जय पाटील

असे कपडे घालायचेच कशाला? पुरुष असेच असणार, म्हणूनच आपण संधी देता कामा नये. काय गरज होती तिथे जायची? विनयभंग होवो वा बलात्कार… अशा प्रतिक्रिया अगदी सहज उमटतात. पण कोणाला तरी स्वतःच्या लैंगिक भावनांवर ताबा ठेवता येत नाही, म्हणून तिने किती काळ स्वतःच्या इच्छांना मुरड घालत राहायची? ट्विटरवर सोमवारी गाजलेल्या ‘आय नेव्हर आस्क फॉक इट’ या ट्रेण्डने हाच प्रश्न उपस्थित केला.

ब्लँक नॉइज या लिंगभेद आणि लैंगिक हिंसाचाराविरोधात काम करणाऱ्या संघटनेने हा ट्रेण्ड सुरू केला आणि त्याला ट्विटराइट्सने उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. सर्वसामान्य महिलांबरोबच अनेक पुरुषांनीही या विचाराला पाठिंबा दर्शवला. शिवसेना नेत्या प्रियांका चतुर्वेदी, गायक सोना मोहापात्रा, अंकुर तिवारी, पत्रकार बरखा दत्त यांच्यासारख्या अनेक मान्यवर आणि सेलिब्रिटीजनेही असे प्रश्न उपस्थित करण्याच्या मनोवृत्तीचा निषेध केला. अनेकांनी शोषितांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्यांविरोधात भूमिका घेण्याचा निर्धारही ट्विट्स आणि व्हिडीओ स्टेटमेन्ट्समधून व्यक्त केला.

विविध शहरांतल्या मुलींचं शोषण झालं तेव्हा त्यांनी कोणता पोषख घातला होता, याची यादीच मांडण्यात आली आहे. दिल्लीत कुर्ता, कोलकातामध्ये शाळेचा गणवेश, केरळमध्ये जीन्स-टॉप आणि नाइट ड्रेस अशी ही यादी आहे. यापैकी कुठे अनोळखी व्यक्तीने, कुठे नातेवाईकाने, कुठे किशोरवयीन मुलाने, कुठे प्रियकराने, तर कुठे चुलत-मावस भावांनी बलात्कार किंवा लैंगिक शोषण केल्याचे नमूद आहे. संघटनेने तयार केलेल्या व्हिडीओमध्ये अनेक शोषित मुलींनी आपल्याला आलेले अनुभव, त्याविषयी स्वतःच्या पालकांना सांगताना निर्माण झालेली अपराधी भावना, त्यावेळी आपण घातलेले कपडे याविषयी सांगितले आहे. काहींनी थेट कॅमेरासमोर, तर काहींनी समाजासमोर येणे टाळत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

ब्लँक नॉइजच्या संस्थापक जस्मीन पथेजा यांनी २०१८ पासून ही मोहीम हाती घेतली आहे. महिलांना जेव्हा लैंगिक शोषणाचा सामना करावा लागला, तेव्हा त्यांनी कोणत्या स्वरूपाचे कपडे घातले होते, हे दर्शवणारे एक प्रदर्शनच त्यांना उभे करायचे आहे. २०२३ पर्यंत त्या असे १० हजार पोषाख गोळा करणार असून इंडिया गेट परिसरात ते प्रदर्शित करणार आहेत.

शोषित महिला आणि मुली एकट्या नाहीत. त्यांच्या वेदना समजून घेणारा, त्यांच्यावर विश्वास ठेवणारा एक मोठा वर्ग समाजात अस्तित्त्वात आहे, हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवणं हा या मोहिमेमागचा उद्देश आहे. शोषितांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याऐवजी समाज म्हणून त्यांची जबाबदारी घेणं आवश्यक असल्याचंही बिंबवण्याचा प्रयत्न यातून करण्यात येणार आहे.