डॉ. नीरज देव

वीर सावरकरांच्या मृत्यूला ५७ वर्षे होताहेत आणि त्यांनी अंदमानातून ब्रिटिशांना धाडलेल्या तथाकथित क्षमापत्रांना तर चक्क १०० वर्षे होऊन गेलीत. मग त्यावर अजूनही इतका गहजब, गोंधळ का? वीर सावरकर कधीही, कोणत्याही सत्तास्थानावर नव्हते त्यांनी कोणत्याही स्तरावरची एकही निवडणूक लढविली नव्हती. त्यांनी शासन-प्रशासनात कोणतेही अधिकारपद भूषविले नव्हते. त्यांच्या वंशजातील कोणीही, कधीही सत्तास्थानावर नव्हते. बरे त्यांनी कोणती एखादी संघटना स्थापली होती, असेही नाही. मग सावरकरांच्या तथाकथित क्षमापत्रांचे एवढे भांडवल का बरे केले जात असावे? सोबतच त्यांच्यावर माफी मागण्याची वेळ का आली असावी? त्यांनी खरेच माफी मागितली होती का? असेल तर कोणत्या परिस्थितीत मागितली ? त्यांचे वागणे क्षमाप्रार्थी सारखे होते का? अशा अनेक प्रश्नांचा उहापोह आपण या लेखात करण्याचा प्रयास करुयात.

माफीनामा म्हणजे काय?

माफीनाम्यावर विचार करताना हे निश्चित करणे गरजेचे आहे की, माफीनाम्यात कोणकोणत्या बाबी अंतर्भूत होतात.

०१. माफीनाम्यातील लिखाण बिनशर्त असावे.
०२. आपण केलेले काम चुकीचे होते व त्याविषयी पश्चाताप प्रकट केलेला असावा.
०३. आपल्या त्या कामात सहभागी सहकाऱ्यांची नावे उघड केलेली असावी.
०४. सोबतच आपण काय काय केले त्याचे गुपित नि तपशील दिला जावा.
०५. विनाअट मी पुन्हा तसे करणार नाही याची शाश्वती असावी.
०६. सुटकेनंतर त्या कामाशी वा कार्यातील सहकाऱ्यांशी संबंध तोडलेले असावे.
०७. ज्यांच्याकडे माफी मागितली त्यांनी पण मानायला हवे की ही व्यक्ती आता बदलेली आहे.

वरील सर्व मुद्दे ज्यात मिळतील त्यालाच माफीनामा म्हणता येईल. येथे हे ही लक्षात ठेवणे गरजेचे आहे की राजनीतिक कामात तात्कालीक माफीनाम्याची गरज असते. आणि परिस्थिती जर युध्दमान असेल तर ती निकड आणखीनच वाढते. आता पहिला प्रश्न उभा राहतो –

वीर सावरकर यांचे छायाचित्र

सावरकरांना क्षमायाचना करण्याची वेळ का आली असावी?

उत्तर स्पष्ट आहे, वीर सावरकरांना दोन जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती म्हणून ! त्यांना एवढी अमानुष शिक्षा देण्याचे कारण एकच होते; ते इंग्रजांकडे कोणतीही मागणी करत नव्हते तर सरळ ब्रिटिशांना भारतातून हाकलण्याची कृतीशील योजना आखीत होते. त्यासाठी सशस्त्र क्रांतीचा उघड पुरस्कार करत होते. विविध ग्रंथ लिहून, भाषणे देऊन सशस्त्र क्रांतीचे तत्वज्ञान त्यांनी अतिशय कोवळ्या वयात निर्माण केले होते. ते तत्वज्ञान जगभर पसरलेल्या सर्व भारतीय क्रांतीकारकांना पथदर्शक होते. सावरकरांचे हे काम इंग्रजांना दहशतवादी, अराजकता पसरवणारे व पर्यायाने राजद्रोही वाटत होते. ‘सावरकरांनी ब्रिटिश साम्राज्याशी युध्द पुकारले आहे.’ असाच अर्थ इंग्रजांनी त्यातून काढला व त्याच आधारे दोन जन्मठेपेची शिक्षा सावरकरांना देण्यात आली.

नीट पाहीले तर अशी अमानवी शिक्षा इंग्रजांनी गांधी, टिळक अशा पुढा-यांना तर सोडून द्या पण वासुदेव बळवंत फडकयांसारख्या महान क्रांतिकारकालाही दिली नव्हती. ही शिक्षाच सावरकरांच्या बावन्नकशी देशभक्तीचा ठसठशीत पुरावा आहे अन् त्यांच्या कथित माफीनाम्याचे कारणही आहे. माफीनाम्याची ओरड करणारे ही शिक्षा कशी काय विसरतात? हे त्यांच्या स्वयंस्फूर्त विसरण्याच्या कलेलाच ठाऊक. यावर काही जण म्हणतील जर सावरकर इतके धोकादायक होते तर –

सावरकरांना फाशीची शिक्षा का दिली नाही?

सावरकरांना फासावर चढवू नये असा विचार करण्याइतपत इंग्रज सदय नव्हते. पण त्यांना निरुपायाने सावरकरांना फासावर चढविता आले नाही. त्यामागे अनेक कारणे आहेत.
अ) मार्सेल्सला उडी घेऊन सावरकरांनी तयार करुन ठेवलेला आंतरराष्ट्रीय तिढा.
ब) फ्रांस सरकारने इंग्लडकडे केलेली सावरकरांची मागणी.
क) सावरकरांसाठी फ्रांसने हेगच्या आंतरराष्ट्रीय लवादाकडे ब्रिटनविरुध्द दाखल केलेली न्यायालयीन याचिका.
ड) फ्रांसच्या भूमिकेला जर्मन, इटली, स्वित्झर्लंड, बेल्जियम, झेकोस्लाव्हिया इ अनेक युरोपियन राष्ट्रांनी दिलेला पाठींबा.
इ) खुद्द इंग्लडमध्ये सावरकरांच्या समर्थनार्थ अन् ती ही गाय आल्ड्रेड सारख्या ब्रिटिशाच्या नेतृत्वात उभी राहिलेली चळवळ.
ई) वयाच्या २७ व्या वर्षी अवघ्या युरोप नि अमेरिकाभर सावरकरांची ‘भारताचा जोसेफ जोसेफ माझीनी, गारीबॉल्डी, कोवूर अशी झालेली ख्याती.

