BLOG: अविचाराने माखलेला मेंदू!

स्मृती इराणी यांनी केलेले वक्तव्य वादग्रस्तच नाही तर स्त्रियांचा अपमान करणारेच आहे

फोटो- अमित चक्रवर्ती

‘अगर भगवान नहीं होता तो आदमी के दिमागमे भगवान का आयडिया कैसे आता?’ असा प्रश्न ‘सेक्रेड गेम्स’मधला गणेश गायतोंडे उपस्थित करतो. देव आहेच असे वाटणारा एक समाज आहे. देव नाही असेही मानणारा एक समाज आहे. मात्र आस्तिक-नास्तिकतेच्या या सगळ्या परंपरा माणसाने निर्माण केल्या आहेत. देव त्याच्या भक्तांमध्ये भेदाभेद का करेल? स्त्री पुरुष, लहान मुलं, म्हाताऱ्या बायका आणि पुरुष सगळेच त्याला सारखे आहेत. या सगळ्या गोष्टी मांडण्याचं कारण म्हणजे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केलेलं वक्तव्य आणि शबरीमला मंदिर प्रवेशाचा सुरु असलेला वाद हे आहे.

केरळच्या #शबरीमला मंदिरात महिलांनी प्रवेशबंदी होती म्हणून त्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. सुप्रीम कोर्टाने महिलांनी मंदिरात प्रवेश करण्यास हरकत नाही असे म्हटले. त्यानंतर या मंदिरात प्रवेश करू इच्छिणाऱ्या महिलांना अडवण्यात आले प्रसंगी मंदिरास टाळे ठोकू अशीही भूमिका मंदिरातील कर्मठ पुजाऱ्यांनी मांडली. काही महिलांना मारहाणही झाली. अशा सगळ्यात एक पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. आता या प्रकरणी पुढील सुनावणी १३ नोव्हेंबरला होणार आहे अशीही माहिती समोर येते आहे. या सगळ्या वादात केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जे वक्तव्य केले त्यातून त्यांची सडकी आणि अविचारांनी माखलेली मानसिकताच समोर आली. कोणतीही मुलगी, महिला तिच्या मित्राच्या घरी रक्ताने माखलेला सॅनिटिरी पॅड घेऊन जाईल का? असा प्रश्न विचारत त्यांनी केरळ येथील शबरीमला मंदिराच्या शेकडो वर्षांच्या परंपरेला पाठिंबाच दर्शवला. त्याचवेळी हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे मी माझे व्यक्तीगत मत मांडते आहे केंद्रीय मंत्री म्हणून नाही हे देखील त्या स्पष्ट करण्यास विसरल्या नाहीत.

स्मृती इराणी यांचं हे वक्तव्य कोणालाही झोंबणारं असंच आहे. एकीकडे स्त्री-पुरुष समानता, वैचारिक समता, स्त्रियांचे मुलभूत हक्क यांवर बोलायचं आणि दुसरीकडे आधुनिकता न स्वीकारता परंपरांना चिटकून राहायचं ही कसली मानसिकता आहे? पुरोगामीपणाची झुल पांघरून आम्ही कसे परंपरांनाच चिटकून आहोत हे दाखवणारं त्यांचं हे वक्तव्य आहे. साधारण पन्नास ते साठ वर्षांपासून ते अगदी परवा परवा पर्यंत मासिक पाळी आलेल्या स्त्रियांना घराबाहेर बसवत. त्यांना होणारा त्रास काय आहे हे समजून न घेता. पुरुषप्रधान संस्कृतीच्या गुलाम झालेल्या स्त्रियांनीही हे स्वीकारलं. पूर्वापार चालत आलेली परंपरा असं त्याला नाव दिलं गेलं. मात्र समाजसेविका विद्या बाळ आणि त्यांच्यासारख्या अनेक महिलांनी यासंदर्भातली चळवळ चालवली. ज्याला आलेल्या थोड्याफार यशातून आज अनेक महिलांना घराबाहेर बसावं लागत नाही. आजकाल मासिक पाळीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. मात्र हे झाले आहे शहरीकरणाच्या धबडग्यात. सॅनिटरी पॅड्स हे अजूनही ग्रामीण भागात म्हणावे तेवढ्या प्रमाणात पोहचलेले नाहीत. स्त्रियांच्या नैसर्गिक ऋतूचक्राकडे ‘प्रॉब्लेम’ ‘अडचण’ ‘अडथळा’ म्हणून पाहिलं गेलं. सर्वात मोठा विनोद हा की बहुतांश पुरुषांना तर आजही माहित नाही की स्त्रीला मासिक पाळी येते म्हणजे काय होतं. मागे एका सॅनिटरी पॅडच्या जाहिरातीच्या वेळी अभिनेत्री परिणीती चोप्राने मासिक पाळीबाबत मूर्खासारखा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला झापलं होतं. सॅनिटरी पॅड स्त्रियांसाठी किती आवश्यक आहेत त्यांच्या आरोग्यासाठी किती महत्त्वाची आहेत हे सांगणारा ‘पॅडमॅन’सारखा सिनेमा यावा लागतो यापेक्षा मोठं दुर्दैव नाही. तरीही आपल्या देशाच्या केंद्रीय मंत्री म्हणतात तुम्ही परंपरा पाळा, जसं रक्तानं माखलेलं पॅड तुम्ही मित्राच्या घरी घेऊन जाणार नाही तशीच तुम्ही शबरीमला मंदिर प्रवेशाची परंपराही झुगारू नका, ती पाळा कारण ती वर्षानुवर्षे तशीच पाळली जाते आहे.

