– रोहित फडणीस

लहानपणापासूनच सैन्यात जायची इच्छा होती पण ती पूर्ण झाली नाही. परंतु संघाच्या माध्यमातून देशसेवा करण्याची संधी करोनामुळे मिळाली. माझे वडिलही स्वत: स्वयंसेवक. त्यांच्या संस्कारानेच संघात कधी जायला लागलो ते कळलेच नाही.  करोनामुळे देशसेवा करण्याची संधी मिळाली पण यासाठी मला घरुन परवानगी मिळवताना दडपण आले होते. बाबांशी पहिल्यांदा बोलताना थोडा घाबरलोही, कारण त्यांनी नाही म्हटले तर? त्यामुळे शब्दांची‌ मनात जुळवाजुळव करुन मोठे धाडस करुन, त्यांचा‌ मूड व वेळ बघून त्यांना विचारले. त्यांनी दोन मिनिटे विचार केला आणि तयार झाले. म्हणाले की ही राष्ट्रीय आपत्ती आहे आणि संघाचा सहभाग आहे, अशी‌ संधी सारखी येत नाही. अवश्य जा. माझी परवानगी आहे.

माझ्या कामाचे स्वरुप म्हणजे पुणे महानगर पालिका आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती यांच्या, पुण्यातील रेड झोन मधील सेवा वस्ती भागात जाऊन, डॉक्टरांच्या मदतीने, स्थानिकांचे corona screening करणे,आणि माझ्या द्रुष्टीने या उपक्रमात सहभागी होण्याची संधी मला मिळाली ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. या दिवसांत आलेला अनुभव हा आपले व्यक्तिमत्व अतिशय समृद्ध करणारा असा होता आणि करोनाबरोबर राहून देखील आनंदात जगता येते याची खात्री पटवणारा होता.

गुरुवारी म्हणजे १४ मे रोजी रात्री ९ वाजता गरवारे हॉस्टेल येथे पोहोचलो. त्या रात्रीच डॉक्टरांनी स्क्रिनिंग केले, फिटनेस लेव्हल पहिली व रेड झोन मध्ये जाण्यास परवानगी दिली. १५ मे आणि १६ मे या दोन्ही दिवशी माझी नियुक्ती हडपसर येथील वैदू वाडी या रेड झोन मध्ये काम करण्यासाठी झाली. १ डॉक्टर व २ स्वयंसेवक असा संच असायचा. गरवारे हॉस्टेल मधून आम्हाला इष्ट स्थळी नेण्यासाठी ambulance ची सोय असायची. नियुक्त ठिकाणी पोहोचल्यावर तेथील स्थानिक स्वयंसेवक आमच्या मदतीला असायचे. त्या ठिकाणी पोहोचल्यावर आम्ही सर्वजण PPE किट घालायचो व कामाला लगेच सुरुवात करायचो. घरोघरी जाऊन प्रत्येक माणसाचे corona स्क्रिनिंग करणे, घरातील माणसांची माहिती घेणे, त्यांना औषधे व मास्क यांचे वाटप करणे अश्या स्वरूपाचे ते काम होते. ते काम सकाळ व दुपार आशा २ सत्रांमध्ये होते. प्रत्येक स्वयंसेवक रोज साधारण ४ तास हे काम करत असे.

आता PPE किट घालणे हे फार जिकीरीचे काम आहे आणि ते घालुन ४/५ तास काम करायचे म्हणजे फारच दिव्य.डॉक्टर्स हे किट घालुन रोज १२/१२ तास काम करतात त्यांना खरोखरीच सलाम. या कामात स्थानिक स्वयंसेवक व नागरिकांनी पूर्ण सहकार्य केले.

हे २/३ दिवसांच्या स्क्रिनिंगच्या काळातील राहण्याची व्यवस्था व त्यानंतरचे अलगिकरण हे गरवारे हॉस्टेल मध्ये झाले. तेथील सोय देखील उत्तम होती. आमची राहायची व जेवणाची सर्व सोय ही MES तर्फे करण्यात आली होती. तेथील ७ दिवस हे अविस्मरणीय असेच म्हणावे लागतील. इतर स्वयंसेवकांच्या झालेल्या भेटी, त्यांचे अनुभव, तेथील सत्रे, विविध स्पर्धा, सकाळची शाखा, जेवण-खाण इ. सर्वच गोष्टी लक्षात राहण्यासारख्या होत्या. संघ शिस्त व संघ नियोजन याचा वस्तुपाठ तिथे बघायला मिळाला. आमच्या सोयीसाठी व्यवस्थेतील स्वयंसेवकांनी कोणतीही कसर सोडली नाही.

हे हॉस्टेल रोज sanitize केले जात असे. आम्हा सर्वांना आयुषचा काढा रोज मिळत असे. जेवायला पण कधी आमरस, कधी गुलाबजाम, कधी खीर असे पदार्थ मिळत होते. आमचे तेथील वास्तव्याचे ६ दिवस पूर्ण झाल्यावर आमची सह्याद्री हॉस्पिटल मध्ये swab टेस्ट झाली. त्याचा रिपोर्ट २४ तासांनी हातात पडला. ती टेस्ट corona -ve आल्यामुळे आम्ही सातव्या दिवशी घरी येऊ शकलो. आता पुढील ७ दिवस मी home quarantine असणार आहे. गरवारे मध्ये वस्त्याव्यास असणाऱ्या सर्वच्या सर्व साधारण २२५ स्वयंसेवकांची कोरोना टेस्ट ही -ve आली.

२७ एप्रिल ते २४ मे या काळात साधारण १००० स्वयंसेवकांनी या कोरोना स्क्रिनिंग च्या उपक्रमात भाग घेतला. १५०+ रेड झोन्स मध्ये हे स्क्रिनिंग पार पडले. जे जे स्वयंसेवक ही कामगिरी बजावून घरी परतलेले आहेत त्यांच्यामुळे, यापुढील काळात आपणास कोरोना किंवा तत्सम विषाणू बरोबरच राहायचे आहे आणि ते रहात असताना जर आवश्यक ती काळजी घेतली तर आपण आपापली कामे करता करता सहज व आनंदात राहू शकतो, हा संदेश समाजात जाणार आहे आणि तेच या उपक्रमाचे खरे फलित असेल…

आता screening चा पहिला टप्पा संपलेला आहे आणि आता आम्ही सर्व स्वयंसेवक २५ मे ते १० जून यामध्ये होणाऱ्या पुढील उपक्रमात सहभागी होण्याच्या तयारीत आहोत. संघाचे पुढील आवाहन आलेले आहे आणि त्यात सहभागी व्हायची इच्छादेखील आहे. या कामामुळे मला वैयक्तिक काय फायदा झाला तो मी शब्दांत नाही सांगु शकत, मी स्वत: तो अनुभवत आहे आणि अशी संधी मला परत परत मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना.