भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरूद्ध झालेल्या सामन्यात दारूण पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंपुढे भारतीय संघाची गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सारेच फिके पडले. नाणेफेक गमावण्यापासूनच भारतीय संघाच्या कमनशिबाची सुरूवात झाली. आव्हानाचा पाठलाग करण्यात तरबेज असलेल्या भारतीय संघाला ऑस्ट्रेलियासारख्या तगड्या संघाविरूद्ध पहिल्याच सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याची वेळ आली. भारतीय संघ कागदावर कितीही मजबूत दिसत असला तरी आव्हानाचा बचाव करायचा असेल, तर भारतीय संघ काहीसा दडपणाखाली असतो हे अनेकदा दिसून आलं आहे. कालच्या सामन्यातही तसंच झालं. दडपणाचा भार इतका होता की भारतीय संघाने घरच्या मैदानावर रोहित शर्मासारखा अनुभवी आणि स्फोटक फलंदाज अवघ्या पाचव्या षटकात गमावला.

विराटचा प्रयोग यशस्वी, पण फटका विराटलाच!

रोहित शर्मा लवकर बाद झाला. चेंडू अजूनही नवीन होता, त्यामुळे सलामीला येण्याचा अनुभव असलेला खेळाडू संघात असणे आवश्यक होते. त्यावेळी विराट कोहलीचा एक नवा प्रयोग मैदानावर दिसून आला. भारतीय संघाने तिनही सलामीवीर म्हणजेच रोहित शर्मा, शिखर धवन आणि लोकेश राहुल यांना संघात स्थान दिले होते. त्यापैकीच लोकेश राहुल आणि शिखर धवनने विराटचा हा प्रयोग यशस्वी ठरवून दाखवला. या दोघांनी रोहितच्या स्वस्तात बाद होण्याची झळ भारतीय संघाला लागू दिली नाही. त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी तब्बल १२१ धावांची भागीदारी केली.

विराटचा हा प्रयोग तर यशस्वी झाला, पण त्याचा फटका विराटच्या खेळीला बसला. विराट हा गेली काही वर्षे एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून खेळतो आहे. तो त्या जागी चपखल बसला आहे. पण तीनही सलामीवीरांना संघात स्थान देण्याचा प्रयत्नामुळे विराटला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस यावे लागले आणि त्यानंतरच्या सगळ्याच खेळाडूंचे फलंदाजीचे क्रमांक खाली घसरले. परिणामी २०१९ या वर्षात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज अवघ्या १६ धावांवर तंबूत परतला. आकडेवारीचाच आधार घ्यायचा झाला, तर ज्या गेल्या सात सामन्यात विराटने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे, त्यात त्याला सर्वाधिक १६ धावा करता आल्या आहेत. त्यामुळे अतिरिक्त सलामीवीराला संधी देताना विराटच्या कामगिरीवर परिणाम होणार नाही याकडे संघ व्यवस्थापनाने लक्ष देणे आवश्यक आहे.

पर्यायी यष्टीरक्षकाचा अभाव

सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या संघाची फलंदाजी सुरू असताना पॅड, किपींग ग्लोव्ह्स आणि हेल्मेट घालून चक्क लोकेश राहुल मैदानात आला. त्याच्या सुमार यष्टीरक्षणाचा फटका भारताला बसायचा तो बसलाच. एक अत्यंत सोपा असा स्टंपिंग राहुलने सोडल्यानंतर स्टेडियममध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नावाचा जयघोष झाला. तसा जयघोष ऋषभ पंत मैदानात असतानाही अनेकदा झाला आहे. धोनी हा विश्वचषक स्पर्धा २०१९ नंतर क्रिकेटच्या मैदानावर परतलेला नाही. त्यामुळे तेव्हापासून भारतीय संघात ऋषभ पंत हाच यष्टीरक्षक म्हणून खेळत आहे. ऋषभ पंत हा युवा खेळाडू आहे, त्यामुळे त्याला जितक्या जास्त संधी मिळतील तेवढा त्याचा खेळ सुधारेल असा युक्तिवाद अनेकदा भारतीय संघ व्यवस्थापन आणि विराटने पंतच्या बचावात केला आहे. पण पंत सातत्याने खराब कामगिरी करूनही त्याला संघात वारंवार संधी दिली जाते.

