‘जपान’ म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे काय येतं? किमोनो आणि युकाटा परिधान केलेले स्त्री-पुरुष की, शिंटो धर्म मंदिरं, महात्मा बुद्धाची मूर्ती. झेन मेडिटेशन, फुजी पर्वत ते अगदी जपानच्या प्रगतीची खूण असलेली बुलेट ट्रेन. अगदी सुशी, रामेन नुडेल्सपासून ते जपानी चहापर्यंत अनेक गोष्टी आम्ही जपानी संस्कृतीचा भाग म्हणून सांगू. जपानी लोक दीर्घायुष्यासाठी प्रसिद्ध आहेत हेही नव्याने सांगायला नकोच ! ‘इकिगाई’च्या वाचकांना हे चांगलेच माहिती आहे. पण, जपानमधील ‘टाचियोमी’ संस्कृतीबद्दल कधी ऐकलंत का? जगाला ‘हायकू’ देणार्या जपानच्या वाचनसंस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या ‘टाचियोमी’बद्दल जाणून घेऊयात, आजच्या या जागतिक पुस्तक दिनविशेष लेखामधून…
काय आहे टाचियोमी?
टाचियोमी याचा जपानी भाषेत शब्दशः अर्थ होतो ‘उभे राहणे आणि वाचणे.’ जपानमध्ये अनेक पुस्तकविक्रेते पुस्तकं विकण्यासाठी दुकानाबाहेर खुली ठेवतात. ती दुकानात ठेवण्यापेक्षा रस्त्यावरील ये-जा करणार्यांना सहज दिसावीत हा त्यामागचा उद्देश. हळूहळू लोक ती पुस्तके तिथेच उभी राहून वाचू लागली. जपानी पुस्तक विक्रेत्यांनीही कधी वाचकांना हटकलं नाही. त्यांच्या मते अशाने वाचक पुस्तकांमध्ये गुंतता गुंतता आमचे ग्राहक बनतात.
टाचियोमीचे संस्कृतीत रुपांतर तेव्हा होऊ लागले, जेव्हा लोक येता जाता उभ्याने पुस्तकं वाचू लागली. म्हणजे कुठेही रांगेत उभे असतील, गर्दीने भरगच्च गाडीतून प्रवास करताना बसायला जागा मिळाली नाही तर वाचतील. अशा पद्धतीने वाचन न थांबवता, वेळ वाया जाऊ नये या अनुषंगाने वाचन चालूच असे. याची नेमकी सुरुवात कोणी केली किंवा हा शब्द कोणी तयार केला हे मात्र माहीत नाही, पण वाचनसंस्कृती रुजवण्यासाठीचं टाचियोमी हे एक प्रभावी माध्यम ठरलं होतं.
‘टाचिनोमी’वरून ‘टाचियोमी’ झालं असावं का?
जपानमध्ये ‘बीअर कल्चर’ मोठ्या प्रमाणात आढळतं. जगभरात जपानी मद्य हे उच्च दर्जाचं मानलं जातं. मद्यपी उभ्याने मद्य पितात, त्याला टाचिनोमी म्हणतात. यासाठी बारमध्ये तशा सोयीदेखील केलेल्या आहेत. बीअर, साके, शोचू अशा अनेक प्रकारचे मद्य बीअर पार्लरमध्ये सहज उपलब्ध होते. संध्याकाळी ऑफिसातून सुटलेले चाकरमानी अशा बीअरबारमध्ये ‘टाचिनोमी’ करताना सहज आढळतात. ‘टाचिनोमी’वरून ‘टाचियोमी’ झालं असेल का, असाही एक अंदाज लावला जातो.
इंडोनेशियात ‘टाचियोमी’चा सर्जनशील प्रयोग
एस्का प्रसेत्या हे इंडोनेशियातील इंग्रजी या परदेशी भाषेचे शिक्षक आहेत. इब्न खाल्दुन विद्यापीठाच्या इंग्रजी संशोधन पत्रिकेत त्यांचा ‘टाचियोमी’वरील शोधनिबंध प्रसिद्ध झालेला आहे. इंडोनेशियातील मुलांना इंग्रजी शिकवण्यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रम तयार केलेले आहेत. मुलांमधील वक्तृत्व कौशल्य उत्कृष्ट दर्जाचे असण्यासाठी वाचन आवश्यक आहे. केवळ शिकवणीतून मुलांचं इंग्रजी सुधारणार नाही. वाचनामुळे मुलांना इंग्रजीची गोडी लागेलच, परंतु त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकासही होऊ शकतो हे प्रसेत्या यांच्या प्रयोगातून निष्पन्न झाले. याचसाठी प्रसेत्यांनी हा प्रयोग त्यांच्याच शाळेत करून पाहिला.
पश्चिम जावाती हा इंडोनेशियातील भाग आहे. या भागातील लोकांचे राहणीमान साधारण मध्यमवर्गीय आहे. इंडोनेशिया हा विकसनशील देशांपैकी एक, त्यामुळे इंडोनेशियात साक्षरतादेखील कमी, त्यात वाचनसंस्कृतीही जपानसारखी समृद्ध नाही. चांगली ग्रंथालयं, पुस्तकालय तिथे नाहीत, त्यामुळे मुलांमध्ये वाचनाची गोडी लागणं हे प्रसेत्या यांच्यासाठी आव्हान होते.
