कश्यप रायबागी, सोहम वैद्य

पुण्यात लॉकडाउनची बंधनं शिथिल करण्यात आली असली तरीही चिंतेची बाब ही की चार कोविड चाचण्यांमागे एक चाचणी पॉझिटिव्ह ठरते आहे. WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमावलीनुसार करोना रुग्णांचा पॉझिटिव्ह होण्याचा दर ५ टक्क्यांपेक्षा खाली जातो तेव्हा लॉकडाउनची बंधनं शिथिल करण्यात यावीत. पुणे जिल्हा कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार २३ जुलै रोजी पॉझिटिव्हीटी दर २३.९ टक्के इतका होता. हे प्रमाण ३ जून रोजी १५.६ टक्के तर २० मे रोजी १२.८ टक्के होतं. २३ जुलै रोजी पॉझिटिव्हिटी दर २३.९ टक्के होता. तरीही टाळेबंदी अर्थात लॉकडाउनची बंधनं शिथिल करण्यात आली आहेत.

सातत्याने पुणे जिल्ह्यात कोविड १९ चाचण्यांचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. २३ जुलैपर्यंत पुण्यात ९० हजारांच्यावर चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी ६५ हजारांपेक्षा जास्त रुग्णांना करोनाची बाधा झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

१२ मे २०२० रोजी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशने सरकारला सल्ला दिला की लॉकडाउनची बंधने शिथिल होण्यापूर्वी चाचणीत सकारात्मकतेचे दर ५% किंवा त्यापेक्षा कमी असणे हे १४ दिवसांसाठी  स्थिर राहणे गरजेचे आहे. पुण्यात मात्र एप्रिल महिन्यापासून पॉझिटिव्ही दराची टक्केवारी सातत्याने वाढतांना दिसते आहे. ५ एप्रिल ला हा दर ४.९% होता आणि २३ जुलै ला तोच दर २३.९% पर्यंत येऊन पोहचला. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नियमावलीनुसार ६० हजार रुग्णांसाठी १ लाख २० हजारांपेक्षा जास्त चाचण्या घेणे आवश्यक आहे.

 

 

 

जेव्हा दक्षिण कोरिया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये सकारात्मकतेचा दर ०.३% टक्क्यांपेक्षा कमी होता तेव्हाच हे देश कोविड १९ बाधित रुग्णांची संख्या सातत्याने कमी करण्यात यशस्वी झाले. २२ जुलै २०२० पर्यंत भारताचा सकारात्मकता दर ९.९% होता.

जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या मते, उच्च पॉझिटिव्हिटी दर असे सूचित करतो की देशाच्या वैद्यकीय प्रशासन व्यवस्था केवळ अशा रुग्णांची चाचणी करत आहेत जे खूप आजारी आहेत पण या मार्गाने विषाणूचा सामुदायिक प्रसार किती आहे हे जाणून घेणे अशक्य आहे. पॉझिटिव्हिटी दर कमी करायचा असेल तर चाचण्यांचे प्रमाण वाढवणे आवश्यक आहे. चाचण्यांचे प्रमाण मर्यादित राहिले तर संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे पुण्यात लॉकडाउनची बंधनं शिथिल करण्यात आली असली तरीही संसर्गाचा धोका टळलेला नाही असंच म्हणावं लागेल.

 

(कश्यप रायबागी हा एक डेटा जर्नलिस्ट आहे. सोहम वैद्य हा एक ह्युमॅनिटेरिअन एड वर्कर आहे.)