आपल्या म्हणण्यावर जोर देण्यासाठी स्मृती इराणींनी उदाहरण कसलं दिलं? तर स्वतःचंच. मी पारशी माणसाशी लग्न केलं. आम्हाला बाळ झालं तेव्हा मी अग्यारीमध्ये गेले होते मात्र हिंदू असल्याने मला अग्यारीत जाऊ दिलं गेलं नाही, मग मी माझ्या बाळाला नवऱ्याकडे दिलं तो बाळाला अग्यारीत घेऊन गेला. आजही त्याला अग्यारीत जायचं असेल तेव्हा तो जातो आणि मी त्याची रस्त्यावर किंवा कारमध्ये वाट पाहते. म्हणजे केंद्रीय मंत्रीपदापर्यंत पोहचूनही मी परंपरा मोडली नाही तर तुम्ही मला शबरीमला मंदिराची परंपरा मोडायची कशी हे विचारूच कसे शकता असे ध्वनित करण्याचा हा प्रयत्न स्पष्ट दिसतो आहे. मी माझ्या मुलांनाही झोराष्ट्रीयन परंपरेप्रमाणेच वाढवले आहे. अग्यारीत प्रवेश मिळावा म्हणून मी कोर्टाचा दरवाजा ठोठावला नाही असे त्यांनी म्हटले आहे. म्हणजेच मी केंद्रीय मंत्रीपदापर्यंत पोहचले पण मी माझे परंपरावादी विचार बाजूला ठेवू शकले नाही हेच त्यांच्या वक्तव्यातून दिसते आहे.

योनीशुचिता इतकी का महत्त्वाची मानली गेली आहे? हे कळणे खरोखरच अनाकलीनय आहे. मंदिराच्या गाभाऱ्याला गर्भगृह म्हटलं जातं, मंदिराची रचना आईच्या गर्भाप्रमाणे केली जाते असं कायमच सांगितलं जातं. दक्षिणेतल्या तर अनेक मंदिरांची रचना अगदी अशीच आहे. मग अशात स्त्रीलाच मंदिर प्रवेशासाठी रोखायचं हा कोणता न्याय आहे? ही कोणती समानता आहे? हे प्रश्न उरतातच. #शबरीमला हे अय्यपाचे मंदिर आहे. अय्यपा म्हणजे विष्णूचे मोहिनी रुप आणि भगवान शंकर यांच्या मिलनातून झालेले अपत्य आहे, अयप्पा ब्रह्मचारी होता अशी अख्यायिका आहे. त्यामुळे या मंदिरात अशाच मुली येऊ शकतात ज्यांची मासिक पाळी आलेली नाही म्हणजेच ज्यांचं वय १० ते ११ वर्षे आहे. शिवाय अशा महिला येऊ शकतात ज्यांची रजोनिवृत्ती झाली आहे. म्हणजे साधारण ४५ ते ५० या वयोगटातील पुढच्या स्त्रिया. ही नियमावली घालून कोणी दिली आहे तर मंदिरातील पुजाऱ्यांनी, नेमक्या किती वर्षांपासून घालून दिली याचा काहीही संदर्भ नाही. मात्र परंपरा म्हणून ही नियमावली पाळली जाते आहे. शैव आणि वैष्णव भक्तांना एकत्र आणणारे हे मंदिर स्त्रियांना मात्र विरोध करते हा मुद्दाच अनाकलीनय वाटतो.

