिक नाट्य ,अनपेक्षित वळण ,आक्रस्ताळेपणा हा काहीही टिपिकल मसाला न घालताच चित्रपट बनवला आहे आणि म्हणूनच तो आवडून जातो, सान्या मल्होत्राने नायिकेची भूमिका उत्तम केली आहे. ती बोल्ड आहे पण जबाबदारी घ्यायला घाबरत नाही .नवऱ्याची राहून गेलेला संवाद ती त्याच्या गर्लफ्रेंडच्या माध्यमातून पुरा करते ,नवरा गेल्याने आर्थिक संकटात आलेल्या कुटुंबाला सावरण्यासाठी स्वतः आर्थिक स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करते, कोणताही आविर्भाव न आणता नवऱ्याच्या म्हणजे कुटुंबातल्या कमावत्या पुरुषाची भूमिका करण्यास सज्ज होते.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर अशा छोट्या शहरांमधल्या गोष्टी, चित्रपट, मालिका या मोठ्या प्रमाणात येत आहेत आणि लोकप्रियही होत आहेत. मुंबई. दिल्ली. बंगलोरसारख्या मोठ्या शहरातल्या कथा हा श्रीमंती आणि झोपड्यांमधील गरिबी यावरच कायम दाखवल्या जातात. पण गेल्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये छोटी शहरं, गाव विकासाचा नकाशावर येऊ लागल्यावर तिथल्या लोकांचे जीवन हे एक मोठं कथानक बॉलिवूडसाठी खुलं झालं. या गावांमधून ही बॉलीवुडमध्ये काम करायला दिग्दर्शक म्हणून, लेखक-कवी म्हणून अनेक जण पुढे आले. ते येताना त्यांचे अनुभव, त्यांच्या आकांक्षा, त्यांचा जीवनाकडे बघण्याचा नवीन दृष्टिकोन घेऊन आले. त्यामुळे चित्रपटांमधल्या कथांचा साचलेपणा कमी झाला आणि निमशहरी भाग म्हणजे फक्त शेती हा समजही मोडीत निघाला. प्रेम, गँगवॉर, कुटुंब, नाती, मैत्री, करियर या गोष्टी वेगळ्या दृष्टिकोनातून पुढे येऊ लागल्या. त्यातूनच ‘गँग्ज ऑफ वासेपुर’, ‘मसान’, ‘सुई धागा’, ‘तेवर’, ‘तनु वेड्स मनु’, ‘बरेली की बर्फी’, ‘शुभमंगल सावधान’, ‘अनारकली ऑफ आरा’, ‘लिपस्टिक अंडर माय बुर्खा’, ‘ओमकारा’ असे अनेक चांगले चित्रपट आले. तोच कित्ता आता ओटीटी प्लॅटफॉर्मनी गिरवला आहे. या कथांची खासियत अशी आहे की चकचकीत महाल, बंगले, गाड्या, मेकअप मुळे एकसारख्या, दिसणाऱ्या बायका पैलवानासारखी शरीरयष्टी असलेले नायक यांना इथे फारसं स्थान नाही. सर्वसाधारण दिसणार्‍या मुली-मुलं, वजन जास्त असलेली आणि साचेबद्ध फिगर नसलेली मुलगीही हीरोइन होऊ शकते. वास्तववादी घरं आणि आजूबाजूचा परिसर, रोजच्या जीवनातल्या लहान-मोठ्या घटना, समस्या आणि त्यातून बाहेर पडून स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द असा मानवी चेहरा या कथांना असतो म्हणून त्या लोकांशी पटकन जोडल्या जातात.

गेल्या वर्षी ॲमेझॉनवर प्रदर्शित झालेली पंचायत मालिका एकदम हिट ठरली. यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तलाठ्याचं काम एका खेड्यात राहायला गेलेला मुलगा आणि तिथे जुळवून घेताना त्याला आलेले अनुभव यांची धमाल कथा यामध्ये आहे. ग्रामीण भागात राहिल्याशिवाय तिथल्या लोकांचे जीवन जवळून कळत नाही. पंचायतमध्ये ते आवर्जून बघायला मिळतं. मैत्री करणारे, प्रेमळ, पण कधी स्वार्थी होणारे, समोरच्याला गृहीत धरणारे, पण मदतीसाठी लगेच धावून येणारे, कधी गावंढळपणाचं कातडं ओढून समोरच्याकडून सहानुभूती मिळवणारे असे मजेदार लोक समोर येतात.

सध्या याच पठडीतली सोनी लिव्हवरची ‘गुल्लक’ मालिका लोकांच्या पसंतीला उतरली आहे. या मालिकेचा हा दुसरा सिजन आहे. आई-वडील आणि दोन मुलगे असं चौकोनी कुटुंब. मग मुलांकडून असलेल्या अपेक्षा, मुलांच्या स्वतःबद्दलच्या कल्पना, आजूबाजूचा समाज, लहान लहान प्रसंगातून घडणारे विनोद एकदम हलकीफुलकी करमणूक करतात. मध्यमवर्गीय घरांमध्ये रोजच्या जेवणामध्ये काय प्रसंग येतात जसं की रविवारी पाण्याचा पंप बिघडणं, आईचं डोकं दुखणं, मुलाने परीक्षेत नापास झाल्याचं लपवून ठेवणं, मग त्याभोवती बिणलं जाणारं दिवसभराचं जाळं आणि सहजपणे होणारा शेवट हे छान वाटतं. लोकांची भावनिक नाळ ओळखून त्याच्याशी जोडल्या जाणाऱ्या या कथा ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी हिट फॉर्म्युला ठरल्या आहेत.

shruti.sg@gmail.com

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shruti ganapatye new ott trend like pagliaat gullak panchayt show connects the spirit of small town kpw
First published on: 10-04-2021 at 10:26 IST