प्रयोगातून वाचन; वाचनातून शिक्षण; शिक्षणातून व्यक्तिमत्त्वाचा विकास
प्रसेत्यांनी त्यांच्याच शाळेत इयत्ता ११वीत शिकणार्या २० मुलांच्या वर्गावर हा प्रयोग केला. सर्वप्रथम मुलांकडून टाचियोमी करून घेण्यात आले.
त्यानंतर त्यांनी सर्वेक्षण पद्धतीचा वापर करून सहभागींना टाचियोमी ही संकल्पना काय आहे हे समजावून सांगितले. त्याप्रमाणे त्यांची मतेदेखील जाणून घेण्यात आली. यामध्ये सहभागी मुलांच्या गृहीतकांचा अभ्यास केला गेला.
पहिला टप्पा : मुलांना टाचियोमीविषयी माहिती देणं
यूट्यूबच्या माध्यमातून मुलांना सर्वप्रथम टाचियोमी काय आहे याविषयीची माहिती देण्यात आली. तत्पूर्वी मुलांकडून उभ्याने पुस्तक वाचून घेतांना ते ‘टाचियोमी’ करत आहेत याची कल्पना त्यांना देण्यात आली नव्हती. आता व्हिडीओ पाहिल्यावर त्यांना विचारले गेले, “व्हिडीओतील ‘टाचियोमी’ कृती आणि तुम्ही केलेला प्रयोग समान वाटतो का?”
उत्तरे तीन प्रकारे देण्यात आली :
१) आम्हीही ‘टाचियोमीच’ केले.
२) हे टाचियोमीशी समांतर वाटत आहे.
३) नाही हे टाचियोमी नाही.
२० पैकी १८ मुलांनी पहिलं उत्तर निवडलं आणि एका मुलाने दुसरं व एका मुलाने तिसरं उत्तर निवडलं.
दुसरा टप्पा : प्रश्नोत्तरे
मुलांना दोन प्रश्न विचारण्यात आले,
१) टाचियोमीमुळे ग्रंथविक्रेत्यांचा फायदा होईल का?
२) टाचियोमी संस्कृती वाचनसंस्कृतीला वृद्धिंगत करू शकेल का?
याबद्दल २० पैकी २० मुलांची उत्तरं समाधानकारक आलेली पहायला मिळाली. यातील काही उत्तरं ही पुढीलप्रमाणे होती, ‘ही खरंच खूप चांगली पद्धत आहे, याने वाचनक्षमता वाढू शकेल.’
‘मॉलमध्ये रांगेत असताना अनेकदा वेळ वाया जातो, याऐवजी आम्ही त्या वेळेचा उपयोग वाचन करण्यासाठी करू शकू.’
‘जपानची प्रगती का झाली असावी ते मला आता कळत आहे…’
असे अनेक सकारात्मक प्रतिसाद मुलांनी दिले. एका गेमर मुलाने स्वतःचा अनुभव सांगितला, “मला कधीच वाटलं नव्हतं मी वाचू शकेन, पण या पद्धतीने प्रवासात असताना, फिरताना मी वाचू शकतो हे माझ्या लक्षात आलंय.”
‘टाचियोमी’चे फायदे
टाचियोमी खरंच एक उत्कृष्ट संकल्पना आहे, याचे अनेक फायदे आहेत,
१) टाचियोमीमुळे वेळ वाया जात नाही. सतत काहीतरी वाचत राहिल्यामुळे माणूस कामात मग्न राहतो.
२) टाचियोमीमुळे एखाद्या सार्वजनिक जागेत शांतता राहते. लोक वाचनमग्न असल्यामुळे हळू आवाजात बोलण्याचा शिष्टाचार आपसुकच पाळतात
३) वाचनमग्न राहिल्यामुळे माणूस मोबाईल व इतर प्रलोभनांपासून दूर, काही वेळ स्वतःसाठी काढतो. विरंगुळा का होईना, वाचनामुळे माणसाचा वेळ सत्कारणी लागतो.
४) ‘टाचियोमी’मुळे वाचनसंस्कृती बहरत आहे, लोक वाचायला म्हणून पुस्तक घेतात आणि आवडल्यास ते विकतही घेतात; त्यामुळे पुस्तक विक्रेत्यांचाही यातून फायदा होतो.
५) टाचियोमी एक विनयशील सुसंस्कृत समाजाची निर्मिती करते. लोकांना चांगली शिस्त लागते. जगभरात वाचणारा समाज सुशिक्षित आणि सुसंस्कृत मानला जातो.
‘टाचियोमी’ला मर्यादा केव्हा येतात?
सगळेच पुस्तक विक्रेते जपानप्रमाणे उघड्यावर पुस्तकं विकत नाहीत. सर्वच देशांमध्ये ही संस्कृती नसल्यामुळे सगळीकडे ‘टाचियोमी’ला सुरुवात होण्यासाठी तिथल्या पुस्तक विक्रेत्यांनी मनावर घेणं आवश्यक आहे. कोणत्याही ग्रंथालयात अगर पुस्तकालयात, वाचकाला जे पुस्तक हवे ते त्या कप्प्यातून कुणाच्याही परवानगीशिवाय काढता येणं आणि वाचल्यावर पुन्हा ठेवता येण्याजोगं दुसरं स्वातंत्र्य नाही. मुक्त वाचनातून समाजनिर्मितीच होते, त्यामुळे ‘टाचियोमी’ वाचनाची पद्धती ही वाचनसंस्कृतीचा आदर्श ठरते; कारण वाचणारा समाजच चांगले नागरिक घडवू शकतो.