महिलांना मासिक पाळी येते, कारण ते निसर्गचक्रच आहे. मग अशा दिवसांमध्ये ती मंदिरात प्रवेश करणार नाही तिला याच दिवसांत मंदिरात प्रवेश करायचा आहे असा अर्थ का घेतला जातो आहे. महिन्यातले चार किंवा पाच दिवस सोडले तर इतर दिवशी महिलेने मंदिरात प्रवेश केला तर काय बिघडणार आहे? या परंपरांच्या जोखडांना आपण किती दिवस चिटकून राहणार आहोत? सुप्रीम कोर्टापेक्षाही शबरीमला मंदिरातले पुजारी मोठे आहेत का? जे महिलांनी मंदिरात प्रवेश केला तर आम्ही मंदिर बंद करू अशी धमकी देतात.

एकीकडे स्त्रीला देवीचा दर्जा द्यायचा आणि दुसरीकडे तिच्या नैसर्गिक धर्मावर आक्षेप घ्यायचा तिला मज्जाव करायचा, ज्या दिवसांमध्ये तिला सर्वाधिक आधाराची गरज वाटते तिचे ते दिवस अत्यंत चिडचिडीत आणि मनस्तापात कसे जातील हे ठरवायचे ही कोणती मानसिकता आहे? देव कधीही कोणत्या भक्तांमध्ये भेदभाव करत नाही. जे काही ठरवायचे आहे ते त्याने ठरवले आहे का? त्याच्या नावाचे स्तोम माजवत आलेल्या आणि स्वतःला कथित धर्मरक्षक म्हणवणाऱ्या पुरुषप्रधान संस्कृतीनेच हे ठरवले आहे. अशात स्मृती इराणी पाठराखण करत आहेत ती याच पुरुषप्रधान मानसिकतेची. खरंतर वाद आणि स्मृती इराणी यांचं नातं नवं नाहीये याआधी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा वाद असो किंवा महिषासूर आणि देवीबद्दल त्यांनी संसदेत वाचून दाखवलेलं भाषण असो त्यावरूनही वाद निर्माण झालेच आहेत. अशात आता आणखी एका वादाची भर पडली आहे.

महाभारत काळापासून स्त्रीची विटंबनाच होते आहे. द्रौपदी रजस्वःला होती तेव्हाच तिचे मोकळे केस धरून तिला फरफटत दरबारात आणण्यात आले तिचे वस्त्रहरण करण्यात आले. पाच बलशाली पती असूनही द्युतात कौरवांचे दास झाल्याने ते तिचे रक्षण करू शकले नाहीत. शेवटी तिच्या मदतीला धावला तो तिचा सखा श्रीकृष्णच. त्या काळापासून सुरु असलेली स्त्रीची विटंबना आजही संपलेली नाही. मासिक पाळीचा मुद्दा पुढे करून स्त्रीच्या मर्यादांचे वस्त्रहरण करणारे हजारो दुःशासन समाजात उजळ माथ्याने वावरत आहेत… आणि दुर्दैव हे की ही विटंबना थांबवणारा कृष्णही दिसत नाही. या असल्या दुःशासनांना धडा शिकवण्याची भाषा करत प्रसंगी दुर्गावतार धारण करेन असा पवित्रा जर स्मृती इराणी यांनी घेतला असता तर आज देशालाही त्यांचा अभिमान वाटला असता. मात्र माखलेल्या सॅनिटरी पॅड संदर्भातले वक्तव्य करून त्यांनी त्यांचा मेंदू अविचारांनी कसा आणि किती माखला आहे हेच दाखवून दिले आहे.

समीर जावळे
sameer.jawale@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Special blog on smriti iranis statement on sabrimala temple she ask will take sanitary napkins soaked in blood to friends home