या सगळ्या बाबींचा विचार करता सावरकरांना फाशीची शिक्षा ठोठावणे इंग्रजांना आंतरराष्ट्रीय दृष्टया परवडणारे नव्हते. त्यामुळे हेगच्या आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय लागण्याआधीच इंग्रजांनी घाईघाईने सावरकरांना दोन जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्यात ‘आपण फ्रेचांचे बंदी असून इंग्रजांचा आपल्याशी काही संबंध नाही.’ अशी ठोस भूमिका घेत सावरकरांनी खटल्यात भागच घेतला नव्हता. तरीही इंग्रजांनी एकतर्फी कारवाई करीत त्यांना शिक्षा सुनावली.

हे पण वाचा “अयोध्येत कारसेवकांचे रक्त सांडणाऱ्यांचा सन्मान केला जातो, पण…” वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत शिवसेनेचे मोदी सरकारवर टीकास्त्र!

दोन जन्मठेपेची शिक्षा दिल्याने सावरकर हा किती मोठ्ठा गुन्हेगार आहे हे इंग्लडला हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे विनायास मांडता येणार होते. याऐवजी जर सावरकरांना फाशी दिली असती तर युरोपभर सावरकरांची प्रतिमा महान हुतात्म्याची म्हणून आणखीनच प्रखरतेने उजळली असती. परीणामी इंग्लडविरुध्द आंतरराष्ट्रीय क्षोभ उसळला असता. फ्रांससारखे मित्र राष्ट्र इंग्लडच्या विरुध्द गेले असते. नि या सगळ्या घडामोडीत हेगच्या न्यायालयातील ब्रिटनचा दावा कमजोर पडला असता. हे सर्व टाळण्यासाठी सावरकरांना फाशीऐवजी दोन जन्मठेपीची शिक्षा सुनावत इंग्लडने एका दगडात अनेक पक्षी मारले असेच म्हणावे लागेल.

इंग्लंडचा हा होरा किती खरा होता हे हेगच्या निर्णयानंतर लगेच सिध्द झाले. युरोप, अमेरिकेतील बहुतेक वृत्तपत्रांनी हेगच्या निकालावर ताशेरे ओढले. निकालाच्या तिस-याच दिवशी फ्रेंच पंतप्रधान ब्रिआùला राजीनामा द्यावा लागला. सावरकर प्रकरणातील हा सर्वात मोठा बळी होता. यावरुनच सावरकरांना फाशीची शिक्षा सुनावली असती तर ब्रिटनला युरोपात कुठे कुठे अन् काय काय तोंड द्यावे लागले असते याची कल्पना येऊ शकते.

सावरकरांनी खरंच माफीनामे लिहीले का?

वर उल्लेखित माफीनाम्याच्या व्याख्येचा विचार करता; या प्रश्नाचे एका शब्दात उत्तर देता येईल ‘नाही’! मात्रं सुमारे ११ दयापत्रे सावरकरांनी इंग्रज सरकारला पाठविली. यातील पहिले डोंगरीच्या तुरुंगात असतानाच लिहीले. अंदमानातील पहिले ३० आùगस्ट १९११ चे असून शेवटचे ६ एप्रिल १९२० चे आहे. त्यानंतरची दोन रत्नागिरीच्या तुरुंगातील आहेत. अशी दयापत्रे पाठविण्याचा अधिकार जन्मठेपेची शिक्षा भोगणा-या कैद्यांना असतो अन् सर्वचजण तो घेतात. ही दयापत्रे ठराविक नमून्यातच (Prescribed Formate) पाठवावी लागतात. सावरकरांनी पाठविलेल्या दयापत्रांमागील कारणे खालीलप्रमाणे होत-

१) सावरकरांचा अंदमानातील कारावास सुमारे ३५८० दिवसांइतका प्रदीर्घ होता.
२) सावरकरांना कारावासात गांधी, नेहरु इतकेच कशाला भगतसिंहांसारख्यांना दिल्या जाणा-या मूलभूत सुविधाही नाकारण्यात आल्या होत्या.
३) सावरकरांचा मानसिक नि शारीरिक असा अनन्वित छळ केला जात होता.
४) सावरकर मूलतःच विधिज्ञ होते. त्यामुळे त्यांना ब्रिटिश कायद्याची परिपूर्ण माहिती होती. तिचा फायदा न उठविणे चूकीचेच ठरले असते.

याशिवाय सावरकरांच्या धोरणांत ‘शत्रूसोबत सत्य, अहिंसा, प्रामाणिकता, शुचितेने वागले पाहिजे’. या विचारविकृतीला स्थान नव्हते. तर शत्रूला ठकवून, भूलवून, अवचित गाठून कशाही प्रकारे ठेचलेच पाहिजे. या कृष्णनीतीचे वा शिवनीतीचे अनुचरण होते. आग्य्राच्या कैदेतून सुटका करुन घेताना महाराजांनी वापरलेल्या अनेकविध युक्त्या सर्वांना ठाऊकच आहेत.

वीर सावरकरांनी दयापत्रांची माहिती जनतेपासून लपवून ठेवली का?

