डॉ. नीरज देव
Swatantryaveer Savarkar Atmarpan Din proposal for Deshbhakti Din aims to mobilize national contribution: स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे सशस्त्र क्रांतीचे तत्वचिंतक आणि हिंदुत्वाचे मंत्रदृष्टे ऋषी. सावरकरांच्या अफाट कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांचा आत्मार्पण दिन ‘देशभक्ती दिन’ म्हणून घोषित करण्याची गरज आता निर्माण झाली आहे.
हे मातृभूमि ! तुजला मन वाहियेले
वक्तृत्व वाड़्विभवही तुज अर्पियेले |
तू तेचि अर्पिली नवी कविता रसाला
लेखाप्रति विषय तूचि अनन्य झाला ||
सावरकरांच्या या केवळ काव्यपंक्ती नाहीत, तर त्यांच्या राष्ट्र समर्पित जीवनाचे यथार्थ भाष्य आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर सशस्त्र क्रांतिकार्याचे तत्त्वचिंतक महर्षी आणि हिंदुत्वाचे मंत्रदृष्टे ऋषी होते. त्यामुळेच त्यांच्या चरणांना स्पर्श करणे एम एन रॉय सारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या साम्यवादी महर्षीला प्रेरणास्पद तर डॉ. केशव बळीराम हेडगेवारांसारख्या अद्भूत हिंदू संघटकाला परम वंदनीय वाटत होते. तत्कालीन डाव्या उजव्यांना सावरकर या ना दृष्टीने देशपितेच वाटत होते. त्यांच्या या राष्ट्रकेंद्री जीवनादर्शामुळेच आचार्य अत्र्यांना ते जन्मजात देशभक्त वाटतात तर वचनेश त्रिपाठींना राष्ट्र स्वरुप वाटतात. याचाच अर्थ सावरकर देशभक्तीचे जिवंत प्रतीक होते आणि आहेत.
अशा सावरकरांना ‘भारतरत्न’ प्रदान करावे, ही मागणी सातत्याने सावरकरांच्या हयातीपासून आजही उठतेच आहे. साधकबाधक विचार करता ती पुरेशीही नाही आणि सावरकरांच्या भव्योदात्त जीवनाला साजेशी ही नाही. स्वार्थ नि चरितार्थ साधता साधता अनेकांना खैरातीसारखा वाटला जाणारा सन्मान, सावरकरांच्या निःस्वार्थ त्यागाला कसा काय गौरवान्वित करु शकणार?
सावरकरच प्रेरणास्रोत
गदरपासून आझाद हिंद सेनेपर्यंत प्रत्येक स्वातंत्र्यसेनेचे प्रेरणास्रोत म्हणून सावरकरच दिसतात. सावरकरांचे अभिनव भारत, सावरकरांचा सैनिकीकरणावरील भर, त्यांचा सैन्याच्या अद्यावतीकरणाचा आग्रह या साऱ्या बाबी त्यांना भारताच्या अनभिषिक्त सेनापतीचा दर्जा देतात. अशा सेनापतीचा गौरव परमवीर चक्र सारख्या सर्वोच्च सेना पुरस्कारानेच कदाचित होऊ शकेल.

(संग्रहित छायाचित्र)
file photo
पण मनांत प्रश्न उठतो, सावरकरांना परमवीर चक्र दिले तर त्यांच्या हिंदुत्व निर्मिती, अंधश्रद्धा निर्मूलन, जातीपातींचे उच्छेदन आदी जनप्रबोधनाचे काय? त्यांच्या भाषाशुद्धी , लिपी सुधारणा आंदोलनाचे काय? त्यांच्या राष्ट्र पोषक साहित्य निर्मितीचे काय? या बाबी विना पुरस्कृतच राहतील. मग पुन्हा सर्वोच्च नागरी सन्मान असलेल्या ‘भारतरत्न’ कडेच वळावे लागेल.
म्हणजेच वीर सावरकरांचा सन्मान करायला परमवीर चक्र आणि भारतरत्न या दोहोंचे मिश्रण असणारा एखादा नवाच पुरस्कार शोधावा लागेल. आणि तो दिल्यावरही सावरकरांची निरलस, नि:स्पृह अन नि:स्वार्थ देशभक्ती अपुरस्कृतच राहील.
‘ देशभक्ती दिन: एक दिन देश के लिए! ‘
मग यापेक्षा जर सावरकरांचा आत्मार्पण दिन ‘ देशभक्ती दिन: एक दिन देश के लिए! ‘ म्हणून साजरा केला तर? तेच उत्तम ठरेल राधाकृष्णनांचा जन्मदिवस शिक्षक दिन, विश्वेश्वरैय्यांचा अभियांत्रिक दिन, विवेकानंदाचा युवा दिन तसाच सावरकरांचा ‘आत्मार्पण दिन देशभक्ती दिन !’
या दिवशी सुटी नाही घ्यायची, भाषणबाजी करीत नाही बसायचे तर प्रत्येकाने आपापले नियत कार्य प्रामाणिकपणे करीत, त्यातून येणारा नफा, २६ फेब्रुवारी रोजीची कमाई देशाच्या नावे करायची. अर्थात सावरकर आत्मार्पण दिनाची मेहनत आणि मेहनताना देशासाठी वापरायचा. त्यातून उभ्या राहणाऱ्या रकमेचा विनियोग सैन्याचे अद्यावतीकरण, अद्यावत शस्त्रांची खरेदी नि नवीन शस्त्रांचा शोध, नागरिकांचे (विशेषतः हिंदूंचे) नि विद्यार्थ्यांचे सैनिकी प्रशिक्षण यासाठीच केला जावा.
मरणोत्तर सावरकर
सावरकर जन्मभर देशाला फक्त देतच राहिले याप्रकारे मरणोत्तर ही सावरकर भारताला ही काही तरी देतच राहतील हा संदेश ही यातून देता येईल. मला वाटते, याप्रमाणे वर्षातील केवळ एक दिवस देशासाठी वापरुन आपण सावरकरांना कृतीशील श्रध्दांजली अर्पूत! तीच सावरकरांना ही रुचेल यात शंकाच नाही.
लेखकाला वाटते की, सध्याची केंद्र नि अनेक राज्य सरकारे सावरकरांचे अनुसरण करणारी आहेत. तर मग त्यांनी येणारी सावरकर पुण्यतिथी (२६ फेब्रुवारी) साठावी पुण्यतिथी असल्याने तिच्यापासून सावरकरांचा आत्मार्पण ‘देशभक्ती दिनः एक दिवस देशासाठी!’ म्हणून घोषित करावा. सोबतच अहमदाबादचे कर्णावती, अरबी समुद्राचे पशिम समुद्र आणि पोर्ट ब्लेअरचे वीर सावरकर नामकरण करीत त्यांना श्रध्दांजली अर्पण करावी.
(लेखक व्यवसायाने मनोचिकित्सक असून ‘दशग्रंथी सावरकर’ या पीएच डी समतुल्य उपाधि अन महाराष्ट्र शासन-विवेक व्यासपीठाच्या ‘सावरकर वीरता’ पुरस्काराने सन्मानित)
