नुकतंच बातम्यांमध्ये वाचलं की अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विटरवरून काढता पाय घेतला. म्हणजेच काय तर तिने आपलं ट्विटर अकाऊंट डिअॅक्टीव्हेट केलं. बरं जी अभिनेत्री सतत विविध विषयांवर सोशल मीडियावर आपली मतं उत्स्फूर्तपणे मांडते, ती अचानक असं का करेल हा प्रश्न स्वाभाविकपणे मनात डोकावला. तेव्हा तिची बातमी वाचताना एक शब्द सतत डोळ्यासमोर येत होता. तो म्हणजे डिजिटल डिटॉक्स. ‘I am on digital detox’ असं तिचं विधानच होतं. आता बॉडी डिटॉक्स body detox हा शब्द तर कित्येकदा ऐकला, पण हा डिजिटल डिटॉक्स काय प्रकार आहे बुवा?

टॉक्सिक म्हणजे विषारी हे तुम्हाला माहितीच असेल आणि बॉडी डिटॉक्सिफिकेशन म्हणजे शरीरातील विषजन्य घटक बाहेर पडण्याची प्रक्रिया. ‘डिजिटल डिटॉक्स’ म्हणजेच डिजिटल उपकरण म्हणजेच मोबाइल, लॅपटॉप यांच्यापासून लांब राहणं किंवा त्यांचा वापर टाळणं. हा पर्याय निवडण्याचं सर्वांत मोठं कारण म्हणजे सोशल मीडिया. सकाळी उठल्यापासून ते रात्री अंथरुणात जाईपर्यंत आपण किती वेळ सोशल मीडियावर असतो याचा अनेकांना अंदाजही नसेल. या माध्यमाचा आपल्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात अतिरेक झाला आहे की सोशल मीडियाशिवाय व्यक्ती शोधणं कठीणच आहे. आता ज्या अर्थी इथं डिटॉक्स हा शब्द वापरण्यात आला आहे म्हणजे सोशल मीडियावर विषारी घटक आहेत हे नक्की. पण इथं विषारी घटकांचा अर्थ शब्दश: घेऊ नये. तर ट्रोलिंग, एकमेकांवर निशाणा साधणं, अगदी लहानसहान कारणांवरून ऑनलाइन ट्रोलिंगला सामोरं जाणं, हे सर्वसाधारणपणे सोशल मीडियावरील विषारी घटक. एकंदरीत काय तर, ऑनलाइन विश्वापासून घेतलेला संन्यास म्हणजेच ‘डिजिटल डिटॉक्स’. २०१३ मध्ये हा शब्द ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये समाविष्ट करण्यात आला. हा संन्यास मग काही काळासाठी सुद्धा असू शकतो किंवा कायमचाच.

वैद्यकीय क्षेत्रातल्या काही तज्ज्ञांच्या मते ज्यावेळी तुम्ही फेसबुक किंवा ट्विटर चेक करत असता त्यावेळी शरीरामध्ये चिंता दर्शवणारी लक्षणं आढळतात. साधं एखादं अॅप जरी उघडलं तरी काही प्रमाणात शरीरात अस्वस्थता आढळते. “सोशल मीडिया किंवा समाज माध्यमांचं व्यसन लागू शकतं आणि त्याचा या माध्यमाचा आपण कसा वापर करतो यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं. या माध्यमामुळं आपल्याला प्रचंड फायदा होऊ शकतो हे जितकं खरंय तितकंच त्याचा आपल्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो हे ही सत्य आहे,” तज्ज्ञांनी सांगितलंय.
सोशल मीडियाच्या व्यसनातून मुक्त व्हावं यासाठी केलेला प्रयत्न म्हणजेच ‘डिजिटल डिटॉक्स’.