  • बहुतेक विरोधकांचा दावा असतो सावरकरांची दयापत्रे आम्हीच शोधून काढली. वस्तुस्थिती नेमकी उलटी आहे. या दयापत्रांचा उल्लेख नि त्यात काय काय लिहून दिले. याचा ब्यौरा विनायकरावांनी त्यांच्या लहानभावाला लिहीलेल्या पत्रात दिलेला आहे. ही सर्व पत्रे समग्र सावरकर साहित्याच्या दूस-या भागात प्रसिध्द झालेली आहेत. शिवाय सावरकरांनी लिहीलेल्या माझी जन्मठेप या विख्यात पुस्तकात या दयापत्रांचे तपशीलवार वर्णन आहे. याचाच अर्थ ही दयापत्रे सावरकरांनी आपल्या देशबांधवांपासून लपवून ठेवलेली नाहीत तर सर्वप्रथम त्यांनीच जनतेसमोर मांडलेली आहेत. त्यामुळे आपणच ती शोधल्याचा उसना आव कोणी आणू नये. या दयापत्रांत काय होते?

डोंगरीतून लिहीलेल्या पहिल्या आवेदनात दोन जन्मठेपीची शिक्षा एकाच वेळी भोगता येतील का ? याची विचारणा सावरकरांनी केली होती. कायद्याच्या अभयासकांना माहिती असेल की एका जन्मात एकच जन्म असल्याने एकच जन्मठेप भोगता येते. जन्मठेप म्हणजे मरेपर्यंत तुरुंगात रहावयाचे नसून व्यक्तीच्या कर्तृत्वाचा काळ तुरुंगात जावा असा हेतू असतो. त्याकाळी जन्मठेपेचा कालावधी युरोपात १४ वर्षांचा होता. त्या न्यायाने पाहता सावरकरांना दिलेली ५० वर्षाची शिक्षा युरोपातील सुमारे साडेतीन जन्मठेपीची ठरत होती, हे न्यायसंगत नाही हे सावरकरांना कळत होते.

शिवाय जर एखाद्या व्यक्तीला तीन वेगवेगळ्या प्रकरणांत १४,०७ नि ०३ वर्षांची शिक्षा झाली; तर ती त्याला १४+७+३= २४ अशी चोवीस वर्षे भोगावी लागत नसून, पहिल्या १४ वर्षातच ७ नि ३ वर्षांची सजा त्याने भोगली असे मानले जाते. शिवाय तुरुंगातील चांगली वागणूक, राज्यातील विविध राजकीय सण-समारंभ नि राजाची कृपा इ मुळे १४ वर्षात आणखी सूट मिळून ७ ते ८ वर्षातच कैदी सुटू शकतो. कायद्याचे हे ज्ञान असल्यानेच सावरकरांनी पहिले दयापत्र लिहीले. याला उत्तर देताना एप्रिल १९११ त इंग्रज सरकारने, ‘पहिल्या जन्मठेपेची २५ वर्षे तर आधी संपू द्या त्यानंतर पुढचा विचार करु.’ असे निष्ठूरपणे कळवले होते. कल्पना करा कुणी जर आपल्याला म्हटले की २५ दिवस थांबा मग पाहू तरी आपला धीर सुटतो नि हा देशभक्त २५ वर्षांनी विचार करु म्हटल्यावर ही घाबरला नाही, किंचितही चळला नाही. मात्रं दयापत्रे पाठविण्याचा सिलसिला थांबवला नाही. हे सावरकरांचे मुत्सद्दीपणच दाखवते.

१९१३ साली पाठविलेल्या याचिकेत सावरकरांनी म्हटले होते कि, ‘ माझ्या राष्ट्रास विधायक प्रगती करण्याची संधी दिली तर मीच काय माझे क्रांतिकारक सहकारी सुध्दा शांततेच्या मार्गाने जाण्यास तयार होतील.’ ही याचिका झळकावत विरोधक सावरकरांनी सपेशल शरणागती घेतली होतीचा दावा करतात. ही याचिका, याचिकेची पृष्ठभूमी सावरकरांनी स्वतःच माझी जन्मठेपेत सांगितलेली आहे. त्याचा तपशील त्यांनी नारायणरावांना लिहिलेल्या पत्रात दिलेला आहे. तो मूळातून वाचावा. यावर अधिक टिपणी न करता ज्यांच्या सूचनेवरुन सावरकरांनी ही याचिका लिहीली त्या गृहमंत्री सर क्रेकार्डचा अहवाल वाचला तर याचिकेचे मूल्य चटकन कळेल. ते लिहीतात, ‘ सावरकरांनी कोणताही खेद, खंत वा पश्चाताप व्यक्त केला नाही….सावरकर किती प्रमाणात खतरनाक राहणार हे १०, १५ किंवा २० वर्षांनी कळेल.’