भारतीय संघाकडे यष्टीरक्षकासाठी पर्यायी खेळाडू नाहीत, असा भाग नाही. पण त्यांना संधी देण्याबाबत संघ व्यवस्थापन प्रचंड उदासीन दिसून येत आहे. देशांतर्गत स्पर्धांमध्ये अप्रतिम कामगिरी केलेल्या संजू सॅमसनला सातत्याने संघातून डावलण्यात येत आहे. त्यामागचे कारण काय हे अजूनही कळलेले नाही. श्रीलंकेविरूद्धच्या एका टी २० सामन्यात त्याला संधी देण्यात आली, पण त्यानंतर त्याला परत संघात स्थान देण्यात आलेले नाही. जर भारतीय संघाने पर्यायी यष्टीरक्षकाला संधीच दिली नाही, तर पंतच्या दुखापतीच्या वेळी लोकेश राहुलला यष्टीरक्षण करावे लागले, तसा एखादा प्रकार महत्त्वाच्या सामन्यात घडू शकतो आणि त्याचा फटका भारतीय संघाला नक्कीच बसू शकतो.

आव्हानाचा बचाब करताना पुन्हा एकदा गोलंदाज अपयशी

क्रिकेट हा खेळ फलंदाज आणि गोलंदाज यांच्या समतोलाचा असतो. भारतीय गोलंदाज आणि फलंदाज यांनी अनेकदा स्वत:ला सिद्ध केले आहे. पण भारतासारख्या संघाला आव्हानाचा बचाव करताना सातत्याने येणारे अपयश हा चिंतेचा विषय ठरत आहे. भारतीय संघात जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर हे तीन अनुभवी खेळाडू आहेत. यातील दोन खेळाडूंना कायम संघात संधी दिली जाते. अपवादात्मक परिस्थितीत कोणी तरी एकच खेळाडू संघात असतो आणि इतर दोघांना संघाबाहेर ठेवले जाते. पण त्या गोलंदाजांना पूरक असा पर्य़ाय भारताकडे दीपक चहरच्या रूपात उपलब्ध आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. पण या सगळ्या गोष्टींमध्ये या कडे दुर्लक्ष करून चालणार नाही की संघात कितीही प्रतिभावन गोलंदाज असले तरी भारताला आव्हानाचा बचाव करणे अवघड जात आहे. वेस्ट इंडिजसारख्या तुलनेने कमकुवत असलेल्या संघाने भारतातच भारतीय गोलंदाजांना डिसेंबर २०१९ मध्ये अक्षरश: रडवले होते. तशीच काहीशी अवस्था काल ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारतीय संघाची होताना दिसून आली.

भारतीय संघाचा कालच्या खेळात १० गडी राखून ऑस्ट्रेलियाच्या संघाने पराभव केला. २५५ धावांच्या आव्हानाचा बचाव करणे भारतीय संघाला जमले नाही. महत्त्वाचे म्हणजे २५५ ही धावसंख्या इतकीही छोटी नव्हती की केवळ सलामीवीरांनी ती धावसंख्या पार करावी. त्यात भर म्हणून ऑस्ट्रेलियाने ती धावसंख्या ४० षटकांच्या आत पार करून टाकली. टीम इंडियाचा अशा प्रकारचा पराभव सतत होत नाही. विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरूद्ध विजय मिळवल्यानंतर भारत पहिल्यांदाच एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाविरूद्ध उभा ठाकला होता. त्याच सामन्यात अत्यंत लाजिरवाणा पराभव भारताच्या पदरी पडला.

असा मोठा पराभव भारताचा गेल्या काही काळात पहिल्यांदाच झाला आहे, त्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंना लगेचच ‘नालायक’ ठरवणे हे अत्यंत चुकीचे आणि आततायीपणाचे ठरेल. पण भारतासारख्या क्रमवारीत अव्वल ५ मध्ये असलेल्या संघाचा आपल्याच भूमीवर अशाप्रकारे पराभव होणे हा चिंतनाचा विषय आहे. या पराभवातून भारतीय संघव्यवस्थापनाने वेळीच बोध घ्यायला हवा आणि सावरायला हवे. नाहीतर टीम इंडियाचं हसं व्हायला वेळ लागणार नाही.