‘शेप ऑफ यू’ या गाण्यामुळे जगभरात प्रसिद्धी मिळवलेल्या एड शीरन या ब्रिटीश गायकानेही काही महिन्यांपूर्वी ट्विटरला रामराम केला होता. ट्विटर अकाऊंट बंद करताना त्याने तरुणांना या मोहजालापासून दूर राहण्याची विनंतीदेखील केली होती. त्याच्या मते लोकांना आपले विचार सहज बेधडकपणे मांडता यावेत या चांगल्या हेतूने सोशल मीडियाचा शोध लागला होता. परंतु अनेक चांगल्या गोष्टींचा जसा गैरफायदा घेतला जातो त्याचप्रमाणे याचाही गैरवापरही वाढला आहे. अनेक लोक कोणताही विचार न करता मनाला वाटेल ते सोशल मीडियावर अपलोड करतात. कोणी काय लिहावं, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न जरी असला तरी आपल्यामुळे इतरांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याचे भान राखणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे. अनेक दहशदवादी संघटना याच समाजमाध्यमांच्या मदतीने तरुण वर्गाला चुकीच्या मार्गावर नेत आहेत. त्यामुळे ट्विटर अकाऊंट उघडले की काहीतरी नकारात्मकच वाचायला मिळतं आणि असा एक नकारात्मक विचार आपला संपूर्ण दिवस खराब करतो. त्यामु़ळे यावर एकमेव उपाय म्हणजे स्वत:च त्यापासून दूर जाणे आहे, असं म्हणत त्याने आपले ट्विटर अकाऊंट बंद केले. जस्टीन बिबरनेही सोशल मीडियावर प्रेयसीबाबत नकारात्मक प्रतिक्रियांना पाहून काही काळासाठी अकाऊंट डिअॅक्टीव्हेट केलं होतं. ग्रॅमी पुरस्कार विजेती पॉपस्टार रिहाना हिनेही मे २०१४ मध्ये इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट केलं होतं. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये तिने इन्स्टाग्रामवर पुनरागमन केलं. आमिर खानचा भाचा आणि अभिनेता इमरान खानने २०१०मध्ये वैतागून ट्विटर अकाऊंट डिलीट केलं. फक्त नकारात्मक कारणांसाठीच नाही तर टेक- ब्रेक घेण्यासाठीही म्हणजेच स्वत:ला काही काळासाठी सोशल मीडिया आणि फोनपासून लांब ठेवण्यासाठीही हा उत्तम पर्याय आहे.

बऱ्याचदा सुट्टीवर असतानाही सतत फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, मेसेंजर, व्हॉट्स अॅप यांसारख्या अॅप्सचे नोटीफिकेशन येत असल्याने तिथे लक्ष वेधलं जातं. स्वत:ला किंवा कुटुंबीयांना वेळ देण्यासाठी घेतलेली सुट्टी मग सोशल मीडियावरचे अपडेट्स तपासण्यात जाते. सध्याच्या घडीला हे सर्वांत मोठं व्यसन असून यात फक्त तरुणाईच नाही तर लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येक पिढी गुंतली आहे. विशेष म्हणजे ‘डिजिटल डिटॉक्स’साठी काही क्लासेससुद्धा घेतले जातात. ‘टाइम टू लॉग ऑफ’ time to logg off या नावाने जगभरात डिजिटल डिटॉक्ससाठी उपक्रम राबवले जातात. शांत झोप यावी, एकाग्रता वाढावी आणि ऑनलाइनपेक्षा ऑफलाइन लोकांशी जास्त चांगल्याप्रकारे वावरता यावं या उद्देशाने या उपक्रमांची आखणी केली जाते. यासाठी फीसुद्धा आकारला जातो.

सोशल मीडियाचं वाढतं व्यसन पाहता येत्या काळात ‘डिजिटल डिटॉक्स’शी संबंधित व्यवसाय चांगलेच फोफावतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एकही पैसा न मोजता स्वत:वर नियंत्रण ठेवूनही आपण ‘डिजिटल डिटॉक्स’ करू शकतो. काही काळासाठी सोशल मीडिया अॅप्सवरून रजा घेऊन तुम्ही हे नक्कीच करू शकता. तेव्हा यापुढे तुम्हीही सोशल मीडियाला कंटाळला, वैतागला असाल तर हा पर्याय नक्कीच वापरून पाहा.

तुमच्या प्रतिक्रिया कळवा :

swati.vemul@indianexpress.com