१९१४ साल म्हणजे दूस-या महायुध्दाचा काळ यावर्षी पाठविलेल्या दीर्घ पत्रात सावरकर मागणी करतात की ‘भारताला औपनिवेशक स्वायत्तत्ता प्रदान करावी, त्यात हिंदी लोकांचे बहुमत असावे या बदल्यात भारतीय क्रांतीकारक ब्रिटिशांना दूस-या महायुध्दात सहकार्य करतील.’ हे पत्र दाखवित विरोधक ओरडतात १९१४ च्या माफीनाम्यात सावरकर इंग्रजांना युध्दात मदत करायचे वचन देत होते. यापत्राला माफीनामा म्हणणे हास्यास्पदच होय. हा सरळ सरळ सौदा होता. भारताला स्वायत्तत्ता दिली तर मदत करु ही अट तेच तर दाखवते.
५ आकटोबर१९१७ रोजी ब्रिटिशांना धाडलेल्या दयापत्रांत सावरकरांनी म्हटले होते ‘सर्व राजबंदीवानांना सोडण्यात यावे. यातून मला वगळले तरी चालेल.’ यावर दस्तुरखुद्द इंग्रजांनी ‘सावरकरांकडून राजबंद्यांच्या सुटकेसाठी आलेले दयापत्र. (ज्यात त्यांना स्वतःला क्षमा मिळायला हवीच असे नाही)’ असा शेरा मारलेला आहे. स्वत;पेक्षा आपल्या इतर सहका-यांची, देशभक्तांची काळजी करणा-या या आवेदनाला माफीपत्र एखादा मतिमंदच म्हणू धजेल.
अगदी याच आशयाचे दयापत्र सावरकरांनी इंग्रज सरकारला दि ४ ऑगस्ट १९१८ ला धाडले होते त्यातही ‘माझ्यामुळे इतर राजबंद्याना सोडण्यात सरकारला अडथळा वाटत असेल तर माझे एकट्याचे नाव वगळायला मी स्वतः अत्यंत आनंदाने संमती देत आहे.’ असा उदार निर्वाळा सावरकरांनी दिलेला दिसतो.
१९२० साली सावरकरांनी तीन दयापत्रे पाठविलेली दिसतात. यात ज्या भारतीय क्रांतीकारकांना परदेशात निर्वासित व्हावे लागले त्यांनाही क्षमादानाच्या कक्षेत सामावून घ्यावे असे सूचविले होते. यातून स्वतःचे नांव वगळण्यास त्यांनी मान्यता दिली होती.
सावरकरांची ही सारी दयापत्रे पाहिली तर ध्यानांत येते की, यातील एकही माफीपत्राच्या व्याखेत बसणारे नाही. उलट सा-यांच दयापत्रातील भाषा जरतारी आहे. दूसरी बाब म्हणजे सावरकर भारतीय क्रांतीकारकांच्या नेत्याच्या भूमिकेतूनच सरकारशी वारंवार पत्रव्यवहार करीत होते. यामागे स्वतःही अंदमानातून बाहेर पडावे ही योजना होतीच. याचे कारण साफ होते अंदमानात सडत राहण्याने राजकीय देशकार्य तर थांबलेलेच होते त्यापेक्षा काही अटी तात्पुरत्या मान्य करुन बाहेर पडल्यास उघडपणे सामाजिक, सांस्कृतिक इ क्षेत्रात देशकार्य करता येणार होते, नि छुप्या पध्दतीने राजकीय कार्यही करता येणार होते. विरोधक आरोप करतात की सावरकर इंग्रज सरकारशी पत्र व्यवहार करताना सन्मानदर्शक नि नम्र भाषा का वापरत होते ?

अहो ! विव्दत जन हो, ज्यांच्या भयंकर टाचांखाली आपले राष्ट्रच्या राष्ट्र दबलेले आहे. त्यांच्या तुरुंगात असताना त्यांच्या कडून आपले कार्य साधून घ्यायचे असेल तर भाषा आदरार्थक नि नम्रच असायला हवी. त्याने घातलेली बंधने वरवर का होईना मान्य करायलाच हवी. हे कोणीही सुज्ञ सांगेल एखादा अडाणीच शिव्याशाप देत ‘दुश्मनांनो ! मला सोडा नाहीतर मी रडेलची.’ धमकी देत स्वतःचा मूर्खपणा सिध्द करील हे वेगळे सांगायची गरज नसावी.
शिवाय हे लिखाण तुरुंगातील होते नाशिक, पुणे, लंडन अशा मुक्त काळातील नव्हते. कोणताही दबाव नसताना; मुक्त वातावरणात पितामह दादाभाई नौरोजी स्वतःस ‘ब्रिटिशांचा एकनिष्ठ प्रजानन’ तर राष्ट्रपिता गांधीजी स्वतःस ‘ब्रिटिश साम्राज्याचा कैवारी’ म्हणवून घेत असत. त्या तुलनेत याचे मोल कितीसे असणार?

येथे हे ही सांगणे गरजेचे की आपण जसे आवेदन धाडले. तसेच इतरांनी धाडावे नि आपापली सुटका करुन घ्यावी म्हणून सावरकर इतरांना समादेश देत असत. काहीजणांना असे वाटते की, वीर सावरकर पक्के देशभक्त होते पण अंदमानातील छळाने खचून त्यांनी माफीपत्रे पाठविली असावीत. खरंच….

अंदमानातील छळाने सावरकरांचे मनोबल तुटले होते काय?

पन्नास वर्षांची जन्मठेप म्हणजे सुटका होणार तेंव्हा सत्तावीस वर्षीय युवा सावरकरांचे वय असणार सुमारे सत्त्याहत्तर, अठ्याहत्तर वर्षांचे! या विचाराने कोणीही खचून गेला असता; पण सावरकरांनी ते हिंमतीने स्वीकारले, धैर्याने सोसले. पण कधी कधी धैर्य सुटे, मन निराशेने भरुन येई, मनांत आत्महत्येचे विचार येत. हे सारे मानवीयच होते, स्वाभाविक होते. पण ते त्यांनी कधीही इंग्रजांजवळ व्यक्त केले नाही. सदसदविवेकाचा वापर करुन त्यावर मात केली.

इंग्रजी अधिका-यांचे अहवाल, इंग्रज सरकारचे सावरकरांबाबतचे धोरण अंदमानातील छळाने सावरकर खचले नव्हते, हेच दाखविणारे आहे. १९१९साली चीफ कमिश्नर मॉरिसनने सावरकर बंधुंविषयी लिहीले कि, ‘बाबारावांना तो ओळखत नसून शिक्षेने ते तुटले वा खचले आहे की नाही सांगता येत नाही. पण विनायक सावरकर अजिबात तुटलेले किंवा खचलेले दिसत नाहीत.’

