– कीर्तिकुमार शिंदे

‘आवाज कोणाचा?’ अशी आरोळी सर्वात पहिल्यांदा मुंबईत कम्युनिस्टांनी ठोकली. पण ती फळली शिवसेनेला.

आवाज कोणाचा…? शिवसेनेचा!
कोण आला रे कोण आला…? शिवसेनेचा वाघ आला!
या दोन घोषणा एखाद्या ठिकाणी बाळासाहेब आले किंवा भाषणाला उभे राहिले की हमखास दिल्या जायच्या.
घोषणांमधून राजकीय वातावरणनिर्मिती करण्याचं कसब त्या काळातील शिवसैनिकांकडे होतं.

शिवसेनेच्या या घोषणांमध्ये एक सळसळ होती.
तिची प्रेरणा अर्थातच बाळासाहेबांच्या जादुई व्यक्तिमत्वात होती.
डरकाळी फोडणारा वाघ ही शिवसेनेची मूळ निशाणी किंवा बोधचिन्ह.
बाळासाहेबांनी अनेकदा आपल्या व्यंगचित्रांमध्ये महाराष्ट्राला किंवा मराठी माणसाला चवताळलेला वाघ दाखवलं.
मराठी माणसाच्या संतापाला वाघाच्या डरकाळीशी जोडलं.
पुढे बाळासाहेब हेच महाराष्ट्राचे वाघ ठरले.
देशभरात त्यांची प्रतिमा ‘टायगर’ म्हणजे आक्रमक नेता अशी बनली.
ही त्यांची प्रतिमा अखेरपर्यंत म्हणजे ते वयोवृद्ध झाले तेव्हाही तशीच राहिली.

शेवटच्या काही वर्षांमध्ये बाळासाहेब थकलेले दिसायचे, पण त्यांचा दरारा कायम होता.
याच काळात त्यांना दोनदा भेटण्याची संधी मला मिळाली.
दोन्हीवेळा मी एक शब्दही बोललो नाही, पण ते काय-कसं बोलतात, हे अत्यंत जवळून ऐकलं-अनुभवलं.
मला त्यांच्या बोलण्यात दोन वैशिष्ट्यं जाणवली.
एक, ते अत्यंत रोखठोक, करारी, जरबपूर्ण बोलायचे.
दुसरं, त्यांच्या बोलण्यात प्रेमळपणाचा एक भावनिक ओलावा आणि चेष्टा-थट्टामस्करीचा सूर सुद्धा जाणवायचा.
हे कॉम्बिनेशन मला खूप भारी वाटलं.
स्वभावात बेफिकिरी असल्यामुळे असं असेल कदाचित.
त्यात भर पडली त्यांच्या आवाजाची.

वक्तृत्वशैली-आवाजाच्या जोरावर त्यांनी पाच दशकं महाराष्ट्रावर मोहिनी घातली.
ठाकरे हे आडनाव आज ब्रॅण्ड असेल, तर आवाज हा त्या ब्रॅण्डचा काॅपीराइट-ट्रेडमार्क आहे.
जवळपास पाच दशकं प्रत्येक पिढीने हा आवाज प्रत्यक्ष- म्हणजे एखाद्या जाहीर सभेत किंवा टीव्हीवर ऐकला आहे.

शिवाजी पार्कला राहणा-या चेतन शशितल या महान व्हाॅइस ओव्हर आर्टिस्टने- आवाजाच्या बादशहाने एकदा बाळासाहेबांच्या समोरच त्यांचा आवाज काढून दाखवला (ऐकवला) होता. तो आवाज इतका हुबेहूब होता की, बाळासाहेब (मस्करीतच) म्हणाले, “चांगला काढलास. आता यापुढे पुन्हा काढू नकोस.”

दै. सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी जेव्हा बाळासाहेबांच्या विचारांवर आधारीत ‘बाळकडू’ या सिनेमाची निर्मिती केली, तेव्हा बाळासाहेबांचा आवाज काढण्यासाठी चेतन शशितल यांनाच बोलावलं.
‘बाळकडू’ सिनेमात बाळासाहेब कुठेही दिसत नाहीत, पण शशितल यांनी काढलेला आवाज हाच या सिनेमात एक मुख्य व्यक्तिरेखा म्हणून आपल्याला भेटत राहतो.

कथा, पटकथा, संवाद, मांडणी अशा अनेक पातळ्यांवर ‘बाळकडू’ हा सिनेमा अत्यंत टुकार होता. पण चेतन शशितल यांचा आवाज ए-वन होता.
आज ‘बाळकडू’तला एकही सीन डोळ्यासमोर येत नाही, पण शशितल यांचा ‘ठाकरी’ आवाज कानात घुमतोय.

सध्या ‘ठाकरे’ सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे.
या सिनेमाची निर्मितीही संजय राऊत यांनीच केली आहे.
दिग्दर्शन करतोय, अभिजीत पानसे.

अभिजीतने दिग्दर्शित केलेला ‘ठाकरे’ सिनेमा पटकथा, मांडणी, अभिनयात उजवा असणार यात शंकाच नाही.
त्याने दिग्दर्शित केलेला ‘रेगे’ ज्यांनी पाहिलाय, ते प्रेक्षक तर त्याच्या या सिनेमाची चातकासारखी वाट पाहताहेत.
बाळासाहेबांच्या भूमिकेसाठी नवाजुद्दीनचं कास्टिंग तर परफेक्टच.

काल फेसबुकवर या सिनेमाचे दोन ट्रेलर पाहिले-
एक, हिंदीत. दुसरा, मराठीत.

हिंदी ट्रेलर आवडला.
मराठी ट्रेलर ऐकताना खूप हळहळायला झालं.
नाडला गेलेल्या मराठी माणसाच्या भूमिका वठवणा-या अभिनेत्याचा आवाज हा सर्वांना बेधडक नडणा-या माणसाचा आवाज म्हणून वापरला गेलाय.
काव्यवाचन किंवा पुलंच्या साहित्याचं पार्ले, डोंबिवलीत अभिवाचन ऐकण्यासाठी उपस्थित राहणारी माणसं आणि शिवाजी पार्कवरच्या जाहीर सभेत धडाडणारी ठाकरी तोफ ऐकण्यासाठी येणारी माणसं ही दोन्ही मराठीच असली तरी वेगळी असतात.

मैफिलीत गळा लागतो, सभेसाठी नरडं लागतं.

सचिन खेडेकर यांच्या आवाजात बाळासाहेबांच्या आवाजातला करारीपणा तर नाहीच, मग त्यांच्या आवाजातून व्यक्त होणारी त्यांची बेफिकिरी कुठून येणार ?

नवाजुददीन हा शून्यातून पुढे आलेला अभिनेता आहे. आवाजाच्या दुनियेतील म्हणजे व्हॉइस ओव्हर इंडस्ट्रीत एखादा नवीन कलावंत नक्कीच शोधता आला असता.
पण काही लोकांना ठराविक जणांचा आवाज इतका गोड वाटतो, की सगळीकडे तोच आवाज ते वाजवतात.

सचिन खेडेकर यांचा आवाज हा ठाकरे सिनेमाच्या निर्मात्यांनी स्वीकारलेला शॉर्टकट आहे.
सिनेमात असे आणखी इतर शॉर्टकट्स असू नयेत, ही अपेक्षा.