समीर जावळे

तुमच्या आमच्या घरातली एखादी ज्येष्ठ व्यक्ती जर आजारी असेल तर तिच्याबाबत आपण जगाला माहिती देत फिरत नाही. याचं कारण असतं की तो आपला कौटुंबिक विषय असतो. अगदी असाच कौटुंबिक विषय किंवा खासगी बाब असण्याचा अधिकार सेलिब्रिटींनाही आहेच. हे मांडण्याचं कारण अभिनेता सनी देओलचा झालेला प्रचंड संताप. त्यातून त्याने पापाराझींची काढलेली लाज. पापाराझींचं फॅड भारतात आणि खास करुन बॉलिवूडमध्ये रुजून एक काळ लोटला आहे. पण ज्यात त्यात नाक खुपसून पाहणं असाच हा प्रकार आहे असंच दिसतं.

धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबतच्या अफवा

अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतल्या ब्रीचकँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना कुठला आजार झाला आहे इथपासून अनेक अफवा पसरवल्या गेल्या. ११ नोव्हेंबरला जे घडलं तो तर या सगळ्या अफवांवरचा कहर होता. ११ नोव्हेंबरला धर्मेंद्र यांचं निधन झाल्याची अफवा सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. सकाळी ८.३० ते ९ च्या दरम्यान सोशल मीडियावरील अर्ध्याहून अधिक हँडल्सनी धर्मेंद्र यांचं निधन झाल्याचं वृत्त जाहीर केलं आणि त्यांना आदरांजली वाहिली. ही घटना देओल कुटुंबासाठी इतकी धक्कादायक ठरली की इशा देओल आणि हेमा मालिनी या दोघींनीही पोस्ट लिहून संताप व्यक्त केला. यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजेच १२ नोव्हेंबरला धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

सनी देओलचा सात्विक संताप, आणि ‘ती’ शिवी

आता आज सनी देओलने त्याचा व्हिडीओ शूट करणाऱ्या पापाराझींना खडे बोल सुनावले आहेत. तुमच्या घरीही आई वडील आहेत, मुलं आहेत. तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्ही किती काळ इथे *## सारखे थांबता? असं वाक्य तो बोलून गेला. अर्थात त्याने शिवी का दिली असेल? हा प्रश्न अनेकांना पडला असेल. पण त्याचा सात्विक संताप यातून बाहेर पडला हे सरळ आहे. आपले वडील जिवंत असताना ज्या मुलाने त्यांच्या मृत्यूच्या बातम्या ऐकल्या, त्यांना वाहिलेली श्रद्धांजली ऐकली, ट्विट्स पाहिले, फोटो पाहिले, ग्राफिक्स कार्ड करुन वाहिलेली श्रद्धांजली पाहिली त्या मुलाला म्हणजेच सनी देओलला काय वाटत असेल? तो सगळा संतापच या शिवीतून बाहेर पडला.

धर्मेंद्र यांच्या नावाशिवाय चित्रपटसृष्टीचा इतिहास अपूर्ण

धर्मेंद्र हे सिनेसृष्टीतलं असं नाव आहे ज्यांच्या नावाशिवाय चित्रपटसृष्टीचा इतिहास अपूर्ण आहे. शोले, सीता और गीता, यादो की बारात अशा कितीतरी चित्रपटांमधून धर्मेंद्र यांनी अजरामर भूमिका करत आपला एक खास प्रेक्षक वर्ग तयार केला होता. तसंच धर्मेंद्र यांनी त्यांची देशी मातीतला ही मॅन ही इमेज तयार केली आणि जपलीही. सनी देओल, बॉबी देओल ही त्यांची आणि प्रकाश कौर यांची मुलं. तर इशा आणि अहना या दोन मुली त्यांना हेमामालिनी यांच्यापासून झाल्या आहेत. सुपरस्टारचं आयुष्य जगलेला हा कलावंत लोणावळ्यात शेती करतानाचे व्हिडीओही व्हायरल झाले होते. चाहत्यांवर प्रचंड प्रेम असलेल्या धर्मेंद्र यांचं सोशल मीडिया अकाऊंटचं नावही त्यांच्या प्रेमाची साक्ष देणारं आहे. जे आहे आपका धरम. ज्या माणसाने इतकं समृद्ध आयुष्य जगलं आहे आणि जगतो आहे त्या माणसाच्या निधनाची अफवा त्याचे कुटुंबीय कसे काय सहन करतील? इशा देओल आणि हेमा मालिनी यांचा संताप सोशल मीडियावरुन बाहेर पडला. तर अभिनेता सनी देओलचा संताप थेट पापाराझींच्या कॅमेरासमोर. याचं कारण हा त्यांच्या अत्यंत खासगी गोष्टीवर केलेला एक प्रकारे गोपनीयतेवर केलेला व्हिज्युअल रुपातला हल्लाच आहे.

Dharmendra In Sholey Movie
धर्मेंद्र यांची शोलेमधली भूमिका अजरामर ठरली यात शंकाच नाही. (फोटो-इंडियन एक्स्प्रेस)

पापाराझींवर सनी देओलचं चिडणं अगदीच साहजिक

पापाराझींवर चिडणारा सनी देओल हा काही पहिला कलाकार नाही. याआधी जया बच्चन, रणधीर कपूर, ऋषी कपूर यांच्यासह अनेक कलाकारांनी पापाराझींवर संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियाच्या काळात आणि २० सेकंद रिल दाखवण्याच्या नादात आपण कुणाच्याही आयुष्यात डोकावत आहोत याची जाणीव पापाराझींना नसावी का? मलायका जिममध्ये जातानाचे व्हिज्युअल्स, करीना कपूर एअरपोर्टवर जातानाचे फोटो, कुणाचा विचित्र अवस्थेतला फोटो, कुणा स्टारचा गबाळा अवतार हे सगळं पापाराझी त्यांच्या कॅमेरात कैद करत असतात. या निमित्ताने प्रश्न निर्माण होतात ते हेच आहेत की सेलिब्रिटी असले म्हणून तुम्ही रोज त्यांच्या खासगी आयुष्यात डोकवायचं का? पापाराझी प्रसिद्धी मिळावी आणि त्यातून चांगलं मानधन हवं म्हणून फोटो किंवा व्हिडीओ काढण्याचा हा मार्ग का अवलंबतात? पापाराझींना कुणी फॉलो केलं आणि तसेच फोटो, व्हिडीओ काढले तर तो त्यांच्या नैतिकतेवर हल्ला ठरणार नाही का? असे प्रश्न उपस्थित होतातच. पण या भाबड्या प्रश्नांची उत्तरं कुणाकडेच नसावीत. अशात सनी देओलसारखं उत्तर सगळ्यांना द्यायला जमतंच असं नाही. सनी देओलने तीन ते चार दिवस स्वतःवर संयम ठेवला. पण अखेर त्याचा संयम सुटला आणि सहनशक्तीचा कडेलोट झाल्यानंतर त्याने पापाराझींची लाज काढली आणि त्यांना एक शिवीही घातली. इतका सात्विक संताप होईपर्यंतची परिस्थिती का आली? याचं उत्तर एकच आहे ती आणली गेली. आता प्रश्न हा आहे की पापाराझी यातून काही धडा घेतील का? की सवंग प्रसिद्धीसाठी त्यांचे हे उद्योग सुरु राहतील? याचं उत्तर आज तरी देणं कठीण आहे.