अंदमानातील इतर बंदीवानांसमोर सावरकरांची प्रतिमा खंबीर देशभक्त वीराची होती. याचा सबळ पुरावा म्हणजे अंदमानात सजा भोगता भोगता वेडेपणाचा झटका आलेल्या उल्हासकर दत्त या बंगाली क्रांतीकारकाच्या आत्मचरित्रातील एक प्रसंग होय. उल्हासकर दत्त लिहीतात, ‘त्यादिवशी मला १०७ डिग्रीचा ताप होता. तरीही मला बांधून जखडून ठेवले होते. त्यात मला भास होऊ लागला. बंदीपाल बारी म्हणाला, ‘चल माझ्याशी व्दंव्द खेळ ! तुझ्या बाजूने कोणी प्रतिनिधी असेल तर त्याला बोलाव.’ मला चटकन विनायक सावरकर आठवले. मी लगेच त्यांना बोलावले. बारीने एक हातमोजा सावरकराकडे फेकला. बारी व सावरकरांचे व्दंव्द सुरु झाले. सावरकरांनी एका ठोश्यात बारीला पाडले.‘

कल्पना करा ! मानसिक ताणाच्या टोकावर, भास होत असताना, भास जागृत नाही तर सुप्त मनाला होतात. त्या सुप्त मनांत उल्हासकर दत्त सारख्या श्रेष्ठ प्रतीच्या क्रांतिकारकाच्या मनात बारीला टक्कर देणारा एकटा विनायकच वीरवर वाटत असेल, तर सावरकर खचले, तुटले होते म्हणून त्यांनी माफीपत्रे धाडली.‘ असे म्हणता येईल का ? नाही ! दयापत्रे हे तर केवळ नि केवळ कूटनीतीचे धोरण होते.

सावरकरांच्या माफीनाम्यावर इंग्रज सरकारने विश्वास ठेवला का?

सन १९१३ साली इंग्रजांचे गृहमंत्री सर रेजिनाल्ड क्रेकॉर्डने सावरकरांच्या दयापत्रावर प्रतिवृत्त लिहीतांना लिहीले, ‘सावरकरांच्या दयेचे आवेदनपत्र माझ्या हातात आहे. त्यांना इथे काही स्वातंत्र्य देणे अशकयच आहे.’ पुढे त्यांनी लिहीले, ‘सावरकर असे महत्वाचे नेते आहेत की, हिंदी अराजकवाद्यांचा युरोपयिन गट त्यांच्या सुटकेसाठी कट करेल नि तो त्वरेने अंमलात आणला जाईल.’ तर त्यानंतर सुमारे दहा वर्षांनी १९२३ मध्ये गृहखात्यातील एक अधिकारी जे ए शिलीड यांनी सावरकरांना भेटल्यावर सरकारकडे अभिप्राय नोंदविला की, ‘सावरकरांवर विश्वास ठेवून ते सरकारशी सहकार्य करतील अशी आशा बाळगणे भ्रामक ठरेल. सशस्त्र क्रांतीकारक काहीही नवे शिकत नाहीत व ते कधीही बदलत नाहीत.’ तर त्यानंतर अदमासे महिन्याभरानंतर सावरकरांना भेटल्यानंतर गृहमंत्री मॉरिस हेवर्डांनी मुंबईच्या गव्हर्नरांना लिहीले की, ‘माझा सावरकरांवर विश्वास नाही हे मला मान्यच करायला हवे. सावरकरांची सुटका करणे योग्य होणार नाही.’ त्यानंतर मुंबईचे गव्हर्नर जाùर्ज लाùईडही सावरकरांना भेटायला गेले. त्यांचाही सावरकरांवर भरवसा बसला नाही पण चांगले धोरण म्हणून कडक अटी घालून सावरकरांना सोडावे असे त्यांचे मत पडले.
सावरकरांच्या राजक्षमेबाबत ‘दुरात्म्यांना दया दाखवावी, पण सावरकर बंधूना नाही.’ असा सर प्रभाशंकर पटणी यांचा अभिप्राय तर ब्रिटिशांचे धोरण सावरकरांबाबत किती क्रूरपणाचे होते हेच दाखविणारा आहे.
नीट पाहीले तर लक्षात येते १९१३ ते १९२३ म्हणजे सुमारे अकरा वर्षा दरम्यान ‘सावरकर जसेच्या तसेच प्रखर क्रांतीकारक आहेत.’ असे अभिप्राय तत्कालीन दोन दोन गृहमंत्र्यांनी दिलेले आहेत. याचाच अर्थ सावरकरांच्या दयापत्रांना दयापत्र मानायला इंग्रज सरकारच तयार नव्हते. मग इतर सोमेगोमे काहीही बरळत असले, तरी त्यावर किती विचार करावा हे सुजाण वाचकांनी ठरवावे.

सावरकरांवर भरोसा ठेवायला इंग्रज तयार नव्हते – शचींद्रनाथाचा अनुभव


  • हे झाले प्रत्यक्ष राज्यकर्त्या इंग्रजांचे. पण तत्कालीन देशभक्तांची सावरकरांच्या दयापत्रांबाबत काय लिहिले हे पाहणे उद्बोधक ठरेल. सावरकरांनी असे दयापत्र सरकारला पाठवावे अशी सुस्पष्ट भूमिका म गांधीनी सावरकरांचे लहान बंधू नारायणराव सावरकरांना पाठविलेल्या पत्रात कळविलेली होती नि त्याचा जाहिर पुनरुच्चार यंग इंडीयात ही केला होता.

भगतसिंहांचे गुरु नि हिंदुस्थान सोशùलिस्ट रिपब्लीकन आर्मीचे संस्थापक सदस्य शचींद्रनाथांना इंग्रजांनी ऑगस्ट१९१६ साली अंदमानात जन्मठेपेवर पाठविले होते. त्यांनी इंग्रजांकडे दयापत्र सादर केल्यावर फेब्रुवारी १९२० मध्ये म्हणजे केवळ साडेतीन वर्षात जन्मठेपेची शिक्षा माफ करुन मुक्त करण्यात आले होते. ते सावरकरांसोबतच अंदमानावर होते. सावरकरांच्या मुक्ततेसाठी ते ही कार्यरत होते. या संदर्भात आत्मकथा बंदी जीवन मध्ये ते लिहीतात की, ‘ज्या प्रकारचे दयापत्र मी दिले होते तसेच विनायक सावरकरने दिले आहे. मला सोडण्यात आले पण त्यांना का नाही?’ असा प्रश्न मी वी सी चटर्जींना विचारला तेंव्हा ते मला म्हणाले, ‘‘बात असल में यह है कि मरहठों के ऊपर अंग्रेजों का बिल्कुल विश्वास नहीं हैं । बंगालियों के ऊपर अंग्रेजी सरकार यह भरोसा कर रही है कि बंगाली जैसा कहेंगे, वैसा करेंगे लेकिन मरहठे ऐसा कभी नहीं कर सकते।’’
सांन्याल पुढे लिहीतात की ते ऐकल्यावर माझी मलाच लाज वाटली. कारण इंग्रज बंगाली लोकांपेक्षा मराठ्यांना कुटूनीतिच्या दृष्टीने उच्च स्थान देत होते. सांन्यालांसारख्या दोनदा जन्मठेपीची शिक्षा झालेल्या क्रांतीकारकाच्या वक्तव्यावर आणखी वेगळे स्पष्टीकरण देण्याची गरजच नाही

दयापत्रांशिवाय सावरकरांच्या सुटकेचे इतर प्रयत्न

एमडेन ही जर्मन युध्दनौका सावरकरांना सोडविण्याच्या इराद्याने अंदमानच्या जवळ आली होती, असे ब्रिटिशांचेच म्हणणे आहे. १९२० साली गांधीजींनी नि १९२१ मध्ये अलाहाबादच्या लीडरमधून तसेच अन्य काही वृत्तपत्रांनी व नेत्यांनी सावरकरांना सोडण्याची मागणी केलेली दिसते. काùग्रेसच्या अधिवेशनातून शचींद्रनाथ सांन्याल आणि नारायणराव सावरकर यांनी सावरकरांच्या मुक्ततेसाठी ठराव पास करुन घेतला होता. नारायणरावांनी तर सावरकर बंधूंच्या सुटकेसाठी सह्यांची मोहीम हाती घेतली होती. सुमारे पाऊण लाख सह्यांचे निवेदन त्यांनी इंग्रजांना धाडले होते. हे झाले अंदमानातून सावरकरांना भारतात आणण्यासाठीचे प्रयत्न.
रत्नागिरीच्या स्थानबध्दतेतून सोडण्यासाठी प्रयास करावे लागले ते वेगळेच. पण नोंद करण्यासारखी बाब म्हणजे ‘सावरकरांना अंदमानातून सोडा’ म्हणणारे गांधीजी सावरकरांना ‘रत्नागिरीतून मुक्त करा’ या मागणीवर बोलायला तयार नव्हते. ‘लंडनला भेटलेले उग्र क्रांतिकारक युवा सावरकर नि रत्नागिरीला भेटलेले अंदमानोत्तर सावरकर समानच आहेत.’ हे कूटनीति पारंगत गांधीजीना उमगलेले सत्यच त्यामागे होते.

सावरकरांची अंदमानातील मुक्तता दयापत्रांमुळे नाही

  • १९२० च्या आसपास सावरकर वगळता जवळपास सर्वच राजबंदी अंदमानातून सोडण्यात आलेले होते. अगदी जन्मठेपीवर आलेल्या काहीजणांना तर संपूर्णपणे मुक्त करण्यात आले होते. केवळ सावरकर बंधू नि मोजके क्रांतीकारक अंदमानात बाकी होते. १९१९ ते १९२१ च्या आसपास सेल्युलर जेल बंद करण्याचा सरकारचा विचार चाललेला होता. तशा हालचालींना आरंभही झालेला होता. मुख्यतः जेल बंद करण्याच्या विचारातूनच सावरकरांना अंदमानातून भारतातील तुरुंगात हालविण्यात आले. त्यानंतरही सुमारे तीन वर्षे त्यांना अलीपूर, येरवडा, रत्नागिरी अशा कारागृहात डांबण्यात आले. १४ वर्षांच्या जन्मठेपीनंतर १३ वर्षांची स्थानबध्दता

१९२४ साली तुरुंगातून सुटका केल्यानंतर वीर सावरकरांना शचींद्रनाथ वा बारिंद्र घोष इतकेच कशाला त्यांचे मोठे बंधू बाबाराव सावरकरांसारखी संपूर्ण मुक्तता दिलेली नव्हती. गांधी, नेहरुसारखे राजकारण करायला, इतकेच नव्हे तर राजकारणावर भाष्य करायला सावरकरांना बंदी घालण्यात आली होती. शिवाय रत्नागिरी या दुर्गम नगरात सावरकरांना सुमारे तेरा वर्षे स्थानबध्द करुन ठेवण्यात आले होते. ती एक प्रकारची नजरकैदच होती. या तेरा वर्षात कित्येक वेळा सावरकरांच्या घराची झडती घेणे, सावरकरांना स्पष्टीकरण मागणे, तंबी देणे वा तात्पुरते तुरुंगात टाकणे या गोष्टी इंग्रज करीत होते. या सा-या बाबी इंग्रज सरकार सावरकरांपासून किती सावध रहात होते याच्याच निदर्शक आहेत.

इतर क्रांतिकारकांनीही अशी दयापत्रे पाठविली होती का?

होय, सावरकरांसोबत अंदमानांत शिक्षा भोगणा-या शचींद्रनाथ सांन्याल, श्रीअरविंद घोष यांचे बंधू बारिंद्र घोष, भाई परमानंद, काकोरी कटातील पं रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्र लाहिडी, अश्फाक उल्ला खां वारसी इ अनेकांनी अशा दयापत्रांचा सर्रास वापर करुन मुक्तता करुन घेण्याचा प्रयास केलेला आहे. असा प्रयास विविक्षित क्रांतीकारकांची ब्रिटिशनिष्ठा दाखवित नसून निखळ देशभक्ती नि कूटनीतीज्ञताच दाखविते. ‘ज्यांनी इंग्रजांविरुध्द काही केलेच नाही, उलट इंग्रजांना सहाय्यभूत होत राहीले, त्यांना इंग्रज शिक्षा करतीलच कशाला नि शिक्षाच नाही तर दयापत्र पाठविण्याची गरजच त्यांना पडणारच कशी ?’ या विधेयावर विचार केला तर दयापत्र पाठवणारे देशभक्त आहेत. हे समजायला वेळ लागणार नाही.
इथे काहीजण म्हणतील की कित्येक असे होते ज्यांना शिक्षा झाली. पण त्यांनी त्यावर दाद मागितली नाही, दयापत्र पण धाडले नाही. होय ! आहेत असेही वीर भारतमातेच्या पोटी जन्मलेत. त्यांचा निरलस नि निःस्सीम देशभक्तीला कोणीही नाकारत नाही, नाकारु ही नये. पण जेंव्हा अंतिम युध्द जिंकायचे असते त्यावेळी नेता सर्वस्वपणाला लावून फाशी चढल्याचा भावनिक आनंद मानणारा ताठर हवा की कूटनीतिक विचार करुन अंतिम जयापर्यंत कृष्णनीतीला व शिवरायांना अनुसरणारा सारासार विवेक ठेवणारा हवा याचा विचारही व्हायलाच हवा.

दयापत्रांना अनुसरुन वर्तन होते काय?


  • याचे सरळ उत्तर ‘नाही‘असेच आहे. स्थानबध्द असतानाही सावरकरांचे जूने सहकारी सेनापती बापट, व्ही व्ही एस अय्यर, भाई परमानंद सावरकरांशी विचारविमर्षासाठी आले होते. सावरकरांना भेटल्यावर अहिंसेच्या मार्गाला लागलेले ते पुन्हा क्रान्तिकारी कामाकडे वळलेले दिसतात. भगतसिंह, राजगुरु सावरकरांना भेटून मसलत करुन गेले होते. वामन चव्हाण, पवार सावरकरांनी घडविलेले रत्नागिरीतील तरुण सशस्त्र क्रांतीकारकांपैकी तरुण होते. वासुदेव बळवंत गोगटेंसारखे तरुण सावरकरांना भेटून क्रांतीकार्यात उतरत होते. गोगट्यांनी हाùटसनवर गोळ्या झाडल्या होत्या. चिलखत घातलेले असल्यामुळे तो बचावला नि गोगटे हौतात्म्यास हुकले. आपण सावरकरांपासूनच सशस्त्र क्रांतिकार्याची प्रेरणा घेतली हे वासुदेव बळवंत गोगटे नि वामन चव्हाणांनी स्वतः नमूद करुन ठेवलेय. या बाबी सावरकरांचे वर्तन तथाकथित माफीनाम्याला अनुसरुन नव्हते हेच दाखविते.

दुस-या महायुध्दात सावरकरांनी अवलंबिलेले ‘सैनिकीकरणाचे धोरण हा हिंदू महासभेच्या व्यासपीठावरुन चालविलेला अभिनव भारताचाच कार्यक्रम होता.’ हे सावरकरांनीच प्रतिपादन केले होते. या सैनिकीकरणातूनच आझाद हिंद सेना उभी राहीली हा सर्वज्ञात इतिहास आहे. म्हणजे सावरकरांचा तथाकथित माफीनामा इंग्रजांना खोटा वाटत होता ते खरेच ठरले असे म्हणावे लागेल.

सावरकरांच्या बदनामीमागील विरोधकांची व्यूहरचना

  • हिंदुत्ववादी विचारांचे अटलबिहारी जेंव्हा सत्तारुढ झाले तेंव्हा हिंदुत्ववाद आता सत्तासंघर्षात प्रबळ होणार हे विरोधकांना स्पष्टपणे दिसू लागले. खरे म्हणजे या हिंदुत्ववादावर सांस्कृतिक हिंदुत्वाचा पगडा होता. सांस्कृतिक हिंदुत्वावर विवेकानंद, अरविंदांपासून गोळवलकर, पांडुरंगशास्त्री आठवलेंपावेतो सा-यांचा ठसा उमटलेला आहे. हिंदुत्ववादी माणूस सावरकरांचे नाव घेतो पण मनाने जोडलेला असतो वरील सारख्या कोणाशी तरी ! सावरकरांचे राजकीय हिंदुत्व त्याला हवे असते पण सावरकरांचा बुध्दिवाद नको असतो, सावरकरांच्या पारतंत्र्यपूर्व काळातील अतुल शौर्याचा नि निःस्सीम त्यागाचा वारसा त्याला हवा असतो पण सावरकरांच्या विज्ञाननिष्ठेपासून तो दूर रहातो. सावरकरांपासून विचारभिन्नता राखत तो अतीव आदराने सावरकरांचे नाव मात्र घेत असतो.
    आणि विरोधकांची अडचण अशी असते की, हिंदुत्ववाद्यांचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नाही म्हणावे तो भारतीय सशस्त्र क्रांतीकारकांचे मुकुटमणी म्हणून हिंदुत्ववादी सावरकर पुढे ठाकतात. एम एन राùय, कामरेड डांगे नि नंबुद्रीपाद सारखे वामपंथी, असफ अली, राजन, राजगोपालाचारींसारखे काùंग्रेसी, इतकेच कशाला शिंकंदर हयात खान सारखे मुस्लिम लीगवाले सावरकरांनाच आपला प्रेरणास््रोत मानतात. तीच बाब सामाजिक सुधारणांची तेथेही हिंदुत्ववादी सावरकरच अग्रक्रमाने आडवे येतात. डिप्रेस्ड कलासचे महषीेर् वि रा शिंदे सावरकरांच्या समाजसुधारणेच्या कामावरुन जीव ओवाळून टाकतात नि जात्युच्छेदनाचे मर्म सावरकरांना गवसले आहेची ग्वाही देत डाù आंबेडकरांचे जनता ‘सावरकरांच्या सामाजिक क्रांतीत बुध्दाची झलक मिळते’ सांगून जाते. बुध्दिवाद नि विज्ञाननिष्ठेचा टेंभा मिरवावा तर येथेही हिंदुत्ववादी सावरकर उच्चकोटीची बुध्दिनिष्ठेची मशाल तेवत त्यांना आडवा येतो. इतिहास बदलायला जावे तो पुन्हा राष्ट्रवादाची धूरा तोलत हिंदुत्ववादी सावरकरच सामोरा येतो. तीच बाब साहित्यिक गुणांची नि काव्यकलेची ! याचाच अर्थ हिंदुत्ववादी विचारसरणीच्या विरोधकाला प्रत्येक आघाडीवर सावरकरांशीच मुकाबला करावा लागतो नि तिथे त्यांचा कस अपूरा पडतो. मग त्यावर एकच उपाय उरतो, सावरकरांची सार्वत्रिक बदनामी करण्याचा ! तेच धोरण हिंदुत्वविरोधक वापरताहेत.
    त्यासाठी त्यांनी सावरकरांच्या धर्मनिरपेक्ष हिंदुत्वावर सरळ हल्ला न करता त्यांचे तथाकथित माफीनामा प्रकरण, न्यायालयाने ज्यातून सावरकरांना निर्दोष सोडले ते गांधी हत्या प्रकरण अशा बाबी शोधून काढल्या. सावरकरांचे मूळ ग्रंथ नि इंग्रजांचे मूळ कागदपत्र न पाहता आणि पाहिले तर त्यातील संदर्भ अर्धवट व काही जागी तर चकक बनावट मांडून दुष्प्रचार अवलंबिला. त्यात एकच आरोप पुनःपुन्हा उगाळून नि त्यासाठी परस्परांचेच ठराविक लिखाण भककम पुरावा म्हणून लोकांना दाखवत, तो दुष्प्रचार अधिकच तीव्र केला. यासा-यात वीर सावरकरांची तेजस्वी प्रतिमा भंगेल असा विरोधकांचा कयास होता नि आहे ही.
    नीट पाहिले तर विरोधकांनी सावरकरांच्या दुष्प्रचारासाठी उचललेले मुद्दे कायद्याच्या भाषेतील आहेत. कायद्याची भाषा सामान्य लोकांनाच नाही तर सुशिक्षितांनाही फारशी समजत नाही. साधा अर्ज करायचा तर आपण स्टùम्प वेंडर कडून लिहून घेतो. जनतेच्या कायद्याच्या भाषेतील अज्ञानाचा फायदा विरोधक उचलताहेत. उदाहरणादाखल न्यायालयातील कोणत्याही प्रकारातील कोणताही निकाल पहा त्याची भाषा ‘सदर न्यायालयासमोर आलेल्या प्रकरणातील पुरावे पाहता, ते —यास गुन्हेगार साबित करण्यास पुरेशे नाहीत. त्यामुळे पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात येते आहे.’ अशाच भाषेत असतात. पण सावरकरांवरील गांधी हत्येचा मुद्दा उपस्थित करुन विरोधक न्यायालयाने सावरकरांना ‘पुराव्या अभावी सोडले’ अशी आवई उठवतात. जसे काही खरा पुरावा यांनीच दडवून ठेवला होता नि तत्कालीन सरकार वा पोलिस यंत्रणा नि प्रत्यक्ष न्यायालयही यांच्यापुढे मूर्ख होते. यात आपण न्यायालयीन निर्णयाची पायमल्ली करतो याचे भानही त्यांना राहत नाही. *विरोधकांचे दिवास्वप्नः
  • अशा दुष्प्रचाराने सावरकर बदनाम होतील, राष्ट्रवाद तुटून पडेल नि यांचे देशद्रोही मनसुबे साकार होतील अशा खोट्या आशेत विरोधक वावरत बसलेत. पण त्यांना ठाऊक नाही की सावरकर हे असे तेज आहे की जे मृत्युनंतर ५७ वर्षांनीही त्यांच्या हिंदुत्वविरोधी नि देशद्रोही इराद्यांना पुरुन उरेल. अहो, एखाद्या माणसाने शंभर वर्षांपूर्वी माफी मागितली काय अन् न मागितली काय तिचे मोल खरेच एवढे मोठे असते का ? की शंभर वर्षांनीही त्यावर चर्चांच्या फैरी झडाव्या, पक्ष नि प्रतिपक्ष समोरासमोर उभे ठाकावे? कोणतीही राजसत्ता कधीही पाठीशी नसताना अक्षरशः विजनवासात निधन झालेल्या नेत्याच्या नावाने मृत्युनंतर अर्ध शतकाने त्याच्या नावाने निवडणूकांचे फड रंगावे ? ह्या बाबी सावरकरांचे जिवंतपणच अधोरेखित करतात. विरोधक जेवढा विरोध करतील तेवढा तरुण वर्ग सावरकरांच्या अभयासाकडे वळेल. सावरकरांचा तटस्थ अभयास करताच, तोच वर्ग अधिक सावरकरनिष्ठ बनेल. कोणत्याही निःस्पृह नि त्यागी महापुरुषाची बदनामी बुमरँग होऊन विरोधकांवरच कोसळते. हा इतिहासाचा दाखला आहे. त्यामुळे सावरकरांची बदनामी ही विरोधकांना अधिक पतनाकडे घेऊन जाईल नि सत्ताकारणाचे त्यांचे स्वप्न मृगजळाप्रमाणे विरतच जाईल.
    ( डॉ. नीरज देव हे या ब्लॉगचे लेखक आहेत. दशग्रंथी सावरकर या पीएच डी तुल्य सन्मानपत्राने सन्मानित असून मनोचिकित्सक आहेत)